राहुल गांधी यांचे महत्त्व सद्यस्थितीत आहे काय?

1
287

राहुल गांधी यांनी त्यांच्या आयुष्याशी जोडलेले सारे गौरवास्पद संदर्भ त्यांच्या समर्थनासाठी किंवा प्रचारासाठी वापरण्यास कायम नकार दिला. ही एकच गोष्ट आत्ताच्या सत्तेसाठी भिंत बनून उभी आहे. हिंदुत्वाला उत्तरेत उधाण आलेले असताना दक्षिणेने सातत्याने प्रागतिक भारतीयत्वाला स्वीकारलेले दिसून येते…

राहुल गांधी हे अलौकिक आहेत किंवा नाहीत, ते नेहरूंएवढे मोठे होऊ शकणार किंवा नाही हे मुद्दे फिजूल आहेत. त्या त्या वेळेला, त्या त्या काळाच्या पार्श्वभूमीवर धाक असणारी एक नैतिक शक्ती असावी लागते. आज भारत स्वातंत्र्योत्तर काळातील अशा कालखंडात आहे, की राजसत्तेला कोणाचाही नैतिक धाक उरलेला नाही. राजसत्ता निरंकुश तर आहेच, पण ती नैतिक दृष्ट्याही बेलगाम आहे. अशा वेळेला, त्या विषारीपणाचे पाणी जनतेच्या नाकातोंडात जात असताना त्या पाण्याची उंची मोजण्यास किमान एक फूटपट्टी लागते. ती फूटपट्टी राहुल गांधी हे आहेत. राहुल गांधी यांच्यामागे कोणता तेजस्वी इतिहास आहे किंवा जवाहरलाल नेहरू यांच्या तत्त्वज्ञानात किती भारतीयत्व आहे, हे येणारा काळ ठरवेल; परंतु एका शोकांतिकेचा नायक बनवल्या गेलेल्या शापित राजपुत्रासारखे आयुष्य जगणाऱ्या राहुल गांधी यांनी त्यांच्या आयुष्याशी जोडलेले सारे गौरवास्पद संदर्भ त्यांच्या समर्थनासाठी किंवा प्रचारासाठी वापरण्यास कायम नकार दिला. ही एकच गोष्ट आत्ताच्या सत्तेसाठी भिंत बनून उभी आहे. त्या भिंतीचा भारतीय इतिहासावर काय परिणाम होतो किंवा त्या भिंतीमुळे भारतीय इतिहासाला कोणते वळण लागते ते नाटकीय भाषणबाजीपेक्षा लोकांच्या आयुष्यावर झालेल्या खोल परिणामावरून भविष्यात पाहण्यास मिळेल.

राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत (2019) केरळमधील वायनाड मतदारसंघ निवडला. ते त्यांचा पारंपरिक मतदारसंघ अमेठीमधूनही उभे राहिले होते. ते अमेठीत पराभूत झाले आणि ते वायनाडमध्ये चार लाख एकतीस हजार मतांनी विजयी झाले. हिंदुत्वाला उत्तरेत उधाण आलेले असताना दक्षिणेने सातत्याने प्रागतिक भारतीयत्वाला स्वीकारलेले दिसून आले. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा मतदारसंघ आणि विजय हा खूप बोलका आहे. त्यातून सिद्ध काही होत नसेल तरी भारत हा अनेक वेगळ्या संस्कृतींचा देश आहे, ज्यामध्ये उत्तर आणि दक्षिण या दोन भिन्न जीवनशैली आहेत. देश त्यांना बरोबर घेऊन पुढे जाणार, का त्यांचे विभाजन करून भारत देशाला अंधाराच्या खाईत लोटणार हा प्रश्न राहुल गांधी यांनी वेगवेगळ्या माध्यमांतून पुन: पुन्हा विचारलेला आहे. तो प्रश्न आणि काही अंशी त्याचे उत्तर जवाहरलाल नेहरू यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या त्यांच्या पुस्तकात मांडले होते. राहुल गांधी हे 2014 ला किंवा 2019 लाही प्रश्न अशा स्वरूपात नव्हतेच. त्यानंतरच्या भारताच्या इतिहासात मात्र राहुल गांधी हे एक उत्तर म्हणून पुढे येण्याची शक्यता सतत असणार आहे.

देशामध्ये निवडणुका कशा लढल्या जातात, मग त्या इव्हीएम आणि निवडणूक आयोग यांच्या सहकार्याने कशा जिंकल्या जातात, न्यायालयात आणि आयोगाकडे त्याची दाद कशी मिळत नाही, हे सर्व पाहत असताना भारताची प्रगती व्हावी असे वाटणाऱ्या विज्ञाननिष्ठ लोकांना, जनतेला राहुल गांधी यांचा राग येतो. राहुल गांधी आक्रमकपणे काही करत का नाहीत असे त्यांना वाटते आणि त्याच वेळी त्यांच्या शत्रूंना त्यांना खोडत राहवेसे वाटते. हेच राहुल गांधी यांचे खरे यश आहे. त्याही पलीकडे जाऊन असे म्हणता येईल, की राहुल गांधी यांना आज भारतीय राजकारणात असण्याची जर काही अपरिहार्यता असेल, तर ती हीच आहे!

राजू परुळेकर
(‘वसा’ दिवाळी अंकावरून 2019 उद्धृत)
——————————————————————————————————————————————–

About Post Author

1 COMMENT

  1. राहुल गांधींची अनाठायी भलामण फक्त राजू परुळेकरांसारखे मोदी द्वेषी लोकच करू शकतात. त्यांना तुम्ही मोठे करत असल्याचा निषेध म्हणून तुमच्या टेलेग्राम चॅनेल ला रामराम करत आहे. राहूल गांधी हा मनुष्य या देशाला घातक आहे. मोदी भले चुकत असतील पण त्यांच्या देशहिताच्या भूमिकेबाबत मला तरी शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here