‘राजीव-रजन आधारघरा’चा आधार !

0
31

– शरयु घाडी

शरयु घाडीपनवेलजवळचे शांतिवन वरोर्‍याच्या ‘आनंदवना’ची आठवण करून देते. संस्थेचे राजीव-रजन आधारघर म्हणजे विकलांग वृद्धांना मोठाच आसरा आहे. हे वृद्ध म्हणजे बाळेच जणू! पण संस्थेच्या कार्याध्यक्ष मीरा लाड आणि त्‍यांचे कार्यकर्ते आधारघरातील निवासींची अपार काळजी घेतात. लाड यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य यांबाबत……

– शरयु घाडी

मीरा लाडपनवेलजवळच्या ‘शांतिवन’मध्ये जाण्याआधी, मी तेथील मित्रमेळाव्याबद्दल माझ्या मैत्रिणींकडून, ‘अनाम प्रेम’कडून ऐकत असे. त्यावेळी माझ्या मनात प्रश्न येत, तरी एक मात्र वाटायचं. ते म्हणजे शांतिवनात मन:शाती नक्की असेल! आणि एके वर्षी मी पनवेलजवलच्या ‘शांतिवन’च्या मित्रमेळाव्यात सहभागी झाले. शांतिवन म्हणजे शांतिवन कुष्ठरोग, निवारण समिती संस्था. बाबा आमटे यांच्या ‘आनंदवना’ची आठवण करून देणारी!
 

गांधीवादी विचारसरणीचे कार्यकर्ते स.ग.प्रभुगुरूजी आणि आप्पासाहेब सहस्रबुद्धे यांनी संस्थेची मुहूतेमेढ रोवली आणि गोविंदराव शिंदे यांनी स्वत:ची ती कर्मभूमी केली. त्या सर्व मंडळींनी जगाचा निरोप घेतला आहे. तेथे कार्यकर्ती म्हणून काम सुरू केलेल्या मीरा लाड संस्थेच्या कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतात तर शंकर बगाडे मुख्य कार्यवाह आहेत. त्याचबरोबर प्रभुदेसाई, ठकार, रक्षा मेहता विद्या अशी काही मंडळी वेगवेगळे पदभार सांभाळतात. संस्थेचे काम अनेक सेवाक्षेत्रांत आहे. त्यांपैकी एक म्हणजे राजीव-रजन आधारघर. त्या घरातील वृद्ध म्हणजे बाळेच जणू… कुणाची स्मृती गेलेली, कुणी संधिवाताने आखडलेले, कुणी अर्धांगवायूने पीडित… अनेक प्रकार, पण त्या सर्वांचा आधार म्हणजे मीरा लाड आणि त्यांचे कार्यकर्ते.

 

‘आधारघरा’शी माझे नाते कधी जोडले गेले ते कळलेच नाही, मी तिथे अधुनमधून जाते. मीरा लाड यांच्याशी गप्पा मारताना त्यांच्या जीवनाचे उलगडलेले पैलू ऐकून मी त्यांच्यापुढे नतमस्तक होते. एवढ्या मोठ्या संस्थेला आणि ‘आधारघरा’ला आधार देणारे हे व्यक्तिमत्त्व बनवताना परमात्म्याने नेमका काय फॉर्म्युला वापरला असेल?
 

मीराताईंचा जन्म बेळगाव येथील सुंठणकरांच्या सावकारी घरात झाला. त्यांच्या लहानपणीच त्यांचे वडील गेले आणि आर्थिक चणचणीचे चटके कुटुंबातील सर्वांना सहन करावे लागले. मीरा लाड यांच्या आईने त्यांच्या चार मुलींचा सांभाळ केला. आईची विचारसरणी उच्च होती. त्या आपल्या मुलींना सांगत, ‘मुलींनो, तुमची लग्ने झाली नाहीत तरी चालतील. पण तुम्ही शिकून मोठ्या व्हा आणि स्वत:च्या पायावर उभ्या राहा’. मीराताईंच्या मावशी सध्या ‘आधारघरा’त आहेत. मावशीचे पती गेल्यानंतर त्यांना त्यांच्या मिलमधून ‘कामासाठी या’ असा निरोप आला. त्यावेळी मीरा यांच्या आई म्हणाल्या, ‘मिलमध्ये काम केले तर नातेवाईक कशाला हसतील? हसणारी मंडळी तुझी चूल पेटवायला, मुलांचे पालन करायला काय रोज येणार का? तुझी चूल पेटवायची असेल तर तू उद्यापासूनच कामावर जा!’ मावशी त्यांच्या वयाची पंच्याऐंशी वर्षे ओलांडूनही त्यांचे स्वत:चे करतातच आणि इतरांनाही  त्यांच्या कामांत मदत करतात.
 

मीरा यांचे बालपण, शिक्षण बेळगावात झाले. त्यावेळीही त्यांनी ‘मी इंग्रजांच्या (मिशनरी) शाळेत जाणार नाही, तर ‘महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या, बनुबाई अघे यांच्याच शाळेत मी जाणार’ असा हट्ट त्यांनी केला. बेळगावी असतानाच, त्या राष्ट्र सेवा दलामध्ये सहभागी झाल्या. समाजसेवा त्यांच्या नसानसात भिनलेली आहे. मीरा यांना बॅ. नाथ पै यांचा सहवास आणि प्रेरणा लाभली. ते सांगत, ‘आपण आपला संसार, आपली मुले या पलीकडेही पाहायला पाहिजे.’
 

त्यांनी गिरगावच्या चिकित्सक समूह शिरोळकर शाळेत शिक्षिकेची नोकरीही काही वर्षे केली आहे. परंतु त्यांनी आपल्या दोन मुलांचे संगोपन नीट व्हावे यासाठी नोकरीही सोडली. पतीच्या नोकरीमुळे मीरा लाड इटाली, झांबिया या देशांत अनेक वर्षे राहिलेल्या आहेत.
 

मीरा लाड यांचे वैवाहिक जीवन परिपूर्ण आहे. त्यांचे पती सीताराम लाड त्यांच्या कार्यानिमित्त पनवेल स्टेशनजवळच्या त्यांच्या घरी राहतात. तो ‘लाड काकांचा संसार’, पण तेथेही मीरा यांची सार्वजनिक कामे चालतात! मग लाड पाहुण्यांचे आगतस्वागत, चहापाणी बघतात.
 

लाड पूर्वीचे झांट्ये-वेंगुर्ल्यांचे कारखानदार. काजू उत्पादक सीताराम राधाकृष्ण झांट्ये यांचे ते पुत्र. ते ‘एअर इंडिया’त उच्च पदावर नोकरीत असताना, कोणीतरी केलेला झांट्ये या नावाचा चुकीचा उच्चार खटकल्यामुळे त्यांनी त्यांचे आडनाव बदलून लाड हे नवे आडनाव घेतले. लग्नावेळची आठवण मीरा सांगतात , ‘माझी नणंद गंमतीने म्हणायची, की आमची मीरावहिनी लाडाची बरं का!’ काही व्यावहारिक गोष्टी खटकल्यामुळे वेगुर्ल्यांच्या ह्या पती-पत्नीने मोठ्या संपत्तीवर पाणी सोडले. पण त्यांच्यावर सरस्वती आणि लक्ष्मी, दोघींचा वरदहस्त आहे. तरी त्यांचे काटकसरीचे व्रत आहे.
 

मीरा यांनी, मुले मोठी झाल्यावर ‘मी आता समाजसेवेसाठी बाहेर पडणार’ असे जाहीर केले. लाड यांचे मीरांना एवढेच सांगणे होते, की ‘तू समाजसेवा कर, पण त्यासाठी जवळची एखादी संस्था बघ’. त्यांना कुष्ठरुग्ण पुनर्वसनाचे काम शांतिवन (नेरे-पनवेल) येथे सुरू झाले असल्याचे कळले. मीरा तेथील पहिल्या भेटीची आठवण सांगतात, “पावसाळ्याचे दिवस, पाऊस धो-धो चालू होता. संस्थेजवळ आले तर वाटेत नदी. नदीला पूलही नव्हता. मग शिट्यांच्या ध्वनीने सवांद साधले. संस्थेची माणसे मदतीला आली. तरी आम्ही कंबरेपर्यंत पाणी व डोक्यावर बॅगा अशा अवस्थेत नदी ओलांडली.” जणू त्या नदीने समाजवेड्या मीराची परीक्षाच घेतली! आणि मीरा यांचा शांतिवनात प्रवेश झाला!

अण्णा हजारे यांची भेट शांतिवन शांत, निसर्गरम्य आहे. कुष्ठरोगातून मुक्त झालेले बांधव तिथे आनंदाने व्यवसाय करून राहत आहेत. ते सतरंजी विणकाम, शेतीकाम, नर्सरी, फळबाग, गोपालन अशा व्यवसायांत बांधव सहभागी आहेत. तसेच स्नेहलता निसर्गोपचार केंद्र, अण्णासाहेब सहस्रबुद्धे आदिवासी आश्रम शाळा, बलवंतराय मेहता पंचायत ग्राम सुधार आणि रामकृष्ण परमहंस वृद्धाश्रम असे वेगवेगळे प्रकल्प चालतात. शांतिवनाचे महावृक्षात रूपांतर झालेले आहे. मीरा यांनी त्या काळात कार्यकर्त्यापासून ते कार्याध्यक्षापर्यंत केलेला प्रवास अनेकांनी पाहिलेला आहे. पण मीरा यांनी स्वत:ची लाखो रुपयांची संपत्ती ‘शांतिवन’ला अर्पण केली आहे.

मीरा यांची सर्वात मोठी देणगी आहे, ती म्हणजे राजीव-रजन आधारघर, राजीव व रजन ही मीरा ह्यांच्या कुशीत जन्मलेली जुळी भावंडे. दोघेही दिसायला राजबिंडे आणि कुशाग्र बुद्धीचे. राजीव याची तर राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत निवड झाली होती. तो जी. एस. मेडिकल कॉलेजमध्ये एम.बी.बी.एस.च्या शेवटच्या वर्षाला असतानाच त्याला विधात्याचे बोलावणे आले आणि चार महिन्यांनी रजनलाही! दोन्ही मुलांचा जीवनाचा डाव अधुरा राहिला. केवढे मोठे हे दु:ख! पण मीरा व त्यांचे पती यांची धारणा वेगळीच आहे. लाड मीरांना म्हणाले, ‘मीरा रडू नकोस, ज्याने दिले त्याने घेतले!’
 

काही दिवसांतच पती-पत्नी आपले दु:ख बाजूला ठेवून समाजातील पीडितांना आधार देण्यासाठी उभे राहिले. हेच खरे अध्यात्म!

मीरा यांनी वयाची सत्तर वर्षे ओलांडली आहेत, पण त्या संस्थेच्या कार्यासाठी, दरवर्षीच्या मित्रमेळाव्यासाठी आणि ‘आधारघरा’साठी ताठपणे वावरतात. त्यांच्या प्रत्येक कृतीत आत्मविश्वास असतो. ध्यानीमनी नसतानाही मीरा यांच्या हातून ‘आधारघर’ निर्माण झाले अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे ‘परमेश्वर आपल्या हातून काही वेळा काय घडवून आणेल हे मात्र सांगता येत नाही’ असे मीरा म्हणतात. ‘आधारघरा’त चौसष्टपेक्षा जास्त निवासी राहतात. सर्व जागा नेहमी भरलेल्या असतात. अपंगत्व, स्मृतिभ्रंश, वृद्धत्व यांमुळे जीर्ण झालेला देह, संधिवात अशा कितीतरी व्याधींनी कठिण परिस्थिती असलेल्यांसाठी ‘घरा’चा केवढा मोठा ‘आधार’ आहे!
 

व्यवस्थित आणि वेळेवर असा नाश्ता, जेवण निवासींना मिळते. एका निवासींची सून त्यांना भेटायला आली. त्यावेळी ‘अगं इथे सात दिवसाला सात प्रकारचा नाश्ता देतात गं’ असे त्या कौतुकाने सुनेला सांगून गेल्या. निवासींना फणसाची भाजी, उकडीचे मोदक असे वैशिष्ट्य- वेगळे पदार्थही मिळावेत यासाठी मीरा प्रयत्नशील असतात. एखाद्याची विशेष आवडही त्यांच्या नजरेतून सुटत नाही. पण त्यांना ताटात टाकलेले अन्न, वाया घालवलेले पाणी चालत नाही. ‘पाहिजे तितके खा पण ताटात टाकू नका’ असे त्या सर्व निवासींना बजावतात. तर ‘पाणी, इतर सामुग्री काळजीपूर्वक वापरा’ असे त्या कार्यकर्त्यांना कळकळीने समजावून देतात.
 

निवासी कधी कधी लहानांसारख्या छोट्या छोट्या तक्रारी घेऊन येतात, त्यावेळी त्या त्यांना त्यांचे समाधान होईपर्यंत समाजावत असतात. त्यांच्या सहवासात जाणवलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे संस्थेचे जे नियम आहेत ते दुसर्‍यांना सांगण्याआधी त्या स्वत: काटेकोरपणे पाळतात. ते नियम त्यांच्या नातेवाईकांनाही लागू असतात.
 

राजीव-रजन आधारघराचे वैशिष्टय म्हणजे तेथील काही जागा समाजासाठी काम करणार्‍या व्यक्ती, ज्यांना वृद्धत्वात कोणाचाही आधार नसेल अशांसाठी विनामूल्य असाव्यात असा करार लाड यांनी संस्थेबरोबर करून घेतला आहे.
 

‘आधारघरा’तील माणसे पाहिली की जीवनाचे कटू सत्य जाणवते. ते म्हणजे जीवनभर तुम्ही जे काही कमावलेले असते, जो मान-सन्मान मिळवलेला असतो ते सर्व इथेच आपली साथ सोडते. पण ते पचवायची आपली मानसिकता नसेल तर मनाचा तोल कधी कधी जातो. अशी माणसे इतरांनाही त्रासदायक ठरू शकतात, पण ती वेळ येण्याआधीच मनाची धाटणी आणि आध्यात्मिक प्रगती योग्य मार्गावर घडली असेल तर मावळतीच्या वेळीही माणूस उगवतीइतकाच आनंदात राहू शकतो. अर्थात मीरा लाड यांच्यासारखा आधार मिळायलाही नशीब लागते.
 

‘आधारघरा’तील व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. समाजाला वृद्धाश्रमापेक्षाही ‘आधारघरां’ची गरज जास्त आहे. त्यासाठी मीरा लाड नवीन जागा शोधण्याच्या प्रयत्नात आहेत, पण अशा संस्था चालवायच्या तर गरज आहे तळमळीने काम करणार्‍या कार्यकर्त्यांची. मीरा यांचे मत आहे, की M.S.W. करून प्रशासनाचे काम जमू शकते, पण समाजसेवा करायची तर ती आतूनच स्फुरली पाहिजे. तरच कार्यकर्ता संडास साफ करण्यापासून ते एखाद्या निवासीला भरवण्याचे कामही आनंदाने करू शकतो. असे कार्यकर्ते आणायचे कोठून?
 

शरयु नागेश घाडी – सी/5, गिल्डरलेन म्युन्सिपल कॉलनी, ठी.बी.मार्ग, मुंबईसेन्ट्रल, मुंबई – 400008

भ्रमणध्वनी : 9892455007

शांतीवन कुष्‍ठरोग निर्मूलन समिती, मु. पो. नेरे, तालुका पनवेल, जिल्‍हा रायगड.

दिनांक – 13 डिसेंबर 2011संबंधित लेख –

अंधांसाठी सर्व काही !

'एकलव्य बाल शिक्षण आणि आरोग्य न्यास'

‘ऐसी कळवळ्याची जाती’

मृणालिनी-उमा ह्यांची मायेची ‘सावली’

{jcomments on}

About Post Author