गोव्यात राहणाऱ्या राहुलने दहावी पास झाल्यानंतर, एक वर्षभर कॉलेजमध्ये प्रवेश न घेता, त्याला जे काही करावेसे वाटते ते केले. त्याच्या त्या वर्षभराच्या शाळाबाह्य शिक्षणाचे अनुभव म्हणजे ‘शाळेपासून मुक्ती- वर्षापुरती’ हे पुस्तक. त्याचा कालावधी जून १९९५ ते जून १९९६ असा आहे. ती कल्पनाच भन्नाट आहे. राहुलच्या आई-बाबांनी त्याला तसे करण्यासाठी परवानगी दिली; नव्हे, प्रोत्साहनच दिले!
राहुलचा परिवार त्यांच्या बाबांच्या मित्राकडे, सुट्टीत राहायला गेला होता. त्या मित्राच्या मुलीने व तिच्या मैत्रिणीने एक वर्ष शाळेपासून सुट्टी घेतली होती. त्या दोघी संपूर्ण देशभर फिरल्या-शिक्षणाच्या पर्यायी पद्धतीचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने. त्यावेळी राहुलच्या मनात शाळेपासून वर्षभर मुक्ती घेण्याचे बीज रोवले गेले. राहुलने सुट्टीच्या वर्षात काय काय करायचे, त्या कार्यक्रमाचा आराखडा आई-बाबांच्या मदतीने आखला. जून म्हणजे पावसाळ्याचे दिवस. त्यामुळे राहुलने गोव्यात राहूनच काहीतरी करावे, शिकावे, स्वत:चे व्यवहार स्वत: करावेत असे आई-बाबांनी सुचवले. राहुल म्हापशाच्या मत्सालयात मदतनीस म्हणून जाऊ लागला. मत्सालय, राहुलच्या बाबांच्या कॉलेजमित्राचे – अशोककाकांचे होते. राहुलला रोज सकाळी नऊ वाजता दुकानात पोचायला हवे असायचे. त्यासाठी सकाळी लवकर उठून, स्वत:चे आवरून, सायकलवरून जायचे म्हणजे वेळेचे नियोजन आले; ते राहुल शिकला. अशोककाका सांगतील ती कामे मत्सालयात करायची; राहुलला लहानपणापासून माशांची आवड होतीच. त्याने माशांवरची पुस्तके वाचलेली होती. तो अशोककाकांकडे राहून मत्सालय बनवायला शिकला.
त्यासाठी लागणाऱ्या सामानाच्या खरेदीपासून मत्सालयाची स्वच्छता राखणे, माशांची काळजी घेणे, त्यांना खाऊ घालणे, जखमी/आजारी माशांवर उपचार करणे, मासे विकत घेण्यास येणाऱ्या गिऱ्हाईकाशी संवाद साधणे याही गोष्टी राहुल शिकला. अशोककाका राहुलला बँकेचे व्यवहार – चेक भरणे, पैसे काढणे अशीही कामे सांगत. एकदा, एका मोठ्या हॉटेलमधीले मत्सालयातील मासे का मरतात अशी विचारणा मत्सालयाकडे झाली. अशोककाकांनी राहुलला एकट्याला त्याची माहिती घेण्यासाठी बऱ्याच दूर असणाऱ्या हॉटेलचा पत्ता देऊन, तेथे कसे जायचे ते सांगून पाठवले. राहुलने त्या अनुभवाचे वर्णन छान लिहिले आहे. राहुल घरी असताना रविवारी सुट्टीच्या दिवशी, हातखर्चासाठी पैसे मिळावे म्हणून घरची कामेही करू लागला. बाबांची कार धुणे (पाच रुपये), आईला किराणा माल आणून देणे (तीन रुपये), विजेचे बिल भरणे (दोन रुपये) इत्यादी. त्याने ‘खरी कमाई’ केली. राहुल स्वत:ची कामे स्वत: करायला शिकला. राहुलची तीन गिअरवाली सायकल एकदा नादुरुस्त झाली. आईने स्वत:बरोबर राहुलला पणजीला नेले. तेथील रस्ते, दुकाने वगैरे माहिती तोंडी सांगितली. ती तिच्या कामाला निघून गेली. राहुलने मग स्वत: फिरून दुकान शोधून काढले. तीच आईची इच्छा होती, हे महत्त्वाचे!
राहुलने दुसरा अनुभव शेतीचा घेतला. राहुलच्या बाबांचे मूळ गाव ‘परा’. राहुल तेथे एका ओळखीच्या शेतकरी कुटुंबात महिनाभर राहिला. नांगर चालवणे, नांगरणी झाल्यावर जमीन समतल करणे याचा अनुभव राहुलने घेतला. तो स्वत:चे घर सोडून, इतर कोणाकडे राहतो तेव्हा त्याला स्वत:च्या आवडी-निवडी, खाण्याच्या सवयी यांना मुरड घालावी लागते. तो त्या विषयी प्रांजळपणे लिहितो. राहुल त्याच्या घराजवळील दोन खेड्यांमध्ये भरणाऱ्या ‘वनस्पती उत्सव’ या प्रदर्शनाला गेला. त्याने प्रदर्शन पाहिले, दुसऱ्या प्रदर्शनात तो सहभागी झाला. त्याने प्रदर्शनातील झाडा-झुडुपांचे वर्णन छान केलेले आहे. त्याने तेथे सेंद्रीय शेतीविषयीची व्याख्याने ऐकली. राहुलच्या वडिलांनी प्रदर्शनाला जाण्यापूर्वीच त्याची त्याबाबतची तयारी करून घेतली होती.
राहुल ‘ग्रीन हेरिटेज’ या प्रदर्शनाच्या ठिकाणी अॅलेक्सीकाकांकडे राहिला होता. राहुलने अॅलेक्सीकाकांबरोबर जाऊन प्रदर्शनाचे साहित्य गोळा करणे, त्यावर चिठ्ठ्या लावून नावे, नंबर लिहिणे, प्रदर्शनानंतर साहित्ये परत करणे. प्रदर्शनात कुंड्या मांडणे अशी कामे केली. राहुलने त्या समारंभाचे वर्णन सविस्तर केले आहे. ‘ग्रीन हेरिटेज’ तीन भागांत होते. प्रदर्शन, विविध विषयांवरील भाषणे, वनस्पती जगाशी संबंधित स्पर्धा. तेथे बागकामाची विविध आयुधेही विक्रीसाठी होती.
वेगवेगळ्या गोष्टी शिकत असताना राहुलच्या ओळखी अनेक लोकांशी होत गेल्या. त्यातूनच एखादी नवीन उपक्रमाची कल्पना सुचत होती. ‘ग्रीन हेरिटेज’मध्ये भेटलेल्या ब्रिगांझा यांच्या मुळे, राहुलला अळंबी वाढवायच्या दोन दिवसांच्या अभ्यासवर्गाविषयी समजले. राहुल तिकडेही गेला. भाषणे, प्रात्यक्षिके होती. अळंबीच्या विविध जाती, त्यांची काळजी कशी घ्यावी, त्यावर पडणारे रोग, अळंबीचे पोषणमूल्य अशी माहिती त्याला मिळाली. पहिल्या दिवसाचा कार्यक्रम संपल्यावर, राहुल हा एकटाच फार्मवर राहणारा होता!
बाबांनी स्वत:बरोबर राहुलला कोट्टायमला नेले होते. तेथे त्यांचे सेंद्रीय शेतीवर व्याख्यान होते. परतीचा प्रवास राहुलला एकट्याला करायचा होता. पुढे तो पुण्याजवळील कात्रजच्या सर्पोद्यानात तीन आठवडे जिवंत सापांच्या दुनियेत राहिला. सर्पोद्यानाचे संचालक निर्मलकुमार खैरे यांच्याकडून राहुल अनेक गोष्टी शिकला.
राहुलने सापांच्या अनेक जाती प्रत्यक्ष पाहिल्या, हाताळल्याही. सापांना लागणारे खाद्य – जिवतं बेडूक – तो तेही पकडण्यास शिकला. जंगली डुक्कर, उदमांजर, खोकड, शिक्रापक्षी, मुंगूस, घुबड, गरूड असे जखमी अवस्थेतील प्राणी तेथे आणले जातात व त्यांच्यावर उपचार करण्यात येतात, तेही त्याने पाहिले. तीन आठवड्यांच्या शेवटी, राहुलच्या हातावर पंधरा-वीस वेळा साप चावल्याचे व्रण होते!
राहुलने एकट्याने दादर ते चेन्नई हा प्रवास ट्रेनने केला. राहुलने चेन्नईतील डॉ. इस्माईल यांच्या गांडूळ संस्थेत, गांडूळ व गांडुळखताचा अभ्यास केला. चेन्नईला भाषेची अडचण होती. तरीसुद्धा त्याने निभावून नेले. चेन्नईला राहुल मनूकाकांकडे राहिला. राहुल सकाळी लवकर उठून, आवरून, सातपूर्वीच घर सोडून साडेआठ वाजेपर्यंत कॉलेजवर पोचत असे. परतीचा प्रवास दुपारी चारपर्यंत सुरू करायचा. डॉ. इस्माईल यांनी सांगितलेली गांडुळांवरील पुस्तके वाचून तो टिपणे काढत असे. राहुलने प्रत्यक्ष निरीक्षणे करून, गांडुळांचे विविध प्रकार – त्यांच्या हालचाली, सवयी, रंग, त्यांची वैशिष्ट्ये यांचाही अभ्यास केला. राहुलने मातीची सच्छिद्रता, आर्द्रता, पोत यांचा तसेच मातीमधील अनेक सजीवांचाही अभ्यास केला. त्याचे चेन्नईच्या मुक्कामातील केलेल्या साहसांविषयीचे वर्णन प्रत्यक्ष वाचले पाहिजे असेच आहे.
इंडियाची स्पायडरवुमन म्हणून ओळखल्या जाणा-या के. विजयलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचे व कोळ्यांविषयी शिकण्याची संधी राहुलला लाभली. राहुलने त्यांचा मदतनीस म्हणून पंधरा दिवस काम केले, कोळ्यांविषयी निरीक्षण केले. ‘जायंट क्रॅब स्पायडर’ या कोळ्याच्या वेगळ्याच जातीविषयीही राहुल लिहितो. रोम्युलस व्हिटेकर हे सर्पतज्ज्ञ आता क्रोकोडाईल बँक चालवत होते. राहुल एक महिना, जंगलाच्या जास्तीत जास्त जवळ राहिला. क्रोकोडाईल बँकेत छोट्या हौदात कासवे होती. मोठे मत्सालयही होते. त्याच परिसरात एक ग्रंथालयही होते. घोरपड, सरडा अशा अनेक प्राण्यांच्या सहवासात, त्यांची माहिती घेत, त्यांच्या नोंदी करत, आलेल्या पाहुण्यांना माहिती सांगत, राहुलचा एक महिना कधी व कसा संपला हे त्याचे त्यालाच कळले नाही.
पाँडेचरीला अरबिंदो आश्रमात डोळ्यांवर उपचार केले जातात असे राहुलला, क्रोकोडाईल बँकेत असताना समजले होते. राहुलला चष्मा आहे. त्यामुळे नियमित व्यायाम करून दृष्टिदोष सुधारता येतो. राहुल ते व्यायाम शिकण्यासाठी एकटा पाँडेचरीला गेला. राहुलची राहण्याची व्यवस्था आश्रमाजवळ राहुलच्या एका मित्राने विनामूल्य केली खरी, पण तेथून आश्रमात जाण्यासाठी अंदाजे बावीस किलोमीटर सायकलिंग करावे लागे. त्या प्रवासात राहुलला कसे गंडवले गेले तो किस्साही रोचक व उद्बोधक आहे.
राहुलने प्रवासाची सांगता ‘बेतीम’च्या जंगलभेटीने केली. ‘गोवा फाउंडेशन’ने तो प्रकल्प कॉलेज विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता. पर्यावरणविषयक प्रकल्प असल्यामुळे, राहुलने नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. त्या प्रकल्पांतर्गत जंगल किती व कोठे शिल्लक आहे? कोठे जंगल तोडले आहे? कोठे बांधकाम केले आहे? असा अभ्यास होता. राहुलने चार दिवस जंगलातही तंगडतोड केली. तो तेथे थोडा कंटाळला पण त्याने काम पूर्ण केले.
राहुल सुट्टीनंतर कॉलेजात प्रवेश घेणे, त्यासाठी फॉर्म भरणे अशी बेचव कामे करण्यात व्यस्त होता. त्याच वेळी एक अनपेक्षित आश्चर्य त्याच्या वाट्याला आले. ५ जून हा ‘पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून राहुलला बेळगावहून आमंत्रण आले! राहुलला वर्षभर काय केले, त्या अनुभवांविषयी, विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा होता. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही असणार होते. आईने राहुलला टिप्स दिल्या. राहुलचे भाषण छान झाले. राहुलने भाषणानंतर प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात, विचारल्या गेलेल्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तरे दिली. राहुलच्या मते, त्याच्या वर्षभराच्या शाळेपासून मुक्तीचा तो कळस होता.
राहुलने त्या एका वर्षात प्रत्येक गोष्टीची, माहितीची तपशीलवार नोंद केली. त्याची परिणती म्हणजे हे पुस्तक होय. पुस्तक मनोविकास प्रकाशनाचे आहे. आज, वीस वर्षांनंतर राहुल काय करत आहे हे जाणून घेण्यास मी उत्सुक होते. त्या वर्षभराच्या अनुभवात राहुलने M.sc. – ecology of environment केले आहे.
आजच्या राहुलची ओळख ही अशी आहे –
• Herpetologist & wildlife expert , लेखक म्हणून त्याची प्रसिद्ध झालेली पुस्तके – १. शाळेपासून मुक्ती – वर्षापुरती (वयाच्या सतराव्या वर्षी लिहिले), २. Call of snakes, 3. Birds of Goa (Rahul & HeingLainer), फोटोग्राफर – पक्षी-प्राणी, फिटनेस इन्स्ट्रक्टर, Pain थेरपिस्ट
राहुल सध्या पुढील टूर्स नेतो – Birds watching & Nature Excursions in Goa, Jungle camping, Snake trip – (तीन तासांची), Photography workshop – (तीन दिवसांचे), Night Watch
राहुल अल्वारिस – 9881961071
– पद्मा कऱ्हाडे
chhhan
chhhan
Comments are closed.