रंगगंध कलासक्त न्यासाच्या पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती अखिल भारतीय साहित्य अभिवाचन महोत्सवास २०१२ मध्ये दहा वर्षे पूर्ण झाली.
‘रंगगंध’च्या साहित्य अभिवाचन महोत्सवाबद्दल बोलताना, जर ‘स्पर्धेतील संघ पुढच्या वर्षी काय वाचायचं याची तयारी वर्षभर करत असतात’ असं म्हटलं तर काही रंगकर्मी तुच्छतेनं हसून उद्गारतात, “तुमच्या स्पर्धेत पुस्तक समोर ठेवूनच वाचायचं असतं ना मग काय करायची एवढी तयारी? एक दिवसात तयार होईल ते अभिवाचन… !’’ आदल्या दिवशी गाईड पाठ करून दुसर्या दिवशी परीक्षा देणारे महाभाग असतात ना! त्यातलाच हा प्रकार! परदेशात पाठ्यपुस्तकं परीक्षेच्या वेळी उघडी ठेवता येतात, पण तेव्हाही खरा अभ्यास केलेला विद्यार्थीच उत्तीर्ण होतो. तसं आहे हे…
अभिवाचन या शब्दामधला ‘अभि’ खूप महत्त्वाचा आहे. खरं तर, नाटक बसवताना संहितेचा, भूमिकेचा जेवढा विचार करावा लागतो, तिचा सराव करावा लागतो तेवढाच विचार, सराव अभिवाचनातही करावा लागतो. तरच सादरीकरण उत्तम होऊ शकतं.
पहिला विचार येतो तो संहितानिवडीचा! संहिता निवडताना, संहितेचे श्राव्य मूल्य किती आहे? त्यात नाट्य आहे का? ‘पुढे काय’ ही उत्सुकता पुरेशी येत आहे ना? हे बघायला हवं. मराठी भाषा कोसाकोसावर बदलते. वेगवेगळ्या भागांतल्या भाषांचे वेगवेगळे गंध संहितेत आले आहेत का? ते आपण समर्थपणे सादर करू शकणार आहोत का? याचा विचार करायला हवा.
‘अभिवाचन’चा प्रयोग हा रेडिओवर श्रुतिका आणि सादर केलेले रंगमंचावर पूर्ण नाटक यांच्या अधलामधला प्रकार आहे. रेडिओवरच्या श्रुतिकेमध्ये प्रेक्षक समोर बसलेले नसतात. त्यामुळे घडणार्या सर्व गोष्टी केवळ शब्द, आवाज आणि संगीत यांतून अभिव्यक्त कराव्या लागतात; तर नाटकात रंगभूषा, वेषभूषा, प्रकाशयोजना, शारीरिक अभिनय, समोर घडणार्या घटना या सगळ्या गोष्टी अधिकच्या मदतीला असतात. अभिवाचनाच्या वेळी प्रेक्षक समोर बसलेले असतात. त्यांची प्रतिक्रिया समोरासमोर मिळते. त्यामुळे हा प्रयोगही त्यांचं लक्ष सादरीकरणावरून हलणार नाही इतपत आकर्षक, उत्सुकतापूर्ण होईल याची काळजी घ्यावी लागते. संहिता वाचत असताना प्रेक्षकांकडे बघत (अर्थातच आपली भूमिका सुटू न देता), त्यांना विश्वासात घ्यावं लागतं; आपण ‘स्वान्त सुखाय’ वाचत नाही याचं भान ठेवावं लागतं; प्रयोग बहुतेक वेळी समीप रंगमंचावर होत असल्यामुळे आपल्या चेहर्यावर येणारे हावभाव प्रेक्षक वाचणार आहेत याचंही भान ठेवावं लागतं. तात्पर्य, अभिवाचन हा नाटक किंवा श्रुतिका यांहून वेगळाच कलाप्रकार असल्यानं त्याचीही पुरेशी तयारी करावी लागते.
संहिता पाऊण ते एक तास या वेळात बसवायची असते आणि त्यात दोन ते पाच कलाकारांचा सहभाग अपेक्षित असतो. मग कुणी सरळ सरळ एकांकिका किंवा नाटकाचा संपादित भाग सादर करतात. कुणी साहित्यकृतीचं नाट्य रूपांतर करतात. आमच्याकडे ‘कलापिनी’च्या – ‘तळेगाव’ – लोकांनी ‘रारंग ढांग’ कादंबरीचं वाचन केलं होतं. (पुढे, राज्य नाट्य स्पर्धेसाठी नवं नाटक त्यातूनच मिळालं हा बोनस फायदा…!) कुणी एकाच साहित्यिकाच्या कथा किंवा कविता घेऊन सादरीकरण करतं. त्या साहित्यिकाचं आयुष्य किंवा त्याचे विचार, साहित्यातलं सौंदर्य उलगडून दाखवतं. प्रकाश देव – कोराडी- नागपूर – यांनी ना.धों.महानोरां च्या कवितेचा धांडोळा घेतला होता तर ‘महाराष्ट्र कल्चरल’नं पु.शि.रेगे यांच्या कवितेतले ‘सृजनरंग’ दाखवले होते. कुणी एक विषयसूत्र घेऊन, त्यासंबंधीच्या वेगवेगळ्या साहित्यिकांच्या भावविचारांचा कोलाज सादर करतं. पहाटेपासून परत पहाट होईपर्यंतची वेळ, सहजीवन, घरं – त्यांचे प्रकार असे वेगवेगळे विषय हाताळले गेले. तर कुणी स्पर्धेकरता खास नवीच संहिता लिहून आणतं. अर्थात यातलं काहीही केलं तरी भरपूर साहित्यवाचन जाणीवपू्र्वक केलेलं असेल तरच संहिता चांगली तयार होऊ शकते. (लोकांनी पुस्तकांकडे परत वळावं हाही या स्पर्धेचा उद्देश आहेच!)
खरं तर, नाटक -एकांकिका करतानाही; प्रेक्षागृहातील पुढच्या चार-पाच रांगांमध्येच दृश्य परिणाम पोचतो. त्याच्या पुढे ‘मुख्यत: नटा’चा आवाज, संगीत या गोष्टी नाटक प्रेक्षकांपर्यंत (श्रोतेच ते) पोचवतात. अभिवाचनामध्ये तो ‘वाचिक अभिनय’ पणाला लागतो. कारण तेथे समोर ‘दृश्य’ नसतेच. एकांकिका किंवा नाट्यस्पर्धा सध्या जागोजागी भरवल्या जात आहेत. त्यांची मोठमोठी बक्षिसं, आर्थिक आणि राजकीय गणितं अशा वेगवेगळ्या बाजू पुढे येत असताना आयोजक आणि स्पर्धक, दोघांच्याही दृष्टीनं कमी खर्चात नाट्य व साहित्यसाधना, दोन्ही साधणारा अभिवाचन हा कलाप्रकार आम्हाला महत्त्वाचा वाटला.
आम्ही खानदेश विभागापुरता हा महोत्सव २००२ साली पहिल्यांदा आयोजित केला. नंतर पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या स्मृतीनिमित्ताने राज्यस्तरीय साहित्य अभिवाचन महोत्सव म्हणून रंजन दारव्हेकर यांच्या सहकार्याने सुरू ठेवला. तो २०१० पासून महोत्सव ‘अखिल भारतीय’ झाला. मुंबई , पुणे , नाशिक , सोलापूर , लातूर , नांदेड , नागपूर , औरंगाबाद , धुळे , जळगाव , चोपडा, गोवा, इंदूर अशा विविध ठिकाणचे संघ हजेरी लावून गेले आहेत. दहाव्या वर्षी(२०१२) हैदराबाद, बेळगाव, बंगळूर इथूनही प्रवेशिका आल्या. या आमच्या प्रयत्नांत नाट्यकर्मी व समीक्षक अनिरुद्ध खुटवड, अजय जोशी, धीरेश जोशी, अनिल भागवत, ज्योती आंबेकर, माधवी सोमण, वामन पंडित, पांडुरंग फळदेसाई, शशिकांत बर्हाणपूरकर, विजय रणदिवे, लक्ष्मीकांत धोंड़, वसंत दातार, रत्नपारखी अडावदकर, अपर्णा रामतीर्थकर, उल्हास कडुस्कर, यादव खैरनार अशा मान्यवरांचा सहभाग लाभला आहे. तर उद्घाटक, प्रमुख पाहुणे किंवा सादरकर्ते म्हणून रंजन दारव्हेकर, डॉ. गिरीश ओक , अशोक शिंदे, वीणा देव, बंडा जोशी वगैरे मंडळींनी हजेरी लावली आहे.
डॉ. मुकुंद करंबेळकर,
शल्यशोभा, कारगाव रोड,
चाळीसगाव, जळगाव – ४२४१०१
भ्रमणध्वनी- ९८२२२६३२७९
ईमेल –mukunddk@gmail.com