काय योगायोग, पाहा! विजय तेंडुलकर यांचा दहावा स्मृतिदिन आणि जागतिक हिंसाचारविरोधी दिवस हे जवळजवळ लागून, एकापाठोपाठ एक आले. त्यामुळे त्या घटनांना औचित्य लाभले. ही आठवडाभरा पूर्वीची गोष्ट. विजय तेंडुलकर यांनी हिंसाचाराचा, विशेषत: मानवात दडलेल्या हिंसावृत्तीचा शोध घेतला. तोच त्यांनी त्यांच्या नाट्यकृती व चित्रपटकृती यांमधून मांडला. मनुष्य हादेखील प्राणी आहे. त्याने त्याच्या प्राणीज विकृती संस्कृतीच्या आवरणाखाली दाबून ठेवण्याचा परोपरीने प्रयत्न केला आहे. परंतु अडचणीचे प्रसंग उद्भवताच संस्कृतीची ती आवरणे गळून पडतात व मनुष्यदेखील हिंस्र प्राण्यासारखा उघडावाघडा व्यक्त होतो. तेंडुलकर यांनी त्यांचे ते निरीक्षण कलात्मक रीतीने मांडले. त्यामुळे ते प्रभावी रीत्या व्यक्त झाले आणि परिणामतः लोक बिथरले. त्यांनी त्यांची नाटके बंद पाडली, त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले केले. तेंडुलकर त्या काळात कमालीचे शांत राहिले. त्यामुळे त्यांच्या पक्क्या चाहत्यांचा वर्ग जसा तयार झाला तसा त्यांच्याबद्दल मनात अढी बाळगून असलेला वर्गही तयार झाला. समाजात असे गट तयार झाले, की वस्तुनिष्ठता संपते. तसेच तेंडुलकरांच्या बाबतीतही घडले. त्यांच्या प्रतिपादनाचा वाद-प्रतिवाद फारसा खोलवर झाला नाही.
भारतीय परंपरेने माणसाचे विकार सहा मानले आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर! माणसाचे वर्तन त्या घटकांनी नियंत्रित होते. त्यांचा अतिरेक माणसाला विकृतीकडे नेतो. माणसाच्या हातून सर्व गुन्हे त्यामुळे घडतात. पांडुरंग खोत नावाच्या पोलिस अधिकाऱ्याने, त्यांनी शोध लावलेल्या दहा गुन्ह्यांच्या कथा सांगितल्या आहेत आणि दाखवून दिले आहे, की त्या गुन्ह्यांच्या मुळाशी षड्रिपूंपैकी कोणता ना कोणता विकार बळावला हे कारण आहे. उलट, त्या सहा विकारांचे यथायोग्य प्रमाण माणसाला सुकृतीकडे नेते. त्यामधून संस्कृती घडते. मला व्यक्तिश: ही मांडणी यथार्थ वाटते व आवडतेही.
या विकारांपलीकडे, माणसाच्या स्वभावप्रकृतीकडेही भारतीय परंपरा विधायक रीतीने पाहते. स्वभावप्रकृतीची सत्त्व-रज-तम अशा तीन प्रकारे विभागणी केली जाते. ‘तम’पासून ‘सत्त्व’पर्यंत जाणे हे माणसाचे इतिकर्तव्य असते असेही ती परंपरा निर्देशित करते. त्या आधी ‘स्वभावो दुरतिक्रम:’ किंवा ‘स्वभावाला औषध नसते’ हे बजावून सांगितलेले असतेच.
म्हणजे बघा, मनुष्य घडवण्याची ही प्रक्रिया आहे. ते भारतीय परंपरेचे वैशिष्ट्य जाणवते. पाश्चात्य वैज्ञानिकांनी व समाजशास्त्रज्ञांनी गेल्या दोन-तीनशे वर्षांत माणसाच्या शरीरप्रकृतीचा व मनोविज्ञानाचा विविध तऱ्हांनी शोध घेतला. त्यामधून माणसाच्या स्वभावप्रकृतीचे आणि तीमधील विकारांचे विश्लेषण सूक्ष्मतेने घडून आलेले आहे. त्यात प्रकृतीमधील बिघाडांचे व ते दुरुस्त करण्याचे वर्णन आहे, परंतु मनुष्य घडवण्याचे व प्रकृतीतील दोष दृगोचरच होणार नाहीत यासाठीचे उपाय नाहीत. मला आधुनिक अभ्यासातील एकूणच हे उणेपण जाणवते.
तेंडुलकरांनी तो आधुनिक अभ्यास हिंसाचाराच्या संदर्भात भारतात आणला. त्यामुळे वाचक-प्रेक्षक-श्रोते भयचकित झाले. त्यांनी माणसाची जगण्याची प्रबळ इच्छादेखील फार प्रभावी रीत्या व्यक्त केली, मात्र ते जगणे निरोगी, निर्विकार कसे होईल हा विचार फार पुढे नेला नाही. तसे सूचनही त्यांच्या कृतींमधून झाले नाही. त्यामुळे मनुष्यस्थितीचे वास्तव दर्शन प्रखरपणे झाले, परंतु उपाययोजना सुचवली गेली नाही. उलट, ते लेखक-कलावंताचे कामच नव्हे अशी त्यांची भूमिका होती.
– दिनकर गांगल