राम (फड) नावाचा मेळघाटातील देवदूत

0
38
_Ramfad_navacha_melghatatil_devdut_1.jpg

कुपोषण आणि बालमृत्यू यांच्या मेळघाटातून येणाऱ्या बातम्या 1995-96 च्या सुमारास समाजमन ढवळून काढत होत्या. त्या संकटावर मात करण्यासाठी काम उभे करण्याचे पुण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल शिदोरे यांनी तरुणांना आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत कुपोषित आदिवासींचे दुःख वाटून घेण्यासाठी काही शिक्षित तरुण मेळघाटाकडे सरसावले. रामभाऊ फड हे त्यांतील एक. रामभाऊंचे औरंगाबादला बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात एम ए पर्यंतचे शिक्षण झाले होते. त्यांचा इरादा प्राध्यापक होण्याचा होता, पण त्यांची पावले कुपोषणाचे भयाण वास्तव ऐकून मेळघाटाच्या दिशेने वळली. त्या वेळी त्यांच्यासोबत गेलेल्या तरुणांपैकी काही आठ दिवसांनी, काही महिन्यांनी, तर आणखी काही वर्षभराने परतले. रामभाऊ मात्र गेली वीस वर्षें मेळघाटात किलाटी गावात जगण्याचा अर्थ शोधत आहेत!

रामभाऊ मूळचे परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील कोद्री या गावचे. ते  मेळघाटात आले तेव्हा, मेळघाटात कुपोषित बालकांच्या मृत्यूंचे प्रमाण हजारांमागे एकशेवीस असे होते. आज, वीस वर्षांनंतर, ते प्रमाण चाळीसपर्यंत घसरले आहे. अर्थात, रामभाऊ फड समाधानी नाहीत… “जोपर्यंत ते प्रमाण शून्यावर येत नाही, तोपर्यंत मला ती वस्ती सोडणे शक्य नाही. पण शासनाची उदासीनता पाहता मी मरेपर्यंत तरी ते प्रमाण शून्यावर येईल असे वाटत नाही.” – रामभाऊ मनातील खंत बोलून दाखवतात.

रामभाऊ ‘मेळघाट मित्र’शी जोडले गेले आहेत. ‘मेळघाट मित्र’ ही चळवळ पुण्यात संघटित झाली. अनिल शिदोरे हे तिचे प्रणेते. ती मंडळी विविध कार्यांत गुंतलेली आहेत. मेळघाटातील आरोग्यविषयक काम हा त्यांपैकी एक भाग. त्यातून वर्षाकाठी जवळपास शहाऐंशी बाळांना जीवदान मिळते. रामभाऊ हे त्या कामातील मोठे घटक आहेत. त्यांचे बालपण दैन्यावस्थेत गेले. घरी शेती नव्हती, वडील धान्य घेऊन कपडे शिवून द्यायचे, त्यात पाच भाऊ आणि आईवडील यांचे पोट भरायचे नाही. त्यांना मिनतवाऱ्या करून वसतिगृहात प्रवेश मिळाला व तसे शिक्षण घेण्याची वेळ आली. रामभाऊ ‘रूममेट्स’चे कपडे धुऊन द्यायचे, त्यांच्याच खर्चात शिक्षण घ्यायचे. त्यांना स्वत:च्या गरिबीचे वैषम्य वाटायचे. पण ते जेव्हा मेळघाटात आले आणि त्यांनी भुकेने मरणारे आदिवासी पाहिले, तेव्हा त्यांना त्यांचे स्वतःचे दुःख क्षुल्लक वाटू लागले. त्यानंतर त्यांचा पाय मेळघाटातून बाहेर निघाला नाही.

_Ramfad_navacha_melghatatil_devdut_2.jpgपण त्यांना तेथे राहताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात मेळघाटातील नद्यांना येणारा पूर जीवघेणा असतो. पंधराएक वर्षांपूर्वी ते कामानिमित्त भरपावसात नदी ओलांडून दुसऱ्या गावात जात होते. सोबत दोन-तीन पुरुष आणि एक अंगणवाडी सेविका होती. ते चार-पाच जण एकमेकांच्या हाताला धरून नदी ओलांडत असताना, त्या अंगणवाडी सेविकेचा हात अचानक सुटला आणि ती पुरात वाहून गेली. अंगणवाडी सेविकेचा मृतदेह दोन दिवसांनी शंभर किलोमीटर अंतरावर आढळला. त्यानंतर एकदा, रस्त्याने मोटारसायकलने प्रवास करत असताना, तुफान पाऊस पडून गेला होता. रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत होते. पाण्याचा प्रवाह जोरात असला, की पाणी भररस्त्यावर मोठे खड्डे करते, तसाच एक खड्डा चेल्हाटी-हातरू रस्त्यावर झाला होता. रामभाऊंना पाण्यात त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे रामभाऊ यांच्यासह, त्यांचे दोन मित्र मोटारसायकलसह त्या खड्यात पडले. त्याही रात्री, ते खड्ड्यातून कसे बाहेर आले त्याची कहाणी अंगावर काटा उभा करणारी आहे. रामभाऊंनी मेळघाटात अशा अनेक संकटांवर मात करून उभारलेले काम थक्क करणारे आहे.

‘मेळघाट मित्र’चे स्वंयसेवक त्या भागातील पस्तीस गावांतील आदिवासी पाड्यांवर, शेतात, डोंगरात, आदिवासी जेथे असतील तेथे जाऊन कुपोषित मुले शोधायचे. त्यांच्या आई-वडिलांना समजावून त्या मुलांना रुग्णालयात ‘अॅडमिट’ करून घ्यायचे. त्यामुळे मुलांना वेळीच योग्य उपचार मिळू लागले आणि मुलांचे प्राण वाचू लागले. ते काम स्थानिक पातळीवर रामभाऊ हाताळायचे. त्यावेळी रामभाऊंच्या लक्षात एक बाब आली, की ती सगळी मुले कुपोषित जन्माला येतात, तेव्हा कुपोषित मुलांवर उपचार करण्याबरोबर गरोदर मातांवरही उपचार करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने त्यांनी कामाला सुरुवात केली. कधीच रुग्णालयात न जाणाऱ्या त्या भागातील गरोदर महिलांच्या दारात स्वयंसेवक ‘रुग्णालय घेऊन’ जाऊ लागले. त्या महिलांचे वजन, हिमोग्लोबिनचे प्रमाण, बाळाची स्थिती यांची काटेकोर तपासणी सुरू झाली. त्यातून समोर आलेली परिस्थिती भयावह होती. त्या भागातील नव्वद टक्के महिला या गरोदरपणात पौष्टिक आहार घेत नव्हत्या, त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन कमालीचे कमी होते. ‘मेळघाट मित्र’च्या स्वयंसेवकांनी गरोदर महिलांना हिमोग्लोबिनच्या गोळ्या रोज घरी जाऊन देण्यास सुरुवात केली. त्याचाही त्या भागात चांगला परिणाम दिसून आला.

‘मेळघाट मित्र’ने त्यांचे काम त्याहीपुढे नेले आहे आणि त्या भागात मानधन देऊन 1. बोको मित्र (बोको म्हणजे कोरकू भाषेत लहान मूल), 2. आरोग्य मैत्रीण, 3. शेती मित्र, 4. शिक्षक मित्र अशी माणसे नेमली आहेत. त्याचा परिणाम असा झाला, की आदिवासींना हयातीत पहिल्यांदा घाटाखालील मित्र मिळाले, त्यांना जगाचे ज्ञान होऊ लागले आणि आदिवासी हुशार होऊ लागला. मेळघाटात कोरकू आदिवासी आरोग्यमैत्रिणी स्थानिक पातळीवर काम करतात. त्या गावात कोणी गरोदर आहे का? नवीन लग्न कोणाचे झाले आहे? तसेच, बाळाचे स्वास्थ्य? अशी सर्व चौकशी करतात. त्यांना लिहिता, वाचता येतेच असे नाही. पण त्यांचे काम दिसते. त्यातून आरोग्यविषयक काम सुदृढ होत जाते.

‘मेळघाट मित्र’ने आणखी एक दूरगामी प्रयोग राबवला, तो म्हणजे शिकलेल्या काही तरुणांना निवडणूक लढण्यास प्रोत्साहित केले. त्याचे फलित म्हणून हातरू – चिलाटी ग्रामपंचायतीवर संस्थेचे मार्गदर्शन लाभलेला मुलगा सरपंच झाला आहे. कालू बेटेकर असे त्या सरपंचाचे नाव आहे.

_Ramfad_navacha_melghatatil_devdut_3.jpgरामभाऊ यांचे स्वत:चे सरकारी अधिकाऱ्यांसोबत संबंध चांगले आहेत. ते‘मेळघाट मित्र’चे स्थानिक प्रमुख आहेत. ते शिक्षण, शेती, आरोग्य यांचे नियोजन आणि पुण्याच्या मंडळींबरोबर दुवा साधण्याचे काम करतात. ते चतुरस्र आहेत, सर्वाधिक अनुभवीही आहेत. त्यांना तेथील इतिहास आणि भविष्य यांची जाण आहे. रामभाऊ रुग्णांना रात्री-बेरात्री वाहनांवरून घेऊन जात असतात.

मेळघाटात रामभाऊंच्या पुढाकाराने ‘बालकदिन’ साजरा केला जातो. ‘सुदृढ बालक’ स्पर्धा घेतली जाते. त्यावेळी मोठा समारंभ होतो. त्यात बक्षिस म्हणून त्यांना लागणाऱ्या वस्तू दिल्या जातात. उदाहरणार्थ प्रेशर कुकर (त्यातील विज्ञान त्यांना शिकवले जाते), पिंप, एखाद्या संघाला भांड्याचा सेट, मंडप बांधण्याचा सेट, भजनासाठी वाद्ये दिली जातात. तेथे शिक्षणात कोरकू मातृभाषा, हिंदी व्यवहाराची भाषा आणि मराठी ही शाळेत शिकवली जाणारी भाषा असे त्रिभाषा सूत्र आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण अवघड होते. ते त्यांना रंजकपणे खेळ, गाणी, गोष्टी आणि कोडी घालून शिकवले जाते. त्यासाठी तीन-चार स्वयंसेवकांचे गट वर्षातून तेथे तीन-चार वेळा जातात. गावमित्र मुलांना शाळेत जाण्यासाठी प्रेरित करतात. तेथील लोक शेतीवर अवलंबून आहेत. त्यांच्यापर्यंत शेतीच्या अभिनव गोष्टी पोचाव्या – उदाहरणार्थ सुधारित बी-बियाणे वापरून काय उपयोग होतो, सेंद्रीय शेती आणि रासायनिक शेती यांतील फरक यांबाबत मार्गदर्शन केले जाते. ‘लगान’, ‘स्वदेश’ यांसारखे सिनेमे दाखवले जातात. तेथे दरवर्षी मनोरंजन आणि चुरशीच्या स्पर्धा या गोष्टींचे आयोजन करण्याकरता एक गट जातो. शिरीष जोशी व मंगेश जोशी हे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासोबत तेथील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ते काम शेतीसुधार गट करतो. असे विविध काम ‘मेळघाट मित्र’मार्फत तेथे चालते.

रामभाऊंच्या गेल्या वीस वर्षांपासून सुरू असलेल्या त्या कामाची पावती त्यांना मिळू लागली आहे. ते त्या परिसरातील गावांत फिरू लागले, की लहानलहान मुले, माणसे, बायाबापड्या, तरुण पोरे त्यांच्याभोवती पिंगा घालू लागतात, हजार प्रश्न विचारतात-बोलतात; जणू कोणी देवदूत आला आहे या भावनेने त्यांची पखरण करतात… रामभाऊ फड जर त्या भागात आले नसते आणि त्यांनी तेथे आयुष्य घालवले नसते तर आज त्यांच्याभोवती पिंगा घालणाऱ्या असंख्य मुलांपैकी किती तरी जण कुपोषणाचे बळी ठरले असते! अनेकांना तर जन्माचेही भाग्य लाभले नसते. रामभाऊंनी स्वतःच्या स्वप्नांवर पाणी टाकून मेळघाटाला कवटाळले, म्हणूनच मेळघाटात होणारी ‘कोवळी पानगळ’ रोखता आली.

– दत्ता कानवटे, dattakanwate@gmail.com

(दिव्यमराठी ‘रसिक पुरवणी’वरून उद्धृत, जयश्री शिदोरे यांनी दिलेल्या अधिक माहितीसह)

About Post Author