वैजापूरमधील धोंदलगावाने गेली पंचेचाळीस वर्षे पाणीटंचाईची झळ सोसली आहे. त्या गावात आनंद असोलकर या जादूगाराने येऊन गावातील नागरिकांना पाणी अडवण्याचे महत्त्व समजावले आणि ते फक्त लोकसहभागातून शक्य आहे ही भावना त्यांच्या मनी बिंबवली…
वैजापूर हा कायमस्वरूपी अवर्षणग्रस्त तालुका. तीव्र पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या पिढ्या तेथे वर्षानुवर्षे होऊन गेल्या. सर्वकाही निसर्गावर ढकलून तेथील मंडळी निष्क्रिय झाली. मात्र लोकसहभागातून जलसंधारणाची कामे गावोगावी होऊन अनेक गावे ही पाणीटंचाई मधून बाहेरही पडली. एक अवलिया आम्हाला भेटला… देवदूतच म्हणा त्याला… त्याची स्वत:ची कोणतीही मालमत्ता धोंदलगावाच्या पन्नास किलोमीटर त्रिज्येतदेखील नाही. आनंद असोलकर नावाचा तो देवदूत ! त्याने गावातील नागरिकांना पाणी अडवण्याचे महत्त्व समजावून सांगितले आणि ते फक्त लोकसहभागातून शक्य आहे हे पटवून दिले. बघता बघता, गावातील तरुण मंडळी, ज्येष्ठ नागरिक, महिला, विविध पदाधिकारी एकत्र आले. त्यांनी छोटेखानी निधी जमवला. पिण्याच्या पाण्याची बारव (विहीर) असलेल्या जागेच्या वरील भागातील जुना सिमेंट बंधारा खोल (‘खोलीकरण’) केला. दानशूर व्यक्तींनी गावच्या लोकसहभागाला आर्थिक योगदान दिले. पहिल्याच प्रयत्नात सुमारे नऊ हजार घनमीटर खोदकाम पूर्ण झाले. नशीब असे, की कधीही वेळेवर न येणारा पाऊस पहिल्याच आठवड्यात धो धो पडला आणि गावकऱ्यांच्या श्रमाला फळ आले ! वर्षानुवर्षे टँकरने पाणी मिळत असलेल्या गावाला, गावातील बारवेला पहिल्याच पावसात मुबलक पाणी मिळाले.
माझ्या गावास पाणीटंचाईचा शिक्का मागील जवळपास चाळीस-पंचेचाळीस वर्षे बसत आलेला होता. ते गाव पिण्याच्या पाण्यापुरते का होईना स्वयंपूर्ण झाले. पाणी अडवण्याचा किती मोठा फायदा होऊ शकतो त्याचा अनुभव गावकऱ्यांना आला.
एकदा गावाचे नशीब फळफळले, की सगळे जुळून येते असे म्हणतात, त्याचा प्रत्यय आम्हाला लोकशक्तीतून आला. आनंद असोलकर यांनी गावात जलसंधारणाचे काम करावे असा आग्रह धरला. लोकसहभागातून काम करण्याची गावाची इच्छा व तयारी होतीच. गावातील नदी आणि ओढे यांचा सविस्तर अभ्यास करून नियोजन करण्यात आले. जुने सर्व सिमेंट बंधारे हा घटक पकडून त्या बंधाऱ्याच्या वरील संपूर्ण भाग यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण केले गेले. शंभर-सव्वाशे दिवसांत सुमारे साडेसात हजार मीटर लांबीचे पंधरा-अठरा मीटर रुंदीचे आणि तीन मीटर खोलीचे काम पूर्ण झाले. लगतच्या पावसात मिळालेल्या अनमोल साथीमुळे गावातील नदीपात्र आणि ओढे पाण्याने गच्च भरले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला, शेतीसाठी प्रचंड पाणी उपलब्ध झाले. ज्या गावात मागील चाळीस वर्षे, दिवाळीनंतर पिण्यास पाणी मिळत नव्हते तेथे उन्हाळ्यात जवळपास बाराशे एकर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. गावात चहाला दूध मिळणे अवघड होते, पण त्याच गावात भर उन्हाळ्यात साडेपाच हजार लिटरपेक्षा जास्त दूध संकलन होत आहे. एक छोटीशी सुरुवात किती मोठी प्रगती करू शकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे माझे गाव, धोंदलगाव आहे.
‘नाम फाउंडेशन’ने धोंदलगाव दत्तक घेतले. त्यातून गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार केला; जलसंधारणाच्या कामाला वेग दिला. त्यासाठी पुन्हा फाउंडेशनने दोन मशीन व डिझेल उपलब्ध करून दिले. त्यामुळे गावकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले.
– बिपीन साळे 9850412478 vb_sale@rediffmail.com
(जलसंवाद, ऑगस्ट 2022 अंकातून)
————————————————————————————————————————————-