राधारमण कीर्तने – अमेरिकेतील संगीत गुरू (Radharaman Kirtane – Music Teacher In US)

2
43
राधारमण कीर्तने
आम्ही एक सांगीतिक कार्यक्रम घेऊन फ्लोरिडामधील मराठी मंडळ टॅम्पा बे येथे गेलो होतो. तेथे स्थानिक गायिकेचाशोध घेतला असता पं. जसराज स्कूलची विद्यार्थिनी, जान्हवी केंडे हिचा संपर्क मिळाला. जान्हवीने आम्हाला कार्यक्रमात उत्तम साथ दिली. कार्यक्रमानंतर, तिने तिच्या गुरुजींची ओळख करून दिली. ते होते राधारमण कीर्तने. ते जसराज यांचे शिष्य. राधारमण व मी पूर्वीनाट्यसंपदाकंपनीत नाट्यकलावंत होतो. त्यामुळे आम्ही एकमेकांना ओळखलेपरंतु राधारमण आता, गेली सोळा वर्षे अमेरिकेत आहेत आणि जसराज स्कूलच्या टॅम्पा बे शाखेची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे.

राधारमण यांचा जीवनप्रवास अचंबा वाटावा असा आहे. कीर्तने परिवार दादरच्या शिवाजी मंदिर नाट्यगृहाजवळ राहतो. त्यांतील राधारमण हा मुलगा संगीताची जाण उपजत घेऊन आला होता. घरात संगीताचे वातावरण होते; सर्वजण सतत आकाशवाणीवर नाट्यगीते ऐकत असत. राधारमणची नेमणूक शाळेत सर्व विद्यार्थ्यांना प्रार्थना सांगण्यासाठी होत असे. मनोरमा फाटकबाई दादरच्या समर्थ विद्यालयात संगीत शिकवत. राधारमण यांनी त्यांच्याकडून संगीताचे प्राथमिक धडे घेतले. राधारमण थोडे मोठे झाल्यावर रामदास कामत यांची नाट्यगीते हुबेहूब म्हणत. नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेच्या लक्ष्मण गावडे यांनी त्याला हेरले आणि त्या चुणचुणीत गायक मुलाला कट्यार काळजात घुसली नाटकातील छोटा सदाशिवही भूमिका करण्याची संधी मिळाली. वसंतराव देशपांडे वगैरेंसारखे मोठे गायक त्या नाटकात काम करत. राधारमण यांनी शाळा सांभाळून त्या नाटकाच्या दोनशे प्रयोगांत काम केले. त्यानंतर त्यांनीनाट्यसंपदाच्यासंत तुकाराम, ‘महाराणी पद्मिनीअशा नाटकांत भूमिका केल्या. राधारमण एक कलाकार म्हणून वसंतराव देशपांडे, भार्गवराम आचरेकर, शंकर घाणेकर, प्रसाद सावकार, अतुल व्यास, फैयाज, बालकराम, दिनकर पणशीकर अशा मोठ्या कलाकारांबरोबर घडत गेले. त्यानी त्यांच्यापैकी काही जणांबरोबर नाट्यसंगीताचे स्वतंत्र कार्यक्रमदेखील केले. नट बालकराम यांनी राधारमण यांचा विकास व्हावा असे स्वप्न पाहिले आणि त्यांनी त्यांचे गुरुबंधू पंडित वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे राधारमण यांची संगीत शिक्षणाची सोय केली. राधारमण कीर्तने यांना तेथे संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळून, त्यांच्या कलेला आकार येऊ लागला.

त्याच दरम्यान, राधारमण यांनी पंडित जसराज यांचे गायन ऐकले व त्यांना जसराज यांचे शिष्य होण्याची मनीषा निर्माण झाली. पंडितजींनी त्यांची परीक्षा त्यांना एक गाणे म्हणण्यास सांगून घेतली. राधारमण यांनी त्यांना कट्यार काळजात घुसलीमधील नाट्यगीत गाऊन दाखवले. जसराज यांनी त्यावर मान डोलावली. तोच त्यांनी राधारमण यांना शिष्य म्हणून स्वीकरल्याचा रूकार होता. जसराज म्हणाले,आओ कभीमगर फोन करके आना. राधारमण यांच्या आयुष्याला ते एक मोठे वळण ठरले. राधारमण त्यांच्या आईसमवेत जसराज यांना भेटण्यास 1977 साली अक्षय तृतीयेच्या दिवशी गेले. त्यांनी गुरुपूजा करण्यासाठी हार-नारळ बरोबर नेला होता; तसेच, शुभशकुन म्हणून एक पाकिटही सोबत होते. जसराज यांनी हार-नारळ स्वीकारला, पैसे घेण्यास नकार दिला. ते म्हणाले, मी गाणे शिकवणीचे कोणतेही पैसे घेत नाही.

जसराजजी राधारमण कीर्तने सन्मानित करतानाचा क्षण

जसराज यांच्या घरी शिष्यांचा राबता चोवीस तास असे. गायक संजीव अभ्यंकर हे जसराज यांचे शिष्य आहेत. ते जसराज असताना पुण्याहून मुंबईत येत व जसराज यांच्याकडे संगीत/गायन शिकत. शनिवाररविवार तो शिकवणीचा कार्यक्रम त्यांच्या घरी चाले. गुरुपौर्णिमा दरवर्षी जंगी प्रमाणात साजरी होत असे. त्यावेळी सगळे शिष्य त्यांच्यासमोर कला सादर करत. एका वर्षी, कीर्तने यांची गाण्याची वेळ आली तेव्हा पहाटेचे सुमारे तीन वाजले होते. जसराज बराच वेळ इतर शिष्यांचे गाणे ऐकत बसल्यामुळे थोडे थकले होते. त्यामुळे ते आतील खोलीमध्ये विश्रांती घेण्यास गेले. पण कीर्तने यांच्याराग बैरागीची आलापी जसजशी बहरू लागली तसे जसराज बाहेर येऊन, समोर बसून ऐकू व दाद देऊ लागले. ते कीर्तने यांना गाणे संपल्यानंतर म्हणाले, “तुम अभी आधेपौने गवैया बन गये हो. कुछ थोडी चीजोंका अभ्यास करोगे तो और अच्छे गाओगे.” कीर्तने म्हणाले, की असे थोर, प्रेमळ गुरू होते ते.

राधारमण यांना ध्वनिमुद्रण व अन्य क्षेत्रांतील अनुभवही त्या काळात मिळाला. रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये काही मोठ्या कलाकारांसाठी डमी गाणी (Que Tracks) गाणे, कधी दूरदर्शनवरील कार्यक्रमांसाठी संगीतात रिसर्च करणे, तर कधी एखाद्या रिॲलिटी शोमध्ये सहभागी सिंगिंग स्टारना मार्गदर्शन करणे, संगीत स्पर्धाचे परीक्षक म्हणून काम पाहणे अशी विविध कामे ते पूर्ण हिंमतीने व हिकमतीने करत गेले. ते हरि ओम शरण, अनुराधा पौडवाल, अनुप जलोटा, साधना सरगम, सुरेश वाडकर, श्रीधर फडके यांच्यासाठीहीQue Tracks गायले आहेत. एकदा तर त्यांना गीत रामायणाच्या Cassette साठी पंधरा गाणी गाण्याचा योग आला. तो प्रसंग संगीत संयोजक अप्पा वढावकर, तबला वादककेदार पंडित यांच्या मार्गदर्शनाने व साथसंगतीत पार पडला होता अशी कीर्तने यांची आठवण आहे. त्यांना संगीतकार प्रभाकर पंडित, संगीतकार नंदू होनप यांनीदेखील ध्वनिमुद्रणाच्या संधी दिल्या.

कीर्तने टॅम्पाच्या जसराज स्कूल ऑफ म्युझिकचे काम 2004 सालापासून पाहत आहेत. त्यापूर्वी तेअनुराधा पाल म्युझिक स्कूलमध्ये संगीत शिक्षक म्हणून मुंबईला काम करत होते. त्यामुळे त्यांना शास्त्रीय संगीत शिकवण्याचा अनुभव मिळाला होता.

जसराज यांनी कीर्तने यांना टॅम्पाच्या स्कूलमध्ये शिकण्यास जावे असा निरोप फक्त दिला होता. कीर्तने यांनी गुरूची आज्ञा म्हणून अमेरिकेला निघण्याची तयारी सुरू केली. पासपोर्ट-व्हिसा तयार होत होते. तेवढ्यात एक अपघाती घटना घडली. महिन्याभरात अमेरिकेला जायचे तोच कीर्तने यांना भारतातच प्रवासादरम्यान बसमध्ये धक्का लागून प्रचंड अपघात झाला. त्यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या पत्नी त्यावेळी नायर हॉस्पिटलमध्ये काम करत असत. राधारमण यांच्यावर काही दिवस तेथे उपचार झाले. तो मोठा कसोटीचा काळ होता. पण कीर्तने यांना गुरूंचा आशीर्वाद असल्याने त्याही संकटातून सहीसलामत बाहेर पडूअशी खात्री होती. ठाण्यातील डॉक्टर विनोद इंगळहळीकर यांनी त्यांच्यावर उपचार करून त्यांची कंबर व पाठीचा मणका ठीक केला आणि कीर्तने अमेरिकेचा प्रवास करण्याला सिद्ध झाले! कीर्तने यांची भावना, त्यांची वृत्ती सकारात्मक विचार करण्याची असल्याने त्या प्रसंगाला तोंड देऊ शकले अशी आहे. राधारमण कीर्तने अमेरिकेत अनेक शिष्यांना 2004 पासून तालीम देत आहेत. तेथे गुरुकुल पद्धत आहे. शिष्य तेथे कीर्तने यांच्या शाळेत राहून शिक्षण घेऊ शकतात.

कीर्तने यांनी टॅम्पामध्ये स्त्रियांचे गायन शिबिर 2019  साली घेतले. काही महिला विद्यार्थिनी स्कूलमध्ये येऊन राहिल्या होत्या. त्यांना शिक्षण देण्यासाठी तीन दिवस पहाटेपासून रात्रीपर्यंत वेळापत्रक आखले होते. त्या व्यक्तिगत नित्यक्रम वगळून दिवसभर अभ्यास करत होत्या. भारतातून आलेल्या कलाकारांच्या मैफली किंवा कार्यशाळा (Workshops)देखील गुरुकुलामध्ये काही वेळा आयोजित केल्या जातात.

अमेरिकेतील अनुभव सांगताना कीर्तने म्हणाले, “इथं आल्यावर, माणसाच्या अनुभवाच्या कक्षा विस्तृत होतात. जातपात, धर्मभेद यांपलीकडे जाऊन आपण माणूस वाचू लागतो. माझ्याकडे येणारे विद्यार्थी कधी भारतीय, कधी मुस्लिम देशांतील तर कधी अमेरिकन असतात. शास्त्रीय संगीत शिकण्याची आस हा त्यांचा समान धर्म. शास्त्रीय संगीताची भाषा वैश्विक असते. त्यामुळे मी ती कोणालाही शिकवू शकतो.

कीर्तने यांचे वय त्रेसष्ट वर्षांचे आहे. ते अकरा महिने अमेरिकेत एकटे व एक महिना भारतात कुटुंबाबरोबर राहतात. अमेरिकेतील त्यांचे वास्तव्य व त्यांचे ‘स्कूल’ एकाच मोठ्या घरात आहे. त्यांच्या दादरच्या कुटुंबात पत्नी, मुलगा अक्षय आणि जुळ्या मुली विधात्री व वेदवती या आहेत. अक्षय तबलजी आहे. तो तबला वाजवतो व शिकवतो. वेदवतीदेखील गाणे शिकवते. तिला छोटी मुलगी आहे. विधात्रीने मास मीडियात शिक्षण घेतले व त्या क्षेत्रात काम करते.

राधारमण कीर्तने – ramankirtane@gmail.com

मेघना साने 98695 63710 meghanasane@gmail.com

मेघना साने मुंबई विद्यापीठाच्या एम ए, एम फिल पदवीधारक असून, त्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर शाखा अध्यक्ष आहेत. त्यांनी मराठी रंगभूमीवर नाट्यसंपदाच्या तो मी नव्हेचसुयोगच्या लेकुरे उदंड झाली या नाटकांमधून पाच वर्षे भूमिका केल्यानंतर एकपात्री प्रयोगाची स्वतंत्र वाट चोखाळली आहे. त्यांनी कोवळी उन्हेया स्वलिखित एकपात्री प्रयोगाचे देशविदेशांत दौरे केले आहेत.

——————————————————————————————————–

 

—————————————————————————————————————————-

About Post Author

2 COMMENTS

  1. चांगली माहिती आहे . पूर्वी कधी ऐकले नव्हते . संजीव अभ्यंकर पंडित जसराजांचे शिष्य आहेत ते माहिती आहे. लेख आवडला

  2. राधारमण!तुझी इतकी मोठी झेप असलेला लेख आज वाचला आणि तुझ्याबद्दलचा आदर दुणावला.गुरूजींनी जागतिक पातळीवर गायक म्हणुनजसे नाव कमावले. तसा गुरू म्हणुन लौकिकही मिळवला.त्याचा मागोवा घेत आपण त्याच उंचीवर मेवाती घराण्याचे नाव उंचावण्यात मोठाच हातभार लावला. माझ्या आईला मुंबई चे वातावरण मानवतनाही म्हणुन गावीच म्हणजे अंबाजोगाई ला परत जाऊन तिथेच गुरुकुल पद्धतीने अध्यापन करावे असा गुरूजी व वहिनीच्या सल्ला ऐकला.योग असा की तिथं पण केवळ पाल्याला गाणे शिकविण्यासाठी अंबाजोगाई ला घरकेलेआणि मराठवाड्यातील मागासलेल्या भागातील विद्यार्थ्यांना त्याचा खूपलाभ झाला.पुढे माझ्या मुलीला वैदिक हेरिटेज चर्या वतीने न्युजर्सीला गायची संधी मिळाली‌तेही गरुजींमुळे‌.त्यामुळे एक गुरू बंधु तुझा अभिमान देखील वाटतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here