हातून सारखे पाप घडतच असते. ते नाहीसे करायला हरिद्वारला ‘महाकुंभ’ चालू आहे. पण पाप घालवायला तापीचे स्मरण सोपे. असे मानले जाते, की गंगेत स्नान करावे लागते. नर्मदेचे दर्शन केले तरी पुरेसे असते आणि तापीनदीची आठवण काढली, की पाप साफ होते.
हे सगळे ठीक आहे. पण भुसावळपासून जवळ जवळ चाळीस किलोमीटर अंतरावर मुक्ताईनगर आहे. तेथे तापी नदीच्या किना-यावर निवृत्ती, ज्ञानेश्वर आणि सोपानाची धाकटी बहीण मुक्ताबाईचे मंदिर आहे. वरच्या अंगाला तापी आणि पूर्णा नदीचा देखणा संगम आहे.
मुक्ताबाई निवृत्तीनाथाची शिष्य तिचे व्यक्तिमत्व स्वतंत्र किंवा जणू स्वयंभू होते. एका कवितेत ती म्हणते,
”सर्वरूपी निर्गुण संपले पै सर्वदा. आकार संपदा नाही तया.
आकारिती भक्त मायामय काम. सर्वत्र निःसीम अंतरी आहे”.
”नाही सुखदुःख. पापपुण्य नाही.
नाही कर्मधर्म. कल्पना नाही.
नाही मोक्ष ना भावबंधन नाही.
म्हणे वटेश्वरा ब्रह्म नाही. सहजसिध्द बोले मुक्ताई ”
तापीच्या शुभ्र वाळूच्या पटात वैशाख वद्य द्वादशीच्या दिवशी मध्यान्ही एकाएकी वीज कडाडली आणि त्या झगमगाटात मुक्ताबाई एकाएकी अद्दश्य झाली.”
नदीकाठी उभे राहिले आणि मुक्ताईच्या अदृश्य होण्याचा प्रसंग डोळयासमोर आणला, की पोटात गोळा येतो. त्यावेळी मुक्ताईचे वय जेमतेम अठरा-वीस वर्षे होते आणि ज्ञान इतके होते, की चांगदेवासारख्या विद्वानाने तिचे शिष्यत्व पत्करले! थोडे दूर चांगदेवाचे भग्न देऊळ आहे.
मुक्ताबाई ही निवृत्ती-ज्ञानदेवादी भावंडांची धाकटी बहीण असून, तिच्याबाबत त्यांच्या रचनांमध्ये उल्लेख आढळत नाहीत. संशोधक ते शोधून काढतात चांगदेव-नामदेव ह्यांच्या अभंगांतून. मुक्ताबाईने त्या दोघांचा मानीपणाचा नकशा उतरवला होता. मुक्ताबाईने तापी नदीकाठी मेहुणला समाधी घेतली. त्याबाबतचा उल्लेख नामदेवांच्या आत्मचरित्रपर अभंगांत आढळतो.
मुक्ताबाई देखील अठरा-वीस वर्षेच जगली व तिचे ज्येष्ठ बंधू, निवृत्तीनाथांच्या आधी समाधी घेतली असे म्हणतात. मुक्ताबाई एक की दोन होत्या ह्याबद्दलही संशोधकांत वेगवेगळी मते आहेत.
मुक्ताबाईची समाधी कल्पना देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. तापी-नदीच्या काठी ती विजेच्या लोळात नाहीशी झाली अशी दंतकथा आहे.
संदर्भ : भारतीय संस्कृतिकोश, सातवा खंड. पं.महादेवशास्त्री जोशी.
Last Updated On 21st October 2019