Home लक्षणीय भारतीयन्स – सकारात्मकतेचा सोशल मंत्र

भारतीयन्स – सकारात्मकतेचा सोशल मंत्र

थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे समाजातील चांगुलपणाचे अाणि सकारात्मक घडामोडींचे दर्शन घडवणारे व्यासपीठ. ‘थिंक महाराष्ट्र’ने ‘प्रज्ञा-प्रतिभा’ या सदरामध्ये त्याच तऱ्हेच्या सकारात्मक कहाण्या वाचकांसमोर सादर केल्या. त्या समान विचाराने सकारात्मकता प्रसृत करण्यासाठी धडपडणारा एक तरूण पुण्यात अाहे. त्याचे नाव मिलिंद वेर्लेकर. ‘थिंक महाराष्ट्र’चा प्रकल्प अाणि मिलिंद वेर्लेकरची धडपड यांमधला सकारात्मकतेचा समान धागा उठून दिसतो. त्यामुळे या तरूणाची माहिती ‘थिंक महाराष्ट्र’ने मांडणे अावश्यकच होते.

आयुष्य कोणत्या क्षणी वळण घेईल हे खरेच सांगता येत नाही. चाकोरीतील जीवन सुरू होण्याच्या शक्यता एकवटलेल्या असताना जीवनाला वेगळीच दिशा देणारी एखादी संधी अचानकपणे खुणावत येऊ शकते. त्याक्षणी तिला दिला जाणारा सकारात्मक प्रतिसाद आयुष्याला वेगळा आयाम देऊन जातो. तसेच घडले त्या तरुणाच्या आयुष्यात.

मनात उफाळून आलेल्या देशभक्तीच्या भावनेतून संपूर्ण कारगिल युद्धाचे डॉक्युमेंटेशन करणारे एक पुस्तक त्याच्याकडून साकारले गेले आणि तोच टर्निंग पॉईंट ठरला! ते पुस्तक गेले, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम या कसबी जवाहिऱ्याच्या हातात. त्यांनी त्या तरुणाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांची भेट थेट दिल्लीमध्ये झाली आणि मग त्याच्याकडे ऐन उमेदीत सोनेरी संधी चालून आली… डॉ. कलाम यांनी त्याला एका प्रकल्पासाठी सोबत काम करण्याविषयी विचारले. त्या तरुणाने क्षणाचाही विचार न करता तत्काळ होकार दिला.

“या कामासाठी पैसे किती घेणार?..’’ कलाम यांनी विचारले असता तो तरुण म्हणाला, “मी एक रुपाया घेईन.”

त्याच्या अायुष्यातील पुढील दोन महिने कोठल्याही पैशांत मोजता येणार नाहीत इतके लाखमोलाचे असतील इतके भान त्याला होते. सकारात्मकतेच्या ताकदीने ओसंडून वाहणारा कलाम नावाचा धबधबा दोन महिने सतत त्याच्या सोबत असणार होता. कोठलीही समस्या त्यांच्या समोर आली तरी ते कधीही गडबडून जात नसत. त्यांच्यामते, प्रत्येक समस्या ही तिच्यासोबत ‘सेट ऑफ सोल्युशन्स’ घेऊन येत असते. त्याकडे संधी म्हणून पाहण्यास मात्र हवे.

मिलिंदच्या अंगी कलाम यांच्यासोबत काम करताना जी सकारात्मकता भिनत गेली, ते बीज होते ‘भारतीयन्स’चे!

कलाम यांच्या अल्पकालीन सहवासानेही अामूलाग्र बदलून गेलेला तो तरुण म्हणजे ‘भारतीयन्स’ या फोरमचा संस्थापक मिलिंद वेर्लेकर. ‘गिनीज बुक’मध्ये स्वत:च्या विक्रमाची नोंद करणाऱ्या मिलिंदच्या सुपीक डोक्यातून ‘भारतीयन्स’ ही संकल्पना साकारली. ‘फेसबुक’ हे निव्वळ ‘टाईमपासचे माध्यम’ असे समजले जाते. त्या समाजमाध्यमांचा वापर करून भारतीयांपर्यंत सकारात्मक विचार घेऊन जाण्याचा प्रयास ‘भारतीयन्स’च्या माध्यमातून केला जातो. ‘भारतीयन्स’चे वेब पोर्टल आहे, अॅप विकसित केले आहे, फेसबुकच्या अॅक्टिव्ह पेजला तब्बल पंच्याऐंशी लाखांचा रिच अल्पावधीत प्राप्त झालेला आहे. जगभरातील भारतीय तरुण त्या फोरमचा भाग होत गेले अाहेत. अमेरिका, जपान, सिंगापूर, जर्मनी, थायलंड आदी देशांत राहणारे एकशे सदुसष्टहून अधिक भारतीय तरुण ‘भारतीयन्स’मध्ये सक्रिय आहेत. केवळ मराठी-इंग्रजीपुरते मर्यादित न राहता या साऱ्या तरुणांनी त्याचा विस्तार तब्बल अठरा भाषांमध्ये करण्याचे शिवधनुष्य हाती घेतले आहे. त्याशिवाय, त्यांनी विविध भाषांतून उत्तमोत्तम साहित्य अनुवादित करण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी चांगल्या अनुवादकांची फळी उभी राहत आहे. त्याशिवाय, ‘योगा फॉर पॉझिटिव्हिटी’ हा उपक्रम जगभरात विविध ठिकाणी राबवून त्याचीही विश्वविक्रमी नोंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मिलिंद मूळ मुंबईचा. त्याचा लहानपणीच्या स्वभावाबद्दल ऐकले तर तो पुढे इतका ‘सोशल’ होईल अशी कोणी कल्पनाही केली नसती. तो शालेय जीवनात अतिशय भिडस्त स्वभावाचा होता. तो लोकांमध्ये फारसा रमत नसे. वडील प्रख्यात वकील.घरात वातावरण सुसंस्कृत पण मिलिंदला आवड मात्र खेळांची. त्याला शाळेतील गुणही बेतास बात मिळत. त्याचा मित्रपरिवार मोजका. त्याने तो बोलू शकणार नाही हा न्यूनगंड अगदी सुरुवातीपासून जोपासलेला. पण मिलिंद बारावीला असताना कॉलेजमध्ये एक लेक्चर त्याला ऑफ होते म्हणून तो स्टाफरूममध्ये डोकावायला आला. समोर बसलेल्या एका शिक्षकांनी त्याला अात बोलावले आणि नाव विचारले. त्यांनी त्याचे नाव एका कागदावर लिहिले आणि ते म्हणाले, “जा आता.’’ मिलिंदला काहीच कळेना. शिक्षक म्हणाले, “अरे एक वक्तृत्व स्पर्धा आहे. मला तेथे आजच नावे द्यायची होती. तुझे नाव दिले. पण चिंता करू नको. तू गेला नाहीस तरी चालेल.” घरी अाल्यानंतर मिलिंदच्या वडिलांना नावाचा तो कागद टेबलावर पडलेला दिसला. त्यांनी विचारणा केल्यावर मिलिंद म्हणाला, “मी स्पर्धेत भागबिग काही घेणार नाही.’’ वडील म्हणाले, “अरे, आता नाव दिले अाहेस तर तयारी कर. मी जसा विषय लिहून देतो व तयारू करून घेतो तसा बोल.’’

मिलिंद तयार झाला आणि त्याचा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत राज्यात तिसरा क्रमांक आला. आजवर जो संभाषण करायला धजावत नव्हता अशा मुलाने ते यश मिळवले. मिलिंदचा उत्साह कमालीचा दुणावला. त्यानंतर त्याचा आत्मविश्वास जो काही वाढला, त्या बळावर त्याने राज्यभरात जितक्या वक्तृत्व स्पर्धा होतात त्या सर्वांमध्ये भाग घेतला. त्याने सुमारे एकशे पासष्ट स्पर्धांमध्ये पहिला वा दुसरा क्रमांक पटकावला! सर्व व्यासपीठे गाजवली. त्यातून दोन चांगले फायदे झाले. एक म्हणजे त्याचा संभाषणातील आत्मविश्वास वाढला आणि दुसरा म्हणजे त्याला लोकांत मिसळण्याची सवय झाली. तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कट्टर स्वयंसेवक असल्याने आणि त्याला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करण्याची संधी मिळाल्याने मिलिंदच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी पैलू पडले. त्याच्या सामाजिक जाणिवा अधिक सजग झाल्या. मिलिंदने त्याच प्रेरणेतून ‘वाग्भट’ ही राज्यस्तरीय स्पर्धा सुरू केली. त्याला राज्यभरातील तरुणांचा उत्तम प्रतिसाद लाभला. कारगील युद्धाच्या काळामध्ये बातम्यांमधून घडामोडी कळत होत्या, पण त्यांचे डॉक्युमेंटेशन होत नाही याची जाणीव काही प्रसंगांतून त्याला झाली. मग त्याने पस्तीस हजार बातम्यांची कात्रणे जमवून, इतर संदर्भाची जोड देऊन कारगीलवरचे पुस्तक साकारले. त्याच्या पाच हजारांहून अधिक प्रती विकल्या गेल्या. कारगील युद्धात शहीद झालेल्या एका जवानाच्या पत्नीच्या हस्ते त्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. पुस्तकाची किंमत सर्वसामान्यांना परवडेल अशी फक्त पन्नास रुपये ठेवली. पुस्तकाची इंग्रजी, हिंदी, संस्कृत, गुजराती या भाषांत भाषांतरे झाली. पुस्तक रघुनाथ माशेलकर यांच्या माध्यमातून कलाम यांच्यापर्यंत पोचले.

मिलिंद त्यानंतर चार वेगवेगळ्या मोठ्या प्रकल्पांवर काम करत होता. पण साऱ्यांमध्ये काही ना काही अडचणी येत गेल्या आणि काही झाले तरी त्या सुटता सुटेनात. अखेर वैतागून त्याने ते बाजूला ठेवले. त्याने त्याच बेताला इंग्रजी पेपरातील एक सकारात्मक ‘स्टोरी’ वाचली. त्याने तिचे भाषांतर फेसबुकवर पोस्ट केले. त्याला जोरदार लाईक्स मिळाले. त्या स्टोरीचा परिणाम सकारात्मक झाला! गंमत म्हणजे, तो ज्या चार प्रकल्पांमध्ये अडकून पडला होता त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्याला गवसला. ती शक्ती होती सकारात्मकतेची.

सकारात्मकतेची ऊर्जा समाजमाध्यमांचा वापर करून सर्वांपर्यंत नेता आली तर किती छान होईल! मग त्याच्याकडून रोज एक पॉझिटीव्ह स्टोरी फेसबुकवर पोस्ट होऊ लागली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याने ज्योती रेड्डी नामक एका युवतीचा शेतमजुर ते आयटी कंपनीची सीईओ हा प्रवास मांडला. ती पोस्ट तब्बल बारा हजार वेळा शेअर झाली. लाखो लोकांनी वाचली. पाच हजारांहून अधिक फॉलोअर्स आले. देशभरातील वृत्तपत्रे वाचून त्यातून सकारात्मक स्टोरी निवडणारी एक उत्तम फळी तयार झाली. दक्षिणेकडे एक माणूस जेवणाच्या वेळी त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला अवघ्या दहा रुपयांत जेवण देतो ही स्टोरी वाचून पुण्यात रास्ता पेठेत हॉटेल असणाऱ्या एकाने त्याचे अनुकरण केले. असंख्य लोकांना प्रेरणा देणारे ते व्यासपीठ लोकप्रिय झाले. सकारात्मकता हवी तर शरीरही चांगले हवे म्हणून ‘योगा फॉर पॉझिटिव्हिटी’ हा अभिनव उपक्रम जगभरात घेतला गेला. आता तर अठरा भाषांतून ते सारे विस्तारण्याचा मोठा प्रयास सुरू आहे. ‘भारतीयन्स’ची वाटचाल अधिक दमाने होऊ लागली आहे. मोट चांगली बांधली गेली आहे. सकारात्मकतेची ऊर्जा अधिक ताकदीने पसरवली जात आहे.

मिलिंद त्या पलिकडे जाऊन विविध सामाजिक कामांमध्ये अग्रेसर असतो. पुण्यातील आदर्श मित्र मंडळाच्या माध्यमातून गडचिरोलीमध्ये जो विश्वविक्रम करण्यात आला (याविषयीचा लेख ‘रसिक’मध्ये 25 मार्च 2018 रोजी प्रसिद्ध करन्यात अाला होता.) त्या साऱ्या प्रक्रियेमध्ये मिलिंददेखील सहभागी होता.

त्याविषयी मिलिंद म्हणतो, “सकारात्मकतेची ऊर्जा खरच जबरदस्तच असते. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने झाली तर त्यातून खूप चांगल्या गोष्टी घडत जातात. नकारात्मक दृष्टी असणारे अनेकजण येथे आले आणि सकारात्मक होऊन कायमचे ‘भारतीयन्स’शी जोडले गेले. ते काम करताना मिळणारे आंतरिक समाधान फार मोठे आहे.’’

_Bhartiyans_SakaratmaktechaSocial_Mantr_2.jpgसाडेतीन लाख छायाचित्रे अाणि गिनीज बुकमध्ये नोंद

छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील अडीचशेहून अधिक किल्ले आणि अन्य राज्यांतील शिवाजी महाराजांनी जिंकलेले शंभर किल्ले अशांची तब्बल साडे तीन लाख छायाचित्रे, त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि त्यांचे जीपीएस मॅपिंग अेसा डाटा हाती असलेला मिलिंद बहुदा एकमेवद्वितीय व्यक्ती असावा. त्याने अशाच निवडक पंचेचाळीस हजार छायाचित्रांचे प्रदर्शन त्याने गणेशकला क्रीडा मंदिरात काही वर्षांपूर्वी भरवले होते. त्या प्रचंड संग्रहाची दखल गिनीज बुकने घेतली आणि विश्वविक्रमी नोंद केली.

मिलिंद वेर्लेकर – 9049457575

– पराग पोतदार

sweetparag@gmail.com

(पूर्वप्रसिद्धी - दैनिक दिव्य मराठी, मधुरिमा सदर, जुलै 2018) 

About Post Author

2 COMMENTS

Comments are closed.

Exit mobile version