यशोगाथा : चवीने खाणार त्याला यशो देणार!

0
45
_YashoGatha_ChavineKhanar_1.jpg

एक मराठमोळी दातांची डॉक्टर, तिची प्रॅक्टिस सांभाळून चक्क केटरिंगचा व्यवसाय करते! आणि तोही या श्रेणीतील प्रतिष्ठीत उद्योगपतींच्या घरून तिच्या पदार्थांना मागणी येते! डॉक्टरकी आणि केटरिंग हे व्यवसाय दोन टोकांवर तितक्याच समर्थपणे पेलणाऱ्या त्या जिगरबाज स्त्रीचे नाव यशोधरा धनंजय पेंडसे ऊर्फ यशो असे आहे. ती मूळची कोल्हापूरची. आई संगीत विषय घेऊन एम.ए. झालेली, वडील यशस्वी वकील, आजोबा(आईचे वडील) कोल्हापुरातील पहिले एम.डी., एक पणजोबा बॅरिस्टर केशवराव देशपांडे हे गांधीजींचे अनुयायी- त्यांनी त्यांच्या वकिलीवर देशासाठी पाणी सोडले होते. दुसरे पणजोबा वामनराव पाटकर बडोदा संस्थानाचे सरन्यायाधीश… ही गाडी अशीच पुढे-पुढे (आणि मागे मागेही) जात राहिली.

यशोच्या रक्तातील पाककौशल्याचे जीन्स ही देणगी तिला आजीकडून (वडिलांची आई) मिळाली. ती मोदक, पुरणपोळ्या यांसारखे आव्हानात्मक पदार्थही दहाव्या-अकराव्या वर्षांपासून करू लागली. पुरणपोळ्याही कशा तर ओठांनी तोडाव्यात अशा! तिची आईही सासूच्या हाताखाली शिकून त्या विद्येचे क्लास घेण्याइतकी तरबेज झाली. तिच्या लहानपणी, म्हणजे साधारण पंचेचाळीस वर्षांपूर्वी त्यांच्या घरी रात्रीच्या जेवणात फ्रेंच किश (quiche), इटालियन पास्ता, सूप, डेझर्ट असा थाट असे. दुपारी मात्र कांदा-खोबऱ्याचे वाटण लावलेले टिपिकल सारस्वती जेवण. यशो माहेरची सारस्वत- यशोधरा सबनीस. त्या काळी त्यांच्या घरी ‘लाईफ’, ‘वूमन अँड होम’, ‘गुड हाऊसकीपिंग’ अशी, पाककौशल्याला वाहिलेली विदेशी मासिके येत. तिचे वडील काही गोष्टींत आग्रही होते आणि ते त्यांची त्या संबंधीची ठाम मते वारंवार बोलून दाखवत. उदाहरणार्थ, ते यशोला नेहमी सांगत, “भले, तू लग्न कोट्यधीशाशी कर, पण तेथील नोकर माणसांकडून उत्तम जेवण बनवून घेण्यासाठी तुला ते फिल करता यायला हवं.” यशोच्या केटरिंगच्या व्यवसायाचे बीज असे, तिच्या लहानपणीच्या सुग्रास वातावरणात पेरले गेले.

_YashoGatha_ChavineKhanar_2.jpgतरीही यशोच्या मनात ती शाळा-कॉलेजमध्ये शिकत असल्यापासून मेडिसिन हेच करिअर पक्के होते; तिची मेडिकलची अॅडमिशन अवघ्या एका मार्काने हुकली. तेव्हा वैफल्यग्रस्त होऊन, त्या मुलीने चक्क एक वर्ष बॅडमिंटन खेळण्यात घालवले. घालवले का म्हणायचे? कारण त्यातही नैपुण्य तिने एवढे प्राप्त केले, की महाराष्ट्राच्या टीममध्ये तिची निवड झाली. पण नंतर वडिलांनी तिला जागे केल्यावर तिने दंतवैद्यक शाखेसाठी अर्ज भरला. तिने मुंबईच्या गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजमध्ये पाच वर्षांचे शिक्षण पूर्ण करून, 1982 साली डिग्री मिळवली. लगेच, 1983 मध्ये शुभमंगल आणि 1985 पासून दंतवैद्यकीच्या व्यवसायाचा शुभारंभ… तेव्हापासून तिने तो व्यवसाय जपला आहे. दंतवैद्यकीत जम बसला, तरी यशोला पाककलेची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. यशोचे प्रयोग दुपारच्या मोकळ्या वेळी सुरू झाले. तिच्या हाताची चव, तिचा उरक आणि पदार्थाची विविधता यांची कीर्ती पसरू लागली आणि ऑर्डरी देण्या-घेण्यासाठी तिच्या घराबाहेर गाड्या थांबू लागल्या.

मोठमोठे उद्योगपती यशोला कसली कसली ऑर्डर देतात, हा माझ्या जिभेच्या टोकावरील प्रश्न मी तिला विचारून टाकला आणि त्यानंतर चॉकलेट मुस, अस्पारॅगस मुस, डबल चॉकलेट गनाश केक…अशी नावे ऐकताना माझा बर्फ होत गेला! एका अत्यंत प्रतिष्ठीत उद्योगपतीला म्हणे यशोच्या हातचे चॉकलेट मुस हे डेझर्ट अत्यंत आवडते. त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या ऑर्डरमध्ये तो पदार्थ असतोच असतो. मंगेशकरांची तिसरी पिढीही यशोचे स्टार्टर्स व डिप्स यांच्या प्रेमात आहे. रचना खडीकर-शहा व वैजनाथ हृदयनाथ मंगेशकर यांच्या माध्यमातून ती आशा व लता यांच्यापर्यंत पोचली. लतादीदींनी फोनवरून दिलेली जेवणाची ऑर्डर आणि वेगवेगळ्या रेसिपीजवर आशातार्इंशी झालेल्या पोटभर गप्पा हे यशोने मनाच्या कुपीत जपून ठेवलेले अविस्मरणीय क्षण!

_YashoGatha_ChavineKhanar_3.jpgमला यशोचे मेनुकार्ड मनातल्या मनात वाचतानाही धाप लागली. त्यांतील क्रेप्स (स्टफ) इं पॅपरिका सॉस, मेक्सिकन सेव्हन लेअर्स डिश विथ नचो चिप्स (mexican seven layers dish with nacho chips), बर्मीय खाँसुये (burmese khowsuey), ग्रीक सॅलेड विथ फेटा चीज या तिच्या काही सिग्नेचर डिशेस. मी ते क्रेप्स करण्याची बेसिक कृती धीर करून विचारली, पण मी ते ऐकत असतानाच ती डिश करून बघण्याचा विचार मनातून काढून टाकला होता. पदार्थाचे साहित्य आणि कृती ऐकताना मला सगळ्यात महत्त्वाची वाटलेली (खरे तर समजलेली) गोष्ट म्हणजे ती हे सॉसेस – म्हणजे पॅपरिका सॉस, बर्गन्डि सॉस इत्यादी- एकदम बनवून डीप फ्रिजरमध्ये टाकत नाही तर ऑर्डरप्रमाणे त्या त्या दिवशी ताजे ताजे बनवते. त्याने चवीत फरक पडतोच. साधे आले-लसूण-मिरचीच्या गोळ्यांचेच उदाहरण घ्या ना! ती पेस्ट फ्रिजमधील वापरण्याऐवजी आयत्या वेळी नुसती कुटून जरी टाकली तरी चव पॉर्इंट फाइव्हने वर सरकतेच!

मला स्तब्ध करणारा आणखी एक मुद्दा म्हणजे यशो स्वतःच्या ओट्यावर पाच जणांपासून शंभर माणसांपर्यंतच्या ऑर्डरचा स्वयंपाक करते. त्यासाठी तिने तिला सासू-सासऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्याचा आवर्जून उल्लेख केला. अर्थात चिरणे, कापणे, मागचे आवरणे अशा मदतीसाठी तिच्याकडे दोन बायका आहेत (त्याही गेल्या दहा-बारा वर्षें टिकवलेल्या), पण शेवटचा हात यशोचा. त्या सहा हातांबरोबर आणखी दोन हात अत्यंत आवडीने व सफाईने काम निपटत असतात. त्या आधारवडाचे नाव धनंजय पेंडसे.

केटरिंगमध्ये पत्नीचा जम बसताना पाहून, कोणताही स्वाभिमान न बाळगता स्वतःचा मार्ग बदलून, तिला साथ देऊन एकत्रितपणे व्यवसाय फुलवणाऱ्या धनंजय यांना मानायलाच हवे! धनंजय यांनी स्वतःची मोहोर आता दहा-बारा पदार्थांवर उमटवली आहे. मुख्य म्हणजे त्यांनी स्वतःकडे डेकोरेशन, पॅकिंग; तसेच, घरातील स्टॉक तपासून त्यानुसार सामान भरणे ही कामे घेतल्यामुळे यशोचा भार कमी झाला आहे. त्या चार जणांचा चमू चायनीज, फ्रेंच, इटालियन, बर्मीज, थाई, काँटिनेंटल, लेबनिज आणि अर्थातच भारतीय (यात अळूचे फदफदे आणि वालाचे बिरडे पण आले) जेवण बनवण्यात वाकबगार आहे. यशोने या रेसिपी शिकण्यासाठी कोठलाही क्लास लावलेला नाही. ग्रंथ हेच तिचे गुरू. तिच्यापाशी पाककलेच्या दीडदोनशे पुस्तकांचा खजिना आहे. तिने थोरामोठ्यांकडे जेवण पाठवण्यासाठी उत्तमोत्तम कटलरीदेखील जमवली आहे (उघड आहे – प्रसिद्ध आणि मोठ्मोठ्या व्यक्तींच्या घरी थोडेच चिनी मातीच्या भांड्यांतून जेवण पाठवणार?)

_YashoGatha_ChavineKhanar_4.jpgव्यवसायात कसोटीचे क्षण अनेक. त्यातूनच तिला धडे मिळत गेले. एकदा सकाळी दवाखान्यात पेशंट तपासत असताना एक ऑर्डर आली (अशा वेळी ती फक्त नंबर टिपून घेते आणि मग सावकाश बोलते). ग्राहकाला त्याच दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता चॉकलेट मुस केक हवा होता. यशो ती गोष्ट पुढील पेशंट्सच्या नादात पार विसरली आणि सायंकाळी पाच वाजता फोन आला, ‘केक न्यायला ड्रायव्हरला पाठवू का?’ अक्षरशः आणीबाणीची वेळ. यशोने विनंती करून फक्त एक तासाची मुदत मागून घेतली आणि पती-पत्नींनी युद्धपातळीवर हालचाली करून काम फत्ते केले. त्या दिवसापासून, धनंजयची चॉकलेट मुस केक ही खासीयत झाली आहे. एकदा तिने एका अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची फर्माईशी ऑर्डर खूप मेहनत घेऊन बनवली आणि त्या दोन तयार डिश दोन हातांत घेऊन किचनच्या बाहेर येत असताना अचानक तिचा पाय घसरला, पण तिने ‘आधी लगीन कोंढाण्याचं’ या न्यायाने हातातील वस्तूंना जराही धक्का लागू दिला नाही. त्या प्रयत्नात तिच्या गुडघ्याची वाटी मात्र तुटली! एक घाव आणि पाच तुकडे! तिला मोठ्या ऑपरेशनला सामोरे जावे लागले. त्या गोष्टीला जेमतेम पंधरा दिवस होतात न होतात तोच बाईसाहेबांचे दोन्ही व्यवसाय पूर्ववत सुरू!

यशोकडे व्यवसायासाठी आवश्यक अशी रत्नपारखी नजर उपजत आहे. त्यामुळे स्वयंपाकासाठी लागणारा उत्तम दर्जाचा कच्चा माल जगाच्या पाठीवर कोठे मिळतो याची नोंद तिच्या मेंदूच्या संगणकात पक्की आहे. ती म्हणाली, ‘टर्कीचं मसाला मार्केट ही माझी फिरण्याची अत्यंत आवडीची जागा. तेथील वेगवेगळ्या मसाल्यांचे, केशराचे, कुसकूसचे (तिथला भात) आणि जेवणात घालण्याच्या फुलांचे ढीग पाहताना- तो गंध भरून घेताना वेड लागायचे बाकी असते.’

बोलता बोलता, मला यशोच्या मॉडेलिंग या तिसऱ्या करिअरविषयी कळले. तिच्या त्या वेगळ्या वाटेची सुरुवात योगायोगाने झाली. तिच्या एका मैत्रिणीने ‘नेव्ही क्वीन काँटेस्ट’साठी तिचा फॉर्म परस्पर भरून टाकला. यशो केवळ एक वेगळा अनुभव घ्यावा म्हणून स्पर्धेला गेली व डोक्यावर मुकुट चढवूनच परतली! त्या यशापाठोपाठ मॉडेलिंगच्या ऑफर चालत आल्या. तिचा चेहरा त्यांपैकी विमल साडी, झंडू बाम, सर्फ… अशा एक-दोन नव्हे तर तब्बल पंचवीस उत्पादनांच्या जाहिरातींत झळकला. तिला ‘इव्हज विकली’, ‘फेमिना’ या नियतकालिकांत ‘ब्युटी विथ ब्रेन’ असे घोषवाक्य देऊन गौरवले गेले आहे. एअर इंडियाने भारतातील विविध प्रांतांच्या नववधूंच्या चित्रांचे एक कॅलेंडर 1989 मध्ये काढले होते. त्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करण्याचा मान यशोला मिळाला. तिने सलग दहा वर्षें तशा प्रकाशझोतात राहिल्यानंतर, घर व दंतवैद्यकी यांकडे जास्त लक्ष देण्यासाठी त्या क्षेत्रात तेथेच थांबण्याचा निर्णय घेतला. तिच्या चेहऱ्यावरील ग्लॅमरच्या खुणा पन्नाशीच्या तळ्यात-मळ्यात असतानाही सहज नजरेत भरतात.

यशो एका प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय शाळेतील शंभर मुलांच्या न्याहारी आणि दुपारच्या जेवणाची सोय पाहते.

‘चवीने खाणार त्याला यशो देणार’ अशी प्रसिद्धी हे तिचे स्वकष्टार्जित संचित आहे. तिच्या पाठचे दोन भाऊही तिच्या पावलांवर पाऊल टाकत मार्गक्रमण करत आहेत. मधील भाऊ डॉक्टर आहे, तर धाकट्याने कोल्हापुरात अस्सल कोल्हापुरी जेवणासाठी हॉटेल काढले आहे. तिचा मोठा मुलगा भारतातील पहिला आणि एकमेव व्यावसायिक रग्बी खेळाडू आहे. तो गेले सहा वर्षे जपानमध्ये व्यावसायिक रग्बी खेळतो आहे. तर धाकटा ‘IHM दादर केटरिंग कॉलेज’मधून पदवी मिळवून स्पेनमध्ये Culinary Science मध्ये उच्च शिक्षण घेत आहे.

– संपदा वागळे

About Post Author