सिनेनट दिलीप कुमार एकदा म्हणाले होते, की “पात्राच्या वठण्यामागे अभिनय वीस टक्के असतो तर रंगभूषा ऐंशी टक्के असते!” पंढरीदादा जुकर यांच्या दीर्घ यशस्वी कारर्कीर्दीमुळे दिलीपकुमार यांच्या विधानाचा प्रत्यय येतो. मेकअपमुळे कलाकाराचे रुपडेच बदलून जाते. पंढरीनाथ यांचे नाव रंगभूषा क्षेत्रातील ज्येष्ठ आहे; त्यांनी त्यांच्या आयुष्याची साठ वर्षें भारतीय चित्रपटसृष्टीला दिली. बॉलिवूडच्या तीन पिढ्यात्या काळात घडल्या! पंढरीदादा यांचे मूळ नाव नारायण. मुंबईत त्यांच्या शेजारी प्रसिद्ध मेकअपमन बाबा वर्धम राहत. पंढरीदादा त्यांचे वडील आजारी पडल्यानंतर, बाबा वर्धम यांच्या सांगण्यावरून त्यांचे सहकारी म्हणून 1948 साली काम करू लागले. बाबा वर्धम यांनीच त्यांना रंगभूषाशास्त्राचे धडे दिले. काही दिवसांनी, जेव्हा पंढरीदादा यांचा हात बसला तेव्हा बाबा वर्धम यांनी त्यांची ओळख दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्याकडे करून दिली. पंढरीदादांनी राजकमल स्टुडिओजमध्ये काम सुरू केले. नर्गीस या अभिनेत्रीने पंढरीदादांची ओळख दिग्दर्शक के. ए.अब्बास यांच्याशी करून दिली. त्यामुळे पंढरीदादांची वर्णी लागली ती थेट ‘परदेसी’ या चित्रपटाच्या चमूसोबत रशियात जाण्यासाठी! ‘परदेसी’या 1957 सालच्या चित्रपटामुळे पंढरीदादांच्या आयुष्याला वेगळीच मोठी कलाटणी मिळाली. रशियन सरकारने त्यांना ‘मेकअप आर्ट’मध्ये डिप्लोमा करण्यासाठी शिष्यवृत्ती देऊ केली. पंढरीदादांनी मेकअप आर्टमधील डिप्लोमा मॉस्कोहून पूर्ण केला. दैवदुर्विलास म्हणजे, पंढरीदादावर्षानंतर मुंबईत परतले, तेव्हा ‘त्या फॉरेन रिटर्ण्डआर्टिस्टला पगार देणे झेपणार नाही’ या विचाराने त्यांना जवळजवळ दीड वर्षें कोणत्याही स्टुडिओने काम दिले नाही! त्यांनी त्या बेरोजगारीच्या काळात रंगभूषेला पूरक अशी इतर कौशल्ये प्राप्त केली.
एक योग त्या काळातच जुळून आला. चेतन आनंद हे मोठे सिनेदिग्दर्शक गौतम बुद्धांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा बनवत होते. चेतन आनंद त्या सिनेमाच्या केशभूषेबद्दल फार चिंतेत होते. त्यांना विग मेकरने गौतम बुद्धासाठी बनवलेले कोणतेही विग पसंत पडेनात. मात्र पंढरीदादांनी केवळ चोवीस तासांत बनवलेला विग चेतन आनंद यांना खूपच आवडला आणि त्यांनी पंढरीदादांना ‘त्यासाठी तुला किती पैसे हवेत?’ असे विचारले. पंढरीदादांनी ‘तुम्हाला वाटतं त्याप्रमाणे द्या’ असे नम्र उत्तर दिले. चेतन आनंद यांनी त्यांच्या अकाऊंटंटला बोलावून दादांच्या हातावर बाराशे रुपये ठेवले. पंढरीदादांसाठी ती कमाई अमूल्य होती. कारण त्यांची सुरुवात महिना सत्तर रुपये एवढ्या तुटपुंज्या पगारावर सिनेजगतात झाली होती आणि त्यांना त्या वेळी तर कामच नव्हते!
हे ही लेख वाचा –
चित्रपती व्ही. शांताराम
तेंडुलकर यांच्या पटकथा लेखनाची उपेक्षा झाली!
नलिनी तर्खड – मूकपटाच्या काळातील नायिका : यशापयशाची सापशिडी
तो त्यांना मिळालेला ‘ब्रेक’ होता! त्यानंतर नारायण जुकर ‘पंढरीदादा’ या नावाने आणि त्यांच्या कामाने इतके प्रसिद्ध झाले, की प्रत्येक स्टुडिओला व प्रत्येक नट-नटीला मेकअपसाठी तेच हवे असत. त्यांनी त्यांच्या परीसस्पर्शाने अनेक नवोदित कलाकारांना सुपरस्टार बनवलेआहे. शर्मिला टागोर, सैफ आणि सोहा अली खान, नर्गीस, सुनील दत्त, संजय दत्त, धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देवल अशा सिनेजगतातीलगाजलेल्या काही कुटुंबांतील प्रत्येक पिढीने जुकर यांच्याकडून रंगभूषा करवून घेतली आहे. पंढरीदादांनी त्यांच्या मेकअपच्या रंगांत राज-शम्मी-शशी कपूर ते करीना आणि करिश्मा कपूर या कपूर खानदानालाही रंगवले. पंढरीदादांनी यश चोप्रांच्या ‘यश राज’ बॅनरसोबत तर तब्बलचाळीस वर्षें काम केले.
‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित, ‘ग्लॅमर क्वीन’ ऐश्वर्या रॉय, विश्वसुंदरी सुश्मिता सेन या प्रसिद्ध नट्यांना खऱ्या अर्थाने सिनेजगतात ‘ब्रेक’मिळवून देण्यात पंढरीदादांचा वाटा सिंहाचा राहिला आहे, तर त्यांनी अमिताभ बच्चन यांना सुरुवातीलाच, ‘तुम बहोत आगे जाओगे’ असे सांगत अमिताभचे टॅलेंट ओळखल्याचे निर्देशित केले होते.
पंढरीदादांना वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ते दिवसाचे अठरा-वीस तास काम करत. त्यांना घरच्यांपासून सतत दूर राहावे लागे. त्यांच्या लग्नासाठी स्थळे तो तरुण ‘नट्यांच्या चेहऱ्यांना हात लावतो’ या कारणाने येईनात! शेवटी, विभा नावाची एक समजूतदार मुलगी तिच्या आई-वडिलांच्या विरूद्ध जाऊन जूकर यांच्याशी लग्न करण्यास तयार झाली व त्यांना सहचारिणी लाभली. काही वर्षांतच पंढरीदादा आणि विभाताईंच्या संसारवेलीवर दोन मुले आणि दोन मुली अशी देखणी फुले उमलली. पंढरीदादांनी सिनेसृष्टीत फार स्ट्रगल असल्याने आपली मुले आणि नातवंडाना त्यापासून दूर ठेवले आहे.
पंढरीदादा जुकर यांना कलाकारांकडून प्रेम तितकेच मिळाले. दिलीपकुमार, संजीव कुमार, धर्मेंद्र तर सेटवर पंढरीदादांशिवाय जेवणही घेत नसत. अमिताभ बच्चनही पंढरीदादांची रंगभूषेच्या बाबतीतील सूचना विचारात घेत. पंढरीदादांना ‘व्ही. शांताराम जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. करिअरच्या आरंभी जुकर यांनी ज्या श्रेष्ठ कलावंताचा चेहरा रंगवला, त्याच्याच नावाचा सन्मान मिळणे म्हणजे अहोभाग्यच आहे असे ते समजतात. शिवाजी पार्कजवळ दादर येथे भव्य ‘पंढरी जुकर्स मेकअप अकॅडमी’ उभी आहे. पंढरीदादांनी स्वतः मेकअप ट्रेनिंग देणे प्रकृतीच्या कारणामुळे बंद केले असले तरी, आपल्या विद्यार्थ्यांना रंगभूषेचे धडे देताना “तुमच्या समोर असलेला चेहरा कोणताही असो, तो मुळात सुंदरच आहे आणि त्याला अधिक आकर्षक बनविणे ही मेकअपमनची जबाबदारी आहे!” त्यांना वाटते, की व्यक्तीचे खरे सौंदर्य तिच्या आत्मिक सुंदरतेतून बाहेर डोकावतेच!
पंढरी जुकर्स मेकअप अकॅडमी – 022 24463546
– वैष्णवी सतीश सोनारीकर 88301 41594
vaish.sonarikar@gmail.com
नमस्कार.
आपला लेख वाचला…
नमस्कार.
आपला लेख वाचला. बरेच रंगकर्मी किंवा पडद्यामागील कलाकार असतात, ज्यांची जनमानसात फारशी प्रसिध्दी होत नाही. परंतु कलाकार खरा कसोटीवर उतरण्याचे ५०% श्रेय त्याच्या रंगभूषाकारासच असते. असे कैक अज्ञात रंगकर्मी आजही आपल्या परिचयापसून अलिप्त आहेत. त्यांचा परिचय करून देण्याचे जे सन्मान्य पाऊल आपण उचलले आहे, ते नि:संशय स्पृहणीयच आहे. आपली भाषाही ओघवती व फारशी क्लिष्ट नसल्याने वाचक कथापदार्थांत गुंतून जातो. शिवाय शिक्षणाचा विषय व छंदांचा विषय भिन्न असणे हेही मला प्रचंड भावले आहे.
आपली उत्तरोत्तर दोन्ही क्षेत्रांत प्रगति होत जावो हिच शुभेच्छा! या सुंदर लेखाबद्दल पुनश्च एकवार मनापासून धन्यवाद!??
Comments are closed.