भारतीय व्यापार, संस्कृती, परंपरा व त्यासाठी असलेले धार्मिक अधिष्ठान यांचा भव्य भारतीय उत्सवात अनुभव पहिल्यांदाच घेतला! खंडोबा हे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही प्रदेशांतील बहुसंख्य जनतेचे कुलदैवत आहे. मल्हारी, मल्हारीमार्तंड, म्हाळसाकांत, मैलार, मैराळ अशी खंडोबाला वेगवेगळी नावे आहेत. खंडोबारायाची महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन्ही राज्ये मिळून एकूण बारा स्थाने आहेत. त्यांपैकी नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील माळेगाव हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. श्रीक्षेत्र माळेगावचा खंडोबा म्हणजे लोकांचा देव. माळेगावचे ग्रामदैवत मल्हारी म्हाळसाकांत खंडोबा हेच आहे, मराठवाड्याची ती सर्वात मोठी ग्रामदेवता आहे. तिच्या नावाने माळेगावला मोठी यात्रा भरते. खरीपाची कापणी झाली की शेतकरी आणि कष्टक-यांना वेध लागतात ते माळेगावच्या यात्रेचे…
माळेगावची यात्रा दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चौदाव्या दिवशी भरवली जाते. निजाम राजवटीमध्येदेखील यात्रा भरवली जात असे. माळेगावची यात्रा ही दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा समजली जाते. ‘येळकोट-येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात राज्याच्या; तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक, पंजाब, हरियाणा, राजस्थान या राज्यांमधूनदेखील हजारो भाविक आणि व्यापारी माळेगावमध्ये येत असतात.
माळेगाव यात्रा उत्कृष्ट प्रतीच्या पशुधनाच्या व्यापारासाठी देशात प्रसिध्द आहे. नांदेडचे स्थानिक लाल कंधारी वळू हे पशुप्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण असते. तेथील घोड्यांचा व्यापारही विशेष प्रसिध्द आहे. उंट, गाढव, कुत्री, शेळ्या यांच्यासारखे पशुधन; त्यांचा बाजार व प्रदर्शन राष्ट्रीय पातळीवर चॅम्पियन ठरलेल्या आणि दुर्मीळ असलेल्या देवणी व लालकंधारी गायी व वळूंचे प्रदर्शन हे प्रमुख आकर्षण असते. आयुष्यात पाहिले नसतील एवढे वेगवेगळे घोडे काही हजारांपासून काही लाखांपर्यंतचे पाहायला मिळतात. पंचवीस हजार रुपयांचा कारवान जातीचा कुत्रा देखील पाळायला मिळाला. चांगला घोडा कसा ओळखायचा त्याच्या पाच खुणा-त्याचा बाहत्तर खोडया कशा, त्याचा डौल…अशा अनेक गोष्टी तिथे पाहता व शिकता आल्या.
यात्रेतील बाजार हे पर्यटकांचे आकर्षण आहे. मूर्ती, छायाचित्रे, लाकडी खेळणी, कोसल्याचा पटका, शेला, पागोटी, जाड धोतर, घोंगडी, घोड्याचा साज, इतर प्राण्यांसाठी लागणा-या म्होरकी, कासरा, गोंडे, घुंगरू, घागर माळा, तोडे, वेसण, खोबळे, खोगीर, लगाम यांसारख्या अनेक वस्तूंनी बाजारपेठ फुलते. जत्रेत कित्येक कोटींचा व्यापार होतो. यात्रेत विविधरंगी वस्तूंबरोबर विविधरंगी संस्कृतीचे दर्शनही घडते. अनेकांना एकतेच्या सूत्रात गुंफणा-या यात्रा आणि देवस्थानाच्या ठिकाणी भारताच्या एकात्मिक संस्कृतीचा महोत्सव अनुभवता येतो.
मोठमोठ्या राजकीय व्यक्ती त्यांच्या त्यांच्या खास अशा घोड्यांसोबत पाहावयास मिळतात. सुग्या-मुग्यांची यात्रा, हौसे-गवसे-नवशांची यात्रा, तृतीयपंथीयांचे माळेगाव, उचल्यांचे माळेगाव अशा विविध प्रकारे माळेगाव यात्रेचा उल्लेख होतो. याला ‘हिजड्यांचे माळेगाव’ असेही म्हणतात. इथं घोड्यांचा मोठा बाजार भरतो. राजस्थान, पंजाब, हरयाणा, गुजरात येथून घोडे येतात. त्यांच्या खरेदीविक्रीची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते म्हणून या गावाला ‘घोडे माळेगाव’ असेही म्हणतात. घोड्याप्रमाणे उंट, गाढवे यांचाही बाजार भरतो, म्हणून ‘उंटाचे माळेगाव’, ‘गाढवाचे माळेगाव’ असेही उल्लेखले जाते. जत्रेला जाऊन मजा करावी या हौसेने माळेगावी येणा-या लोकांमुळे ‘हौशांचं माळेगाव’, नवस फेडणा-या लोकांमुळे ‘नवश्यांचं माळेगाव’, काहींना काही गवसते, मिळते म्हणून ‘गवशांचे माळेगाव’ असेही संबोधले जाते. विशेषणे विविध कार्यक्रमाला लावली जातात. यात्रेला जे जेजुरीत मिळत नाही, ते तिथे मिळते म्हणे! सर्व जातिधर्मांचे श्रद्धास्थान, तमाशेवाले, लोकनाट्यवाले, तळागाळातील व पिढ्यानपिढ्या भटके जीवन जगणा-या जाती-जमातीचे आप्तस्वकीय एकत्र येण्याचे ते ठिकाण आहे. वर्षभराचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक करारमदार खंडेरायाच्या दरबारात होतात. पुढील वर्षीच्या भेटी, आश्वासने, सोयरिकी, देवाणघेवाण, खंडेरायाला साक्ष ठेवून मोठ्या प्रेमभावाने केल्या जातात. वैदू, गोसावी, मसनजोगी, घिसाडी, गारूडी, डोंबारी, नंदीबैलवाले, वासुदेव, जोशी कुडमुडेवाले यांची जातपंचायत यांसारख्या अनेक घटना हे या यात्रेचे आकर्षण आहे.
माळेगावपासून वीस किलोमीटरवर रिसनगाव येथील नाईक कुटुंबाकडे माळेगावच्या पालखीचा मान आहे. नागोजी नाईक यांनी या ‘माळेगाव जत्रे’चा लौकिक नावारूपाला आणला. नागोजी नाईक हे इसवी सन 1777 साली (राजा महिन्द्र हिंदुमती ऊर्फ कबीरसिंघ गोपालसिंघ यांच्या वंजारवाडीच्या नाईकांचे बंड मोडून काढले. तेव्हा त्यांना निजामाकडून ‘काळा पहाड’ हा किताब मिळाला होता.) कंधारजवळील भोसी येथील वाणी कुटुंबीयांकडे खंडोबाच्या पागोट्याचा मान आहे. चंपाषष्टीच्या दिवशी भोसीकर कुटुंब आपले पागोटे घेऊन माळेगावला येतात. ते पागोटे मार्गशीर्ष अमावस्येच्या यात्रेपर्यंत मंदिरात ठेवतात. भोसीकर कुटुंबीय चंपाषष्टीपासून अमावस्येपर्यंत पागोटे वापरत नाहीत. यात्रा पूर्वी महिनाभर भरत असे. आता पाच दिवस भरते. ज्येष्ठा मूळ नक्षत्रावर देवस्वारी निघते. देवस्वारीचा मान नागोजी नाईकांनंतर बापुसाहेब नाईक, हैबतराव नाईक, मल्हार नाईक, गणपतराव नाईक… असा हा वारसा आता संजय नाईक चालवत आहेत.
या अशा आपल्या परंपरेला जोपासण्यासाठी खास प्रयत्न केले गेले पाहिजेत. पण व्यर्थ आश्वासनांपलीकडे फार काही घडत नाही. या भागातील दोन मुख्यमंत्री झाले. विलासरावांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात यात्रा परिसर विकासासाठी सात कोटी रुपये दिले होते. त्यांच्यानंतर राज्याचे नेतृत्व नांदेडकडे आले होते. त्या जिल्हय़ाचे नेते अशोक चव्हाण यांनी त्या वेळी पाच कोटींची घोषणा केली, पण त्यांच्या कारकिर्दीत जाहीर झालेला निधी आलाच नाही!
शेवटी, तळागाळातील माणसंच आपली संस्कृती व परंपरा टिकवतात जोपासतात…मोठे फक्त मिरवतात… हा अनुभव. हेमाडपंथी धाटणीचा गाभारा असलेले ‘खंडोबा’ व ‘म्हाळसा’ यांचे मंदिर आहे. बाजूला ‘बाणाई’चे स्वतंत्र मंदिर आहे. तेथील मंदिरातील पुजा-यांना ‘जहागिरदार’ म्हणतात. जत्रेला सातशे वर्षांची परंपरा लाभली आहे.
जत्रेबद्दल एक लोककथा आहे, ती अशी- बिदरचा एक वाणी तांदळाचा व्यापार करत असे. तो मजल-दरमजल करत माळेगावला आला व तिथेच त्याचा मुक्काम पडला. त्याच्यासोबत तांदळाच्या गोणी पाठीवर असलेली गाढवे होती. दुस-या दिवशी पुढच्या प्रवासाला निघताना एका गाढवाच्या पाठीवरील गोण फार जड वाटू लागली. ती जेव्हा सोडून पाहण्यात आली तेव्हा ती मध्ये दोन तांदूळ सापडले. ते अंगठ्याएवढे मोठे होते. ते तांदूळ म्हणजेच खंडोबा व त्याची पत्नी म्हाळसा. त्यांची प्रतिष्ठापना तिथेच केली गेली. तेव्हापासून जत्रा भरत आलेली आहे. जत्रेचे संयोजन कंधार पंचायत समिती व नांदेड जिल्हा परिषद यांच्याकडे 1968 सालापासून आले.
जत्रा दोन-तीन माळांवर आणि बदकलात बसलेली असल्यामुळे तिचे रूप मानवी नजरकक्षेत सामावले जाऊ शकते व चटकन लक्षातही येते.
लोकसाहित्यावर संशोधन करणा-यासाठी; ‘माळेगावची जत्रा’ हा लोकसंस्कृतीचा व लोककलांचा महाकोश आहे.
बायका पंचमीच्या सणाला ‘भुलई’ म्हणत असतात. त्यांतील एका भुलईनुसार ‘काळा पहाड’ ऊर्फ नागोजी याचे मोठेपण ‘कंधार’च्या किल्लेदारास पाहवले नाही. त्याने नागोजीस तोफेच्या तोंडी दिले. नागोजीच्या गोदाबाई व राधाबाई या दोघी बायकांनी वीर नागोजीच्या शरीराचे मांसाचे तुकडे वेचून त्यांना चिता रचून अग्नी दिला. आणि कंधारच्या राजास ‘तुझा वस बुडू दे’ असा शाप दिला. तेव्हा खंडोबा(देवाने) त्या दोघींना स्वप्नात येऊन अभिवचन दिले, की माझ्या पालखीच्या पुढे तुझी पालखी राहील, अशी आख्याइका आहे. मिर्जा यांच्या ‘तारीख-ए-खंदार’मध्ये अशा कथानकाच्या काही नोंदी सापडतात.
येळकोट येळकोट sss
जय मल्हार!!
शिवा मल्हारी
येळकोट येळकोट घेsss
अशा गगनभेदी जयघोषानं माळेगावचा टापू दुमदुमून जातो. आकाशात बेलभंडाराची उधळण होते. खंडोबाची देवसवारी आणि ‘रिसनगाव’च्या ‘नाईकांच्या’ पालखीच्या वाटेवर हजारो भगत आपल्या देहाची पायघडी करून अंथरतात. त्यांच्यावरून पालख्या जातात. मग भगतांचा देह धन्य धन्य होतो!
– प्रसाद चिक्शे
9403776419
prasadchikshe@gmail.com
अतिशय ऊतम माहिती
अतिशय उत्तम माहिती
ऐतिहासिक संदर्भ देवुन यात्रा…
ऐतिहासिक संदर्भ देवुन यात्रा कथन केल्याबद्दल अभिनंदन
नागोजी नाईकांची अजुन माहिती पुढं आली पाहीजे9421349586
Comments are closed.