यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील या ज्येष्ठ नेत्यांनी घडवलेल्या आणि सत्तरीच्या दशकात उभारीने पुढे आलेल्या पिढीतील ग्रामीण राजकीय नेतृत्वाचे एक वेगळेपण आहे. या पिढीने सहकाराची पायाभरणी आणि उभारणी केली. सर्वसामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी पण विलक्षण जिद्द आणि जनसंग्रहाचा व्यासंग या शिदोरीवर मोठे काम उभे केलेली ही माणसे आहेत. याच जातकुळीचे नेतृत्व अहमदनगर जिल्ह्यातील यशवंतराव गडाखांचे आहे. प्रगल्भ जाणिवां आणि समंजस विचार! त्यांचे गाव नेवासा तालुक्यातील ‘कौतुकी’ नदीच्या काठी वसलेले सोनई. त्यांचे बालपण, शालेय जीवन तिथेच गेले. शेतीचे अपुरे उत्पन्न आणि भाऊबंदकीचे जीवघेणे चटके कायम पाचवीला पुजलेले. गावाच्या बाजारात भाजी विकतांना, व्यापा-याकडे शेतीमाल घेऊन गेल्यावर उपेक्षा वाटयाला यायची. हक्काच्या उत्पन्नासाठी उपेक्षित वागणूक मिळायची. यशवंतराव सांगतात ‘मला ग्रामीण माणसांचे, दलितांचे, शेतक-यांचे जगणे परके वाटत नाही ; त्यांच्या मूळ वेदनेची जातकुळी एकच असते. मी तो भोग भोगला आहे. म्हणूनच माझ्या तरूण वयात वडील गेले तेव्हा सगळयांचा विरोध पत्करून दहाव्याचे जेवण न घालता त्याकाळी तो खर्च मी मागासवर्गीय वस्तीतील शाळेसाठी दिला’
यशवंतरावांचा राजकारणातील प्रवेश मात्र अपघातानेच झाला. ते बी.ए.बी.एड्.करून नोकरीच्या शोधात होते. नेमक्या त्या काळात जिल्हा परिषद निवडणूका जाहीर झाल्या. ‘या निवडणुकीला उभे राहता का’ या प्रश्नाला त्यांनी अनाहूतपणे होकार दिला आणि त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. त्यापूर्वी महाविद्यालयात त्यांनी सचिवपदाची निवडणूक जिंकली होती, एवढाच काय तो निवडणुकीचा अनुभव. ते गाववर्गणी, उसनवारी करून लढवलेली ही निवडणूक जिंकले आणि मग राजकारणात पुढेच जात राहिले. जिल्हा परिषद सभापती पदाच्या काळात परिसरातील शेतक-यांची खासगी साखर कारखान्यात होणारी पिळवणूक त्यांच्या ध्यानी आली. त्यांनी सोनई येथे मुळा सहकारी साखर कारखाना काढण्याचा संकल्प केला. प्रखर राजकीय विरोध सहन करत आणि संघर्ष करत त्यांनी तो उभारला आणि गेली तीन दशके यशस्वीपणे चालवून दाखवला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा त्यांचा कार्यकाल उभ्या महाराष्ट्रात गाजला. जाणकार लोक आजही ‘जिप अध्यक्ष असावा तर गडाखांसारखा’ असे उदाहरण देतात. त्यांनी आशियातील सर्वात मोठया अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची धुरा प्रदीर्घ काळ सांभाळली आहे. ते राज्य सहकारी बँकेचे प्रतिनिधित्व दीर्घकाळ करत आहेत. आमदार म्हणून विधान परिषदेचे प्रतिनिधित्व त्यांनी दोन वेळा केले आहे. त्यांनी अहमदनगर (दक्षिण) मतदारसंघातून लोकसभेच्या तीन निवडणूका जिंकल्या.या निवडणुकांत त्यांनी बाळासाहेब विखे, बबनराव ढाकणे, ना.स.फरांदे, कुमार सप्तर्षी अशा मोठमोठ्यांना पराभव केला. राजकीय विद्वेषातून निर्माण झालेला ‘विखे-गडाख केस’ म्हणजे नगर जिल्ह्याच्या इतिहासातील काळे पान आहे आणि कोर्टाने निवडणुकीस अपात्र ठरवल्यामुळे गडाखांना सहा वर्षे राजकीय विजनवासात जावे लागले.
या राजकीय विजनवासात 1997 मध्ये अहमदनगर येथे आयोजित केलेले 70 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे गडाखांच्या कर्तृत्वाचे आणि संघटनक्षमतेचे अद्वितीय उदाहरण. ते या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. आजतागायत कोणत्याही साहित्य संमेलनाला एवढे यश लाभले नसेल! लाखभर लोकांच्या उपस्थितीने गाजलेल्या या संमेलनात हजेरी लावली ती गिरीश कर्नाड, गुलजार, बासू भटटा्चार्य, अण्णा हजारे, डॉ. श्रीराम लागू, आचार्य किशोर व्यास, पं.हृद्यनाथ मंगेशकर, बाबा महाराज सातारकर, शांता शेळके, व्यंकटेश माडगूळकर, विंदा करंदीकर, ना.सं.इनामदार, गंगाधर गाडगीळ, वसंत बापट, विजया राजाध्यक्ष, नारायण सुर्वे, यू.म.पठाण, आनंद यादव, द.मा.मिरासदार, ना.धों.महानोर, के.ज.पुरोहित, सुभाष भेंडे, शिवाजी सावंत, माधव गडकरी, कुमार केतकर, अशोक जैन, शंकर सारडा, विजय कुवळेकर अशा नामवंतांनी आजवर कोणत्याही साहित्य संमेलनाला एवढया संख्येने मोठ्या व्यक्ती उपस्थित राहिलेले नाहीत. ही साहित्यिक मांदियाळी जमण्याचे कारण म्हणजे यशवंतरावांनी सगळयांशी जपलेला वैयक्तिक जिव्हाळा. या संमेलनात पुस्तक विकीचा उच्चांक झाला. संमेलनाचे इत्थंभूत इतिवृत्त नोंदवून ठेवणा-या ‘संवाद’ या ग्रंथाचे प्रकाशनही यशवंतरावांनी दिमाखदार घडवून आणले. त्यानंतर दोनच वर्षात त्यांनी नगरला जागतिक मराठी परिषदेचे यशस्वी आयोजन करून दाखवले.
गडाखांना नवनवीन कल्पना आणि पुरोगामी विचारांचे प्रचंड आकर्षण आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष असतांना त्यांनी शेकडो कलावंतांचा जाहीर सत्कार घडवून आणला होता. विवाहप्रसंगी जेवणावळी, मानपान, अनावश्यक खर्च, त्यामुळे ग्रामीण जीवनात वाढणारे कर्जबाजारीपण हे सामाजिक प्रश्न त्यांना अस्वस्थ करतात. त्यात बदल घडवून आणायचा असेल तर सुरूवात स्वतःपासून करावी लागेल हे त्यांनी जाणले. त्यांनी स्वतः मुलांची लग्ने लावून घेतली ती नोंदणीपध्दतीने आणि जेवणावळींशिवाय. मोठया मुलाच्या नोंदणी विवाहप्रसंगी साक्षीदार म्हणून शरद पवार, विलासराव देशमुख, बासू भटटा्चार्य, ना.धों.महानोर, शंकरराव खरात यांनी सह्या केल्या. दुस-या मुलाच्या विवाहात त्यांनी आंतरधर्मीय सामुदायिक विवाह आयोजित केले होते. या विवाहात वधू-वरांचे पालकत्व स्विकारले होते सुनिल दत्त आणि यशवंतरावांनी. मामा म्हणून अनेक लेखक, कवी, पत्रकार त्यांच्या पाठीशी उभे होते. अशी कल्पकता आणि कलासक्तता हा त्यांचा स्थायिभाव आहे. त्यांची एकसष्टी त्यांनी पुस्तक प्रकाशनाने साजरी केली होती. त्यांनी तीस वर्षांत लाखो झाडांचा खजिना त्यांनी सोनई परिसरात लावला आहे. अमृता प्रीतम व अनेक साहित्यिकांनी त्याविषयी भरभरून लिहीले आहे. यशवंतरावांना जगभर फिरण्याची हौस आहे. त्यांनी जवळपास पंचवीस देश आतापर्यंत पाहिले आणि अभ्यासले आहेत. यातूनच त्यांच्या शिक्षणाविषयीच्या जाणिवा प्रगल्भ झाल्या आहेत. 1979 साली त्यांनी मुळा एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. हा शिक्षणाचा वटवृक्ष पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, सोनई येथे विस्तारला आहे. त्यांनी स्थापन केलेल्या अनेक संस्थातून हजारो विद्यार्थी आज शिक्षित होत आहेत.
यशवंतराव हे अत्यंत सजग लेखक आहेत. त्यांच्या लेखणीला सोप्या भाषेतील ओघवतेपणाचे आणि व्यापक अनुभवांचे वरदान आहे. त्यांनी ‘अर्धविराम’ या आपल्या पहिल्याच पुस्तकाद्वारे मराठी साहित्यात दमदार पाऊल रोवले आहे. या आत्मचरित्राचा प्रकाशनसोहळा पुण्याच्या बालगंधर्वात रंगला होता. या कार्यकमाला शरद पवार, गुलजार यांच्यासह अनेक दिग्गज साहित्यिक उपस्थित होते. आपल्या खडतर राजकीय व सामाजिक प्रवासाचे सजीव चित्रण करणा-या या पुस्तकाला राज्य पातळीवरचे अनेक पुरस्कार आणि जनमान्यता मिळाली आहे. पुणे विद्यापीठात मराठीच्या अभ्यासकमात त्याचा समावेश करण्यात आला आहे. ‘सहवास’ या त्यांच्या दुस-या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या वेगळया नियोजनाची छाप पाडणारे ठरले. नेवाशाच्या ज्ञानेश्वर मंदिरात ‘ पैस’ खांबानजिक सुशिलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, यू.म.पठाण व मधू मंगेश कर्णिक यांच्या सहभागाने व प्रचंड संख्येने उपस्थित ग्रामीण जनतेच्या उत्स्फूर्त सहभागाने हा कार्यकम गाजला. आयुष्याच्या प्रदीर्घ प्रवासात आपल्या वाटयाला आलेल्या व्यक्ती, मित्र, परिसर, निसर्ग या सर्वांचे चित्र गडाखांनी या पुस्तकात खुबीने रेखाटले आहे. वृत्तपत्र आणि दिवाळी अंकांमध्येही त्यांचे सातत्यपूर्ण आणि विविध विषयांवरचे लेखन सुरू असते. राजकारणापलीकडे जाण्याची प्रवृत्ती त्यांच्या लिखाणात सतत जाणवते. त्यात सहजतेचा दरवळ असतो. त्यांनी माणसाला निसर्गाशी बांधून ठेवणा-या कृषिसंस्कृतीची बांधिलकी नेहमीच जपली आहे. जागतिकीकरण, खुली अर्थव्यवस्था, चंगळवादी जीवनशैली आणि कुटुंबांचे विघटन यामुळे ही ग्रामीण संस्कृती लोप पावते आहे. त्याची संवेदनशील व्यथा त्यांच्या लेखनात अभिव्यक्त होत असते.
सव्वासहा फूट उंची आणि राजबिंडे व्यक्तिमत्त्व असणारे यशवंतराव आता आयुष्याच्या वानप्रस्थात रमत आहेत. धकाधकीच्या आयुष्यात गमावलेले कौटुंबिक क्षण समेटण्याकडे त्यांचा कल असतो. यशवंतरावांना अशातच झालेल्या आईच्या, ताईच्या निधनांची आठवण सैरभैर करते. नव्या पुस्तकाची प्रत मात्र हमखास त्यांच्या हाताशी असते. देश विदेशातील पर्यटनाला ते सतत साद घालत राहतात. ते लिखाणात, विद्यार्थ्यांमध्ये खुप रमतात. प्रचंड संघटन कौशल्य, सहकाराचा दांडगा अनुभव, बहुआयामी व्यक्तिमत्व यांचा ठेवा असतांनाही जाणिवपूर्वक त्यांचे राजकिय नेतृत्व बहुतांशी अहमदनगर जिल्ह्यापुरते मर्यादित राखले गेले. राजकारणात स्वतःसाठी काही न मागण्याची गडाखांची भिडस्तवृत्ती आणि मितभाषीपणा ही कारणे देखिल त्याच्या मुळाशी आहेत. वास्तविक राज्यपातळीवर नेतृत्व गाजवू शकणा-या त्यांच्या राजकीय क्षमतेला कोणत्याच पक्षनेतृत्वाने न्याय दिला नाही. म्हणूनच की काय आताशा सकीय राजकारणापेक्षा सामाजिक कार्यात यशवंतराव आपसूकच सहभागी होतात. ‘मला माझ्या परिसराने आणि सर्वसामान्यांनी घडविले आहे. आयुष्यभर मी त्यांचा उतराई असेन’ या अभावाने आढळणा-या राजकीय सुसंस्कृतपणाचे तेज त्यांच्या चेह-यावर अखंड असते…
डॉ. सुभाष देवढे पाटील, औरंगाबाद
मोबाईल – 9822750566