मार्लेश्वर : प्रतिकैलास (Marleshwar From Ratnagiri District)

2
113

मार्लेश्वर मंदिर

श्री क्षेत्र मार्लेश्वर प्रतिकैलास म्हणून ओळखले जाते. ते रत्नागिरीच्यासंगमेश्वर तालुक्यात आहे. ते मारळ गावाचे आराध्य दैवत. त्या तीर्थक्षेत्राला लागून बारमाही अखंड कोसळणारा धबधबा आहे. तो म्हणजे मार्लेश्वरचा धारेश्वर धबधबा.

देवरुख शहरातून आलेला रस्ता थेट मारळ गावातून मार्लेश्वरापर्यंत जातो. देवस्थानच्या पायथ्याला विस्तीर्ण गाडीतळ आहे. भाविक तेथे गाड्या ठेवून पुढील अंतर चालत जातात. गाडीतळापासून पायर्‍या सुरू होतात. पायथ्यापासून पाचशेतीस पायर्‍या चढून गेल्यावर मार्लेश्वरच्या गुहेत देवालय आहे. त्या पायर्‍या नागमोडी आकाराच्या भक्कम बांधलेल्या आहेत आणि चांगल्या रुंद आहेत. पायर्‍यांवरून चढताना डोळ्यांत भरतात ती तिन्ही बाजूंनी आकाशात भिडणारी सह्याद्रीची शिखरे. पावसाळ्यात त्या डोंगरांमधून वाहणारे बारीक बारीक धबधबे वेगळाच आनंद देतात.

पायर्‍या चढून देवळाच्या गुहेत पोचण्यास साधारण अर्धा तास लागतो. मार्लेश्वर देवस्थान गुहेत विजेची सोय नाही. समयांचा आणि पणत्यांचा उजेड असतो. तो मात्र पुरेसा आहे. गुहेचे प्रवेशद्वारही अरुंद आणि कमी उंचीचे आहे. साडेतीन फूट उंच आणि जेमतेम दोन फूट रुंद असे. गुहेचे तोंड म्हणजेच देवळाचे प्रवेशद्वार! त्याला दरवाजा नाही. एका वेळी एकच माणूस, तोही खाली वाकून देवळात जाऊ शकतो. आत गुहा थोडी प्रशस्त आहे. दहा-पंधरा माणसे एका वेळी देवदर्शन घेऊ शकतात. गुहेच्या बाहेर छोटासा झरा आहे. तो झरा तेथे आलेल्या पवनगिरी महाराजांनी 1973 साली मोकळा केला. पवनगिरी महाराजांनीच मार्लेश्वर देवस्थानची स्वच्छता केली आणि ते उर्जितावस्थेस आणले. पवनगिरी महाराज मूळचे सातारा जिल्ह्यातील अतीत गावचे. ते गगनगिरी महाराजांचे शिष्य. ते आधी राजापूर येथे वास्तव्यास होते. गुरूने आज्ञा दिली आणि ते राजापूरहून थेट आले ते मार्लेश्वर देवस्थानात. ते साल होते 1973. त्यांनी त्यावेळी घनदाट अशा जंगलमय मूळ देवस्थानाची डागडुजी केली.

गुहेत दोन शिवपिंडी आहेत. त्यांपैकी एक मल्लिकार्जुनाची तर दुसरी मार्लेश्वराची. मल्लिकार्जुन हा मार्लेश्वर यांचा मोठा भाऊ असा समज आहे. गंमत अशी, की मार्लेश्वर यांच्याबद्दलच्या आख्यायिकेत त्यांच्या तीन भावांची नावे वेगळीच येतात. मार्लेश्वर हे शंकराचे देवस्थान. गुहेत कपारींमध्ये साप आहेत. गुहेतील काळोखामुळे ते सहजासहजी दिसत नाहीत, पण ते साप डुरक्या घोणस या बोआ जातीचे बिनविषारी व म्हणून निरुपद्रवी आहेत. आजपर्यंत कोणालाही त्या सापांनी दंश केलेला नाही. मूळ देवस्थान दयनीय अवस्थेत आहे. आठ फूट बाय पाच फूट अशा चौथर्‍यावर शंकराची पिंडी आणि समोर नंदी असे ते दृश्य आहे. गुडघ्याएवढ्या उंचीचा कट्टा बाजूने आहे, पण तो ठिकठिकाणी कोसळलेला आहे. चौथर्‍यावर साधा पत्रा आहे. तो गंजून गेल्यामुळे पावसाळ्यात सर्वत्र पाणी गळते. आजूबाजूला जंगल असल्यामुळे तेथे एकट्यादुकट्याला जाताना भीती वाटते.

मार्लेश्वर प्रकट झाले त्या दिवशी, म्हणजे मकरसंक्रांतीच्या दिवशी मार्लेश्वर यांचे लग्न साखरपा गावाच्या गिरजाईदेवीशी लावण्याची परंपरा पडली आहे. त्यासाठी संक्रांतीच्या आदल्या म्हणजे भोगीच्या दिवशी गिरजाईदेवीची पालखी साखरपा गावाचे मानकरी आणि भाविक खांद्यावरून मार्लेश्वरला घेऊन जातात. तो सोहळा पाहण्यासारखा असतो. पालखी संध्याकाळी गिरजाईच्या देवळातून निघते. ती पालखी भाविक मधील डोंगरवाटेने चालत घेऊन जातात. ते अंतर सोळा किलोमीटर आहे. वाटेत आंगवली ह्या गावात,जेथे मार्लेश्वर यांचे वास्तव्य काही काळ होते, तेथे पालखी मानाने थांबते.

धारेश्वर धबधबा

मार्लेश्वराच्या गुहेच्या बाजूने समोर पाहिल्यावर धारेश्वर धबधबा नजरेत भरतो. तो धबधबा सुमारे दोनशे फूटांवरून कोसळतो. धबधब्यालात्या आधी बारा छोटेमोठे धबधबे येऊन मिळतात. त्यांचा एकत्रित प्रभाव मोठा आहे. धारेश्वर धबधब्याखाली जाण्याची वाट प्रारंभी सोपी पण नंतर मोठमोठ्या खडकांवरून जाते. अनेक आबालवृद्ध धबधब्याजवळ जाऊन येतात. धबधब्याखाली जाणे शक्य होत नाही, कारण तो जलप्रपात दोनशे फूट उंचीवरून कोसळत असतो. तो जेथे पडतो तेथे तयार झालेली घळ खोल आहे. धबधब्याचे पाणी पुढे खळाळत जाते आणि त्याची तयार होते ती बावनदी. ती नदी देवरुख शहराला लागून पुढे रत्नागिरीकडे जाते.        

         

अवधूत गगनगिरी महाराज श्रद्धाश्रम

मार्लेश्वर देवस्थानच्या गुहेच्या समोर धबधब्यातूनवाहत आलेल्या पाण्याच्या पलीकडे देऊळ दिसते. त्या देवळाची वास्तव कथा रोमांचकारी आहे. मार्लेश्वर गुहेच्या बाजूचा झरा मोकळा करणारे पवनगिरी महाराज यांनीच तेही देवस्थान उर्जितावस्थेस 1979 साली आणले आणि त्याचे परमपूज्य अवधूत गगनगिरी महाराज श्रद्धाश्रम असे नामकरण केले. पवनगिरी महाराजांनी स्वकष्टाने आवारात दोन विहिरी खणल्या, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधले. स्वयंपाकाची आणि जेवणाची सोय केली. कोल्हापूर येथील दैवज्ञ हायकर ह्या संस्थेकडून त्यासाठी नियमित मदत केली जाते. तसेच, मुंबईतील अन्य काही संस्थाही मदत करतात. पवनगिरी महाराज वयाच्या पंच्याऐशीव्या वर्षाच्या उंबरठ्यावर आहेत.

काही काळातच मार्लेश्वराला भक्तांचा ओढा वाढला. दरम्यान, गावातील कोणी पवनगिरी महाराजांवर देवाचा दागिना चोरल्याचा आळ घेतला. देवळात न्यायासाठी ग्रामस्थ जमले आणि मूळ चोर देवळातून रडत बाहेर आला. त्याने चोरीची कबुली दिली, पण त्यामुळे पवनगिरी महाराज दुखावले व त्यांनी देवस्थान सोडण्याचा निर्णय घेतला. पवनगिरी महाराजांनी स्वत: ही घटना मला सांगितली.      

मूळ मार्लेश्वर देवस्थान – मुरादपूर

मार्लेश्वर देवस्थानासंदर्भात दोन आख्यायिका रूढ आहेत. त्यांतील एक म्हणजे मार्लेश्वरटिकलेश्वर आणि महाबळेश्वर हे तिघे तपस्वी भाऊ देवरुखजवळीमुरादपुर गावी राहत होते. त्या तिन्ही भावांनी ते गाव जुलमी मुराद राजाच्या अत्याचारांना कंटाळून सोडले.त्यातील टिकलेश्वर पूर्वेला सह्याद्रीच्या टोकावर गेलेमहाबळेश्वर शेजारच्या गावात गेले, तर मार्लेश्वर हे थेट आंगवली गावी पोचले. तेथे काही वर्षे तपश्चर्या केल्यानंतर ते गावातील गजबजाटाला कंटाळून अंतर्धान पावले. मार्लेश्वर आंगवली गावातून गायब झाल्यामुळे मोठा गहजब उडाला. त्यानंतर आंगवलीतील सरदार अणेराव यांना ते शिकारला गेले असता मार्लेश्वर यांचे दर्शन सह्याद्रीच्या टोकावर एका गुहेत झाले. त्यांना ज्या दिवशी मार्लेश्वर यांचा शोध लागला तो दिवस होता मकर संक्रांतीचा. त्यामुळे त्या देवस्थानचा वार्षिक उत्सव त्या दिवशी साजरा होतो. मार्लेश्वर नावाच्या उत्पत्तीसंबंधात दुसरी आख्यायिका मारळ गावचे ईश्वर ते मार्लेश्वर इतकी साधी आणि सहज सांगितली जाते.

 अमित पंडित 9527108522

ameet293@gmail.com

अमित पंडित हे शिक्षक आहेत. ते दैनिक सकाळमध्ये पत्रकारिताही करतात. त्यांची सात पुस्तके प्रसिद्ध आहेत. ते विविध वृत्तपत्रे व मासिकांमधूनही लेखन करतात.

———————————————————————————————-

About Post Author

2 COMMENTS

  1. सरजी,लेख छान लिहलाय .तुमच्या लेखामुळे मार्लेश्वर स्थानाला उर्जितावस्था मिळण्यास मदतच होईल असे वाटते.© प्रा.पुरुषोत्तम पटेल,म्हसावद

  2. उत्तम माहितीपुर्ण लेख.देवस्थानाची डागडुजी झाली असून ते पर्यटन क्षेत्र घोषित करण्यात आले आहे,त्या अनुषंगाने पर्यटकांसाठी काही सोयी सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here