नागपूरचे रवी आणि अनुपमा सहस्त्रबुद्धे अमेरिकेला ग्रीनकार्ड घेऊनच 1992 साली गेले. तेव्हा त्यांचे दोन्ही मुलगे लहान होते. रवीची इंजिनीयर म्हणून करियर उत्तम होती. पुण्यात मोठ्या कंपनीत नोकरी चालू होती. अनुपमाचे गाणे बहरात आले होते. त्यांनी त्यांचा भाऊ राम जोगळेकर याच्या आग्रहाने ग्रीन कार्डसाठी 1982 सालीच अर्ज केला होता. ते दहा वर्षांनी हाती आले होते. तो काळ अमेरिकेत भरभराटीचा होता, ‘सॉफ्टवेअर बूम’ सुरू झाले होते आणि आशियातून अमेरिकेत स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होऊ लागले होते. रवी-अनुपमा यांना त्यांच्या दोन मुलांच्या भविष्यासाठी अमेरिकेत जावेसे वाटले. तेथे गेल्यावर त्यांचा उत्कर्षच होत गेला आहे. तरी अर्थात त्यांनी मराठीपण उत्कटतेने जपले आहे.
मला अनुपमा सहस्त्रबुद्धे अमेरिकेतील एका कार्यक्रमातच भेटल्या. मी सध्या अमेरिकेत माझ्या मुलीकडे लुईव्हिलला राहत आहे. मुलीने माझ्या कवितावाचनाचा कार्यक्रम एका संध्याकाळी योजला. त्या कार्यक्रमास तेथे राहणाऱ्या अनुपमा सहस्त्रबुद्धे आल्या होत्या. त्या कवितेच्या रसिक वाचक आहेत. आश्चर्य म्हणजे मी माझ्या गेल्या भेटीत वाचलेल्या काही कविता त्यांच्या स्मरणात होत्या. मी त्यांना भेटीत गीतांची कॅसेट दिली होती. त्यांनी मला चकित केले. त्यांनी माझ्या ‘कदंबाच्या झाडाखाली’ या नृत्यनाट्यातील दोन गीते ऐकवली. त्यांनी ‘क्लासिकल’ आणि एक लोकगीत सादर करून माझ्या कवितावाचनाच्या कार्यक्रमाची रंगत वाढवली. जमलेल्या मंडळींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता. माझ्या लक्षात आले, की सर्वांना ‘इये मराठीचे नगरी मराठीचा सुकाळ करी’ अशी भावावस्था प्राप्त झाली आहे. मला भाषेतून संस्कृती कशी झिरपत असते त्याचे तेथे दर्शन झाले.
अनुपमा यांचे माहेरचे नाव चित्रलेखा जोगळेकर. त्या नागपूरच्या. बालपणी शास्त्रीय गाणे शिकल्या. मग सुगम संगीताकडे वळल्या. त्यांनी भारतात भावगीते राम कदम, अरुण दाते, गजानन वाटवे यांच्याबरोबर गायली आहेत. राम कदम यांच्याबरोबर गाण्याच्या त्यांच्या काही रम्य स्मृती आहेत. विशेषत: कदम यांचे मार्मिक विवेचन आणि चटपटीत निवेदन. त्यांनी गिरीश जोशी ह्यांच्या कार्यक्रमातून इंदिरा संत यांच्या कविता म्हटल्या आहेत आणि सुधीर गाडगीळ यांच्या ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ही त्या होत्या. त्या गझल गायन फैयाज हुसेन यांच्याकडे शिकल्या. ते कादर बक्षीखान यांचे (नातू) शिष्य. त्यामुळे त्यांचे हिंदी आणि उर्दू भाषांचे उच्चार अस्सल आहेत. त्यांनी स्वत: स्टेजवर गाण्याचे कार्यक्रम देण्यास 1986 मध्ये सुरुवात केली. त्या प्रोग्राम 1999 पर्यंत देत होत्या. त्या प्रथम अरुण दाते यांच्यासोबत ‘शुक्रतारा मंदवारा’ हे द्वंद्वगीत गाताना खूप घाबरल्या, मग सरावल्या. त्यांची लोकप्रियता वाढली, त्या स्वतंत्र कार्यक्रम करू लागल्या. त्यांनी रेडिओच्या परीक्षा 1975 मध्ये दिल्या. त्या दूरदर्शनवर ‘शब्दांच्या पलीकडे’ या कार्यक्रमात सात-आठ वेळा सहभागी झाल्या. त्या दूरदर्शनवर ‘गजरा’ कार्यक्रमातही गायल्या. त्यांनी राम कदम यांच्या ‘पठ्ठे बापुराव’ चित्रपटात प्लेबॅक दिला. त्यांची यशाची अशी चढती कमान मध्येच सोडून देऊन अमेरिकेत जाताना घालमेल झाली. त्यांचे पती रवी सहस्त्रबुद्धे यांनी त्यांना पाठिंबा व धीर दिला. रवी यांनी आयआयटीतून इंजिनीयरिंगचे शिक्षण घेतले आहे. ते भारतात अठरा वर्षें नोकरी करून 1992 मध्ये अमेरिकेत गेले.
दोघे त्यांच्या रोहित आणि पंकज या दोन मुलांनी अमेरिकेत करिअर करावी असे उद्दिष्ट बाळगून तेथे गेले. अनुपमा यांनी आरंभी कपड्यांच्या दुकानात कॅशिअर वगैरेसारख्या नोकऱ्या केल्या. त्या केक डेकोरेटर म्हणून वावरल्या. तशा नोकऱ्यादेखील केल्या. मुख्य म्हणजे त्यांना त्यांचे मेहंदी लावण्याचे कौशल्य अमेरिकेत फार फायदेशीर झाले. बघता बघता, त्यांच्या मधुर गळ्याची आणि गानकौशल्याची प्रसिद्धी लुइव्हीलमध्ये झाली. त्यांच्याकडे विद्यार्थी गाणे शिकण्यासाठी येऊ लागले. त्यांचे कार्यक्रम अमेरिकाभर झाले आहेत. बीएमएम कन्व्हेन्शनमध्ये तर त्या हक्काच्या गायक असत. त्याची सुरुवात बाल्टिमोर अधिवेशनात झाली. त्यानंतर त्यांचा तो सिलसिला 2007 पर्यंत चालू राहिला. मग त्यांनी तेथून निवृत्ती घेतली.
अनुपमा यांची निरीक्षणे फार मार्मिक आहेत. त्यांनी भारतातील संगीतविश्व पाहिले आहे आणि अमेरिकेतील भारतीय समाजाचे गायनप्रेमही अनुभवले आहे. त्या म्हणाल्या, की भारतात संगीताचे वेड आहे आणि अमेरिकेत रसिकता प्रतीत होते. तेथे सहसा श्रोतृवर्गात उच्चशिक्षित समाज असतो. शिवाय, त्यांना नव्या, वेगळ्या जगाचे दर्शन झालेले असते. तो परिपक्व भाव त्यांच्या प्रतिसादात जाणवतो. भारतातील मैफली मोठ्या असतात, अमेरिकेत श्रोते शंभराच्या आसपास असतात. त्यातून गायक-श्रोता संवाद संभवतो.
त्यांचे बृहन्महाराष्ट्र मंडळातील (1993) काही आणि केण्टकी येथील कार्यक्रम विशेष गाजले. त्यांना केण्टकी स्टेट गव्हर्नरच्या हस्ते 2005 मध्ये ‘लाइफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्ड’ मिळाले. त्यांना इंडियन कम्युनिटीमध्ये केलेल्या सेवेबद्दल त्यांचा लुइव्हीलच्या मेयरच्या हस्तेदेखील सत्कार18) झाला आहे. त्यांच्या ह्यूस्टन येथील बीएमएम कन्व्हेन्शनमधील कार्यक्रम पक्का लक्षात राहून गेला आहे तो कॅनडातील प्रसिद्ध भारतीय गायक नरेंद्र दातार यांच्या चांगुलपणामुळे. पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली यांची नात नय्यर अख्तर या गाण्याच्या शौकीन आहे. त्यांना अनुपमा यांचे गाणे ऐकायचे होते. अनुपमा कन्व्हेन्शनमधील वाद्ये नेऊ शकत नव्हत्या. अशा प्रसंगी, दातार पुढे आले व त्यांनी फार मोठी जोखीम स्वीकारून त्यांचा पेटी-तबला अनुपमा यांच्या स्वाधीन केला. त्यानंतर अनुपमा सांगतात, की मी सात वेळा टोरांटोला गेले असता दातार यांनी माझी भेट प्रत्येक वेळी घेतली.
रवी सहस्त्रबुद्धे यांनी आळंदी-पंढरपूर वारी दोन वर्षांपूर्वी पार्ल्याच्या ‘ग्रूप’बरोबर केली. ते म्हणाले, की माझ्या आईची इच्छा तशी होती. ती घडू शकली नव्हती. म्हणून मला ती करावीशी वाटली.
अनुपमा यांच्या गळ्यात गंधार आहे, पण त्यांना ‘ग’ची बाधा नाही. त्या कलावंत म्हणून श्रेष्ठ आहेतच, पण त्यांचे मन अंतर्बाह्य कुसुमकोमल आहे. अनुपमा त्यांच्या संगीत प्रवासाविषयी बोलू लागल्या, की त्यांचे आयुष्य म्हणजे एक रसयात्रा वाटते. त्या अनेक जणांना यात्रेमध्ये सामील करून घेत असतात. त्यामधून एक झकास सांगितिक पूल तयार होतो. संगीत ही समाजाला जोडणारी फार प्रभावी मात्रा असते. अनुपमा म्हणाल्या,की अमेरिकेत हजारभर तरी भारतीय गायक-वादक आहेत. ते भारतीय संस्कृतीचा झेंडा त्या परक्या संस्कृतीत घट्ट धरून असतात. एकादा महेश
काळे त्यांचे गानकर्तृत्व भारतात येऊन दाखवून चमकत राहतो.
– सरोज जोशी 9833054157,sgj1935@gmail.com