महाराष्ट्रात सरकारी आणि खाजगी शाळा रचनावादी शिक्षणपद्धतीने प्रेरित होऊन, प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत अंमलबजावणीच्या दिशेने पावले टाकत आहेत! शिक्षक रचनावादाचे धडे गिरवत आहेत, त्यांनी त्यानुसार शैक्षणिक साहित्यनिर्मिती केली, विविध उपक्रम तयार केले; ते उपक्रम समाजमाध्यमांच्या प्रभावी वापरामुळे इतर शिक्षकांपर्यंत वेगाने पोचले आणि शालेय पातळीवर स्वागतार्ह बदल दिसूही लागले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, नगरपालिका यांच्या शाळांचे रूपडे बदलण्यास सुरुवात झाली आहे. शाळांच्या भिंती रंगवणे, जमिनीवर उपक्रम करण्यासाठी काही व्यवस्था करणे, उपक्रम मांडणे, शैक्षणिक साधने तयार करून वा विकत आणून त्यांची संख्या वाढवणे या बाबी सुरू झाल्या आहेत. त्या बदलांचे फायदेही दिसू लागले आहेत. शाळा, वर्ग जास्त संवादी होऊ लागले आणि त्यातून शैक्षणिक गुणवत्ताही सुधारण्यास मदत होत आहे. ते सकारात्मक बदल ‘असर’सारख्यांच्या अहवालांतूनही दिसून आले आहेत. त्या बदलांचा परिणाम म्हणजे इंग्रजी खासगी माध्यमाच्या शाळांतील मुले काही गावांमध्ये जिल्हा परिषदांच्या शाळांत येऊ लागली आहेत.
मात्र या उत्साहात एक त्रुटी आहे. रचनावाद म्हणजे शाळेत साहित्य-साधने वाढवणे, जमिनी शैक्षणिक बाबींनी रंगवणे, तसेच भिंतींवर चित्रे काढणे, मुलांच्या कामासाठीची जागा वाढवणे… इतक्याच मर्यादित अर्थाने तो सार्वत्रिक पातळीवर घेतला जात आहे. पण वास्तव तसे नाही; रचनावाद ही मुलांची शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे व तिला सार्वत्रिक मान्यता तशीच मिळालेली आहे. नैसर्गिक यासाठी म्हणायचे, की शिकणे ही मुलांची उपजत प्रेरणा आहे. मुलांना शिकण्यास आवडते. ती त्या प्रेरणेने आणि नैसर्गिक पद्धतीने एरवीही शिकत असतातच. मुले स्वतः त्यांचे ज्ञान मिळवतात. म्हणजेच मुले त्यांच्या अनुभवांतून, कृतीतून त्यांना हव्या त्या घटकांसंबंधी ज्ञान मिळवत असतात. लहान मुलांचे निरीक्षण केले तरी ती गोष्ट प्रत्ययाला येते. रचनावाद ती गोष्ट औपचारिकपणे नोंदतो. त्यामुळे शिक्षणातील रचनावाद प्रभावी करण्यासाठी काही गोष्टींचा अवलंब करावा लागणार आहे.
रचनावादी पद्धतीमध्ये महत्त्व हे शिक्षकाच्या शिकवण्याला नसून मुलांच्या शिकण्याला आहे, त्यामुळे त्या संदर्भात उपयोजण्याच्या भाषेपासून बदल करावा लागणार आहे. ‘आम्ही रचनावादी पद्धतीने शिकवतो’ असे म्हणण्यापेक्षा मुले ‘आमच्या शाळेत रचनावादी पद्धतीने शिकतात’ आणि शिक्षकांची भूमिका, ‘शिक्षक म्हणून तो काय करतो? तर मुलांना रचनावादी पद्धतीने शिकण्यासाठी मदत करतो’ अशी असावी लागेल. त्यामुळे त्यांना शिकवण्याच्या पारंपरिक पद्धतीला छेद देऊन मुलांसाठी त्यांचे त्यांनी शिकण्याला पूरक वातावरण निर्माण करावे लागणार आहे. मुले अनेक गोष्टी करून पाहतात, स्वतः अनुभव घेतात, ते सारे अनुभव केवळ शाळेच्या चार भिंतींमध्ये व परिसरात उभे करणे अशक्य आहे. त्यामुळे शिक्षण शाळेबाहेर, परिसरामध्ये आणि समाजामध्ये घेऊन जावे लागणार आहे. मूल जेथे शिकू शकेल त्या बाबी शाळेशी जोडाव्या लागतील. ते करण्यासाठी पाठ्यपुस्तकांवर आधारित शिक्षण करण्यापेक्षा कौशल्य विकसन आणि संकल्पना स्पष्टीकरण यांचा विचार करावा लागेल आणि ते मुले ज्या परिसरात वावरतात, तेथील त्यांच्या अनुभवांशी जोडत जावे लागेल.
रचनावादाचा महत्त्वाचा पैलू म्हणजे प्रत्येक मुलाचा व्यक्तिगत विचार. प्रत्येक मूल स्वतंत्र असते, त्याची शिकण्याची पद्धत – त्याचा कृती करण्याचा वेळ हा वेगवेगळा असतो. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या गरजांनुसार संधी मिळणे आणि त्याला तसे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. एखाद्याची गरज लेखनासाठी जास्त वेळ देण्याची असेल, तर तो त्याला मिळावा लागेल किंवा एखाद्याला चित्रकामात अधिक वेळ गरजेचा असेल, तर तो त्याला द्यावा लागेल. म्हणजे शिक्षण हे तासिकांमधून बाहेर काढावे लागेल. ते कसे करावे याच्या प्रभावी पद्धती उपलब्ध आहेत, शिक्षकांना त्या त्यांच्या सोयीने बदलून घ्याव्या लागतील.
शाळांचा परिसर मुलांच्या शिक्षणासाठी महत्त्वाचा आहे. मुलांच्या संकल्पना त्यांच्या त्यांना स्पष्ट होण्यासाठी आवश्यक ती घटकद्रव्ये परिसरातून मिळत असतात. मूल जे शिकते ते करून पाहण्याची संधी परिसरातच उपलब्ध असते आणि तशा संधी त्यांना जाणीवपूर्वक द्याव्याही लागतात. त्यामुळे मुलांचे शिक्षण प्रभावी होण्यासाठी घर-शाळा-परिसर अशी तिपेडी वीण बळकट करावी लागणार आहे. मूल शाळेत जरी शिकत असले तरी त्या शिकण्याचा उपयोग त्याला समाजामध्ये करण्याचा असतो. त्यामुळे शिक्षण आणि समाजाची रचना यांची सांधेजोड करावी लागणार आहे. मुलाला समाजात वावरण्यासाठी सक्षम शिक्षण कसे मिळेल याचा विचार करावा लागणार आहे. त्यासाठी शिक्षक प्रशिक्षण व पालक प्रबोधन या दोन्ही मुद्यांना हात घालावा लागणार आहे. मुलाच्या शिकण्याला त्याच्या घराशी कसे जोडून घेता येईल आणि पालक त्यांचे ज्ञान शालेय शिक्षणात कसे वापरू शकतील असा दुहेरी विचार करावा लागणार आहे, त्यातून जबाबदारीची जाणीव पालकांमध्ये निर्माण होईल, शाळेत असणाऱ्या पालक समित्या अधिक प्रभावीपणे काम करू शकतील. त्यातून शिक्षण भोवतालच्या प्रश्नांशी जोडता येऊ शकेल.
महाराष्ट्रातील प्रयोगशील शाळांची संख्या वाढत (वाढू) लागली आहे. तो बदल सुखावह आहे, प्रयोगशील शाळांनी केलेले काम प्राथमिक शिक्षणातील रचनावाद प्रभावी होण्यात महत्त्वाचे ठरणार आहे. प्रयोगशील शाळांतून नवा विचार आणि नव्या शिक्षणपद्धतीचा अवलंब केला जात आहे. समाजाचाही तशा शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होऊ लागला आहे. त्या शाळांतून वापरल्या जाणाऱ्या प्रयोग-पद्धती तपासून घेऊन त्या सार्वत्रिक होण्यासाठी जर यंत्रणा उभी करू शकलो तर ती मोठी भर ठरू शकेल.
– प्रसाद मणेरीकर 8007999167
pmanerikar@gmail.com
(‘सकाळ’वरून उद्धृत संपादित- संस्कारित)