अनेक मुसलमान संतकवी महाराष्ट्रात पंधराव्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंत होऊन गेले आहेत. त्यांनी मराठी भाषेत अभंग लिहिले. त्यांमधील अग्रगण्य कवी म्हणजे शहा मुंतोजी ब्रह्मणी किंवा मुंतोजी बामणी (1575–1650). ते ‘मृत्युंजयस्वामी’ या नावाने प्रसिद्ध होते. ते एकनाथ-तुकाराम यांच्या काळातील. ते शहा मुतबाजी कादरी आणि ‘ज्ञानसागर अय्या’ अशा नावांनीही ओळखले जात. ते बहमनी राजघराण्यातील होते असे अनुमान आहे. त्यांना आनंद संप्रदायातील सहजानंद स्वामींचा गुरूपदेश मिळाला होता.
‘आनंद’ नावाचा महाराष्ट्रातील प्रमुख प्राचीन संप्रदाय आहे. तो बसव कल्याण येथून सुरू झाला. आख्यानकवी श्रीधर स्वामी नाझरेकर हे त्या संप्रदायातील होत. त्यांची गुरु परंपरा श्री दत्तात्रय – सदानंद – रामानंद – आमलानंद – गंभीरानंद – ब्रह्मानंद – सहजानंद –पूर्णानंद – दत्तानंद – कवी श्रीधर अशी होती. पूर्णानंद नारायण हे सहजानंदांचे शिष्य होते. ते महान साधू होते. बसव कल्याणातील बरीच मुस्लिम मंडळी सहजानंदांची अनुयायी होती. त्यांतीलच शहा मुंतोजी हे होत. सहजानंदांनी त्यांना मृत्युंजय हे नाव दिले होते. ज्ञानसागरानंद हे मुंतोजी यांचे सांप्रदायिक नाव. ते आनंद संप्रदायाची दीक्षा घेण्याआधी सुफी संप्रदायातील कादरी शाखेचे अनुयायी असावेत. काही अभ्यासक त्यांचा संबंध लिंगायत संप्रदायाशीही जोडतात.
मृत्युंजयस्वामींच्या ग्रंथांवर मुकुंदराजांच्या ‘विवेकसिंधू’चा प्रभाव आहे. त्यामुळे ते मुकुंदराजांच्या परंपरेतील मानले जात. ते कल्याणी आणि नारायणपूर या ठिकाणी राहिले होते. त्यांची समाधी नारायणपूर येथे आहे. ती ‘मूर्तजा कादरी का दर्गा’ ह्या नावाने प्रसिद्ध आहे.
त्यांची ग्रंथसंपदा – ‘सिद्धसंकेतप्रबंध’, ‘अनुभवसार’ व ‘अद्वैतप्रकाश’ ‘स्वरूपसमाधान’, ‘प्रकाशदीप’, ‘जीवौद्धरण’, ‘पंचीकरण’, ‘गुरुलीला’, ‘पदे’, ‘अभंग’ अशी आहे. त्याशिवाय, ‘अमृतानुभव’ नावाचा एक ग्रंथही त्यांच्या नावावर आहे. त्यांनी पंचीकरण हा ग्रंथ दख्खनी हिंदीत लिहिलेला आहे. त्यांचे अभंगरूपातील उद्गार बघावे –
शाह मुतबजी ब्रह्मणी । जिनमे नही मनामनी
पंचीकरण का खोज किये । हिंदू-मुसलमान येक कर दिये ।।
रा.चिं. ढेरे शहा मुंतोजी ब्रह्मणी या कवीबद्दल म्हणतात –
‘हा परंपरेतील कवी केवळ मुसलमान मराठी संतकवींतच नव्हे, तर अखिल मराठी संतमंडळात मानाचे स्थान पावणारा आहे. उत्तरकालिनांनी ‘महायोगी’ म्हणून त्याला गौरवले आहे, ते यथार्थ आहे.’
वेदान्त तत्त्वज्ञानांचे विवरण ही त्यांच्या ग्रंथरचनेमागील प्रमुख प्रेरणा होय. शहा मुंतोजी ब्रह्मणी याचा ‘सिद्धसंकेतप्रबंध’ हा सर्वांत मोठा ग्रंथ असून त्यात दोन हजार ओव्या आहेत. त्या ग्रंथातील दुसऱ्या प्रकरणाला ‘रामजानकी संवाद’ असे नाव आहे. त्यातील निवडक ओव्या पुढीलप्रमाणे –
मन-नयना एकांत करावा | प्रेमभाव हृदयीं धरावा ||
सत्य विश्वास मानाव | निश्चयेंसी ||
दिसेल इंदू-भास्करांचे परी | तोचि उदय दृष्टी धरीं |
त्यांत तूं प्रवेश करीं | निश्चय मनें ||
मयोरपत्रावरील डोळे | तैसी दिसती जे वर्तुळें |
तयांमध्ये जे नीळे | ते रूप माझें ||
तयांत खोवोनि दृष्टी | ते अंजन सुवावे नेत्रपुटीं ||
मग उघडेल पेटी | ब्रह्मतेजाची ||
ध्यानीं चित्त स्थिरावेल | तया अखंड तेज प्रकाशेल |
मन तदाकार होईल | विसरलेनि बेहाते ||
शहा मुंतोजी ब्रह्मणी यांच्यानंतर अठराव्या शतकापर्यंत अंबर हुसेन, शेख सुलतान, शेख महंमद, शहामुनी असे मुसलमान मराठी कवी महाराष्ट्रात होऊन गेले आहेत. मुसलमानांनी मराठीत अनेक प्रकारची रचना केली आहे. खलजी वंशातील एका मुंतोजीने मराठीत संगीत व ज्योतिष या विषयांवर पांडित्यपूर्ण ग्रंथरचना केली आहे. त्याने ‘संगीत मकरंदा’वर मराठी ओवीबद्ध टीका आणि ‘विजयभैरव’ नावाचा ज्योतिषविषयक ग्रंथ मराठी गद्यात लिहिला आहे. तो मुंतोजी कोण-कोठला हे निश्चयाने सांगता येत नाही. तरी तो स्वत:ला ‘वजिरुल्मुक’ या बिरुदाने उल्लेखतो. त्याच्या पित्याचे नाव ‘जिया दौलतखान’ असे देतो आणि स्वत:ला ‘खळचिवंशवर्धन’ म्हणवतो.
– थिंक महाराष्ट्र
(भारतीय संस्कृतिकोशावरून संकलित)