मोडी लिपी म्हणजे देवनागरीची जलद लिपी! ती नावाप्रमाणे नागमोडी वळणाची, ब-यापैकी अखंड लिपी आहे. त्या लिपीचा उगम कसा झाला ते अज्ञात आहे. मोडी लिपीचे जनक हे देवगिरीच्या यादव साम्राज्याचे पंतप्रधान ‘श्रीकरणाधिप’ हेमाद्री ऊर्फ हेमाडपंत हे होत असे काही लोक मानतात. यादवांच्या त्या अष्टपैलू पंतप्रधानाने मोडी लिपी यादवांच्या राज्यव्यवहारात आणली. यादव काळात अनेक लिपी प्रचलित होत्या, पण संत ज्ञानेश्वरांच्या वांङमयरचनेनंतर मराठीने झेप घेतली, ती हेमाडपंतांनी यादवांच्या साम्राज्यात सामावून घेतली. तेराव्या शतकातील अनेक संस्कृत व मराठी ग्रंथ मोडी लिपीत लिहिले गेले आहेत.
तो काळ म्हणजे यादव साम्राज्याच्या वैभवाचा कळसाध्याय होता. कला, वांङमय ग्रंथरचनेला राजाश्रय लाभला होता. देवनागरी लिपी सुबोध व सुवाच्य होती, परंतु लिहिण्यास फार वेळ घेई. मोडी लिपीचे ते महत्त्व ओळखून हेमाडपंतांनी मोडी लिपीला चालना दिली. देवगिरी साम्राज्याचे पत्रव्यवहार व साहित्य मोडी लिपीतून होऊ लागले. हेमाडपंतांचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. त्यांनी रचलेल्या ग्रंथांची लिपी मोडी ही होती. मोडी लिपीला अखंड शिरोरेखा ओढली जाते व तिला धरून शब्द व वाक्ये अखंड लिहिली जातात. त्या ‘शिरोरेघे’चे जनक हेमाडपंतांना मानण्यात येते.
देवगिरीच्या यादवांच्या साम्राज्याला पुढे परचक्राचे ग्रहण लागले. पण, मोडी लिपीचे सुगीचे दिवस सुरुच राहिले. मोडीला देवगिरी सम्राटाच्या राजवटीत लाभलेला राजाश्रय अव्याहतपणे सुरू राहिला.
मोडी लिपीचे चार कालखंडांत विभाजन होते – बहमनी, शिवकालीन, पेशवेकालीन व आंग्लकालीन.
देवगिरी नंतरच्या बहमनी राजवटीतही राज्यव्यवहाराची लिपी मोडीच राहिली. कारण बहुसंख्य सरदार व अधिकारी वर्ग हा मराठा व ब्राह्मण समाजाचा होता. बहमनी कालखंडातील मोडीमधील कागदपत्रांमध्ये फारशी-अरबी शब्दांचा भरणा आढळतो. भाषा मराठी, लिपी मोडी, पण अनेक राजकीय शब्द फारशी-अरबी असा शिरस्ता त्या काळातील पत्रांमध्ये आहे. बहमनीकालीन मोडी लिपीत लेखनाची पद्धत अस्ताव्यस्त व वाचण्यास क्लिष्ट आहे.
बहमनी कालखंडात अतिबलाढ्य मोगल सत्तेस थोपवून धरणारे निजामशाहीचे सरसेनापती लखुजी जाधवराव, निजामशहाला मांडीवर घेऊन त्यांच्या नावे अप्रत्यक्षपणे स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे शहाजीराजे भोसले, मलिक अंबर वगैरे मातब्बर सेनानी व सरदार यांचा इतिहास या बहमनीकालीन मोडी कागदपत्रांत अप्रकट राहून दडला आहे. त्या कालखंडातील हजारो कागदपत्रे अजून अभ्यासली गेलेली नाहीत. त्याच कालखंडात महाराष्ट्राला नवसंजीवनी देणा-या भोसले कुळीचा उदयकाळ मालोजीराजे यांच्या कारकिर्दीच्या रूपात झाला. तोही त्याच कालखंडातील कागदपत्रांत दडून बसला असावा.
बहमनी राजवट पाच शाह्यांमध्ये विभक्त झाली. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीद्शाही आणि इमादशाही. त्यांतील बरीद्शाही आणि इमादशाही यांना बाकी तिन्ही शाह्यांनी लवकरच नष्ट केले. शिवाय, त्या तीन शाह्यांचे आपापसांतील संघर्ष व त्यांचे मोगल सत्तेशी संघर्ष असा तो रंजक इतिहास आहे. तो अजून बराच अभ्यासायचा राहिला आहे. त्या काळात त्या सर्व लढायांत व धामधुमीत प्रामुख्याने मराठा सरदार आघाडीवर लढत होते. त्या काळात उत्तरेतून अनेक क्षत्रिय व ब्राह्मण घराणी ही मोगल जाचाला कंटाळून दख्खनमध्ये आली. त्या सर्वांचा मागमूस त्या काळातील कागदपत्रांत आढळू शकतो.
छत्रपतींच्या आयुष्याच्या पूर्वार्धातील कागदपत्रांवर बहमनीकालीन शैलीचा प्रभाव जाणवतो. छत्रपतींना १६५८च्या सुमारास कोकण मोहिमेवर असताना शत्रुपक्षाकडे नोकरी करणारे बाळाजी आवजी चित्रे भेटले. त्यांचे सुंदर हस्ताक्षर पाहून त्यांना चिटणीस हे पद दिले गेले व तेथूनच शिवकालीन मोडी लिपीच्या शैलीला प्रारंभ झाला! तीच शिवकालीन ‘चिटणीशी’ मोडी शैली. त्या शैलीचे वैशिष्ट्य म्हणजे वळणदार मोडी अक्षर दिसण्यास सुंदर व वाचण्यास सुलभ! तत्कालीन छत्रपती शिवाजी महाराजांचे न्यायनिवाडे, राज्यव्यवहाराची पत्रे व आज्ञापत्रे ही त्या शैलीत आहेत.
मराठी भाषेत झालेला फरकसुद्धा त्या कालखंडातील पत्रांत दिसून येतो. शिवाजी महाराजांनी फारशीचा वापर टाळून, अधिकाधिक मराठी व संस्कृत शब्द वापरण्यावर दिलेला भर त्या काळातील मोडी पत्रांत आढळतो. आरमार उभारणी व दुर्गराज रायगडच्या बांधणीसाठी अनुदान व जमाखर्च या सा-या नोंदी त्या शैलीतील मोडी लिपीत आहे. श्रीशिवराज्याभिषेक व दक्षिणदिग्विजय यासंबंधीची पत्रे त्याच मोडी शैलीत आहेत.
शिवाजी महाराजांच्या मृत्युपश्चात शंभुराजे पन्हाळ्याहून राजधानी रायगड येथे दाखल झाले. तेव्हा, त्यांनी किल्ले रायगडाचा खजिना, जिन्नस आणि दफ्तर यांचा समग्र टाळेबंद करवून घेतला. तो सर्व त्याच शिवकालीन शैलीतील मोडी लिपीत आहे.
शंभुछत्रपतींच्या काळात झालेला थोडाफार बदल वगळता त्याच शैलीचा प्रभाव कायम दिसतो. छत्रपती राजाराम महाराजांनी कृष्णाजी अनंत हिरेपारखी ऊर्फ सभासद यांच्याकडून शिवछत्रपतींचे चरित्र लिहवून घेतले. ते चरित्र सभासद बखर म्हणून प्रसिद्ध आहे. शिवछत्रपतींवर लिहिले गेलेले मराठीतील ते पहिले चरित्र. ते शिवकालीन ऊर्फ चिटणीशी शैलीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोर्तुगीजांशी झालेला १६६७ चा तह, शंभुछत्रपतींनी फोंड्याच्या दर्ग्याला दिलेले दानपत्र व पेडणे येथील देसाई केशव प्रभू यांनी दक्षिण कोकणातील किल्ल्यांविषयी गोव्याचे पोर्तुगीज विजरई (व्हाइसरॉय) यांस पाठवलेला जाबिता (अहवाल) म्हणजे त्याच्या दगाबाजीचा पुरावा (सध्या लिस्बन येथे आहे); ती सर्व पत्रे शिवकालीन मोडी शैलीत आढळतात.
शाहू महाराजांच्या काळात सेनाकर्ते बाळाजी विश्वनाथ ‘पेशवे’ झाले व पेशवेकालीन लेखनशैली मोडी लिपीत रुजू झाली. त्या काळातील सर्वात दखलपात्र घटना म्हणजे वारण्याचा तह. त्यातून सातारा व कोल्हापूर अशा दोन छत्रपती गाद्या वेगवेगळ्या निर्माण झाल्या. वारण्याचा तह मोडी लिपीत आहे. पेशवेकालीन शैलीचा त्यावर प्रभाव दिसतो. पेशवेकालीन लिपीत सुद्धा जागोजागी वेगवेगळ्या लेखनशैली दिसून येतात. पण, कालखंड एकच असल्याने तीस पेशवेकालीन असे सरसकट संबोधले जाते.
त्याच काळात उदयास आलेल्या दोन लेखनशैली म्हणजे तंजावरी व इंदुरी ह्या होत. त्यांतील तंजावरी शैली ही बहमनी धाटणीची पण सुवाच्य आहे. इंदुरी शैलीत टापटीपपणा व दोन ओळींमधील अंतर बरेच दिसते. त्या दोन शैली आंग्ल काळाच्या अस्तापर्यंत प्रभावशाली दिसतात. बहुतेक मराठी बखरी पेशवेकाळात लिहिल्या गेल्या असल्याने त्यांच्यावर पेशवेकालीन शैलीचा प्रभाव जाणवतो. दिल्लीच्या बादशाहकडून बाळाजी विश्वनाथ यांनी चौथाई व सरदेशमुखीच्या सनदा १७१९ साली आणल्या (त्या फारशीत होत्या). आणि त्यानंतर फारशी शब्दांचा भरणा मोडी लिपीतील मराठी राज्यकारभारात पुन्हा वाढू लागला. पुढे, १७५२ मध्ये अहमदिया करार झाला व पुढील सर्व मराठी राज्यव्यवहारात फारशी शब्दांचे प्रमाण अधिक वाढले. शिवाय, त्या कालखंडातील मोडी पत्रांत उत्तरकाळात राज्याभिषेक शक वापरण्याची रीत संपुष्टात आली. शालिवाहन शक आणि सुहूर सनाचा वापर प्रकर्षाने दिसून येतो.
अटक ते कटक पसरलेली मराठी दौलत, निजामाचा वेळोवेळी झालेला पाडाव व राजपुताना आणि म्हैसूरवर बसवलेली दहशत हा दैदिप्यमान इतिहास त्याच शैलीतील मोडी कागदपत्रांतून वाचण्यास मिळू शकतो.
तसेच, सरखेल तुळाजी आंग्रे यांच्या आधिपत्याखाली असलेल्या बलाढ्य मराठा आरमाराची वाताहत व स्वकीयांकडून झालेल्या होळीचे दाखले त्या काळातील मोडी पत्रांत आढळतात. पानिपतचा जमाखर्च आणि सदाशिवरावभाऊ व नानासाहेब पेशवे यांच्यातील मोहिमेसंबंधीचा पत्रव्यवहार त्याच शैलीत आढळेल.
माधवराव पेशव्यांचा कालखंड, त्यांच्या कारकिर्दीतील राक्षस भुवनची प्रसिद्ध लढाई हा पत्रव्यवहार, हैदर अलीचा दोनदा केलेला बीमोड त्या शैलीतील कागदपत्रांत आढळून येईल.
नारायणराव पेशवे यांचा वध व तदनंतर मराठी दौलतीत माजलेली यादवी यांचा अभ्यास त्याच कालखंडातील मोडी पत्रांतून करावा लागतो. मराठेशाहीचे आधारस्तंभ ठरलेले महादजी शिंदे, मल्हारराव होळकर, रघुजी भोसले व नाना फडणवीस यांचे समग्र योगदान जाणून घ्यायचे असल्यास त्या मोडी पत्रांचाच आधार घ्यावा लागेल.
विल्यम कॅरी या ब्रिटिश अधिका-याने मोडी लिपी १८०८ साली टंकलिखित केली आणि ‘डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज’ नामक पहिला मराठी-इंग्रजी शब्दकोश छापला. पुढे, इंग्रजांचा अंमल भारतावर सुरू झाला व लेखनपद्धतीत ‘फाऊंटन पेन’ हा नवा प्रकार लेखनासाठी वापरात आला. परिणामी, अक्षरांची वळणे बदलून, ती छोटी होत गेली व लिखाण बेशिस्त होऊ लागले. सर्व व्यवहार त्या शैलीच्या मोडी लिपीत होऊ लागले. नवी शिक्षणपद्धत अंमलात येऊन प्राथमिक शिक्षण हे त्याच शैलीतील मोडीत होऊ लागले. ते १८५० नंतरच्या मोडी पत्रांत प्रकर्षाने जाणवून येते.
प्रत्यक्षदर्शी गोडसे भटजींनी ‘माझा प्रवास’ या पुस्तकाच्या माध्यमातून १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाचा पहिला वृत्तांत मराठी भाषेतून व मोडी लिपीतून लिहून काढला होता. स्वातंत्र्यसेनानी वासुदेव बळवंत फडके यांची मोडी लिपीतील हस्तलिखिते उपलब्ध आहेत.
लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतीराव फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या सारख्या दिग्गज स्वातंत्र्यसेनानींच्या कर्तबगारीची साक्ष मोडी लिपीतील त्यांची हस्तलिखिते पटवून देतात.
मुंबई सरकारने मोडी लिपी ‘कालबाह्य’ म्हणून १९५२ साली मोडीत काढली.
अहद तंजावर तहद पेशावर पसरलेल्या मराठी साम्राज्याची लाखो कागदपत्रे पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, ग्वाल्हेर, इंदूर, नागपूर, दिल्ली जयपूर, तंजावर इत्यादी ठिकाणी इतिहास व मोडी अभ्यासकांची प्रतीक्षा करत आहेत. ती एकत्रित संख्या कोट्यवधींच्या घरात जाऊ शकते. इतकेच काय तर डेन्मार्क, पोर्तुगाल, नेदरलँड, इंग्लंड इत्यादी युरोपीय देशांत हजारो मोडी पत्रे असण्याची शक्यता आहे. गोव्याच्या व्हाइसरॉयने हजारो कागदपत्रे सुरक्षिततेच्या कारणासाठी १७७७ मध्ये पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे पाठवली, त्यात मोडी कागदपत्रे असण्याची शक्यता आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे म्हटले आहे, की महाराजांचा दहा टक्केच इतिहास महाराष्ट्राला अद्याप ज्ञात आहे. म्हणजेच, तेथील अभ्यासकांना अजूनही छत्रपती शिवाजी महाराज पूर्णपणे कळलेले नाहीत.
दरवर्षी, हजारो मोडी कागदपत्रे वाळवी लागून, उंदरांच्या कुरतडण्यामुळे अथवा शाई उडून गेल्यामुळे निकामी ठरून, नष्ट करण्यात येतात.
कोकण इतिहास परिषदेचे कार्यकारिणी सदस्य प्रवीण कदम यांच्या मते, डिजिटल नकला काढण्याचे सरकारचे पाऊल प्रशंसनीय आहे. परंतु, कागदपत्रे सर्वसामान्यांना खुली होणे आवश्यक आहे.
मराठा आरमाराचे अभ्यासक प्रतीश खेडेकर यांच्या मते, ज्याप्रमाणे केंद्र सरकारने ‘डिजीटल लायब्ररी ऑफ इंडिया’ प्रोजेक्ट रुजू करून हक्कविहीन व कालबाह्य गेलेल्या पुस्तकांची डिजिटल प्रत इंटरनेटमार्फत विना-औपचारिकता, विनामूल्य उपलब्ध करून जगभरातील व भारतातील इतिहास अभ्यासक व चाहते यांना बौद्धिक मेजवानी दिली आहे, महाराष्ट्र सरकारतर्फे तशीच योजना अंमलात आणणे ही काळाची गरज आहे.
पुणे विद्यापीठात मिचीहीरो ओगावा नामक जपानी तरुण मराठा इतिहासावर पीएच.डी. करत आहे. त्यांना धाराप्रवाह मराठी येते आणि तितक्याच कौशल्याने मोडी कागदपत्रे वाचता येतात.
मोडी लिपी प्रसारासाठी प्रशिक्षण वर्ग चालवणारे मोडी तज्ञ
राजेश खिलारी – ९३२३०२२२२३ (विक्रोळी / दादर)
कृष्णाजी म्हात्रे – ९८६९४५५४२२ (दादर)
मुंबई पुराभिलेख एलफिस्टन कॉलेज – ०२२-२२८४४२६८, ०२२-२२८४४३९७ ( फोर्ट)
रमा टोळ – ९६१९३९९४१५ ( परेल)
प्रा. सोनाली पेडणेकर – ०२२-२१६३१४२१, ०२२-२१६३१४२३ (वझे कॉलेज)
परितोष देशपांडे -९८१९१३९१७० (ठाणे)
श्रीकृष्ण टिळक – ०२२-२५४१०४०५
ज्ञानदेव बंडकर – ९६१९३९९४१५9 डोंबिवली)
सुनील कदम / रत्नाकर थत्ते – ९३२३२९९८६३ ( बदलापूर)
उदयसिंग यादव – ९३७०१०१२९३ ( कोल्हापूर)
एस.एस. लाटकर – ९६७३३४३४१९ (पुराभिलेख कार्यालय)
मंदार लवाटे – ९८२३०७९०८७ – ०२०-२४४७२५८१ (पुणे)
पुराभिलेख विभाग – ९६५७५४२८०५ – ०२०-६१२७३०७
शब्बीर अब्बास सय्यद – ७५८८२९७८७६ – ०२४२६-२४७४९६ ( अहमदनगर)
संतोष यादव – ९३७२१५५४५५ (हिस्टोरीकल म्युझिअम, हुतात्मा चौक)
अरविंद साने – ९८५०७४६१७२ (नाशिक)
– आनंद खर्डे
मोडी लीपी पुण्याला कुठे
मोडी लीपी पुण्याला कुठे शिकवतात?
शिवाजी महाराजाची वंशावळ सागा
शिवाजी महाराजाची वंशावळ सागा
Very good. I want to study.
Very good. I want to study.
This is a golden chance to…
This is a golden chance to learn historical language because I have interested in the subject history.
Comments are closed.