मेडशिंगी गावाची संस्कारातून समृद्धी

casasole

सांगोला तालुक्यातील मेडशिंगी हे गाव सर्वसाधारण खेड्यांप्रमाणेच जुन्या वळणाचे होते. त्यात ते तालुक्यापासून जाणा-या सह मुख्य रस्त्याच्या आडबाजूला. सर्व गैरसोयींनी युक्त, शिक्षण आणि संस्कार यांपासून अलिप्त, तमाशात दौलत जादा करत रात्रभर जागणारे आणि दिवसभर पेंगाळणारे…  लोक कष्टांपेक्षा निसर्गावर येणा-या शेतीच्या उत्पन्नावर जगत, पण गावाला शेंडे बापलेक भेटले आणि गावाचा कायपालट घडून आला. आनंदराव शेंडे ब्रिटिश कालीन सैन्यात सुभेदार होते. ते कडक शिस्तीचे. त्यांच्या नावावर शौर्यकथा आहेत. त्यांचे पुत्र संभाजीराव ऊर्फ दादासाहेब शेंडे हे स्वत:साठी, स्वत:च्या कुटुंबासाठी फार कमी जगले, पण त्यांनी सातत्याने परोपकार केले. संभाजीराव शेंडे यांचे मेडशिंगी हे मूळ गाव.

आनंदराव शेंडे तीन वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले. घरची गरिबी होती. त्यांची शेतीही नव्हती, त्यामुळे आनंदराव लहान वयापासून दुस-याच्या शेतात मजुरीने कामाला जात होते. ते १९११ साली कापडगिरणीत काम मिळवण्यासाठी सोलापूरला गेले. तेथेच त्यांना सैन्यात भरती होण्याची संधी मिळाली. इराण-इराकी सैन्याचा १९१४ सालानंतर वेढा पडला त्या लढाईत आनंदराव शेंडे यानी निकराची झुंज देऊन शौर्य गाजवले. ब्रिटिश सरकारने आनंदरावांना सुभेदार ही पदवी व मेडशिंगी गावात सव्वाशे एकर जमीन इनामी दिली. गावाला त्यांचा आदरयुक्त कडक दरारा बसला. प्राथमिक शिक्षणाची सोय चांगली असावी म्हणून त्यांनी गावात चिरेंबदी दगडाची दुमजली शाळेची इमारत बांधली. पिण्याच्या पाण्यासाठी शिवकालीन पद्धतीची दगडी विहीर (बारव) बांधली. गावामध्ये देवदेवतांची मंदिरे बांधली. समाजात एकोपा निर्माण व्हावा म्हणून गावात भंडा-याची प्रथा सुरु केली. गावात रात्रभर चालणा-या  तमाशाला बंदी घातली आणि मेडशिंगी गावाला सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक स्थैर्य लाभले.

मेडशिंगीचे कै. केशवराव राऊत १९५२ साली पहिले आमदार झाले. तेव्हाच पंचायत समितीचे पहिले सभापती कै. संभाजीराव शेंडे झाले. ग्रामीण भागातील पहिले जिल्हा न्यायाधीश मेडशिंगी गावातील संभाजी राऊत झाले. कृषी खात्याची एम. टेक. पदवी संपादन करणारे मेडशिंगीचे शिवाजीराव शेंडे इत्यादी व्यक्ती घडल्या.

अशा संस्कृतीत संभाजीराव शेंडे वाढले, शिकले आणि कार्यात पुढे आले. १९४६ सालात पदवी संपादन करणा-या  तालुक्यात दोनच व्यक्ती होत्या. त्यामध्ये कै. चंद्रशेखर ऊर्फ बापुसाहेब झपके व दुसरे संभाजीराव ऊर्फ दादासाहेब शेंडे. त्यांनी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधून बी. ए. ची पदवी संपादन केली. जतमध्ये काही काळ शैक्षणिक क्षेत्रात नोकरी केली, त्यानंतर ते सक्रिय राजकारणात आले. त्यांची काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकीय कारकीर्द १९५१ सालापासून सुरू झाली. त्यांना १९५२ साली जिल्हा लोकल बोर्डावर घेण्यात आले. १९६२ साली तालुका पं. स. चे पहिले सभापती होण्याचा मान मिळवला व सात वर्षे त्यानी सभापतीपद भूषवले. त्यांना १९६९ साली सहा जिल्ह्यांच्या विभागीय मंडळावर सदस्य म्हणून घेण्यात आले. त्यांनी सलग सात वर्षे त्या पदावर काम केले.

त्यांनी १९६८ साली लोटेवाडी शिक्षण संस्था सुरू केली. ‘ग्रामीण भागात पाच माध्यमिक विद्यालये व एक महाविद्यालय सुरु केले. अनेक गरीब व होतकरू तरुणांना नोक-या मिळवून दिल्या. ते अनेक कुटुंबांच्या रोजीरोटीचा आधार झाले. त्या अनुषंगाने त्यांनी अनेक लोकांची इतरही कामे केली. त्यांची शिक्षणावर व शेतीवर श्रद्धा होती व त्याकडे ते दूरदर्शीपणाने पाहत होते. त्यांनी ‘ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठीच खेड्यात माध्यमिक शाळा सुरू केल्या. हुशार विद्यार्थ्यांनी कृषी विद्यापीठाची पदवी मिळवावी व त्यांच्या भागातील शेतीचा विकास करावा ही त्यांची अपेक्षा. त्यांचे भाऊ शिवाजीराव शेंडे कृषी विद्यापीठात गेले. त्यांनी एम्. टेक. पदवी संपादन केली.

संभाजीराव शेंडे यांच्याकडे अखेरपर्यंत बैलगाडीशिवाय स्वत:चे दुसरे वाहन नव्हते. त्यांची सायकल सुद्धा नव्हती. ते नेहमी दुस-याच्या सायकलवर डबलसीट बसून जात. एस. टी. ने प्रवास करत. त्यांना जेवणाव्यतिरक्त कशाचेही व्यसन नव्हते. त्याना भरपूर अर्थप्राप्ती करता आली असती परंतु मोठ मोठी पदे सांभाळूनही ते रिकामेच राहिले. फक्त त्यांनी एक अमाप संपत्ती मिळवली ती म्हणजे लोकप्रियता आणि लोकाशीर्वाद, मरणोत्तरही वर्षानुवर्षे त्यांची लोकप्रियता टिकून आहे. त्यांनी प्रत्येक व्यक्तीचा, कार्यकर्त्याचा विश्वारस जपला होता. ते खेड्यात राहणा-या  प्रत्येक कुटुंबाची आस्थेने चौकशी करणार, त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारणार, त्यांनी बिगरदुधाचा किंवा शेळीच्या दुधाचा चहा दिला तरी तो आवडीने पिणार अशा पद्धतीचे त्यांचे जीवनमान होते. अनेक मोठी पदे भोगली. परंतु त्यांच्या जीवनशैलीत तसूभरही फरक पडला नाही. त्यांनी एकच तत्त्व जोपासले ते म्हणजे ’स्वत:साठी जगलो तर मेलो, दुस-यासाठी जगलो तरच जगलो’ या उक्तीप्रमाणे संभाजीराव उर्फ दादासाहेब शेंडे हयात असेपर्यंत दुस-यासाठी जगले.

संभाजीराव शेंडेचे सुपुत्र अरूण शेंडे- 9423335490

-वैजिनाथ घोंगडे

About Post Author

Previous articleअकलुजमधील कुस्ती स्पर्धा
Next articleसांगोला तालुक्यातील मंदिरांची वैशिष्ट्ये
वैजिनाथ जगन्नाथ घोंगडे हे सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी. ते गेल्‍या वीस वर्षांपासून वृत्‍तपत्र क्षेत्रात कार्यरत असून ' माणदेश वैभव' या नियतकालिकाचे ते संपादक आहेत. ते गेल्‍या बारा वर्षांपासून नदीकाठी वृक्षांची लागवड करून त्‍यांचे संवर्धन करण्‍याचं काम करतात. त्‍यांनी 2010 साली माणगंगा नदीपात्रातून १६५ किलोमीटरचे अंतर पायी कापून नदीपरिक्रमा व अभ्यासदौरा पूर्ण केला. त्‍यानंतर त्‍यांनी नदीची दुरवस्था व विकासाचे उपाय यावर अहवाल तयार करुन सादर केला. त्‍यांचे माणगंगेच्या व्यथा आणि उपाय यांवरील लेखन असलेले 'परिक्रमा माणगंगेची' हे पुस्‍तक प्रकाशित झाले आहे. घोंगडे यांनी २०१२-१३ आणि २०१३-१४ या काळात त्‍यांचे राहते गाव, वाढेगाव येथे महात्‍मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी काम करत काही समाजपयोगी उपक्रम राबवले. त्‍यांनी त्‍यातून गावाला पाच लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त करुन दिला. जलतज्ञ मा. राजेंद्रसिंह राणा यांच्या उपस्थितीत माणगंगेच्या उगमस्थळापासून वैजिनाथ घोंगडे यांच्या हस्ते माणगंगेच्या पुनर्जीवनाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आल आहे. त्‍यांनी 2010 साली सोलापूर जिल्ह्यात लोकसहभागातून माणगंगा स्वच्छता अभियान राबवले. त्‍यांनी २०१५ मध्ये माणगंगेची दुसरी परिक्रमा केली. त्यामध्ये माण नदीला मिळणारे ओढे, त्यांची लांबी, त्यावर बांधलेले सिमेंट ना. बं. व अपेक्षीत सिमेंट ना. बं. याबाबतची माहिती संकलीत केली असून त्याचा अहवाल सातारा, सांगली व सोलापूर जिल्हाधिकार्‍यांना देण्याचे काम सुरु आहे. त्‍यांच्‍या प्रयत्‍नांनी नदीकाठच्या निवडक ठिकाणी वृक्षारोपण, पर्यावरण, नदीस्वच्छता याबाबत जनजागृतीचे काम सुरु आहे. लेखकाचा दूरध्वनी 9420093599

2 COMMENTS

  1. आमच्या मोठ्या मामांना असंख्य
    आमच्या मोठ्या मामांना असंख्य प्रणाम.

Comments are closed.