मृदंग हा शब्द संस्कृतमधील मृदा (माती अथवा पृथ्वी) आणि अंग (शरीर) या शब्दांपासून तयार झालेला आहे. शंकर तांडवनृत्य करत असताना नंदीने हे वाद्य वाजवल्याचा पुराणात उल्लेख आढळतो. पुराणाप्रमाणेच हिंदू शिल्पकला आणि चित्रकलेत मृदंगाचे स्थान आढळते.
मृदंग हे पखवाज म्हणून ओळखले जाते. त्याखेरीज त्याला माची, मादुला, मुरजा, पणवातक अशीही नावे आहेत. मृदंगाचे जड व हलका मृदंग असे दोन भाग आहेत. भजन-कीर्तनासाठी खैर व सिसम ह्यांचे जड मृदंग वापरतात; तर दिंडीसाठी जांभुळ, शिवण, बाभळ व बिबला ह्यांच्या लाकडापासून बनवलेला हलका मृदंग वापरतात.
मृदंगाचे दोन भाग चामड्याने मढवलेले असतात. त्यांना पुड्या म्हणतात. डावी बाजू म्हणजे मोठी पुडी. तिला धीम, धुमा म्हणतात. तिला कणीक लावतात. उजवी लहान बाजू शायपूड म्हणून ओळखली जाते. तिला तबल्याची शाई लावतात.
पखवाजाच्या सांगाड्यास नाल म्हणतात. ओंडका पोखरलेला मृदंगाचा भाग म्हणजे खोड किंवा डेरा. तसेच पखवाजाच्या शाईच्या पुडीबाहेरचा भाग म्हणजे चाट किंवा टाकणी होय.
सुरेश पांडुरंग वाघे
(०२२) २८७५ २६७५