माधुरी दीक्षित – नेने (Madhuri Dikshit – Nene)

0
82

खळखळत्या हसण्यातून ‘मधुबाला’ची आठवण देणारी, पडद्यावर ‘एक-दोन-तीन ‘ गुणगुणत अवघ्या तरुण पिढीचा मूड पकडणारी, ‘हम आपके है कोन’ मधल्या, कौटुंबिक खट्याळपणामुळे ‘आजोबा’ पिढीलाही आवडणारी. धक् धक् करूनही ‘धसका’ न बसलेली, वयाची उत्सुकता कायम टिकवलेली, सिनेमा पार्ट्यात ‘न’ मिसळणारी, राजकीय लोकांत उठबस ‘न’ करणारी, कुठल्याही वलयांकित – गॉसिप प्रकरणात न अडकलेली,’प्रहार’सारख्या नाना पाटेकरांच्या सिनेमात ‘मेकअप’ न करण्याचा ‘प्रयोग’ करण्याचा आत्मविश्वास असलेली आणि ‘चोली के पिछे क्या’ चे चित्रण करतानाही ओंगळ न वाटणारी; उलट तरीही तद्दन फिल्मी रसिकांच्या मनात रेंगाळलेली आणि लग्नोत्तर दोन मुलांची आई होऊनही, पडद्यावरच्या पुनरागमनाची उत्सुकता टिकवलेली, रजतपटलावरचे सौंदर्यसम्राज्ञीपद टिकवलेली माधुरी दीक्षित.

डिवाईन वाईल्ड स्कूल या कॉन्व्हेंन्ट स्कूलमधे असल्यापासूनच नृत्याची
लय सांभाळलेली, महाविद्यालयीन काळातच राजश्री प्रॉडक्शनच्या ‘अबोध’ सिनेमाद्वारे (दिग्दर्शक-रघुवीर कुल) पडद्यावर एण्ट्री घेतलेल्या, कथकच्या राष्ट्रीय शिष्यवृत्तीमुळे आणि अजय जडेजाला हसण्यात ‘बीट’ करत, त्याच्यासह जाहिरातीत झळकून स्वत:विषयी उत्सुकता निर्माण केलेली, साध्या संगीतनृत्यप्रेमी उद्योजक घरातून येऊनही कुठल्याही गॉडफादरशिवाय या वलयाच्या जगात यशोशिखरावर पोचलेली, सर्वार्थाने नाव-यश-पैसा लोकप्रियता मिळाल्यावरही, आजोळयाच्या गावी, रत्नागिरीच्या बाजारात निवांतपणे कुळथाचे पीठ खरेदी करु शकणारी, संसाराच्या उंबरठयावर असताना नव्या ‘देवदास’मध्ये ऐश्वर्याच्या तोडीस तोड पदन्यास करत नृत्यातून पेश होणारी, श्रीराम नेनेंच्या नॉन फिल्मी घरातल्या डॉक्टरांशी विवाहबध्द होऊन, आरीन आणि रायन या दोन सुंदर छोक-यांची आई झाल्यावरही, ‘ग्लॅमर तूसभरही कमी न झालेली, रसिक प्रेक्षकांची सुदंर सखी….माधुरी.

अंधेरीच्या जे.बी नगरातल्या नॉन ग्लॅमर घरात वाढत असताना, झोकून देऊन सिनेमा पाहणारी ‘हाथी मेरे साथी’ मध्ये राजेश खन्नाने हत्तीला मारताना पाहिल्यावर ढसाढसा रडलेली! शास्त्रीय संगीत शिकलेली आई लाभल्यामुळे नृत्य आणि गाण्याची आवड उपजत असणारी, त्यामुळेच सार्वजनिक कार्यक्रमात ऐनक्षणी ‘गगनी मोरी भरन नाही…….’ सारखी चीज पेश करणारी सुरेल माधुरी. गल्लाभरू आणि आर्ट फिल्म दोन्ही डगरींवर स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवलेली! एन चंद्रा (तेजाब,वजूद), प्रकाश झा (मृत्युदंड) अशा प्रयोगशील दिग्दर्शकापासून ते बॉडी लॅंग्वेज शिकवलेले सुभाष घई (खलनायक) प्रथितयश यश चोप्रांपर्यंत सा-या दिग्दर्शकांच्या सिनेमांतून झळकलेली स्टार. सलमान खान – संजय दत्त यांच्याबरोबर आरंभीच्या काळातच ‘साजन’ सिनेमा करुनही कुठेही त्यांच्या गोधंळात ‘न’ अडकलेली. अमीर खानबरोबर ‘दिल’सारख्या ‘कॉमेडी’ चित्रपट ‘हंड्रेड डेज’सारख्या सस्पेन्स चित्रपट, शाहरुख खानच्या ‘कोयला’सह सर्व खान बंधूंनी स्वीकारलेली अभिनेत्री; तरीही ‘बेटा’च्या निमित्ताने अनिल कपुरबरोबर येऊन पडद्यावर त्याच्यासह अनेक चित्रपटांत जोडी जमून ‘धकधक’ वाढवलेली. ‘हम आपके है कौन’मुळे तीन ते ऐंशी अशा सर्व वयोगटांत हीट ठरलेली अभिनेत्री. एम.एफ.हुसेनसारख्या आंतरराष्ट्रीय चित्रकाराला तिच्यासह ‘गजगामिनी’ चित्रपट निर्मिण्याचा मोह झालेली सौंदर्यसम्राज्ञी. ‘देवदास’मधील माधुरीच्या ‘चंद्रमुखी’च्या भावमुद्रा टिपणारे चित्रप्रदर्शन हुसेन यांनी 2002 साली ताओ आर्ट गॅलरीत धुमधडाक्यात भरवले होते. तेव्हा प्रत्यक्ष माधुरी आपल्या पतीसह हजर होती.
सहजता, मोकळेपणा, चेह-यावरील विलक्षण बोलके भाव ही माधुरीला मिळालेली देवदत्त देणगी आहे.’तू आधी माणूस आहेस, मग स्टार’ असे वास्तवाचे भान आई, वडील, भाऊ, बहीण यांनी जागृत ठेवल्याने सुपरस्टार होऊनही जमिनीवरचा ‘पाय’ न ढळलेली, अगदी साधीसुधी, निगर्वी तारका. टीका करणा-या स्पर्धक नटीवरसुध्दा ती भाष्य करत नाही, इतका सभ्यपणा जपलेली तारका. खाणे-गाणे माणसांत रमणे यांची मनापासून आवड. त्यामुळे दीक्षित वा नेने घरच्या नात्यातल्या लग्नात ती सहजतेने मिसळते आणि फिल्मी पुरस्कराच्या सोहोळयातही सफाईने ‘एण्ट्री’ घेऊ शकते.

उकडीचे मोदक, बटाटा पोहे, तिळा गुळाची-पुरणाची पोळी आणि आईच्या हातच्या चकल्या हे तिच्या आवडीचे खास पदार्थ. ग्रीन मसाला फ्रिश करीही आवडते. अमेरिकेत श्रीरामाच्या शोधात भटकताना ‘आईस्क्रिम’ चे सारे ढंग चाखण्यात रस घेतलेला. खाणे मनापासून खाऊनही वजन 51 किलोच्या आसपास राहील याची दक्षता घेतलेली. त्यामुळे संसारी-मुलाबाळांची आई झाल्यावरही तिचा शिडशिडीत बांध्यातला सुंदर शेलाटी फोटो पडद्यावरच्या पुनरागमनाच्या निमित्ताने ‘फिल्मफेअर’ला छापावसा वाटण्याचा मोह झालेला गौतम राजाध्यक्षांसारख्या जगद्विख्यात छायाचित्रकाराला ‘कॅमे-यात’ केव्हाही पकडावीशी वाटणारी मैत्रीण. डेन्नवरला (अमेरिकेत) सासरी डॉ श्रीराम नेनेंच्या घरी ‘लायन कॅट’ सहा आणि मेलवीन बोक्याला ममत्त्वाने कुरवाळणारी आणि पुण्यात पं.भीमसेन  जोशीच्या दारी त्यांच्या आवडत्या कुत्र्याशी खेळण्यातही दंग होणारी प्राणिमित्र

माधुरी.

किशोरी अमोणकर, पंडित जसराज, भीमसेनजींचे गाणे आस्वादपूर्वक ऐकणारी. नृत्य शिकवणा-या वसंतराव घाटगेंची आठवण करुन देणारी 15 ‘मे’ला घरच्या मंडळीबरोबर साजरा करणारी ‘चिचिज’ कन्या. माधुरीला बलराज सहानी, ग्रेगरी, इन्ग्रीड बर्गमन, नूतन, नर्गिस ही कलावंत मंडळी आवडत असली तरी तिचा ‘ड्रीममॅन’ आहे ‘विन्स्टन चर्चिल’.

लय – जोश – रंग -सुर – सारे जुळलेली स्टार अभिनेत्री माधुरी दीक्षित जिच्यावर मंगेश पाडगावकरांसारख्या मराठीतल्या ज्येष्ठ कवींना कविता

करण्याचा मोह झाला.

तू गडे धडकन दिलांची, तू सुखाची यामिनी

तरुण स्वप्नांची दिवाण्या, तू सुखाची स्वामिनी

आज पण माझ्या वयाने,रक्तदाबच साहिले

माधुरी दीक्षित तुला, नाही कधी मी पाहिले.

About Post Author

Previous articleनाट्यकलाकार – डॉ. शरद भुथाडिया
Next articleएक झंझावती व्यक्तिमत्त्व – मेधा पाटकर
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.