राधिका वेलणकर ही बायोमेडिकल डिझाइन इंजिनीयर. ती अॅम्प्लिट्यूड ऑर्थो या कंपनीत दोन वर्षे काम करत होती. राधिका नोकरी करताना माहितीपट किंवा इतर कार्यक्रम यांना आवाज पुरवण्याचेही काम करत असे. त्यातून तिला कलात्मक आनंद लाभे. मात्र तिला त्या आनंदाला नोकरीच्या बंधनामुळे मोकळेपणाने सामोरे जाता येत नव्हते. तिला तिचा ‘आवाज’ अस्वस्थ करत होता. ती नोकरी आणि इतर अॅक्टिव्हीटी यांमध्ये गुंतलेली असली तरी तिला स्वतःचे ध्येय गवसल्याची भावना झाली नाही. म्हणून तिने नोकरीचा राजिनामा दिला!
राधिकापुढे ‘आता काय’ असा प्रश्न होता. तिने ‘वनवासी कल्याणाश्रम’ या संस्थेस संपर्क केला. तिचे वडील डॉ. यश वेलणकर यांनीही एकेकाळी वनवासी कल्याणाश्रम योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवा केली होती. राधिकाला कल्याणाश्रमामार्फत अरूणाचलमध्ये ‘सेवाभारती’ संस्थेतर्फे सुरू असलेल्या विविध उपक्रमांसंबंधात माहिती मिळाली. राधिकाला ते काम करून पाहावेसे वाटू लागले. तिने संस्थेला तसे कळवले. राधिकाची अरूणाचलमधील आदिवासी प्रदेशातील शालेय विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या कामासाठी निवड झाली आहे. राधिका 21 सप्टेंंबर 2016 रोजी विमानाने अरूणाचलकडे झेपावली. तिचे अरूणाचलमधील आदिवासी भागात वास्तव्य डिसेंबर 2016 च्या अखेरपर्यंत आहे. ती तेथे राहून विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करणार आहे.
राधिका प्रथमच या प्रकारच्या कामासाठी आणि दीर्घ वास्तव्यासाठी महाराष्ट्राबाहेर गेली आहे. व्यवस्थित नोकरी, पैशांची हमी, थोडाबहुत मिळणारा कलात्मक आनंद अशी सर्वसाधारण जीवनचौकट राधिकाला रुचली नाही. म्हणून ती हा कम्फर्ट झोन सोडून त्यापलीकडील जगाच्या वाटा धुंडाळत स्वतःचा शोध घेण्यास बाहेर पडली आहे. ती या क्षणी अरूणाचलमधील आदिवासी प्रदेशांमध्ये फिरून विद्यार्थ्यांना भेटत असेल. राधिकाला तेथे राहून काम करण्यांचा अनुभव महत्त्वाचा आणि उत्साहवर्धक वाटतो. राधिकाचा सांगण्याचा सूर असा, की ‘माझ्या या निर्णयाने मला हवी असलेली दिशा मिळाली असे नाही. पण कदाचित त्यातून माझी नेमकी दिशा कोणती ते मला गवसू शकेल. यापुढे काय हे मला सध्या ठाऊक नाही. मात्र या वेगळ्या अनुभवाला सामोरी जाण्यात उत्सुकता वाटते.’
राधिका वेलणकर – 8275235629
– किरण क्षीरसागर