Home वैभव गावांच्‍या अंतरंगात मिठबावचा श्रीदेव रामेश्वर

मिठबावचा श्रीदेव रामेश्वर

_Mithabavache_Rameshwar_mandir_1.jpg

मिठबाव गावचे श्रीदेव रामेश्वर मंदिर सुमारे चारशे वर्षें जुने आहे. मंदिर कौलारू व छोटेखानी आहे. मंदिराची डागडुजी १९७५ मध्ये करण्यात आली होती. पण त्याचे नव्याने बांधकाम हे उद्दिष्ट ठेवून सुमारे साडेतीन हजार चौरस फूट क्षेत्रफळावर करण्यात आले आहे. त्यात मंदिराचा पूर्ण कायापालट होऊन गेला आहे. त्याचा सभामंडप दोन हजार चौरस फूट क्षेत्राचा आहे. गाभार्‍याचे कळसापर्यंतचे बांधकाम सुंदर, कलाकुसरयुक्त असून कळसाला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केलेला असल्याने मिठबावच्या वैभवात भर पडली आहे.

मंदिर सभामंडपासह चोपन्न खांबांवर उभे आहे. समोर चार दीपमाळ आहेत. मंदिराची बांधणी तंजावर धाटणीची आहे. सिंधुदुर्गातील ते तसे बहुधा पहिले मंदिर असावे. गाभार्‍यातील शिवपिंडी मात्र काळ्या पाषाणातील, जुनीच आहे. त्या शिवाय सात मूर्ती नव्याने आणल्या असून त्यात श्री गणेश, विठ्ठल, रखुमाई, वीरभद्र, नंदी व सटी-मटी यांचा समावेश आहे.

गावात पूर्वी श्री गजबादेवी व श्री रवळनाथ अशी फक्त दोन मंदिरे होती. त्या काळात कुणकेश्वर हे गाव होते व मिठबाव ही गावातील वाडी होती. मिठबाव, तांबळडेग व कातवण (साहित्यिक चंद्रकांत खोत यांचे गाव) अशा तीन स्वतंत्र गावांचे नवे गाव निर्माण१९९५ मध्ये करण्यात आले. मिठबाव गाव तेव्हा उंच माळरानात होते. तेथील मूळ गावठाणात बोरी नावाच्या गवळ्याची वस्ती असल्याने त्याला ‘बोरीचा वाड’ असे म्हटले जाई.

त्याच गवळ्याच्या आश्रयाने धोंड, जेठे, कुबल, फाटक, राणे-मिराशी, लोकेगावकर, घाडी, सुतार, काळे, देसाई व महार या लोकांनी गावात खाली वस्ती केली. कालांतराने, नरे व जोगल यांनी पाया रोवला. पूर्वी तेथेही गावपळण होई, परंतु सध्या ती बंद आहे. तर १८९० पासून सुमारे सव्वाशे वर्षें देवस्थानाचे वार्षिक कार्य बंद आहे, तरीही देवस्थान कमिटी छोटया स्वरूपातील उत्सव साधेपणाने साजरा करते.

मंदिरात पूजेचे काम गुरव करतात. अन्य कामे बारापाचाचे मानकरी असलेले कुबल, जेठे, लोके, राणे, फाटक, खाडिलकर, रेगे, जोगल, नरे, शेट्ये व चौगुले आदी लोक सांभाळतात. श्रीदेव १९४० नंतर अद्यापपर्यंत गावात फिरण्यासाठी मंदिरातून बाहेर पडलेले नाहीत.

मंदिराची आख्यायिका अशी आहे, की तेथील लोके व राणे हे इनामी संस्थान असलेल्या आचरा येथील रामेश्वर मंदिरातील रामनवमी उत्सवाला मानकरी म्हणून हजर असायचे. त्यांच्या उपस्थितीशिवाय तेथील वार्षिकोत्सव साजरा होत नसे. परंतु एका वर्षी तुफानी पावसामुळे आचरा नदीला पूर आला व त्यांना मंदिरात पोचण्यास विलंब झाला. राणे व लोके त्यांच्या तेथे पोचण्यापूर्वीच उत्सव साजरा झाल्याने संतापले. राणे व लोके यांनी त्याच नदीपात्रातून छत्तीसगुणी काळ्या पाषाणातून एक पिंडी तयार करून तिची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली. तेच हे श्री रामेश्वर मंदिर!

छत्रपती संभाजी महाराजांच्या काळापासून एकावन्न रुपयांची सनद घाडीगावकरांकरवी त्या मंदिराला प्राप्त झाली आहे. पेशवेकाळात, चिमाजी आप्पांनी त्यांच्या पत्नीचा नवस फेडताना मंदिराला पालखी भेट म्हणून दिल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या आवारात अकरा सती समाधिस्थळे असून तेथील फाटकवाडीतून दत्ताची पालखी रामेश्वराच्या भेटीला येते. श्रीदेव कुणकेश्वर दर्शनासाठी येणार्‍या देवांचे तरंग व पालख्या या मंदिरात पाहुणचार व रामेश्वरांची भेट घेऊनच पुढे मार्गस्थ होतात.

मंदिरात रोज सायंकाळी सात वाजता नौबत वाजवण्याची प्रथा पाळली जाते. श्रावणामध्ये दर सोमवारी देवदर्शन व अभिषेक केला जातो. गोकुळाष्टमीचा उत्सवही अगदी मोठया स्वरूपात साजरा केला जातो. त्या दिवशी खाडीत स्नान केले जाते. महिलांना गाभार्‍यात जाण्यास प्रवेशबंदी असली तरी, वैकुंठ चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी पहाटे तीन ते पाच या वेळेत स्नान करून, नव्या वस्त्रानिशी गाभार्‍यात जाऊन देवदर्शन घेता येते.

– पांडुरंग भाबल

About Post Author

Exit mobile version