मिहोकोचे संस्कृतीप्रेम

    1
    41
    डॉ. मिहोको हिराओका
    डॉ. मिहोको हिराओका

    डॉ. मिहोको हिराओका     माणसांची नाती जुळायला काय लागते? सांगता येणे अवघड आहे. स्वभाव? समान व्यसने(इंटरेस्ट ह्या अर्थी)? भाषा? धर्म? वय? लिंग? ह्यातील सर्व काही किंवा ह्यातील काही नाही. फक्त क्लिक होणे महत्वाचे! त्‍याला कुठलेही लॉजिक लावता येत नाही. बर्‍याचदा क्षणभराच्या भेटीत जुनी ओळख असल्याची खूण पटते. अन्यथा वर्षानुवर्षे ओळख असूनही परिचयच होत नाही. साहित्य अकादमीच्या कुमारस्वामी फेलोशिपसाठी भारतात आलेली डॉ. मिहोको हिराओका ह्या जपानी संशोधक स्‍त्रीशी ओळख अशी झाली आणि ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. अभ्‍यासाकरता भारतात आलेली ही स्त्री महाराष्ट्राच्या प्रेमात पडली आहे.

    डॉ. मिहोको हिराओकांसोबत संजीवनी खेर     डॉ. मिहोको हिराओका पुण्याला एक वर्ष शिकण्‍यासाठी राहिली होती. कला-इतिहासाची संशोधक नि अभ्यासक असल्याने जपान नि भारत ह्या दोन पुरातन देशांतील नातेसंबंध शोधायचा प्रयत्न तिने सुरू केला. त्‍या दोन देशांत दृढ धागा आहे तो बुध्दविचारांचा, पाली, संस्कृत भाषेचा, जातककथांचा. हिराओकाला भारताच्या समृध्द सांस्कृतिक, समंजस वारशाची जाणीव आहे. बौध्द धर्माबरोबर सरस्वती, लक्ष्मी, वरूण, इंद्रादि देव यांच्या कथा, परंपरा, पूजा-पध्दती व तत्‍त्‍वज्ञान हे सारे जपानमध्‍ये गेले. कालांतराने आणि तेथील जीवनपध्दतीनुसार त्यात थोडेफार परिवर्तन झाले. परंतु त्‍याच मूलद्रव्याने तेथील संस्कृतीची जडणघडण झाली आहे.

    मैत्रेय बुद्धएशियाटिक लायब्ररीत ठेवण्यात आलेले सोपारा येथे सापडलेल्या बुध्दाच्या भिक्षापात्राचे अवशेष आणि कलश       हे खोलवर भिनलेले संस्कारच हिराओकाला इथे परत परत घेऊन येत आहेत. ती चाळीस वेळा अजिंठ्याला येऊन गेली आहे. तिने महाराष्ट्रातील बहुतेक लेणी पालथी घातली आहेत. तिचा तेथील चित्रांचा अभ्यास आहे. ती तिच्या देशातील कला महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांना कलेचा इतिहास शिकवते. तिला ह्या दोन्ही देशांतील समृध्द विचारपरंपरेची जाणीव आहे. तिला मुंबईतील एशियाटिक सोसायटीतील बुध्दाच्या संबंधित वस्तू पाहायच्या होत्या. तिने आदराने नतमस्तक होऊन एशियाटिक सोसायटीच्या वाचनालयातील प्राचीन वस्तूंना निरखले. सोपारा येथे सापडलेल्‍या अवशेषात सोन्याचे लहान झाकण असलेल्या पात्रात गौतम बुध्द वापरत असलेल्या भिक्षापात्राचे तुकडे आहेत. बुध्दाच्या भिक्षापात्राच्या तुकड्यांचे दर्शन होताच मिहोकोच्या डोळ्यांत आसवे उभी राहिली. सोपारा येथे अन्‍य अवशेषही आहेत. त्‍यात दगडाचे मोठे पात्र असून त्याला दगडाचे झाकण आहे. त्यात चांदीचे, पितळेचे, तांब्याचे, स्फटिकाचे आणि सोन्याचे कलश आहेत. दगडाच्या पात्रात बुध्दाच्या विविध अवतारांतील मूर्ती आहेत. त्यावर सोन्याची फुले आहेत.

    मिहोकोने हे सारे पाहिले. मिहोको अगदी भारावून गेली होती. ती म्‍हणाली, ‘‘खरंच, मी बुध्द-शाक्यमुनीच्या भिक्षापात्राच्या अवशेषाला पाहात आहे. धन्य आहे ही वास्तू! भाग्यवान आहे मी. आजचा दिवस माझ्या आयुष्यात तुमच्यामुळे आला. मी हा क्षण कधीही विसरणार नाही. हे विविध देखणे कलश, सोन्याच्या छोट्याशा कलशातील तुकडे, त्यावर पसरलेली सोन्याची फुले. ह्या सात बुध्दांच्या धातूच्या अप्रतिम मूर्ती! सारेच भारावून टाकणारे आहे. मला नेपाळमधील ‘प्रज्ञा पारमिता’ हे दुर्मीळ देखणे हस्तलिखित पाहायला मिळाले. माझे येथे येणे सार्थक झाले!’’जपानमधील नारा येथील ‘तोडाइजी’ हा जगप्रसिध्द मठमठातील भगवान बुद्धाची मूर्ती

    तिने एशियाटिकच्या दरबार हॉलमध्ये जपानच्‍या नारा येथील ‘तोडाइजी’ या जगप्रसिध्द मठाबद्दल, तेथील कलेबद्दल सचित्र माहिती दिली. त्‍या मठाच्या परिसराच्या स्लाइड्स पाहून स्वर्गीय वातावरणात तो मठ उभारला गेला असावा असे वाटले. हिरव्या वनराईतील ती भव्य वास्तू, म्हणजे इसवी सन ७५० मधील बुद्धमंदिर आहे. जपानलाही पुरातन इतिहास नि परंपरा आहे आणि त्या गोष्टी जतन करायची वृत्‍ती त्यांनी जपली आहे. त्यामुळेच इतकी प्राचीन वास्तू अग्नीच्या भक्ष्यस्थानी अनेकदा पडूनही नव्यासारखी दिसते. ती जगातील सर्वात मोठी लाकडाची वास्तू आहे. नारा येथील बुद्धहॉल आणि वैरोचन बुद्धमंदिरातील सतरा मीटर उंचीच्या धातूच्या भव्य मूर्तीच्या नेत्र उघडण्याच्या समारंभाच्या वेळी बुधसेन हा मूळचा भारतीय भिक्‍खू तेथे हजर होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली मंदिरातील पूजाविधी झाले. ते आजतागायत त्याच रीतीने केले जातात. जपानमध्ये सरस्वती आणि लक्ष्मी यांची मंदिरे आहेत. वरुण आणि कुबेर हे तेथील महत्‍त्‍वाचे देव आहेत. तेथील्या सरस्वतीच्या देवळांची शान, निर्मळता फोटोत पाहिली तरी आपले देव परदेशांतच वैभवात आहेत असे म्हणावेसे वाटले. मंदिराचे प्रमुख आहेत मिहोकोचे पती. मंदिराचे पौरोहित्य गेल्या अनेक पिढ्या परंपरेने हिरोओका कुटुंबाकडे आहे. हिराओका यांच्यानंतर त्यांचा मुलगा तेथील प्रमुखपदी येईल. श्री. हिराओका स्‍वतः भारतात येऊन संस्कृत शिकले आहेत. जपानमध्ये ९० टक्के बौद्धधर्मीय लोक आहेत.ही मूर्ती सतरा मीटर उंचीच्या धातूपासून तयार करण्यात आली आहेही मूर्ती सतरा मीटर उंचीच्या धातूपासून तयार करण्यात आली आहेही मूर्ती सतरा मीटर उंचीच्या धातूपासून तयार करण्यात आली आहे

    डॉ. मिहोको हिराओका ही विद्वान स्‍त्री भारतीय विचारांनी भारलेली आहे. ती भारतातल्‍या वाचनालयांना, लेण्यांना, विद्वानांना भेटायला, बुद्धाचा वारसा समजून घ्यायला येथे येते. तिने सारा महाराष्ट्र पालथा घातला आहे. कुठल्‍या लेण्‍यांचा काळ कोणता, ती केव्हा आणि कुणी खोदली, ती आज कोणत्या अवस्थेत आहेत याची बिनचूक माहिती तिच्याकडे आहे. अजिंठा, नाशिक, जुन्नर ही ठिकाणे तिच्या खास अभ्यासाची आहेत.

    येथील्या अनुभवाबद्दल विचारले असता ती म्हणाली, की येथील खाणे-पिणे तिला आवडते. लोक माहिती देतात. पण तिच्‍या एका अनुभवाने तिलाच काय पण मलाही बेचैन केले. ती एका लेण्यात सप्तमातृकांच्या मूर्ती पाहायला गेली होती. पाहते तर काय? त्या मूर्तींच्या अंगावर मुले चढत होती, नाचत होती. तीही चक्क बूट-चपला घालून. तिने त्यांच्या आयांना चिडून म्हटले, “मुलांना उतरायला सांगा! काय हो? ह्या मूर्ती पवित्र मानता नां? मग त्यांच्यावर मुलांना बुटांसकट कसे चढू देता?”

    त्यावर त्या आया म्हणाल्या, “अहो ती छोटी मुलं आहेत.’’

    विदेशी संशोधक येऊन आपल्याला आपल्या वारशाची आठवण करून देते आणि आपल्या तथाकथित शिकलेल्या आईबापांना त्‍या अमूल्य वारशाच्या जतनाची जाणीवही असू नये?

    डॉ. मिहोको हिराओका
    masala@dream.com

    संजीवनी खेर,
    वैशाली अपार्टमेंटस, १७६ अ,
    भालचंद्ररोड, हिंदु कॉलनी,
    दादर, मुंबई – १४
    मोबाईल – ९८२१४११४७२
    sanjeevanikher@gmail.com

    About Post Author

    1 COMMENT

    Comments are closed.