आदिवासी समाज हा शहरी समाजापासून दूर, आडरानात राहतो. त्यांच्याकडे नैसर्गिक संसाधने असतात. सरकारने आदिवासी भागांमध्ये शाळा काढल्या आहेत, पण तेथे मुले येत नव्हती. उलट, जीवनशाळांमध्ये मुले हौसेने येतात. त्या जीवनशाळांना मेधा पाटकर यांचे मार्गदर्शन लाभते…
मेधा पाटकर म्हणतात, ‘आदिवासी समाज हा शहरी समाजापासून दूर, आडरानात राहतो. त्यांच्याकडे नैसर्गिक संसाधने असतात. जसे, की लाकूड, गवत, गुरेढोरे, फुले-फळे-मध, विविध औषधी वनस्पती व निसर्गातील इतर उपयोगी गोष्टी. त्या सर्वांचा वापर आयुष्यातील गरजा कशा प्रकारे पुरवाव्या व त्या टिकवाव्या याकरता शिक्षण हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. तसे शिक्षण त्यांना त्यांच्या रोजच्या आयुष्यात, जीवनक्रमात मिळत असते. त्याकरता त्यांना शाळेत जाण्याची गरज नाही. त्या मुलांना शिक्षणप्रवाहात सामावून घ्यायचे असेल तर त्यांच्या शाळांमधून तो जीवनक्रम समजावून घेऊन वेगळ्या पद्धतीने शिक्षण देणे आवश्यक आहे. आदिवासी भागांमध्ये सरकारने शाळा काढल्या आहेत, पण तेथे मुले येत नव्हती. उलट, जीवनशाळांमध्ये मुले हौसेने येतात आणि तेथून जगण्याचा नवा दृष्टिकोन घेऊन पुढील शिक्षणप्रवाहातदेखील सक्षमतेने सामील होतात.’
जीवनशाळांकरता काही सहजसोप्या वाटणाऱ्या, पण अमूल्य अशा सूचना मेधा पाटकर देतात :
- शिक्षक व विद्यार्थी यांचे संबंध ही शिक्षणक्रमातील महत्त्वाची गोष्ट आहे. शिक्षकांच्या मनात विद्यार्थ्यांविषयी प्रेमभावना हवी.
- मुलांच्या घरी जी भाषा बोलली जाते ती त्यांना जवळची असते. त्यामुळे त्यांच्या बोलीभाषेतून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न हवा.
- मुलांच्या मनात अभ्यासाची भीती निर्माण होता कामा नये. ती शिक्षकांची जबाबदारी आहे. मुलांना शाळा आनंदाची जागा वाटण्यास हवी.
- मुलांनी व शिक्षकांनी मिळून छोट्या पुस्तिका त्यांच्या गरजेप्रमाणे तयार करणे. उदाहरणार्थ‘जंगलपोथी’- यामध्ये जंगलांविषयीचे सर्व तपशील आणि जंगलातील संसाधनांचा उपयोग दैनंदिन जीवनात कशा प्रकारे करता येईल याची माहिती त्यात असेल. तशाच प्रकारे विविध सण,विविध संस्कृती, देवदेवता, प्रत्येक ठिकाणच्या बोलीभाषा आणि त्या त्या गावातील इतिहास यांविषयीच्या पुस्तिका शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन तयार कराव्यात. तशी माहिती देणारे मासिकही शाळेने काढावे.
- शिक्षक हा विद्यार्थ्यांचा नेता असतो. त्याला कोठल्याही प्रसंगातून शांतपणे मार्ग शोधून काढता आला पाहिजे.
- शिक्षकांनी मुलांमध्ये विविध गोष्टींद्वारे;तसेच,स्वतःच्या आचरणाने प्रेम/समाजप्रेम निर्माण करावे.
- शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. पण त्यांना त्यांचे अनुभव घेऊ द्यावेत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक शिक्षकाने तो मुलांना शिकवत नसतो,तर मुले त्यांच्या क्षमतेप्रमाणे शिकत असतात हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
- शिक्षकांनी मुलांच्या मनामध्ये शिकण्याची इच्छा निर्माण करावी. शिक्षकाने त्याच्या आचरणाने मुलांच्या मनामध्ये त्याला काही गरज पडली,तर त्याचे शिक्षक त्याच्या पाठीशी आहेत ही श्रद्धा व विश्वास निर्माण करावा.
- मुलांचे मूल्यांकन स्पर्धेकरता करू नये. शिक्षकांनी ते मुलांचे लेखन,वाचन,बोलणे, उपक्रमातील काम, शारीरिक श्रम, विचार करण्याची पद्धत या सर्व गोष्टींबाबत वर्षभरात केलेल्या निरीक्षणाच्या आधारावर करावे.
- मुलांबरोबर शिक्षकांचे मूल्यांकन करणेदेखील आवश्यक आहे. त्याचादेखील एक आराखडा बनवावा. ज्यामध्ये शिक्षकांनी नवीन शिकलेल्या गोष्टी,स्वतःमध्ये केलेले बदल,सुधारणा, मुलांशी वागण्याची त्यांची पद्धत व दृष्टिकोन, अडचणींमधून मार्ग काढण्याची त्यांची क्षमता या सर्व गोष्टींची माहिती असावी.
मेधा पाटकर यांच्या सर्व सूचना जीवनशाळांना परिपूर्णता देणाऱ्या आहेत.
– शिल्पा खेर 9819752524 khersj@gmail.com
———————————————————————————————-