माणकेश्वर मंदिराचे सुंदर नक्षिकाम

0
97
carasole

माणकेश्वर गाव उस्मानाबाद जिल्ह्याच्या बार्शी – भूम रस्त्यावर आहे. गाव भूम तालुक्यात आहे. ते बार्शीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. माणकेश्‍वर गावाची लोकसंख्या चार-पाच हजार. तो कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. आजुबाजूचा परिसर सपाट जमिनीचा असून, जमीन काळी ते हलक्या स्वरूपाची आहे. ज्वारी, बाजरी, तूर, कापूस अशी हंगामी व पावसाळी पिके.

माणकेश्‍वर गावची शिव-सटवाईची मंदिरे प्रसिद्ध आहेत. दोन्‍ही देवतांची मंदिरे शेजारी आहेत. त्‍यामुळेे त्‍यांचा उल्‍लेख एकत्रितपणे ‘शिव-सटवाई’ असा केला जातो. त्‍यापैकी शिवमंदिर हे माणकेश्‍वर मंदिर या नावाने प्रचलित आहे. ते भूमिजा शैलीतील आहे. लोक त्यांच्या घरच्या लहान मुलांचे जावळ (केस) काढण्यासाठी शेजारी असलेल्‍या सटवाई देवीला सतत येत असतात. सटवाई ही ग्रामस्थ देवी. शेंदूर लावलेले लंबुळाकार असे तिचे रूप असते. तिची मूल जन्मल्यानंतर सहाव्या दिवशी ‘सष्टी’ पुजण्याचा प्रघात आहे. त्या दिवशी सटवाई मुलाचे भाग्य त्याच्या कपाळावर लिहिते असा समज आहे. सटवाईच्या भोवती दोन किंवा तीन फूट फंच दगड रचून केलेला आडोसा असतो (बांधकाम केलेले नसत).

माणकेश्वर मंदिर नक्षिदार आहे. ते कमी आकाराच्या जोत्यावर मंदिर उभारले गेले आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून, ते गावाच्या पूर्व दिशेला आहे. मंदिराच्‍या शेजारून वाहणारी नदी मंदिराला वळसा घालून पुढे गेली आहे. मंदिराच्या पायऱ्या चढून गेल्यावर मुख्य मंडप लागतो. त्या ठिकाणी चार अर्धस्तंभ आहेत. स्तंभांवर विविध नक्षिकाम केलेले आहे. मुख्य मंडपातील प्रत्येक ठिकाणी सुंदर नक्षिकाम आढळून येते. त्या ठिकाणी सुंदर कलाकृती काढलेल्या आहेत. तेथेच बसण्यासाठी कक्षसुद्धा आहे. मुख्य मंडपातून पुढे गेल्यावर आत सभामंडप लागतो. सभामंडपात आठ पूर्ण स्तंभ आहेत. तळखडा, स्तंभमध्य, आयताकार, चौकोनी, हस्त, फलक, नागबंध अशी स्तंभांची वैशिष्ट्ये पाहण्यास मिळतात. सभामंडपात मुख्य चार व आजुबाजूला इतर अनेक स्तंभ आहेत. मंडपातच रंगशाळा बघण्यास मिळते. पूर्वी कलाकार त्यांची कला प्रथम मंदिरात देवासमोर सादर करत.

सभामंडपाच्या पुढील भागात अंतराळ लागते. अंतराळात पूर्ण स्तंभ दोन आहेत. पूर्वीच्या काळी अंतराळ हा उघडा (खुला) असायचा, कारण अंतराळ म्हणजे आकाश हा अर्थ तेथे अभिप्रेत होतो. तेथे चौकोनी वितान असून त्यावर सुंदर कोरीव काम केलेले आहे. अंतराळातून पुढे गेल्यावर गर्भगृह लागते. गर्भगृहाच्या चारी कोपऱ्यांत पूर्ण स्तंभ आहेत. त्यावरही वितान आहे. गर्भगृहाच्या मध्यभागी सुंदर असे शिवलिंग असून ते आठ फूट खोल गाभाऱ्यात आहे.

मंदिराच्या बाह्यभिंतींवर विविध शिल्पे, मूर्ती आहेत. मुख्य मंडप जेथे सुरू होतो तेथील खालच्या भागावर अर्ध स्तंभ आहेत. त्यामध्ये छोट्या कोरीव सुरसुंदरी काढलेल्या आहेत. शिस्त-आशिस्त रेषा काढलेल्या दिसतात. त्यातून छाया व प्रकाश यांची काळजी घेऊन मंदिर बांधले गेले असावे. अनेक सुरसुंदरी मंदिराच्या बाह्यभागांवर, अंतर्गत भागांवर आहेत. मनुष्याने मंदिरात प्रवेश करताना सर्व वासना बाहेर ठेवून प्रवेश करावा या हेतूने ह्या सुरसूंदरी कोरल्या गेल्या असाव्यात. तेथे माता-बालक, विषकन्या, मृदंगवादिनी अशा विविध सुरसुंदरी आहेत. देवदेवतांच्या काही मूर्ती आहेत. त्यामध्ये शिव, सरस्वती, विष्णू, इंद्रदेव यांच्या प्रतिमा आहेत. शिवाय, चामुंडेची मूर्ती असावी. कारण तिच्या गळ्यात नरमुंडी माळ दिसून येते. ती मूर्ती चतुर्भुज असून खालचे दोन्ही हात भग्न आहेत. काही चरमटधारिणी आहेत. मंदिरातील व गाभा-यातील पाणी बाहेर जाण्यासाठी बनवलेले मकरमुख कलाकृती पाहण्यासारखी आहे. मंदिराचे शिखर अस्तित्वात नाही.

शिवाजी महाराजांना पकडण्‍यासाठी अफझलखान महाराष्‍ट्रावर स्‍वारी करून आला. वाटेत त्‍याने अनेक हिंदू मंदिरे उध्‍वस्‍त केली. माणकेश्‍वरचे मंदिर त्या मंदिरांपैकी एक होते, असे स्‍थानिकांचे मानणे आहे. त्‍यानंतर औरंगजेबाकडून महाराष्‍ट्रातील मंदिरे तोडण्‍यात आली. त्‍याही वेळी माणकेश्‍वर मंदिराचे नुकसान झाले. मंदिराच्‍या भिंतींवरील अनेक मूर्ती तुटलेल्‍या अवस्‍थेत आढळतात. सहसा शिवमंदिराची रचना चार बाजूला चार छोटी मंदिरे आणि मध्‍यभागी मुख्‍य मंदिर अशी केलेली असते. गावक-यांच्‍या सांगण्‍यानुसार, पूर्वी माणकेश्‍वर मंदिराची रचना त्‍या प्रकारची होती. आता मात्र केवळ मुख्‍य मंदिर उरले आहे. मंदिराशेजारी दिसणारे दगड आणि भग्‍न मूर्ती यावरून पूर्वी तशी रचना असावी, असा अंदाज बांधता येतो.

मंदिराचे काही अवशेष देवळाच्या छतावर पाहण्यास मिळतात. छतावर चारी बाजूंनी हत्तीच्या नक्षींची रांग आहे. मंदिर नक्की कधी बांधले गेले, त्याचा कालावधी माहीत नाही. त्या परिसरात कोठेही मोठे दगड सापडत नाहीत. मात्र मंदिराचे बांधकाम आकर्षक व कोरीव दगडांत आहे. मंदिरात कोठेही अशी जागा शिल्लक नाही जेथे नक्षिकाम केले गेले नाही. चैत्र महिन्‍यात माणकेश्‍वर मंदिरात यात्रा भरते. त्‍यास दूरवरून लोक येतात.

– गणेश पोळ

Last Updated On – 22th Jan 2017

About Post Author