नाशिक जिल्ह्यातील छोट्या गावचा अर्धशिक्षित मुलगा मुंबईत येतो आणि छोटीमोठी कामे करत एका कंपनीत कामगाराची नोकरी पत्करतो. सतत रात्रपाळी करून बी कॉम, एलएल बी, एमएलएस होतो आणि कामाच्या ठिकाणी प्रगती करत जातो. व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण घेऊन त्याच कंपनीत पर्सोनेल अधिकारी होतो आणि त्या ठिकाणी एका टप्प्यावर त्याच्या गुणांना अटकाव बसतो, तेव्हा कंपनी बदलून नव्या नोकरीत जातो. अंतिमत: अमेरिकन फायझर (भारत) औषध कंपनीत एक संचालक या पदावर स्थिरावतो.
ही कहाणी आहे माधव सावरगावकर या कर्तबगार व्यक्तीची. त्यांची त्यांच्या आयुष्याचे सार कथन करणारी तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तिन्ही पुस्तकांचे स्वरूप वेगवेगळे आहे. ‘इवलेसे रोप’ या पुस्तकात त्यांच्या यशाची कहाणी वर्णन करून सांगितलेली आहे. दुसऱ्या ‘गावगोत’ पुस्तकात त्यांच्या गावचे कथा-प्रसंग येतात आणि तिसऱ्या ‘कथा कारखान्यातल्या’ या पुस्तकात त्यांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणच्या गोष्टी सांगितल्या आहेत. पुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणजे माधव सावरगावकर यांनी ती आत्मकथनात्मक लिहिलेली नाहीत; तर त्यांनी त्यांच्या प्रगतीच्या काळातील हकिगती सांगितल्या आहेत. त्यांची हातोटीही कथाकथनाची आहे. त्यामुळे त्यांना गोष्टी म्हणता येईल. त्या गोष्टी सांगण्यासाठी त्यांनी ‘यशा’ नावाचे नायक पात्र निर्माण केले आहे. निवेदन तृतीयपुरुषी आहे. पुस्तकांमध्ये त्यांचे आईवडील, बहीण-मेव्हणे, मित्रपरिवार; एवढेच काय त्यांचे प्रेमप्रकरण – त्यातून झालेले लग्न असे अनेकानेक उल्लेख येतात. कारखान्यातील गोष्टी व व्यक्तिचित्रे ही येतातच येतात. मात्र त्यांनी त्यांची अस्सल/खरी नावे, संदर्भ असे काही नमूद केलेले नाही. त्यामुळे त्या सर्व कथा-गोष्टींना बोधकथांचे आणि नीतिकथांचे स्वरूप लाभले आहे.
महत्त्वाची गोष्ट अशी, की त्यांचा काळ आजचा, म्हणजे वीस-पंचवीस वर्षांपूर्वी तंत्रज्ञान अवतरण्यापूर्वीचा आहे. मुंबई-महाराष्ट्रात औद्योगिकीकरण पसरू लागले तेव्हाचा, साधारण, 1960 ते 1990 चा तो काळ. महाराष्ट्रभरातून शिक्षित-अर्धशिक्षित तरुण नोकरीच्या आशेने मुंबईकडे येत राहिले. काहींना येथे यश लाभले. काही तसे परिस्थितीशी झुंजत राहिले. त्या काळातील औद्योगिक कंपन्यांचे वातावरण सावरगावकर यांनी यथार्थ टिपले आहे. ते वातावरण प्रक्षुब्ध असले, कामगार संघटनांचे आणि आंदोलनांचे असले तरी समाजाची एकूण दिशा प्रगतीची व विकासाची होती. त्यामुळे गरिबी भासली तरी सर्वत्र हवा चांगुलपणाची होती, माणुसकीची होती. या तीन पुस्तकांचा आशय एका वाक्यात सांगायचा झाला तर ‘यशा’ची आई ‘माई’ यांनी म्हटले आहे, की ‘जगात चांगली माणसं आहेत म्हणून जग चाललंय’. यशाचा जगाच्या चांगुलपणावर फार विश्वास आहे. त्यामुळे त्या गोष्टींना बोधकथा/नीतिकथा यांचा बाज येतो. त्यामुळे त्यांतील पात्रे निष्पाप-भाबडी आहेत. दुष्टावा आहे तो प्रासंगिक. माणसे मुळातच खलवृत्तीची नाहीत; पण तो काळ होताही तसाच – अभावाचा, म्हणून माणसांनी खूप कष्ट करण्याचा, धडपडत राहण्याचा. त्यामुळे सावरगावकर यांच्या कथा ओढीने वाचल्या जातात. वाचक तिन्ही पुस्तके वाचून माधवरावांच्या असाधारण यशस्वी कारकिर्दीने दिपून जातो व दुसऱ्या बाजूस, विशेषत: ज्येष्ठ वाचकांची भावना तो काळ तर त्यांनी पाहिलेला, अनुभवलेला; ‘तो इतका चांगला, सुखासमाधानाचा होता? आश्चर्यच आहे’ अशी होते.
त्यामुळेच तिन्ही पुस्तके वाचल्यानंतर मला आठवण झाली ती श्री.ना. पेंडसे यांच्या ‘लव्हाळी’ कादंबरीची. ती दैनंदिनी स्वरूपात लिहिलेली कादंबरी आहे. सर्वत्र टंचाईचे वातावरण, रेशनिंग सुरू झालेले. अशा त्या काळात गिरगावात राहणाऱ्या निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांनी परिस्थितीला कसे तोंड दिले याची ती हृदयद्रावक कहाणी आहे. गिरगावात त्या काळात वस्ती स्थिरावत व विस्तारतही होती. माधव सावरगावकर यांच्या तिन्ही पुस्तकांचा आशय स्वातंत्र्योत्तर प्रगतीच्या काळाचे आशादायक चित्रण करणारा आहे. त्यामधील सारी माणसे एखाद-दोन अपवाद वगळता सरळ साधी व आपण बरे आपले काम बरे अशा समाधानी वृत्तीची आहेत. ती उपनगरांत राहणारी मुलुंड ते कल्याण परिसरात वावरणारी आहेत. त्यांची झटापट झोपडी, ‘रूम’ मिळवण्याची आहे. सावरगावकर यांच्या तिन्ही पुस्तकांतील माणसे प्रातिनिधीक आहेत असे निश्चितच म्हणता येईल. तथापी, मीडिया पत्रकार प्रसन्न जोशी या पुस्तकांच्या प्रकाशन समारंभात म्हणाले त्याप्रमाणे या कथा मॅनेजमेंटच्या म्हणजे सुस्थापितांच्या बाजूच्या आहेत. त्याच काळात कामगारांच्या दुसऱ्या बाजूला प्रखर असंतोषही दिसून येत होता. सावरगावकर यांनी दत्ता सामंत व अन्य कामगार नेते यांच्या माध्यमातून ती बाजूही पाहिली आहे. त्यांना त्यांच्या कारखान्यातही तसा अनुभव आला असेल. सावरगावकर यांनी ते चित्रण आता करावे. कथालेखक-कवी किरण येले त्या प्रतिपादनास जोड मिळेल असे त्याच समारंभात म्हणाले, की “सावरगावकर यांच्या गोष्टी वाचनवेधक आहेत. त्यांनी त्यांतील माणसांचा अधिक शोध घ्यावा. ते चांगल्या कथा लिहू शकतील अशी लेखनशैली त्यांना लाभली आहे.”
स्वत: सावरगावकर यांनी आधीच स्पष्ट केले होते, की ते गप्पागोष्टींच्या मैफली रंगवू शकत. ते कौशल्य म्हणजे गप्पागोष्टी सांगण्याची हातोटी त्यांना लाभलेली आहे. तसा दाखला या तीन पुस्तकांत ठायी ठायी दिसतो. त्याच बरोबर, या तिन्ही पुस्तकांतील घटना व व्यक्ती यांमध्ये मोठमोठी कथाबीजेही दडलेली आहेत. ती वाचकांच्या मनामध्ये अधिक वाचण्याची ओढ निर्माण करू शकतात. सावरगावकर यांनी गावाकडच्या ‘रंगी’ नावाच्या महिलेचे चित्रण केले आहे. ते असे विलक्षण गूढ व नाट्यपूर्ण आहे, की त्या ‘रंगी’च्या जीवनाबद्दल अधिक जाणून घेण्याचे औत्सुक्य जागे होते. उलट, ‘मोठी माँ’ हा छोटा किस्सा आहे. त्याचा शेवट शांतता व समाधान निर्माण करतो. कारण त्या किश्श्यामधील ‘मोठी माँ’ त्यांच्याकडे आलेल्या मुनी महाराजांना निर्धाराने सांगते, “महाराज, तुम्ही आमच्या घरी अन्न घेतल्यास आम्ही दोघे यापुढे ब्रह्मचर्य व्रत पाळू.” अशा प्रत्येक गोष्टीला तात्पर्य आहे आणि ते उद्बोधक मूल्यात्मक आहे.
सावरगावकर यांनी ‘परदेशी पाखरू’ या कथेत विकासची गोष्ट सांगितलेली आहे. तीही लोकविलक्षण छंदाच्या ओढीची आहे. विकास पक्षी पाळण्याच्या छंदापोटी दहा लाख रुपयांचे कर्ज करून बसतो आणि त्यातून केवळ सद्भावनेने सावरला कसा जातो याची कहाणी मोठी विलक्षण आहे. पण अशा असाधारण गोष्टींमधील नाट्यात्मकता पकडण्यापेक्षा सावरगावकर यांचा कल आहे तो सरळ साध्या रोजच्या घटनांवर, त्यातून दिसणाऱ्या सरळमार्गी माणसांवर व त्यांच्या संबंधातील घटनांच्या आकर्षक निवेदन शैलीवर. त्या आधारे ते वाचकावर छाप मात्र जबरदस्त टाकू शकतात.
या तीन पुस्तकांचे लेखन झाले व त्यांची निर्मिती झाली ती कहाणीही वेगळीच आहे. स्वत: सावरगावकर यांनी व प्रकाशक संजय शिंदे यांनी ती प्रकाशन समारंभात सांगितली. सावरगावकर व त्यांच्या पत्नी संध्या ही दोघेजण कोरोना काळात देवळालीला अडकून पडलेली होती. सावरगावकर यांनी तेथे काय करावे म्हणून लेखनास सुरुवात केली. त्यांना फोनवरून दाद देण्यास राणी दुर्वे व सुनंदा भोसेकर या दोन लेखिका होत्या. त्या दोघी त्यांच्या नात्यातील, परिचयाच्या. सावरगावकर यांनी अशी देवळालीला बसून दोन-तीन हजार पाने लिहिली. मग अनुपमा उजगरे या त्यांच्या स्नेही लेखिकेने ती संस्कारित व टंकलिखित करून दिली. तो खटाटोप दीड-पावणेदोन वर्षे चालू राहिला. तेव्हा त्या गटात अवतरले संजय शिंदे हे तरुण, उत्साही प्रकाशक. त्यांची पुस्तक निर्मितीतील घटकांची जाण उत्तम. त्यामुळे त्यांनी हार्ड बाऊंड व सुरेख आणि सुंदर मुखपृष्ठे ल्यालेली, ऐवज वाटेल अशी तीन पुस्तके निर्माण केली. पुस्तक निर्मितीतील असा चोखंदळपणा अलिकडे कमी पाहण्यास मिळतो. त्यामुळे पुस्तकांच्या आशयास वजन प्राप्त झाले आहे.
माधव सावरगावकर 9820301035 madhav.sawargaonkar@pfizer.com
– दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
———————————————————————————————-