Home वैभव इतिहास राघोबादादा यांचे कोपरगावांतील वास्तव्य

राघोबादादा यांचे कोपरगावांतील वास्तव्य

_RaghobadadaYanche_KopargaontilVastavya_1.jpg

इंग्रज व मराठे यांच्यात सालबाई येथे तह ( 17 मे 1752 ) झाल्यानंतर तहातील एका अटीनुसार इंग्रजांनी राघोबास महादजी शिंद्यांच्या ताब्यात दिले. राघोबांनी महादजींच्या सल्ल्यानुसार कोपरगावला कायमचे वास्तव्य करण्याचे ठरवले. राघोबादादा 1783 च्या ऑगस्ट महिन्यांत कोपरगावला आले. ते कोपरगाव जवळील कचेश्वर बेटातील वाड्यात राहू लागले. त्यांचे निधन याच वाड्यात दि. 11 डिसेंबर 1783 रोजी झाले. त्यांचे दहन त्यांच्या इच्छेनुसार हिंगणी येथील तीन भिंतींच्या वाड्यात करण्यात आले.

रघुनाथरावांचे कोपरगाव येथे अधुनमधून येणेजाणे 1783 पूर्वीदेखील होते. राघोबादादा नाशिक येथील आनंदवल्ली येथे जाताना हमखास कोपरगाव येथे येत असत. राघोबांच्या पत्नी आनंदीबाई यांचे कोपरगाव येथील वाड्यात 1783 ते 1792 पर्यंत सलग वास्तव्य होते.

तसेच, थोरले माधवराव पेशवे हवापालटासाठी ऑक्टोबर 1771 मध्ये कोपरगाव जवळील कचेश्वर बेटात काही काळ वास्तव्यास होते. त्या बेटात त्यांची सुवर्णतुला 23 ऑक्टोबर या चंद्रग्रहण दिवशी झाली होती.

राघोबांच्या मनात पुण्यापासून दूर कोपरगाव  येथे महाराष्ट्राची राजधानी करण्याचा विचार होता. त्यांनी सन 1783 मध्ये कोपरगावला आल्यानंतर हिंगणी येथे, जेथे गोदावरी नदी दक्षिणवाहिनी होते त्या जागी एक भव्य वाडा बांधण्याचे काम सुरू केले होते. त्यांना पुणे दरबारातून दरमहा पंचवीस हजार रूपये निवृत्ती वेतन मिळत असे. कोपरगाव येथील त्यांचे वास्तव्य म्हणजे एक प्रकारची नजरकैदच होती. नाना फडणवीस यांनी राघोबादादा व आनंदीबाई यांच्यावर नजर ठेवून तेथील दैनंदिन घडामोडींच्या नोंदी ठेवण्यासाठी गोविंदकृष्ण गोडबोले यांना नेमले होते.

राघोबादादांना कोपरगावच्या एकाकी अवस्थेत नारायणराव यांच्या हत्येबद्दल मानसिक टोचणी लागली होती. ते प्रकृती खालावत चालल्यामुळे फार दिवस जगणार नाहीत हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यांनी थोरल्या वहिनी गोपीकाबाई यांची मृत्यूपूर्वी एकदा तरी भेट घ्यावी असे ठरवले. परंतु गोपिकाबाई यांनी प्रायश्चित्त घेतल्याशिवाय भेटू नये असे कळवले. आनंदीबार्इंनीदेखील प्रायश्चित्त घेऊन जाऊबार्इंची खातरजमा करण्यास सांगितले. त्यानुसार राघोबांनी गोदावरी – दारणा संगमावरील सांगवी या गावी 4 ऑगस्ट सन 1783 रोजी सोमवारी (शोभनाम संवत्सर, श्रावण शु // 6 शके 1705 ) प्रसन्नचित्ताने संकल्प सोडला व सक्षौर प्रायश्चित्त घेतले. प्रायश्चित्त विधीचा मसुदा नाशिक पंचवटी, कोपरगाव, कचेश्वर बेट येथील विद्वान ब्राम्हणांनी तयार केला होता.

आनंदीबाई राघोबादादांच्या निधनानंतर सुमारे अकरा वर्षें जिवंत होत्या. राघोबादादांचे देहावसान झाले तेव्हा आनंदीबाई गरोदर होत्या. त्यांना कोपरगाव येथे पुत्र झाला. त्यांचे नाव चिमणाजी असे होते. आनंदीबाई ही कर्तबगार मुत्सदी व राजकारणाची चांगली जाण असलेली स्त्री होती. त्यांनी कोपरगावी असताना 1783 साली एका प्रसंगी त्यांच्या माहेरच्या ओक मंडळीबद्दल, “वोकांचील्येक मी, वोक प्रखर, म्लान व दनी नव्हत माझा जन्मस्वभाव असा” असे उदगार काढले होते. आनंदीबार्इंची स्थिती राघोबांच्या निधनानंतर पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघिणीप्रमाणे झाली होती. त्यांना दोन वेळा जेवण करून किंवा नकळत उपोषण करण्यात वेळ घालवण्या व्यतिरिक्त दुसरा मार्ग राहिला नव्हता. कोपरगावमध्ये कोठे जावे, तर तेथे नाना फडणविसांनी तैनात केलेले कारभारी हजर राहत. कारभारी आनंदीबाई काय करतात, काय बोलतात, कोठे जातात इत्यादी तिच्याविषयीची इत्थंभूत माहिती पुणे येथे कळवत.

नानांनी राघोबादादा मयत झाल्यानंतर आनंदीबाईच्या अंगावरील जवाहीर आणण्यासाठी अन्यबा मेहेंदळे यांना कोपरगावी पाठवले. परंतु आनंदीबार्इंनी दागिने काढून न देता उत्तर दिले, की अंगावर आहेत ते काढोन घ्यावे… नाईलाज झाल्यामुळे – नानांनी पाठवलेले कारभारी पुण्यास रित्या हाताने परत गेले. आनंदीबाई पतीच्या निधनानंतर बाजीराव (दुसरा), चिमाजी व अमृतराव (दत्तकपुत्र) यांच्यासह बेटातील वाडा सोडून कोपरगावातील वाड्यात राहाण्यासाठी आल्या. त्यांच्या बंदोबस्तासाठी गोविंदपंत गोडबोले, आपाजीराम सहस्त्रबुद्धे व केसोपंत फौजपागांसह कोपरगावी राहत. राघोबांच्या अस्थी गंगेत काशीक्षेत्री विसर्जन कराव्या अशी आनंदीबार्इंची इच्छा होती व त्याबद्दल तिने कारभाऱ्यास तगादाही केला होता. परंतु नानांनी त्या साध्या गोष्टीला परवानगी दिली नाही. अखेरीस राघोबांच्या अस्थी गोदावरी नदीतच विसर्जित कराव्या लागल्या.

आनंदीबार्इंनी “येथे आम्ही बहुत संकटात आहे. कारभारी चैन पडो देत नाही. साहेबांच्या अस्थीदेखील श्रीकाशीस पाठवत नाही. मेल्यावर दावा उगवतात” असे उद्गार काढले अशा नोंदी पेशवे दप्तरात आढळतात.

नाना फडणवीसांनी दुसऱ्या बाजीरावाच्या शिक्षणासाठी कोपरगाव येथे राघोपंत ठोसर यांची नेमणूक केली होती. परंतु ठोसर गुरूजी थोड्याच दिवसांत पुण्यास परत आले. आनंदीबार्इंनी त्यांना पाठवण्याविषयी नानांस पुष्कळ लिहिले, परंतु नानांनी दखल घेतली नाही.

“बाजीराव फार खेळतात म्हणून राघो केशव ठोसर यास आणावे असे उपाध्ये बोलले. त्याजवरून बाई बोलली की याणी विद्या शिकावी किंवा शहाणे व्हावे हे कोणास अगत्य नाही. आजून त्याचाही बंदोबस्तच केला नाही. जाल्याशिवाय तो तरी कशास येईल? ” (आनंदीबाई दिनचर्या, पान 45) कोपरगावी असताना, आनंदीबाई यांच्याकडे देवपूजेतील छत्तीस तोळे वजनाचा सोन्याचा सुंदर मोर होता. तो मोर पुणे येथे सवाई माधवराव पेशव्यास पाठवण्याची बार्इंची इच्छा होती. मोराबरोबर एक पोवळ्याचा गणपती, राघोबादादांची सांबाची पूजा करण्याची जडावाची झारी नि तबकडी आदी वस्तू पुण्याला पाठवायच्या होत्या, परंतु नानांनी त्या वस्तू पाठवण्याची परवानगी दिली नाही. ‘घरातील भुतबाधा नाहीशी करण्यासाठी’ कोपरगावातील नथू भगत कुंभार यास वाड्यावर नेहमी बोलावले जात असे. (संदर्भ – पेशवे दप्तर 4, पृष्ठ 34)

आनंदीबार्इंचा मुक्काम कोपरगावात 1792 च्या ऑक्टोबरपर्यंत होता. त्यानंतर त्यांची सपरिवार रवानगी आनंदवल्लीला करण्यात आली. आनंदीबाई सकेशा स्थितीत 27 मार्च 1794 रोजी, गुरूवार (पारभादिनाम संवत्सर फाल्गुन वद्य 11 शके 1715) पहाटे, सुर्योदयापूर्वी आनंदवल्लीलाच वारल्या.

– नारायण क्षीरसागर

संदर्भ ग्रंथ : 1. पेशवे घराण्याचा इतिहास – लेखक प्रमोद ओक, 2. पुण्याचे पेशवे – लेखक अ. रा. कुलकर्णी, 3. राघोबा ऊर्फ राघोभरारी – लेखक चिं.ग. कर्वे, 4. आनंदीबाई पेशवे – लेखक स.रं. सुठवणकर (आवृती 1946), 5. मराठेशाहीतील मनस्विनी – लेखक डॉ. सु.र. देशपांडे, 6. आनंदीबार्इंची दिनचर्या – गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बे प्रकाशन

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.

Exit mobile version