मेढ्यातील कातकरी समाजाचा मच्छिमारी हक्कासाठी लढा

0
41

कातकरी समाजाची लोकवस्ती सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात मेढा या गावी नऊशेपंचाहत्तर हेक्टरवर पसरलेल्या कण्हेर धरणाच्या परिसरात आहे. त्या आदिवासी कातकरी समाजाचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन म्हणजे मच्छिमारी. मच्छिमारीसाठी ठेकेदारी पद्धत कण्हेर धरणाच्या निर्मितीनंतर सुरू झाली. त्यामुळे कातकरी भूमिपुत्रांचे उदरनिर्वाहाचे हक्काचे साधन हिरावले गेले. त्यांना सरकारकडून उपजीविकेचे दुसरे कोणतेही साधन उपलब्ध करून दिले गेले नाही. आदिवासी विकास विभागाकडून मच्छिमारीसाठी होड्या, जाळी उपलब्ध करून देण्यात आली, पण सरकारने जलाशयात उतरण्याचा हक्क मात्र नाकारला! अशा विसंगत परिस्थितीत, दीपक मुकणे हे त्याच समाजातील तरुण पुढे आले. त्यांनी कातकरी समाजाच्या दहा-पंधरा युवकांची मोट बांधली व ‘श्रमिक आदिवासी कातकरी सामाजिक व शैक्षणिक मंडळा’ची स्थापना केली. त्यांनी त्या माध्यमातून कातकरी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी 2014 सालापासून लढा उभारला आहे. त्यांना 2019 मध्ये यश येण्याचे चिन्ह जाणवत आहे.

कातकरी समाज कण्हेर धरणाच्या परिसरात चाळीस-पन्नास वर्षांच्या आधीपासून राहत आहे. पण धरण बांधताना, सरकारकडून त्या समाजाला विश्वासात घेतले गेले नाही. उलट, सरकारने धरण बांधल्यानंतर त्यांची पारंपरिक मच्छिमारी पद्धत बंद करून ठेकेदारी पद्धत सुरू केली. त्यामुळे कातकरी समाजाचे काम हिरावले गेले. सुरुवातीचा ठेका ‘वेण्णा डॅम मच्छिमारी संस्था’ व ‘अजिंक्य मच्छिमारी संस्था’ या दोन संस्थांना मिळाला. कातकरी समाजाने त्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध न राहिल्यामुळे भंगार-चिंचा वेचून विकणे, हातभट्टीवर मोलमजुरी करणे अशी कामे सुरू केली. मुकणे म्हणाले, की त्या समाजाचे दरडोई उत्पन्न एका दिवसाचे अडीच रुपयांपेक्षाही कमी आहे. कातकरी समाजाकडून मासेमारीकरता पैसे भरून सरकारची पावती बनवण्याची तयारी दाखवली गेली तेव्हा त्याला ठेकेदारांनी विरोध केला. ठेकेदार मच्छिमारी करण्यासाठी बाहेरच्या प्रदेशातील मजूर बोलावायचे. बाहेरून येणाऱ्या मजुरांना आपल्याकडील (येथील) मासेमारीचे तंत्र ठाऊक नव्हते. ते धरणाचा तळ खरवडून मच्छिमारी करायचे. त्यामुळे मोठ्या माशांबरोबर छोटे मासेही पागले (पकडले) जायचे. ते मत्सबीजवाढ व जैवविविधता या दृष्टीने हानिकारक होते. दीपक मुकणे, एकनाथ वाघे, हौशा मुकणे, बारीकराव पवार, जगन्नाथ वाघे, शिवाजी पवार यांनी शासकीय पातळीवर मदतीसाठी पत्रव्यवहार केला, पण त्यांना सरकारी अनास्थेमुळे फारसे यश आले नाही. स्थानिक प्रशासन, पोलिस, राजकीय प्रतिनिधी यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले; उलट, त्यांना गुंतागुंतीच्या न्यायालयीन प्रक्रिया व अनौपचारिक बैठका यांमध्येच गुंतवले गेले.

दरम्यान, मुंबईची सामाजिक संघटना ‘कोरो’चा ‘उभरते नेतृत्व शोध फेलोशिप कार्यक्रम’ साताऱ्यात 2011 साली येऊन पोचला. तळागाळातील नेतृत्वाला बळकटी देण्याची भूमिका त्या कार्यक्रमामागे आहे. त्या कार्यक्रमात दीपक मुकणे यांना तीन वर्षांची कोअर फेलोशिप व 2013-14 ची अॅडव्हान्स फेलोशिप मिळाली. त्यांच्या कामाला त्यानंतर गती मिळाली. ‘कोरो’ने कातकरी समाजामध्ये कार्यशाळा, प्रशिक्षण या माध्यमातून नियोजन, कृती, शिस्त, नेतृत्व क्षमता, हक्काची जाणीव, आत्मविश्वास जागवण्याचे काम केले. त्यांनी कातकरी महिलांना बोलते केले. त्यातून कातकरी समाजाचा दबावगट निर्माण झाला. कातकरी लोक इतर समाजाच्या लोकांमध्ये मिसळण्यास घाबरत. पण येथे तर कातकरी तरुणच त्यांचे नेतृत्व करत आहेत, ते पाहून त्या समाजातील लोकांमध्ये जोश व उत्साह निर्माण झाला. कण्हेर धरणावर हक्क मिळवण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज होती. ‘श्रमिक…’च्या कार्यकर्त्यांनी मेढ्यासहित कातकरी समाजाची लोकवस्ती असलेल्या अन्य गावांमध्ये प्रबोधनास सुरुवात केली. धरण परिसरात तशी बत्तीस गावे होती. त्यांनी लोकांना त्यांचे हक्क समजावून सांगितले; सरकारचा मच्छिमारी ठेका मिळवण्याच्या दृष्टिकोनातून कातकरी समाजाच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे तेही पटवून दिले. त्यामुळे कातकरी लोकांमध्ये हक्काच्या लढ्यासाठी आत्मविश्वास निर्माण झाला. बत्तीस गावांतील कातकरी समाज ‘श्रमिक…’च्या छताखाली एकवटला. मेढ्यात ‘महालक्ष्मी आदिम मच्छिमारी सहकारी संस्था’ स्थापन करण्यासाठी 3 फेब्रुवारी 2014 रोजी सरकारकडे प्रस्ताव दाखल केला गेला.

ठेकेदारांनी दादागिरी, हाणामारी करून कातकरी समाजाला दडपण्याचा प्रयत्न चालवला होता. कातकऱ्यांनी हक्काने कण्हेर धरणात मच्छिमारी करता यावी, यासाठी 15 ऑगस्ट 2014 च्या स्वातंत्र्यदिनी आंदोलन करण्याचे ठरवले. दोनशेपंचवीस कातकरीबांधव झेंडावंदन केल्यानंतर कण्हेर धरणाच्या जलाशयात उतरणार होते. दोन ते तीन हजार कातकरी समाजबांधव कण्हेर धरणाजवळ जमले. दोनशेपंचवीस कातकरी मच्छिमारांनी त्यांच्या होड्या जलाशयात नायब तहसीलदार व पोलिस यांच्या समक्ष सोडल्या. त्यांच्यासोबत कुटुंबातील सदस्य होते. कण्हेर धरण परिसर ‘आदिवासी कातकरी ढोर नाय, माणूस हाय! माणूस हाय!’, ‘धरण आमच्या हक्काचे, आहे सर्वांच्या मालकीचे’ अशा घोषणांनी दुमदुमून गेला. कातकरीबांधवांच्या बारा वर्षांच्या संघटित प्रयत्नांना मिळालेले ते पहिले यश होते. मेढा ग्रामस्थांनीदेखील त्या आंदोलनाला ग्रामसभेत पाठिंबा दिला. ग्रामपंचायतीने कातकरी समाजाच्या मच्छिमारी संस्थेच्या स्थापनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची हमी दिली. ‘कोरो’नेही तशा पत्रव्यवहारात मदत केली. तरीदेखील सरकारी कामकाजातील अडचणी येत राहिल्या. अखेर कातकऱ्यांच्या ‘महालक्ष्मी आदिम मच्छिमारी सहकारी संस्थे’ची नोंदणी 11 जून 2015 रोजी सरकारदरबारी झाली.

संस्थेचा वार्षिक खर्च पन्नास ते साठ हजार रुपये आहे. तो आर्थिक भार लोकसहभागातून उचलला जातो. ‘श्रमिक…’चा साताऱ्यातील इतर धरणांवर आणखी मच्छिमारी सहकारी संस्था निर्माण करून कातकरी मासेमारी समूहाचा महासंघ बनवण्याचा मानस आहे. शासनाने याआधी दिलेल्या कण्हेर धरणाच्या मच्छिमारी ठेक्याची मुदत 2019 मध्ये संपत आहे. कातकरी समाजाचे ध्येय महासंघाच्या वतीने नवा ठेका मिळवण्याचे आहे.

कातकरी समाजाची मेढ्यामध्ये लोकवस्ती एकशेदहा, तर एकूण लोकसंख्या चार हजार सातशेपंचाहत्तर आहे. ते लोक चिपळूण, रायगड जिल्ह्यांतून उदरनिर्वाहासाठी चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी आले आणि तेथेच स्थायिक झाले आहेत. कालांतराने, त्यांच्या राहणीमानात फरक पडत गेला. कातकरी समाजाला इतर समाजात स्थान प्राप्त झाले आहे. कातकऱ्यांना स्वत:ची घरे, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदानाचा हक्क मिळाला आहे. कातकरी समाजात शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे. दीपक मुकणे हा मेढ्याच्या कातकरी समाजातील पहिला विद्यार्थी 2000 साली दहावी पास झाला, तर वनिता मुकणे ही पहिली शिक्षक झाली आहे. मुलींचे प्रमाण शिक्षणात जास्त आहे. दोन-तीन मुली पदवीधर झाल्या आहेत. पंचाहत्तर टक्के कातकरी समाज सुशिक्षित झाला आहे. ‘युथ ग्रूप’द्वारे विविध व्यावसायिक कौशल्ये शिकण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, तेणेकरून मच्छिमारीव्यतिरिक्त उपजीविकेसाठी इतर मार्ग सापडतील. सध्या कातकरी समाजात बचत गटाच्या माध्यमातून कागदी वस्तू (विविध डिझाइन्सचे कानातील), ‘श्रमिक…’च्या माध्यमातून नॅपकिन्स आणून त्यांची कमिशनवर विक्री करणे, शासनाच्या मदतीने मधुमक्षिकापालन असे छोटे धंदे केले जातात. कातकरी लोकांना लोकवर्गणीतून, मेढा गावच्या फंडातून, बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते.

दीपक मुकणे जावळी तालुक्यातील केळघर पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करतात. ते नोकरीतून उरलेला वेळ समाजकार्यासाठी देतात. खरे तर, त्यांना सैन्यामध्ये किंवा पोलिसदलात जायचे होते. त्यांचे ते स्वप्न जातीचा दाखला न मिळाल्यामुळे अधुरे राहिले. त्यांनी शिक्षकाची नोकरी महाडमध्ये अडीच वर्षें केली. दीपक यांचे वडील हौशा मुकणे हे अशिक्षित असूनसुद्धा कातकरी समाजाला लोकांमध्ये मान मिळावा, त्यांना कोणी कमी लेखू नये, समाज सुधारावा यासाठी शासकीय पातळीवर काम करत होते. दीपक यांना समाजसेवेचा वसा घरात असताना त्यांच्या समाजाला अज्ञानात ठेवून दुसरीकडे शिकवणी करणे योग्य वाटले नाही. त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडली. दीपक कातकरी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेऊन काम करत आहेत.

दीपक मुकणे 9823488515, dipakpatilmedha@gmail.com

वृंदा राकेश परब 82863 60182/75069 95754, vrunda.rane@gmail.com

सातारा जिल्ह्यातील कण्हेर धरणातील मच्छिमारीच्या ठेक्याची मुदत 2019 साली संपत आहे. स्थानिक कातकरी समाजाला तो ठेका मिळावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांचे हिरावले गेलेले हक्क मिळतील. त्यांचा तो लढा 2014 सालापासून आहे.

About Post Author

Previous articleआजी-आजोबांचे पाळणाघर
Next articleकविमनाचा चित्रकार प्रभाकर बरवे
वृंदा राणे-परब मुंबईत गोरेगाव येथे राहतात. या दहा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्‍यांनी मराठी विषयातून एम ए पदवी मिळवली आहे. त्‍यांनी ‘दै. वृत्तमानस’, 'पुढारी', 'मुंबई तरुण भारत', 'मी मराठी' या वर्तमानपत्रात मुद्रितशोधक पदावर काम केले. त्यांनी 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'मध्‍ये काही काळ उपसंपादक पदावर काम केले. सध्या त्या 'थिंक महाराष्ट्र'सोबत मुक्त पत्रकार म्हणून जोडलेल्या आहेत. 7506995754