मोडवेचा पुरंदरे वाडा

3
45
carasole

अष्टविनायकांपैकी ‘मयुरेश्वर’ या गणपतीचे मंदिर पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील मोरगाव या गावी आहे. अष्टविनायकांपैकी तो पहिला गणपती आहे. त्या स्थळाचे दर्शन ‘अष्टविनायक’ या चित्रपटात होते. त्याच गावाजवळ ‘करंजे’ येथे सोमेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे. तेथे श्रावणी सोमवारी जत्रा भरते. त्या स्थळाचे दर्शन ‘सतीची पुण्याई’ या चित्रपटातून झाले आहे. ते गाव सोमाईचे करंजे म्हणून प्रसिद्ध आहे. त्या दोन प्रसिद्ध धार्मिक स्थळांच्या जवळ मुर्टी-मोडगाव या गावी ऐतिहासिक पुरंदरे वाडा मात्र फार ज्ञात नाही.

मोडवे हे गाव चौफुला (पुणे-सोलापूर महामार्गावरील) – निरा रस्त्यावर आहे. तेथे पुरंदऱ्यांचा वाडा व मोरेपाटलांचा वाडा रस्त्यावरून जाता-येता दिसतो. त्यांपैकी पुरंदरे यांचा वाडा सुस्थितीत आहे. वाड्यांच्या वास्तू छत्रपती थोरले शाहू महाराजांनंतर म्हणजे साधारणपणे १७६० ते १७७० च्या दरम्यान बांधल्या गेल्या असाव्यात. दोन्ही वाड्यांचे बांधकाम करणारे कामगार एक असावेत.

पुरंदरे वाडा चार भक्कम बुरुंजावर मजबूत स्थितीत उभा आहे. बांधकामास खाली काळा पत्थर व वर सुबक विटा वापरल्या आहेत. वीटकाम सुबक आणि सुस्थितीत दिसते. तटबंदीच्या भिंतीत जंग्या ठिकठिकाणी आहेत. ते बुरूज नवीन असल्यासारखे वाटतात. बुरुजांची उंची आठ-साडेआठ मीटर आहे. बुरुजांना जोडणारी तटबंदीची भिंत दोन ते तीन मीटर रुंदीची आहे. बुरुजावर चुन्याचा स्लॅब ओतलेला असून तो सुस्थितीत आहे. चारचाकी वाहन त्याच्यावरून सहज जाऊ शकेल.

वाड्याचा दरवाजा बऱ्यापैकी अवस्थेत पाहण्यास मिळतो. त्यांची उंची चार मीटर इतकी असून रुंदी दीड मीटर आहे. दरवाज्यावर गणेशपट्टी सुस्थितीत आहे. दरवाज्याच्या आतील दोन्ही अंगांस ढेलजा आहेत. त्याची जोती मजबूत आहेत.

आत बऱ्यापैकी अवस्थेतील दुमजली इमारत आहे. इमारतीचे बांधकाम चुन्यातील आहे. खांब व तुळया सुस्थितीत आहेत. वरच्या मजल्यावर दिवाणखाना सुबक कोरीव खांबांवर आणि मजबूत तुळयांवर उभा आहे. इमारतीस कौलारू छप्पर आहे. आतील बाजूस माजघर व मागील बाजूस स्वयंपाकघर आहे. स्वयंपाकघरावर तीन ते चार मीटर उंचीची दोन धुरांडी आहेत. परसदारात उत्तम वृंदावन आहे. पुढील ओसरीच्या दोन्ही बाजूंस बंदिस्त खोल्या आहेत. सध्या इमारतीच्या दोन वाटण्या झाल्या असून एकीकडे मल्हार त्र्यंबक ऊर्फ दादासाहेब पुरंदरे व दुसरीकडे त्यांचे चुलत बंधू वैकुंठ पुरंदरे हे राहतात.

पुरंदऱ्यांच्या शेतीतील एका विहिरीतून खापरी नळांद्वारे वाड्यात पाणी आणले गेले आहे. विहिरीवर गोलाकार तीन मीटर उंचीचे वीटकाम केलेले आहे. विहिरीजवळ दोन उंच कमानी आहेत. कमानींवरून खापरी पाइपलाइन वाड्यापर्यंत जाते. पाणी उपसण्याचे व वर चढवण्याचे साधन हे माणसांच्या साहाय्याने चालणारे रहाटगाडगे असावे. खापरी नळ फुटलेल्या अवस्थेत पाहण्यास मिळतात. नळावर चुन्याचे बांधकाम आहे. वाड्याची पाणीपुरवठा योजना थक्क करणारी आहे. वाड्याची रखवालदारी करण्यासाठी दोन मुस्लिम रखवालदार असावेत. त्यांची थडगी वाड्यासमोर आहेत. त्यांची नावे ज्ञात नाहीत. त्या थडग्यांपासून ताबूताच्या मिरवणुकी निघतात. हा रिवाज चालू आहे. सेवकांची थडगी वाड्यासमोर बांधल्याचे हे उदाहरण दुर्मीळ आहे.

रखवालदारांच्या थडग्याजवळच बांधकामासाठी लागणाऱ्या चुन्याची महाकाय अशी घाणी आहे. चुना पुरंदऱ्यांच्या शेतातील चुनखडीपासून बनवला जात असे. त्यांच्या शेतात नांगरटीत चुन्याच्या भट्टया सापडल्या आहेत.

पुरंदऱ्यांकडे तीन तलवारी आहेत. त्यांपैकी दुर्मीळ अशी ‘जमदाड’ ही तलवार आहे. एक कट्यार सुस्थितीत आहे. वाड्यात दोन लहान तोफा गंजलेल्या अवस्थेत पडल्या आहेत. त्यांपैकी अन्य ऐतिहासिक वस्तू मेणा, पालखी या कालौघात नष्ट झाल्याचे दादासाहेब पुरंदरे सांगतात.

पुरंदऱ्यांचे कुलदैवत खंडोबा असल्यामुळे अश्वारूढ खंडोबाची मूर्ती व इतर टाक फार जुने असूनही सुस्थितीत आहेत. चांदीची उजव्या सोंडेची गणपतीची मूर्तीपण आहे. खंडोबाच्या दर्शनास जाताना गळ्यात घालण्यासाठी चांदीचा पट्टा आहे. त्याला ‘खडा’ असे म्हणतात. देव ठेवण्यासाठी पितळी व चांदीची कमळे आहेत. जुना शिसवी देव्हारा होता, तो देव्हारा शेजारच्या मुर्टी या गावी असलेल्या अक्कलकोट स्वामींचे शिष्य दत्तानंद सरस्वती यांच्या मठात आहे.

‘लोकरस’ ऊर्फ ‘वाघ’ पुरंदरे हे पुरंदरे किल्ल्याचे सुभेदार इसवी सन १७०० पर्यंत होते. पुरंदरे हे घराणे मूळ सासवड-सुप्याला स्थायिक झाले. त्यानंतर त्यांच्या दोन शाखा झाल्या. त्यांपैकी अंबाजी त्र्यंबक यांना ‘सुपे’, तर तुको त्र्यंबक यांना ‘मोडवे’ हे गाव मिळाले व त्यांनी त्या त्या ठिकाणी वस्ती केली, वाडे बांधले.

राजाराम महाराजांच्या वेळेस जिंजीच्या वेढ्यात शंकराजी नारायण, रामचंद्रपंत अमात्य, धनाजी जाधव, संताजी घोरपडे हे लढत होते. त्यावेळी झुल्फिकारखानाने मार्गशीर्ष वद्य ३ शके १६१४ मध्ये जिंजीचा वेढा उठवला. राजाराम महाराजांनी काही लोकांना त्या कामगिरीबद्दल बक्षिसे देऊन त्यांचा गौरव केला. धनाजी जाधव यांच्या लष्करात तुको त्र्यंबक पुरंदरे होते. त्यांना त्यांच्या गावी दोन जमिनी दिल्या. तुकोपंत यांनी धनाजी जाधवांबरोबर शके १६१४ च्या फाल्गुन महिन्यात जाऊन सनदा घेतल्या. तुको त्र्यंबक व अंबाजी या बंधुद्वयाशिवाय त्यांचे चुलत बंधू काशी विश्वनाथ, गिरमाजी विश्वनाथ व भाऊबंद चिंतो महादेव वगैरे हे त्यांच्या त्यांच्या मगदुराप्रमाणे राजकारणात भाग घेत.

सेनापती धनाजी जाधवांची त्या घराण्यावर मर्जी होती. शाहुराजे मोगली कैदेतून सुटून येताच, अंबाजी पुरंद-यांचा पुतण्या मल्हार तुकदेव हा खानदेशात लांबकानीच्या मुक्कामात शाहूला येऊन मिळाला. त्यामुळे धनाजीरावांना ताराराणीच्या पक्षातून फोडणे सुलभ झाले. अंबाजीपंत हे पेशव्यांचे मुतालिक झाले. पुढे, मल्हार तुको व दादासाहेब मुतालकी चालवू लागले.
सनद –

श्री धर्म प्र | धोतेता शेष व | णीदाशण थेरिव |
राजारामस्यमुद्रे | यं विश्ववंधा | विराजते |
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके १९ अंशिरानाम संवत्सरे
फाल्गुन सुध त्रितीया इंदू वासरे क्षत्रीये कुलावंतस श्री
राजाराम छत्रपती याणी तुको त्रिमल पुरंदरे कुलकर्णी व जो तिस्ते मौ अे सुपे खु || प || सुपे यांसी दिल्हे.

जैसे जे लक्ष नृहरीप्रीत र्मुद्रा नीराजी जन्मन: || राजा राम प्रतिनिधे: प्रल्हादस्य विराजते | तुम्ही चंद्रीचे मुक्कामी स्वामी सनिध येऊन विदित केले की स्वामी धर्म प्रभु आहेत कितेका वृत्तीवत्ताचा उधार केला हे कीर्ती यैकोन वृत्तीच्या उदेशे सेवेशी आलो आहे तरी स्वामीने कृपाळू होऊन नूतन वृत्ती करून देविलिया स्वामीचे अन्न भक्षून सार्वकाल स्वमसि कल्याण चिंतून सुखरूप वृत्ती अनुभवून असेन म्हणून श्रृत् केले. त्यावर मनास आणो ना तुमच्या पुरातन वृत्तीने योगक्षेम चालत नाही यैसे जाणून स्वामी तुम्हावरी कृपाळू होऊन नूतन इनाम अजरामरामत करून दिश असे जमीन बिघा पोडाच्या बिघी याने चावर || निमचावरास कुलबाव कुलुबानु हलिपटी व पेस्तर पट्टी देखिल इनाम दिधला असे सदरहू जमीन चावर मौजे खुर्द प || सुपे पैकी स्थल ब्राह्मणीस हे भूमी आपले स्वाधीन करून घेऊन तुम्ही तुमचे पुत्र पौत्रिकादिप वंशपरंपरेने अनुभवून सुखरूप असणे यास कोणी अन्याय करील त्यास आपापले स्वधर्माची आण असे जाणिजे निदेश समक्ष (मर्या | देयं विरा | जते)
सनदेवर छत्रपती राजाराम महाराजांची मुद्रा व प्रल्हाद निराजी या प्रतिनिधींचा शिक्का आहे.

सनदेवरून हे लक्षात येते, की राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत तुको पुरंद-यांना इनाम जमीन सुपे व ब्राह्मणी या गावी दिल्याचे समजते. त्या पत्रावरून आणखी एक गोष्ट लक्षात येते, की तुको पुरंदरे यांनी हे इनामपत्र जिंजी येथे जाऊन राजाराम महाराजांकडून करवून आणले.

पुरंदरे घराण्यातील उत्तर पेशवाईतील विठ्ठल मल्हार हे बाणेदार व बळकट शरीराचे गृहस्थ होते. त्यांच्या बाणेदारपणाच्या हकिगती सांगितल्या जातात. एल्फिन्स्टन याने पुण्याचा कब्जा घेतल्यावर मोडवे गावी गेला. त्या वेळी विठ्ठल मल्हार यांनी त्यांचा बाणेदारपणा एल्फिन्स्टन यास दाखवला असल्याची एक पारंपरिक हकिगत सांगितली जाते. दुसरी एक तशीच त्यांच्या बलदंडपणाची हकिगत प्रसिद्ध आहे. ती अशी, की ते कडेपठार येथील शिवमंदिरात अभिषेकासाठी हाताने ऊस पिळून त्या रसाचा माही शिवरात्रीच्या वेळी महादेवावर अभिषेक करत!

मागच्या पिढीतील त्र्यंबक मल्हार पुरंदरे हे ताकदवान गृहस्थ होते. मोडवे येथे १९५६ साली ग्रामपंचायत झाली. त्याचे पहिले सरपंच त्र्यंबक मल्हार हे होते. त्यानंतर त्यांचे पुत्र मल्हार त्र्यंबक ऊर्फ दादासाहेब हे १९९० ते १९९७ या कालावधीत सरपंचपदावर होते. ते गावी राहून शेती व सामाजिक कार्य करतात.

मोडवे गावी मरीआईचे जुने देऊळ होते. त्या देवस्थानास महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या राज्यांमधून भाविक येत असत. देवीस सुवर्णालंकार वाहण्याची प्रथा असल्यामुळे उत्पन्न मोठे होते. ते उत्पन्न अनेक वेळा बेहिशोबी स्वरूपात असल्यामुळे त्याचा देवस्थानच्या किंवा गावच्या विकासासाठी काडीमात्र उपयोग होत नव्हता. दादासाहेब पुरंदरे यांच्या ती गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी १९८४ साली मरीमाता देवस्थान ट्रस्ट स्थापन केला. त्यामुळे देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम हाती घेता आले. त्यातून नवीन मंदिर, भक्तिनिवास, मंगलकार्यालय उभे करण्यात आले असून त्यावर सुमारे एक कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

वाड्यापासून शंभर मीटरवर ‘म्हाळसाकांत’ मंदिर आहे. त्यात म्हळासाकांत लिंगे आहेत. मंदिर ते पूर्ण जीर्णावस्थेत आहे.

पुरंदरे यांच्या घरावर कृपा असलेले एक योगी शंकर महाराज यांनी भैरवनाथ मंदिरासमोर जिवंत समाधी घेतली. भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू असताना त्या समाधीच्या एका बाजूची भिंत ढासळली व तेथे पद्मासन अवस्थेत त्यांच्या हाडांचा सांगाडा पाहण्यास मिळाला. त्याचा कालखंड अठराव्या शतकाच्या सुरुवातीचा असल्याचे लक्षात आले.

कर्नाटकात प्रसिद्ध गायक म्हणून राजीव पुरंदरे यांनी त्या घराण्याचे नाव मोठे केले आहे. मल्लिकार्जुन मन्सूर यांचा त्यांनी गंडा बांधला व शिष्यत्व पत्करले. त्यांनी कर्नाटकात आकाशवाणीचे ‘केंद्रसंचालक’ म्हणून अनेक वर्षे कारभार सांभाळला. मल्लिकार्जुन मन्सूर हे ‘राजीव हा त्यांचा आवडता शिष्य’ म्हणून उल्लेख करतात. त्यांचे पुत्र सूरज हे तबलापटू म्हणून धारवाड आकाशवाणी केंद्रावर कार्यरत आहेत.

मोडवेकर पुरंद-यांनी द्राक्षाचे उत्पन्न काढण्याची योजना बारामती तालुक्यात प्रथम कार्यान्वित केली. द्राक्षाचे मळे लावले. त्यांनी त्यांच्या शेतात तुतीच्या झाडांची लागवड केली व रेशीम उत्पादनास साहाय्य केले. पुरंदरे यांनी पोल्ट्रीफार्म बारामती तालुक्यात पहिला काढला.

बारामती तालुका पर्जन्यछायेखालील प्रदेशात मोडतो. अलिकडच्या काळात कालवे झाले. तरीसुद्धा मोरगावकडील भाग अजून उन्हाळ्यात पाण्यासाठी आर्त असतो. पुरंदरे यांनी त्यांच्या शेतामध्ये बांधलेल्या वाड्याबरोबर एक विहीर बांधली. ती विहीर परिघाने अतिशय लहान आहे. तिला अखंड पाणी असते. वरचेवर पडणा-या दुष्काळात पुरंद-यांच्या त्या विहिरीतून आठ-दहा गावांना पाणीपुरवठा केला जातो. त्यांच्या पूर्वजांनी तेवढ्याच उंचीची दगडी ताल बांधलेली होती. त्यावरून पाणी जिरवणे, पाणी साठवणे हा त्यांचा उद्देश लक्षात येतो. विहिरीची ती जागा कशी निवडली असेल हा संशोधनाचा विषय आहे. त्यांच्या शेतात शासनाने पाझर तलाव बांधला आहे. गांधीहत्येच्या १९४८ मधील जाळपोळीत पुरंद-याचा वाडा जाळण्यासाठी आलेल्या जमावाला गावक-यांनी प्रतिकार केला व त्यांचा वाडा जळू दिला नाही. त्यामुळे ती ऐतिहासिक वास्तू शाबूत आहे.

पुरंदरे यांनी त्यांची विहीर अस्पृश्यांसाठी शंभर वर्षांपूर्वी खुली केली होती. पुरंदरे मोडवेकर हे समाजकार्य करणारे आहेत.

मोरे-पाटील हे मोडवे गावचे वतनदार पाटील असून त्यांच्या पूर्वजांपैकी एका स्त्रीने पुरंद-यां सारखाच एक वाडा बांधला. तो वाडा पुरंद-यांच्या वाड्याचा जणू जुळा भाऊ वाटतो. तो बराच पडलेला आहे. त्या पाटलांचा एक मजहर (की महजर) प्रसिद्ध आहे. तो सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीतील त्रेचाळीस फूट लांब व सात इंच रुंद कागद आहे. त्या मजहरातून (की महजरातून) तत्कालीन सामाजिक स्थितीवर प्रकाश पडतो.

– सदाशिव शिवदे

About Post Author

Previous articleराहुल अल्वारिस – शाळेपासून मुक्ती : वर्षापुरती
Next articleआत्मनाश आणि धर्म
डॉ. सदाशिव सखाराम शिवदे हे 'अखिल महाराष्‍ट्र इतिहास परिषदे'चे अध्‍यक्ष होते. त्‍यांनी पशुवैद्यक पदविका (D.Vet) मिळवली होती. त्यांनी मराठी आणि इतिहास या विषयांत एम.ए.ची पदवी तर. इतिहास-संस्‍कृत या विषयांत पी.एच.डी. मिळवली होती. त्‍यांनी संभाजीराजे, महाराणी येसूबाई, कान्‍होजी आंग्रे, हंबीरराव मोहिते, शिवाजी महाराजांच्‍या पत्‍नी सईबाई, अशा अनेक ऐतिहासिक व्‍यक्तिमत्त्वांवर संशोधन ग्रंथ लिहिले. त्‍यांची आतापर्यंत संशोधन ग्रंथ, शोधनिबंध, अनुवादित, ऐतिहासिक कादंबरी, कथासंग्रह या प्रकारांत एकूण अठरा पुस्‍तके प्रकाशित आहेत. त्‍यांच्‍या 'माझी गुरं-माझी माणसं' या ग्रामीण कथासंग्रहातील कथांचे आकाशवाणीवर वाचन झाले. शिवदे यांना त्‍यांच्‍या लेखनाकरता अनेक पुरस्‍कारांनी सन्‍मानित करण्‍यात आले होते. शिवदे यांचे ७ एप्रिल २०१८ रोजी निधन झाले. लेखकाचा दूरध्वनी 9890834410

3 COMMENTS

  1. Uttam mahiti.khara tr
    Uttam mahiti.khara tr sampurna bhartat pasarlele purandare kutuamba ne ekatra yawa ..maze sasare let.sudhakar Ganesh purandare . sangayache ke pashwe chimaji appan barobar aple purwaj vasai palghar la ale an tikadech sthaik zale …

  2. Very great n useful
    Very great n useful information which helped us to know the inheritance of Purandare s

  3. मी आपला खूप खूप आभारी आहे…
    मी आपला खूप खूप आभारी आहे.
    आपण मोडवेचा पुरंदरे वड्या बद्दल जी माहिती दिलीत ती खूप मार्गदर्शक आहे.
    आभारी …..

Comments are closed.