मी 1964 साली भाषा संचालनालय विभागात मराठी टायपिस्ट म्हणून नोकरीस लागले. त्या काळात मराठी टायपिंगला फार मागणी होती. माझी टायपिंगची गती चांगली होती व टायपिंग बिनचूक असायचे. ते लक्षात घेऊन ऑफिसमधील अधिका-यांनी मला मराठी टायपिंगच्या हायस्पीड चँम्पियन काँटेस्टमध्ये भाग घेण्यास सांगितले. मी त्या स्पर्धेमधे भाग घेतला व प्रथम वर्षीच महाराष्ट्रातून पहिली आले. मला ‘गोल्ड मेडल’ मिळाले. त्यानंतर मी घरी टायपिंग मशीन घेऊन पी.एचडी.चे आठ-दहा थिसीस टाईप करून दिले. ऑफिसमधून आल्यानंतर घरकाम आटोपले की मी ते काम करायचे. तेवढाच संसाराला हातभार व्हायचा. ऑफिसमधे प्रमोशन्स मिळत गेली. मुलींची शिक्षणे चालू झाली आणि वयही वाढत गेले, त्यामुळे नुसतीच नोकरी एके नोकरी झाली.
मी अडतीस वर्षे नोकरी केल्यानंतर, 2002 साली निवृत्त झाले. नोकरीच्या काळात दिवस कसा जायचा ते कळायचेदेखील नाही. तेव्हा सांसारिक जबाबदार्या होत्या. मुलींची शिक्षणे, त्यांचा अभ्यास घेणे वगैरे. सेवानिवृत्त होण्याच्या आधीपासूनच मला अशी चिंता वाटायची, की निवृत्तीनंतर दिवसभराच्या वेळेचे करायचे काय? माझा धाकटा भाऊ माझ्या निरोप समारंभाच्या दिवशी माझ्या ऑफिसमध्ये आला होता. मला अजूनही आठवते, की घरी आल्यावर मी त्याच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडले होते. विचार एकच, की यापुढे करायचे काय? मुलींची लग्ने, बाळंतपणे अशा जबाबदा-या पार पडल्या होत्या. मुलगा नव्हताच. त्यातच माझ्या आयुष्यात अत्यंत दु:खद घटना घडली. माझी मोठी मुलगी (वय वर्षे 32) एका गंभीर आजाराने वारली (मार्च 1999). मला त्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी मार्ग काढणे भागच होते. त्यामुळे मी असा निर्धार केला, की निवृत्तीनंतर घरात बिलकूल बसायचे नाही. म्हणतात ना ‘रिकामे मन, सैतानाचे घर’, त्यामुळे मी निवृत्तीनंतर लगेच ‘वात्सल्य ट्रस्ट’ येथे माझा बायोडेटा पाठवला व माझी संस्थेत काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली. संस्थेतील पदाधिकार्यांनीदेखील माझा इतक्या वर्षांचा अनुभव विचारात घेऊन मला येण्याविषयी कळवले. मी 1 जानेवारी 2003 पासून वात्सल्य ट्रस्टच्या सानपाडा सेवा प्रकल्पामधे रुजू झाले. अशा त-हेने माझे समाजकार्य चालू झाले! माझ्या यजमानांचा व माझ्या सासुबाईंचाही त्या कार्याला भरघोस पाठिंबा होता.तेथील पदाधिका-यांनीही मला सहकार्य केले.
वात्सल्य ट्रस्ट ही एक सेवाभावी संस्था आहे. समाजातील दानशूर व्यक्तींच्या देणग्यांच्या आधारे संस्था कार्यरत आहे. देणग्यांचा ओघ संस्थेच्या पारदर्शकतेमुळे व सच्चाईमुळे आहे. संस्थेचे मुख्य कार्यालय गेल्या सव्वीस वर्षांपासून कांजूरमार्ग येथे आहे. तिथे बालके व इतर विश्वस्त पंच्याहत्तर वर्षांच्या वरील आहेत. परंतु त्यांच्या कामाची चपळता, आवाका व चिकाटी तरुणांनाही लाजवणारी आहे. सानपाडा सेवा प्रकल्पामधे प्रामुख्याने दोन उपक्रम राबवले जातात: वृद्धाश्रम व अनाथ बालिकाश्रम. वृद्धाश्रमात एकोणीस वृद्ध आहेत. वृद्धाश्रमात प्रवेश देताना ज्या वृद्धांना मुलबाळ नाही किंवा जे अविवाहित आहेत किंवा नवराबायकोमधील एक मागे राहिलेला आहे अशांना प्राधान्याने प्रवेश दिला जातो. बालिकाश्रामामधे ज्या मुली दत्तक गेलेल्या नाहीत त्यांना प्राधान्याने प्रवेश दिला जातो. शिवाय, दारिद्रयरेषेखालील शिक्षणापासून वंचित असलेल्या पाच वर्षांपासूनच्या मुलींना प्रवेश दिला जातो व त्यांना शिक्षण दिले जाते. बालिकाश्रमात बावन्न मुली असून त्या सर्व सानपाडा येथील विवेकानंद संकुल शाळेत जातात. काही मुली पूर्णत: अनाथ असल्या तरी शिक्षणात मागे नाहीत. संस्थेतील आठ-दहा मुलींना इयत्ता दहावीच्या परीक्षेत पंचाहत्तर ते ऐंशी टक्के मार्क मिळाले आहेत. त्या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. त्यांना स्वत:च्या पायावर उभे करून देण्याचा व त्यांचे विवाह करुन देण्याचा संस्थेचा मानस आहे.
बालिकाश्रम असल्याने तेथील पौगंडावस्थेतील प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने तसेच बालिकाश्रमात काम करणार्या महिलांना योग्य सल्ला देऊन कामाचे नियोजन करणे अशी कामे मी करत असे. याचा आणि माझा संस्थेत जाण्याचा नियमितपणा, कामाची आवड व अनुभव विचारात घेऊन 2003 साली ‘बालिकाश्रम प्रमुख’ या पदावर माझी नेमणूक केली गेली. संस्थेच्या मुख्य कार्यकारी मंडळावर देखील माझी नेमणूक करण्यात आली आहे. मी मानधन न घेता सेवाभावी वृत्तीने गेली नऊ वर्षे संस्थेची जबाबदारी सांभाळत आहे. तेथील मुलीही मला आजी म्हणून आदर देतात. माझ्या नाती मला लटक्या रागाने म्हणतात, की ‘वात्सल्य’मधील मुलीच तुला आवडतात. आमच्यावर तुझे प्रेमच नाही.
बालिकाश्रमातील मुली मायेच्या भुकेल्या आहेत. त्यांना थोडे प्रेम दिले तरी त्यांना फार आनंद होतो! मी दोन-तीन दिवस गेले नाही व नंतर हजर झाले, की लगेच त्या विचारतात, की कुठे होतात? ज्या खरोखरच अनाथ आहेत त्यांना तर नातीगोती काही कळत नाहीत. आम्हीच त्यांना काका, मामा मावशी आजी-आजोबा अशी नाती शिकवतो. ज्या मुलींचे एक पालक आहेत, त्यांना आम्ही गणपती, दिवाळी अशा सणांना घरी पाठवतो. एका मुलीला आईवडील नाहीत. तिला तिच्या आजीने आमच्याकडे ठेवले, तिची आजी दीड-दोन वर्षांत तिला भेटायला आली नाही. तिची आजी न आल्याने तिला खूप रडू आले. मी तिला म्ह्टले, की मीच तुझी आजी. तिला इतका आनंद झाला, की तो पाहून माझ्या डोळ्यांतदेखील पाणी आले. बालिकाश्रमातील मुली शाळेत जाताना मला भेटल्याशिवाय जातच नाहीत. परीक्षेला जाताना किंवा त्यांच्या वाढदिवशी मला नमस्कार केल्यशिवाय रहात नाहीत.
आम्ही बालिकाश्रमातील मुलींचे वाढदिवस त्या त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी एकत्रित औक्षण करून साजरे करतो. त्यांना सुटी असली की मला त्या गोष्टी सांगण्यासाठी, गाणी शिकवण्यासाठी घेऊन जातात. वेळप्रसंगी त्यांच्याशी त्यांना शिस्त लागण्यासाठी, त्यांना अभ्यास करण्यासाठी कठोरपणे वागावेच लागते.
बालिकाश्रमात आम्ही जन्माष्टमी , होळी, शारदोत्सव, भोंडला असे सर्व सण साजरे करतो. आमच्या मुलींना आम्ही रामरक्षा, अथर्वशीर्ष, सर्व आरत्या शिकवल्या आहेत. त्यांच्या वार्षिक परीक्षा झाल्यानंतर त्यांच्यासाठी आम्ही शिबिरे घेतो. त्यात त्यांना योग, क्राफ्टच्या वस्तू सर्व प्रकारची फुले, दागिने बनवणे या गोष्टी शिकवतो. कोणी पाहुणे भेटायला आले असतील तर त्यांचे स्वागत कसे करायचे, बोलायचे कसे हेही शिकवतो. त्यामुळे त्यांना समाजात कसे वागायचे, वावरायचे याचे ज्ञान होईल.
वृद्धाश्रमातील सर्व महिला व पुरुष वय वर्षे पंच्याहत्तरवरील आहेत. त्यांच्याजवळ गप्पा मारल्या, त्यांची विचारपूस केली की, त्यांना आपुलकी वाटते. दोन-चार दिवस मी दिसले नाही तर त्यांनाही चुकल्यासारखे वाटते.
मला लहानपणापासून गाणे शिकण्याची आवड होती. लग्नाआधी दोन-अडीच वर्षे मी ऑपेरा हाऊसला ‘संगीत कला भुवन’ येथे शास्त्रीय संगीत शिकत होते. परंतु नोकरी व संसार यामुळे माझी आवड जोपासता आली नाही. निवृत्तीनंतर म्हणजेच 1 जानेवारी 2003 पासून शारदा संगीत विद्यालय (वांद्रे) येथे सुगम संगीत शिकण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा जाते. इतर चार दिवस सानपाडा येथे. असा माझा आठवडा जातो. दोन्ही उपक्रमांमुळे माझ्यावर कोसळलेल्या दु:खाची तीव्रता कमी झाली. मी त्यातून बरीच सावरले आहे. अशा त-हेने माझा सेवानिवृत्तीनंतरचा काळ अतिशय समाधानात व्यतीत होत आहे. माझी परमेश्वराजवळ एकच प्रार्थना आहे, की मला हे काम करत राहण्यासाठी चांगले आरोग्य दे.
उषा सु. बर्वे
25216014, 9869610283
56/1923, सुभाषनगर, पुष्कराज को.ऑ.सोसायटी, चेंबूर, मुंबई 400071
कांजूर मार्ग व सानपाडा येथील
कांजूर मार्ग व सानपाडा येथील दोन्ही सेवा प्रकल्पास मी जाऊन आलो आहे.आपण निस्वार्थ भावनेने जे व्रत अंगिकारले आहे त्याबद्दल प्रथम मी आपले अभिनंदन करतो.आपल्यासारखे अनेक जेष्ठ निरलस भावनेने सेवा देत आहेत.खरोखर वात्सल्य संस्थेचा व्यवहार पारदर्शक आहेच या बाबत दुमत नाही.शिस्त,वेळ आणि कमालीची स्वच्छता,जेवण्या पासून ते झोपण्या पर्यंत… आईची ममता ,वात्सल्य,प्रेम या ठिकाणी पहावयास मिळते.
आपण चालू केलेल्या ह्या
आपण चालू केलेल्या ह्या कार्याची स्तुती करावी तेव्हधि थोडीच आहे. आज अनाथ बालकांना घर व घराची सावली मिळते हे काय थोडे थोडके नव्हे. मी पण एका आश्रमातच वाढलेल्या पैकी आहे. जन्मापासूनच आश्रमात वाढलो, शिकलो, धार्मिक विधी शिकलो, मोठा झालो, नोकरी केली, श्रींनीच लग्न लावून दिले, मुले झाली, शिकली नि आत्ताच नोकरीला देखील लागलीत. मी नुकताच रिटायर झालो आहे. अपाल्या ट्रस्ट ला भेट देण्याची इच्छा आहे. कसे व कधी यावे हे कळवल्यास बरे होयील. आम्ही मुलुंड (प) येथे राहतो.
Comments are closed.