यस्टरडे, टुडे, टुमारो

0
55

     कॉम्रेड यशवंत चव्हाण यांच्‍या नव्वदाव्‍या वाढदिवसानिमित्त त्यांचा मुलगा, माधव चव्हाण यांनी त्यांना अपूर्व भेट दिली. भारतातले तीन महत्त्वाचे बुद्धिवंत त्यांनी एकत्र आणले आणि ‘इंडिया: यस्टरडे, टुडे, टुमारो’ या विषयावर तीन व्याख्याने घडवली. ते तीन विचारवंत म्हणजे इतिहासलेखक रामचंद्र गुहा, संपादक कुमार केतकर आणि तंत्रज्ञ नंदन निलकेणी. महाराष्ट्रातील बौद्धिकता जवळजवळ लोप पावत असताना अशी व्याख्याने घडवण्यातील माधव चव्हाण यांचे औचित्य अनुकरणीय होय.


     कॉम्रेड यशवंत चव्हाण नव्वद वर्षांचे झाले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा मुलगा, माधव चव्हाण यांनी त्यांना अपूर्व भेट दिली. भारतातले तीन महत्त्वाचे बुद्धिवंत त्यांनी एकत्र आणले आणि ‘इंडिया: यस्टरडे, टुडे, टुमारो’ या विषयावर तीन व्याख्याने घडवली. ते तीन विचारवंत म्हणजे इतिहासलेखक रामचंद्र गुहा, संपादक कुमार केतकर आणि तंत्रज्ञ नंदन निलकेणी.

     रामचंद्र गुहा यांचे सध्या ‘इंडिया आफ्टर गांधी’ हे पुस्तक गाजत आहे. त्यांचा देशी-विदेशी संचार असतो. ते तेथील विद्यापीठांत व्याख्याने देतात आणि जगभरच्या वर्तमानपत्रांसाठी नित्य लिहीत असतात. कुमार केतकर हे ‘दिव्य मराठी’चे संपादक आहेत. त्यांची पत्रकार, लेखक म्हणून कारकीर्द गाजत आलेली आहे. त्यांचा उल्लेख टिळक ते तळवलकर या परंपरेतला शेवटचा संपादक म्हणून होतो. नंदन निलकेणी यांचे ‘इमॅजिनिंग इंडिया’ नावाचे पुस्तक सध्या जगभर चर्चेत आहे. ते ‘इन्फोसिस’च्या नारायण मूर्तींचे सहकारी. परंतु सध्या, त्यांची नियुक्ती पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ‘युनिक आयडेंटिटी’, ‘आधारे’पत्रे देण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर संचालक म्हणून केलेली आहे.

      कार्यक्रमाचे संयोजक माधव चव्हाण हे बहुढंगी व्यक्तिमत्त्व आहे. ते ‘प्रथम’ या संस्थेचे प्रवर्तक-संचालक. त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाचा मसुदा घेऊन देश ढवळून काढला आहे. त्यासाठी त्यांच्यासोबत त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फौज गोळा केली. त्यांच्या कामातील नमुनेदारपणा लक्षात घेऊन जगभरातील दात्यांनी त्यांना कोट्यवधी रूपये दिले आहेत. त्यांना अलिकडेच अमेरिकेतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा दोन कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाला. ते सोनिया गांधी यांच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत.

     कार्यक्रम निमंत्रितांसाठी होता तरीसुद्धा तीन आघाडीचे विचारवंत, माधव चव्हाणांसारखा संयोजक आणि ज्यांच्या सन्मानार्थ हा कार्यक्रम योजला गेला होता त्या कॉम्रेड यशवंत चव्हाण यांचे त्यागमय आयुष्य… या पार्श्वभूमीवर कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात तोबा गर्दी उसळली यात आश्चर्य नव्हते.

     माधव यांनी आरंभी वडिलांविषयी खरोखरीच चार कृतज्ञतेचे शब्द उच्चारले व व्याख्यात्यांचा मनमोकळा, हसतखेळत परिचय करून दिला. ते म्हणाले, की कॉम्रेड यशवंत चव्हाण यांचे सारे जीवन मुंबई-महाराष्ट्रात व्यतीत झाले. येथे जमलेला जनसमुदाय बहुसंख्येने मराठी आहे. हे पाहता कार्यक्रम मराठीतून व्हायला हवा. तथापि त्या परिस्थितीत रामचंद्र गुहा व नंदन निलकेणी काहीच बोलू शकणार नाहीत, म्हणून कार्यक्रम इंग्रजी भाषेत होत आहे!

     पहिले व्याख्यान रामचंद्र गुहा यांचे झाले. त्यांनी माधव चव्हाणांच्या ‘मराठी’चा उल्लेख करून हलक्याफुलक्या भाषेतच सुरूवात केली, की मला मराठी माहितीचे आहे. विजय हजारे, गावसकर, तेंडुलकर हे मला माहीत आहेत. किशोरी अमोणकर ते वीणा सहस्रबुद्धे हे अभिजात शास्त्रीय गायक मला माहीत आहेत. टागोर, गांधी आणि नेहरू ही भारतातील सर्वश्रेष्ठ त्रयी वगळली तर त्यांच्यानंतरची विविध क्षेत्रांतील कर्तबगारी महाराष्ट्राची आहे हेही मला ठाऊक आहे… असे बोलत बोलत त्यांनी त्यांच्या ‘यस्टरडे’ या विषयाला हात घातला. त्यासाठी त्यांनी इतिहासाबरोबरचे त्यांचे दुसरे वेड, क्रिकेटचा दाखला घेतला. त्यांनी त्या खेळातील पी. बाळू या, गेल्या शतकातील असाधारण क्षमतेच्या खेळाडूवर, तो दलित असल्यामुळे कसा अन्याय झाला आणि त्यामुळे भारताचीही प्रगती खुंटली हे दाखवून दिले. त्यांचे ऐतिहासिक तपशील अचूक होते आणि ते मांडण्याची हातोटी आकर्षक होती. पी. बाळू यांचा एक सत्कार, भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये विजयी होऊन भारतात परतल्यावर

     झाला होता. ही गोष्ट १९२०च्या आसपासची. ती सर्व हकीगत सांगून गुहा नाट्यपूर्ण रीत्या थबकून पुढे म्हणाले, की त्या सत्कारात प्रमुख पाहुणा म्हणून एक उच्चशिक्षित नवजवान उपस्थित होता. त्याचे बहुधा पहिले जाहीर भाषण त्यावेळी झाले. तो जवान म्हणजे डॉ. बी. आर आंबेडकर!

     प्रसंग असे नाट्यपूर्ण मांडणीने खुलवत, त्यांनी पी. बाळू आणि त्यांचा भाऊ विठ्ठल पानवलकर यांचे चरित्र व सभोवतालची सामाजिक परिस्थिती, जातीयता उलगडून सांगितली. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळ जोमात येत होती तरी येथील सामाजिक-सांस्कृतिक जीवन कसे निकृष्ट होत गेले याचे दर्शन घडले.

     पी. बाळूंप्रमाणेच आणखी एक नमुनेदार व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी गांधीजींच्या परिवारातील कार्यकर्त्या स्ने़ड ऊर्फ मीराबेन यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, की बिथोवेनच्या प्रेमात असलेली ही इंग्लिश बाई रोमा रोलाच्या लेखनाने प्रभावित झाली आणि त्यांच्याकडे फ्रान्समध्ये जाऊन पोचली. स्नेड यांना रोमा रोलांकडे महात्मा गांधींच्या कार्याचा परिचय झाला. तेव्हा त्या भारतात येऊन दाखल झाल्या. त्यांनी गांधींबरोबर अनेक वर्षे काम केले. परंतु नंतर, त्या गांधी आश्रमातील कडक, अमानुष निर्बंधांमुळे व्यथित होऊन हिमालयात गेल्या. त्यांनी तिथे पर्यावरणाचा अभ्यास करून अनेक त-हेचे लेखन केले आणि आयुष्याच्या अखेरीस पुन्हा बिथोविनचा ध्यास घेऊन त्या युरोपात निघून गेल्या.

     त्यांनी कर्नाटकातल्या डॉ. शिवराम कारंथ यांचा कॉम्रेड चव्हाण यांच्यासारखे प्रदीर्घ, विविध गुणसंपन्न जीवन जगलेली व्यक्ती म्हणून उल्लेख केला व म्हणाले, की त्यांचा नव्वदावा वाढदिवस तीन वर्षे साजरा होत होता!  रामचंद्र गुहा यांनी सांगितले, की यशवंत चव्हाण जगले तो काळ अशा नाना त-हेच्या व्यक्तींनी समृद्ध केलेला आहे. त्यांतल्या आघाडीच्या, नेतेसमान असलेल्या व्यक्तींचा आपल्याला परिचय असतो, परंतु सार्वजनिक जीवन घडवतात अशा विविध क्षेत्रांतील संपन्न व्यक्तिमत्त्वे. कॉम्रेड यशवंत चव्हाण हे तसेच एक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे त्यागमय आणि कष्टमय जीवन हे आपल्याला सतत प्रेरणा देत राहील.

     रामचंद्र गुहा यांच्या भाषणातील क्रिकेटचा उल्लेख कुमार केतकर यांनी अचूक उचलला आणि ते म्हणाले, की भारतातील परिस्थिती बिघडत गेली ती मुख्यत: जातीयतेमुळे. हा रोग पी.बाळू यांच्या काळात जसा होता तसाच; किंबहुना अधिक तीव्र स्वरूपात आजही आहे. कुमार केतकर यांच्याकडे विषय होता ‘टुडे’. त्यांनी स्वातंत्र्योत्तर आतापर्यंतची त्रेसष्ठ वर्षे ‘टुडे’मध्ये समाविष्ट केली. ते म्हणाले, की या काळातील वर्तमान अगदी वेगवेगळ्या स्वरूपाचे आहे. ते १९४७ साली जसे होते तसे १९५० साली, भारत प्रजासत्ताक झाला तेव्हा नव्हते. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी १९७५ साली, देशात अराजक माजले म्हणून आणीबाणी पुकारली, त्यावेळी वेगळीच परिस्थिती होती आणि रशिया १९८९ मध्ये विघटित झाला, त्यानंतरची परिस्थिती अगदीच भिन्न होती. नरसिंहराव १९९१ साली पंतप्रधान झाले. त्यांनी उदारीकरण आणले. तो जागतिकीकरणाचा आरंभ मानला जातो. त्यानंतरचा वीस वर्षांचा झपाटा तर विलक्षणच आहे. वर्तमानातल्या या घटनांना ऐतिहासिक महत्त्व आले आहे आणि आपल्या असे ध्यानात येते, की केवळ भविष्य नव्हे तर इतिहाससुध्दा बदलत आहे! कारण या सर्व घटना ऐतिहासिकदृष्टया आणि राजकीयदृष्ट्या वेगवेगळ्या त-हेने मांडल्या जातात. अशी अतिशय अस्थिर म्हणून बेभरवशाची समाजस्थिती सद्यकाळात आहे.

     नंदन निलकेणी हे तंत्रवैज्ञानिक.  त्यांनी त्यांच्या ‘आधार’ ओळखपत्रिकेची माहिती खुलासेवार दिली. त्यामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाला बारा अंकी ओळख लाभणार आहे आणि या सर्व ओळखी संगणकांनी गुंफल्या जाणार असल्यामुळे, प्रत्येक व्यकीला ती भारतात कोठेही गेली तरी ओळखीचे स्थान लाभणार आहे! त्यामुळेच छत्तीसगडचा तरूण दिल्ली किंवा मुंबईत आला तरी तो ‘परका’ राहणार नाही. त्याला त्याची ओळख नव्या ठिकाणी पटवता येईल आणि त्याची पत सिद्ध करता येईल.

     निलकेणी यांनी या योजनेमुळे जे सामाजिक उत्थापन घडणार आहे त्याची झलक अर्थव्यवहारातील उदाहरण घेऊन विशद केली. ते म्हणाले, की रोजगार हमी योजनेतील कामगारांचे वेतन सध्या बॅंकेत जमा होते. ते मिळवण्यासाठी कामगाराला आठ किलोमीटरपासून चाळीस किलोमीटरपर्यंत कितीही प्रवास करावा लागतो. एकदा का त्या कामगाराला (निलकेणी यांच्या) या योजनेमुळे ‘ओळख’ मिळाली की त्याचे पैसे त्याला त्याच्या खेड्याच्या किराणा मालाच्या व्यापा-यामार्फतही देण्याची व्यवस्था करता येईल. बॅंक किंवा कोणतीही अर्थसंस्था भारतातील दूरवरच्या खेड्यापर्यंत पोचेल हे संभवनीय नाही, तथापि किराणा मालाचा व्यापारी हे प्रत्येक खेड्यातील अर्थव्यवहाराचे केंद्र ठरू शकेल. निलकेणी यांनी उभा केलेला भविष्यकाळ (टुमारो) रोमांचकारक होता. ते अखेरीस म्हणाले, की कॉम्रेड चव्हाण गेल्या शतकात कष्टक-याला न्याय मिळावा म्हणून लढले. आमचेही प्रयत्न वंचितांना न्याय मिळावा यासाठीच आहेत. भारतातील दु:खी, कष्टी, मुख्य प्रवाहाबाहेर फेकली गेलेली सर्व जनता मुख्य प्रवाहात यावी, त्यांनी या देशाचे नागरिक म्हणून सन्मानाने जगावे यासाठी इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून चालवलेला हा प्रयास आहे. त्यातून इष्ट गोष्टी घडतील, कारण हे माध्यम जवळ जवळ बिनखर्चाचे आहे.

     निलकेणी यांनी ‘युनिक आयडेंटिटी’मुळे नागरिक ‘अनलीश’ होतील असा शब्द प्रयोग केला. लीश म्हणजे साखळी. साखळीचा बंध तुटून जाईल असा निलकेणी यांचा अभिप्राय होता. मार्क्सने देखील म्हटले होते, की क्रांतीनतर कामगारांच्या पायांतील बेड्या तुटून पडतील! शेवटी, ते तंत्रज्ञानामधून घडणार आहे तर!

     तिन्ही व्याख्याने झाल्यावर कॉम्रेड यशवंत चव्हाण यांचा त्यांचे बंधू अप्पासाहेब चव्हाण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कॉम्रेड चव्हाण यांनी उत्तरादाखल छोटे भाषण करून कार्यक्रमाचा समारोप केला. ते म्हणाले, की १९४२ साली आम्ही कॉलेजमधील तरुण जसे देशस्वातंत्र्याच्या भावनेने भारावून गेलो होतो तसे वातावरण मला या सभागृहात जाणवत आहे!

      जगातील अण्वस्त्रे नष्ट होतील, भारतातील जातीयता संपून जाईल आणि सर्व मनुष्यमात्र सुखासमाधानाने नांदतील अशी आशा व्यक्त करून त्यांनी आपले भाषण संपवले.

     मुंबई–महाराष्ट्रात सभा-समारंभ बरेच होत असतात. अनेक सत्कार साजरे केले जातात. परंतु कॉम्रेड यशवंत चव्हाण यांच्या नव्वदाव्या वाढदिवससमारंभाला जशी वैशिष्ट्यपूर्णता लाभली तशी क्वचित कुठच्या कार्यक्रमास मिळाली असेल, महाराष्ट्रातील बौद्धिकता जवळजवळ लोप पावत असताना अशी व्याख्याने घडवण्यातील माधव चव्हाण यांचे औचित्य अनुकरणीय होय.

प्रतिनिधी-  thinkm2010@gmail.com

{jcomments on}

About Post Author

Previous articleवसाहतवादी वृत्ती
Next articleडुडुळगावचे कमळ-उद्यान
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.