अहमदनगर शहराजवळील मिरीया गावाचे सरदार यशवंतराव मिरीकर यांचा वाडा ब्रिटिशकालीन कारकिर्दीच्या खाणाखुणा घेऊन उभा आहे. यशवंतराव यांचे पणतू, गोविंद मिरीकर यांनी त्या वाड्याचे नूतनीकरण करून, तेथे वस्तुसंग्रहालय(म्युझियम) उभे केले आहे. त्यातील सर्व जुन्या वस्तू या मिरीकर परिवाराच्या मालकीच्या आहेत. म्युझियमचे नाव ‘सरदार मिरीकर फॅमिली म्युझियम’ असे ठेवण्यात आले आहे. मिरीकरांच्या सात पिढ्यांचा इतिहास तेथे संरक्षित आहे. ते म्युझियम लोकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे असे गोविंदराव यांनी सांगितले. त्यांनी त्या सात हजार चौरस फूट वाड्याच्या जागेत तीन हजार चौरस फूट इतके बांधकाम करून घेतले आहे. मिरी गाव नगरपासून मोटारने अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. ते पाथर्डी तालुक्यात येते. तेथे लोकवस्ती दहा हजार आहे.
औरंगजेबचा नातू बादशाह शाहआलम यांनी मिरी गाव रामराव नारायण मिरीकर यांना इनाम (जहागीर) म्हणून दिले. ते फारसी भाषेचे तज्ज्ञ होते. त्यांची दिल्ली दरबारमध्ये वकिल म्हणून नेमणूक ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याच्या वतीने झाली होती. सारे मिरी गाव त्यांच्या मालकीचे होते. यशवंतराव त्रिंबकराव मिरीकर यांना ब्रिटिशांकडून ‘रावबहाद्दूर’ ही पदवी 1900मध्ये मिळाली होती, तर सी.आय.इ. (C.I.E.) हा किताब 1910 मध्ये मिळाला होता. त्यांना इंग्रजी उत्तम येत होते. यशवंतरावांची फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट म्हणून नेमणूक झाली होती. ते कोर्टात न्यायनिवाडा करत असत. त्यांना सरदार म्हणून आजूबाजूच्या जमिनीही मिळाल्याने ते गावाची देखभाल करत. मिरीला पाण्याचा प्रश्न होता. यशवंतरावांनी तो सोडवण्याकरता पाझर तलाव बांधून घेतला. त्यांनी त्यावेळी घडलेल्या घटनांच्या नोंदी करून ठेवल्या आहेत. यशवंतरावांचे पुत्र सरदार नानासाहेब मिरीकर यांनी त्या आठवणी पुस्तकरूपात लिहून ठेवल्या आहेत.
गोविंदराव सांगतात, की “ आम्ही मिरी या गावातील बहुतेक गोष्टी जतन केल्या आहेत. पण तेराव्या शतकात जी आक्रमणे झाली त्यात महादेवाच्या बारा देवळांची पडझड होऊन फक्त तीन देवळे शिल्लक राहिली. त्यांचे अवशेष वाड्यातील म्युझियममध्ये आहेत. आमच्या वाड्यातही एक देऊळ आहे. पूर्वी तेथे ज्ञानेश्वरी, भागवत यांची पारायणे चालत. त्या देवळात दत्तमूर्ती आहे व दगडात कोरलेल्या तीनशे वर्षांपूर्वीच्या जुन्या पादुका आहेत. तेथे दर वर्षी दत्त जयंती साजरी होते.”
मिरीच्या म्युझियमस्वरूप वाड्यातील पहिली खोली आगतस्वागत करण्यासाठी मोकळी ठेवली आहे. अंतःगृहात कामकाजाचे मोठे डेस्क, पैसे ठेवण्याच्या पेट्या, सागवानी फर्निचर, चंदनी वस्तू, लाकडी नक्षीदार वस्तू, मोठी तैलचित्रे आणि झुंबरे भिंतीवर लावून त्यावेळचा माहोल तयार केला आहे. भिंती नव्याने रंगवल्या आहेत. गोविंदरावांची अमेरिकेत असलेली कन्या तेजस्विनी आर्किटेक्ट आहे. ती त्या वाड्याच्या सुशोभिकरणासाठी सूचना पाठवत असते; वडिलांना विविध गोष्टी सुचवत असते. त्यामुळे गोविंदरावांच्या विचारधारणेस आधुनिकता लाभते असे ते म्हणतात. आतील खोलीत जुन्या स्वयंपाकघरातील मोठी रांजणे, शिंकाळे, चंदनी देव्हारा अशा पणजोबांच्या काळातील वस्तू ठेवल्या आहेत. तेथील विविध तसबिरी आणि फोटोग्राफ्स मिरीमधील इतिहासाची साक्ष देतात. मिरीकरांनी मिरी गावात ब्रिटिश काळात पोस्ट ऑफिस आणले, अशी आधुनिकता त्यांच्या वर्तनव्यवहारात होती.
आतील खोलीच्या मध्यभागी लावलेली छायाचित्रासकटची बातमी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. ‘लंडन टाइम्स’मधील त्या बातमीत सरदार यशवंतराव हे लॉर्ड मिंटो यांचा सत्कार करताना दिसत आहेत. होय, ती घटना नगर स्टेशनवर घडलेली आहे! लॉर्ड मिंटो हे त्यांच्या पत्नीसह मनमाडहून पुण्याला 1916 साली निघाले होते. ती दोघे मधे नगर स्टेशनवर उतरली. उतरण्याचे कारणही तसेच खास होते. नगरहून पहिल्या महायुद्धात लढण्यासाठी रेजिमेंट रवाना होणार होती. मिंटोसाहेब त्यांना घेऊन जाण्यास उत्सुक होते. ती त्यांची जबाबदारी होती. उलट, स्थानिकांना युद्धातील त्या सहभागामुळे काम मिळणार होते- पैसे देणारे काम! अशा वेळी लॉर्ड मिंटो हे नगर गावात आल्याबद्दल सरदार यशवंतरावांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला गेला. यशवंतरावांची कारकीर्द 1850 ते 1920 च्या दरम्यान होती. नानासाहेब या गोष्टीला साक्षी असल्याने त्यांनी सर्व गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. आणखी एक ऐतिहासिक घटना म्हणजे, नगरच्या जुन्या कोर्ट (सध्याची पौड गल्ली) गल्लीतील मिरीकर वाड्यात (जेथे ते सध्या राहतात) गव्हर्नरही एकदा येऊन गेले. वाड्यात आगतस्वागत झाले, ‘पानसुपारी’ झाली.
मिरी गाव तसे ऐतिहासिक महत्त्वाचे आहे. गोविंदराव यांच्या आजोबांनी, वडिलांनी तत्संबंधात काही संशोधन केले. तसेच, गोविंदराव स्वतःही इतिहासाचे विद्यार्थी होते. त्यांनीही इतिहास शोधून काढण्यात रस दाखवला. महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी मिरी गावात बाराव्या शतकात येऊन गेले होते. म्हाइंभट्ट यांचा ‘लीळाचरित्रा’त ‘मिरी येथील महालक्ष्मीच्या मंदिरात लीळाचरित्रातील काही भाग लिहिला गेला आहे’ असा उल्लेख आहे. मिरीबद्दल पुराणकाळातील एक आख्यायिकादेखील आहे, की रामाने मारीच राक्षसाचा वध त्याच ठिकाणी केला. किंबहुना म्हणून त्या गावाला मिरी हे नाव पडले.
यशवंतराव मिरीकर यांना जी सनद मिळाली होती त्याची कागदपत्रेही तेथे पाहण्यास मिळतात. त्या पत्रकावर लॉर्ड कर्झन यांची सोनेरी अक्षरांत सही आहे. तो महत्त्वाचा दस्तावेज आहे. जहागिऱ्या नष्ट 1952 साली झाल्या आणि मिरीकर यांच्या पुढील पिढयांजवळ गावठाणची जमीन राहिली नाही. ती सर्व सरकारच्या मालकीची झाली. मिरीकर यांच्याजवळ फक्त स्वतःची जमीन राहिली. ती ते कसत असतात. त्यांनी त्यावर एक फार्महाऊस बांधले आहे. ‘मिरीकर फॅमिली म्युझियम’मधील अनेक मोठ्या मूर्ती नगरच्या म्युझियमला भेट दिल्या गेलेल्या आहेत. त्या तेथे पाहण्यास मिळतात. तरीही मिरीकरांच्या या वास्तूत, म्युझियममध्ये पाहण्यासारखे बरेच काही आहे. वास्तूला तीन तळघरे (बळद) आहेत. तळघरातही चित्रे प्रदर्शनार्थ ठेवली असल्याने प्रेक्षक ती जाऊन पाहू शकतात. त्यामुळे त्यांना जुनी तळघरे (बळद) कशी होती तेही दिसून येते. मिरीकरांमध्ये अजूनही मिरीकर घराण्याबद्दलचा आदर आहे. तेथील मंदिर, जत्रा अशा उत्सवात त्यांना मान आहे. त्यांची पुढील पिढी मिरीला त्यांना वेळ मिळेल तेव्हा भेट देत असते.
दुसरे महायुद्ध 1942 साली संपले. तेव्हा गोविंदरावांचे वडील त्या वेळच्या परिस्थितीचे साक्षीदार होते. युद्धात अनेक लोक मृत्युमुखी पडल्याने अनाथ मुलांचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी गोविंदरावांचे पिताश्री सरदार रा.गो. मिरीकर आणि डी.वाय. चौधरी यांनी एक बालगृह नगर येथे स्थापन केले. आई-बाप नसलेल्या मुलांना तेथे दाखल करून त्यांचे पालनपोषण केले जाई. लोक देणग्याही देत असत. स्वातंत्र्य मिळाल्यावर सरकारने ट्रस्ट स्थापन करून बालगृहासाठी मदत पुरवणे सुरू केले. नगरच्या त्या बालगृहाचे आता दोन भाग आहेत – बालगृह आणि बालसुधारगृह. गुन्हा केलेल्या मुलांना सुधारगृहात ठेवून त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो, तर बालगृहातील मुले गावातील शाळेत जातात. बालसुधारगृहाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. गोविंद मिरीकर हे बालगृह आणि बालसुधारगृहाचे सचिव म्हणून काम पाहतात.
मिरीकर सांगत होते, की समाजात अनाचार किती बोकाळला आहे ते या संस्थेत असल्यामुळे कळते. कुमारी मातांना तेथे आणून सोडले जाते. मुलींवर जो प्रसंग ओढवलेला असतो त्याबद्दल कोणालाही सहानुभूती नसते. त्यांचा त्यांच्या आईवडिलां- कडूनही त्याग होतो. मग त्यांनी जन्म दिलेले नवजात शिशू तेथे आणखी वेगळ्या विभागात भरती होतात. तेथे सहा वर्षांपर्यंतच्या मुलांची काळजी घेतली जाते. ते सरकारच्या मदतीवर आणि उदार लोकांच्या देणग्यांवर सुरू आहे. सरकारने बालगृहाजवळ शिक्षणासाठी एक शाळाही बांधून दिली आहे. तेथे मुले शिकतात. पैकी काही मुले शिकून नोकरीलाही लागली आहेत. गोविंदराव मिरीकर हे तिघे बंधू. गोविंदराव वकील आहेत. ते पत्नीसह नगरला राहतात. त्यांच्या दोन मुली अमेरिकेत आहेत, मुलगा आयटी उद्योगात नोकरी करतो. त्यांचे दोन बंधू – गोपाळराव व श्रीपाद हे पत्रकार होते.
गोविंद मिरीकर – 94222 22370 mirikargovind@gmail.com
– मेघना साने 98695 63710 meghanasane@gmail.com
मेघना साने मुंबई विद्यापीठाच्या एम ए, एम फिल पदवीधारक असून, त्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर शाखेच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी मराठी रंगभूमीवर ‘नाट्यसंपदा’च्या ‘तो मी नव्हेच’ व ‘सुयोग’च्या ‘लेकुरे उदंड झाली’ या नाटकांमधून पाच वर्षे भूमिका केल्यानंतर एकपात्री प्रयोगाची स्वतंत्र वाट चोखाळली आहे. त्यांनी ‘कोवळी उन्हे‘ या स्वलिखित एकपात्री प्रयोगाचे देशविदेशांत दौरे केले आहेत.
—————————————————————————————————————————————————————————–
छान माहिती दिली आहे . एकदा प्रत्यक्ष जाऊन पाहावे लागेल. लेखाबद्दल आभार
उत्तम. दुरापास्त स्थानिक इतिहासात महत्त्वाची भर…
एक वेगळाच इतिहास समोर आला … मेघनाताई नवीन माहिती मिळाली आज… धन्यवाद 🙏
छान व वेगळी माहिती समजली.अभ्यासपूर्ण माहिती आपण दिली आहे.
धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया मोलाच्या आहेत.
खूप सुंदर आणि अभ्यास पूर्वक लिहिलेला लेख.मिरीकरांच्या वाड्याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते.
खूपच माहितीपूर्ण आणि सुंदर लेख मेघना ताई तुमच्यामुळे ज्ञानात अजून भर पडली. 😊👌🏻
मिरीकरवाडा,वाड्याचा इतिहास आणि अलिकडचे बालसुधारगृह याबातची माहिती उदबोधक आहे…
प्राचीन अशा मिरी गावाचाआणि तेथील लोकांचा इतिहास समजला. समृध्द वारसा असलेले म्युझिअम बघितलेच पाहिजे.
मेघना खूप छान माहिती मिळाली. लेख आवडला.( साईलीला चरित्रात मिरीकर सरदारांचा उल्लेख आहे)
एकीकडे सुधारणा तर दुसरीकडे समाजात वाढलेला अनाचार . भीषण परिस्थितीची जाणीव होते. अशावेळी ही मिरीकरांची समाजसेवा अतिशय स्तुत्य आहे.
माहिती खूपच छान आहे ही माहिती मला माझ्या व्हॉट्सअँप वर मिळेल का? आशाप्रकराची माहिती पण मला आपण देऊ शतका हा लेख खूपच उत्कृष्ट सुदंर आहेअसे नवनवीन लेख आम्हास वाचायला मेलो ही नम्र विनंती आपणच एक नवी माहिती मिळाली आपले लेख आमच्या व्हॉट्स ॲप वर मेल शकता प्लीज… धन्यवाद..
माहिती खूपच छान आहे ही माहिती मला माझ्या व्हॉट्सअँप वर मिळेल का? आशाप्रकराची माहिती पण मला आपण देऊ शतका हा लेख खूपच उत्कृष्ट सुदंर आहेअसे नवनवीन लेख आम्हास वाचायला मेलो ही नम्र विनंती आपणच एक नवी माहिती मिळाली आपले लेख आमच्या व्हॉट्स ॲप वर मेल शकता प्लीज… धन्यवाद..
माहिती खूपच छान आहे ही माहिती मला माझ्या व्हॉट्सअँप वर मिळेल का? आशाप्रकराची माहिती पण मला आपण देऊ शतका हा लेख खूपच उत्कृष्ट सुदंर आहेअसे नवनवीन लेख आम्हास वाचायला मेलो ही नम्र विनंती आपणच एक नवी माहिती मिळाली आपले लेख आमच्या व्हॉट्स ॲप वर मेल शकता प्लीज… धन्यवाद..
ही माहिती तुमच्या व्हॉट्सअँपवर मिळू शकेल. तसेच थिंक महाराष्ट्रचे व्हॉट्सअँप ग्रूप आहेत. त्यातही तुम्ही सहभागी होऊ शकता. असे वैशिष्ट्यपूर्ण दोन लेख सोमवार ते शुक्रवार दरम्यान प्रसिद्ध होत असतात. थिंक महाराष्ट्रचा व्हॉट्सअँप नंबर 9892611767 यावर तुमचे नाव आणि जिल्हा मेसेज करावा. किंवा सोबतच्या लिंकवरूनही जॉईन होऊ शकाल. https://chat.whatsapp.com/JxYcscX2glAHtUWljiKwbM- टीम थिंक महाराष्ट्र