मोहोळचा लांबोटी चिवडा

सोलापूर-पुणे रस्त्यावर मोहोळ तालुक्‍यात शिरापूर वळणावर ‘जयशंकर’ नावाचे  हॉटेल लक्ष वेधून घेते. ते हॉटेल बसच्या आकाराचे आहे आणि कपबशीच्या आकाराची त्याची पाण्याची टाकी!

त्या हॉटेलाचे मालक तानाजी खताळ हेच लांबोटी गावाचे सरपंच आहेत. हॉटेलात शिरताच काउंटरवर चिवड्याचा भलामोठा ढीग दिसतो. बाजूच्या खोलीत चिवडा तयार करणे सुरू असते. तोच हा लांबोटी चिवडा! लांबोटी चिवडा हे त्या हॉटेलचे व गावाचेही वैशिष्ट्य होऊन गेले आहे.

तानाजी खताळ हे हॉटेलचे सर्व श्रेय त्यांच्या आईला देतात व तीच त्या चिवड्याची कर्तीधर्ती असल्याचे सांगतात.

अंगभर सोन्याच्या दागिन्याने मढलेली, कपाळभर हळदीच्या रंगाचा मसवट लावलेला अशी ती स्त्री. त्यांचे नाव रुक्मिणी शंकरराव खताळ.

लांबोटी‍ चिवडा मक्यापासून तयार केलेला आहे. रुक्मिणीबाईंचा हात लागला अन् चिवडा चवदार झाला! कारण मका तर सगळीकडे मिळतो, बाकी मसालेही सर्वत्रच मिळतात. मग असा चविष्ट चिवडा इतरत्र का बनत नसावा? सोलापुरातील इतर हॉटेलमालकांनीही तसे प्रयत्न केल्याचे बाईंनी सांगितले. पण लांबोटी चिवड्याचे यश इतरांना लाभले नाही.

जयशंकर हॉटेलचा ‘लांबोटी’ चिवडा कर्नाटक, उत्तर महाराष्ट्र व आंध्र अशा प्रदेशांत जातो. रुक्मिणीबाई प्रत्येक दिवशी तयार केल्या जाणा-या चिवड्याची स्वत: चव घेतात. त्यानंतरच चिवडा विक्रीसाठी ठेवला जातो.

आपल्या सर्वांना नाशिकचा चिवडा माहीत असतो, पुण्याच्या ‘महालक्ष्मी चिवड्या’ने एकेकाळी नाव मिळवले होते. त्यात सोलापूरच्या लांबोटी गावच्या चिवड्याची भर पडली आहे.

‘लोकमत’ परिवाराने रुक्मिणी खताळ यांचा ‘सोलापूर आयकॉन’ नावाच्या पुस्‍तकात समावेश करून त्यांना योग्य श्रेय दिले आहे. रुक्मिणी खताळ या त्या पुस्तकातील गरीब घरातून कष्टामुळे वर आलेल्या एकमेव व्यक्ती असाव्यात.

रुक्मिणी खताळ खास सोलापुरी ढंगात बोलतात. त्यांनी हॉटेलवर असलेल्या कपबशीच्या आकाराच्या पाण्याच्या टाकीबद्दल सांगितले. रुक्मिणी खताळ यांचे शिक्षण झालेले नाही. ‘त्यांचे मालक’ दहावीपर्यंत शिकलेले होते. आधीच गरीब कुटुंब. त्यांत भावंडांत जागा, घर अशी वाटणी (१९७२) झाली. तेव्हा रुक्मिणी खताळ यांच्या वाटणीला चार कपबशा आल्या. ना घर ना शेत. त्यांनी तूटपुंज्या रकमेतून व चार कपबश्यांच्या सहाय्याने टपरी सुरू केली. ती हायवेवर होती. चहा घेण्यासाठी ट्रक ड्रायव्हर थांबावेत म्हणून शंकरराव कसरतींचे चित्तथरारक खेळ करत. छातीवर दगड फोडायचे, सायकल हवेत फिरवायचे, दगड हवेत दूरवर फेकून नेमका झेलायचे. अशा खेळांमुळे ग्राहक आकर्षित होत. टाळ्या वाजवत आणि चहा व इतर पदार्थ विकत घेत. नवऱ्याची अशी धडपड पाहून रुक्मिणीबाईंच्या मनात सतत घालमेल होई. पण दुःख गिळून त्या नवऱ्याच्या व्यवसायात मदत करीत.

मुळात रुक्मिणीबाईंच्या हाताला सुगरणीची चव होती, चहाची विक्री छान होऊ लागली. हॉटेलात एकेक पदार्थ वाढू लागला. झोपडीवजा हॉटेल जाऊन इमारत उभी राहिली. त्यावेळी कपबशीला न विसरता त्यांनी त्या आकाराची पाण्याची टाकी हॉटेलवर उभी केले.

त्यानंतर रुक्मिणीबाईंनी मक्याचा चिवडा, शेंगदाण्याच्या चटण्या, लसणाच्या चटण्या हॉटेलात ठेवणे सुरू केले. मधेच शंकरराव सोडून गेले. पण रुक्मिणीबाई मुलांना घेऊन व्यवसाय वाढवत राहिल्या. त्यांचा मक्यापासून बनवलेला चिवडा प्रसिद्ध होऊ लागला. आता तो चिवडा सातासमुद्रपलीकडेही जात आहे. रुक्मिणी खताळ यांना पती व सासू ह्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा, त्यांच्या हातातील गुण व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मेहनतीला न घाबरण्याची त्यांची वृत्ती यांमुळे ‘जयशंकर’ हॉटेलाची आज लाखो रुपयांची उलाढाल आहे. रुक्मिणी खताळ यांना लिहिता वाचता आले नाही, पण आयुष्याचे गणित मात्र त्यांनी बरोबर सोडवले.

रुक्मिणीबाईंच्या तोंडून त्यांच्या आयुष्याचे तत्त्वज्ञान ऐकताना मला त्या महाराष्ट्राच्या खऱ्या आयकॉन वाटत होत्या!

रुक्मिणी शंकरराव खताळ
हॉटेल ‘जयशंकर’
मु.पो. लांबोटी, ता. मोहोळ, जिल्हा, सोलापूर.
९८५०४३९९९९

– श्रीकांत पेटकर

About Post Author

Previous articleमुणगे गावचा आध्यात्मिक वारसा!
Next articleसोलापूरचा आजोबा गणपती
श्रीकांत बापुराव पेटकर हे प्रकाशगंगा महापारेषण मुख्यालय मुंबई (MSEB) येथे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. पेटकर यांच्या प्रयत्नांमुळे पडघे (तालुका भिवंडी) या वीज केंद्रास सलग तीन वर्षे उत्कृष्ट वीज केंद्राचा पुरस्कार मिळाला. त्यांना लेखनाची आवड असून त्यांची ‘आणि मी बौद्ध झालो‘ या अनुवादित पुस्तकासोबत कल्याण, शांबरीक खरोलिका, चांगुलपणा अवतीभोवती, बेहोशीतच जगणं असतं, गजल अशी दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पेटकर यांनी चित्रकलेचा छंद जोपासला असून त्यांच्या चित्रांची दोन प्रदर्शने भरली होती. त्यांना ‘कल्याण रत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

23 COMMENTS

  1. चीिवडा स्वादिष्ट आहे.खरंच !!!
    चिवडा स्वादिष्ट आहे. खरंच !!!
    मी चिवडा चाखला आहे.
    Recipe please.

  2. lamboti. mohol……dist
    lamboti. mohol……dist-solapur
    femus in only khatal lamboti chiwada
    and tea ………..great

  3. या सर्व गोष्टी वर्तमानपत्रात
    या सर्व गोष्टी वर्तमानपत्रात हि यायला हव्यात. तेव्हाच सर्व सामान्यांना कळेल. बाकी थिंक महाराष्ट्राचा उपक्रम चांगला आहे. मंदिर,गड,पुरातन वास्तू, खाद्य असे सर्वच बाबीवर लिखाण आहे…
    शुभेच्छा.

  4. प्रसिद्ध गावात राहिल्याने
    प्रसिद्ध गावात राहिल्याने तेथील व्यक्ती प्रसिद्ध होईलच असे नाही. पण आपण आपल्या कर्तृत्वाने आपल्या गावाला प्रसिद्ध करू शकतो .
    हे मात्र खरे. रुख्मिणी खताळ यांनी हेच सिद्ध केले आहे. शुभेच्छा .

  5. LAMBOTI CHIWADA…a great
    LAMBOTI CHIWADA…a great taste….and very inspiring fact…Hope that Lamboti Chiwada becomes a popular brand in whole Maharashtra..specially in Mumbai, Pune, Nagpur, Nasik, Aurangabad cities. Marathi Newspapers should promote this Maharashtrian product….BEST OF LUCK

  6. चिवडाही विषय बनू शकतो मला
    चिवडाही विषय बनू शकतो मला पहिल्यादा नवलच वाटले.
    खरंच interesting!!!!!!!.

  7. लांंबोटी चिवड्याचा आस्वाद
    लांंबोटी चिवड्याचा आस्वाद घेऊच. परंतु त्या मागची संघर्ष कहाणी आपल्या समोर आणल्या बद्दल श्री पेठकरांचे आभार

  8. मका चिवडा दोन किलो
    मका चिवडा दोन किलो

Comments are closed.