संतोष गावडे हा एकोणतीस वर्षांचा तरूण. आईवडिलांनी थोडीफार शेती आणि बाकी मजुरी करून संतोष आणि त्याच्या भावंडांचे शिक्षण केले. संतोषने पुण्यात बी.ए.ला असताना गावातील प्रश्नांबाबत काम करण्याचा निर्णय घेतला. पुढे त्याने पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले. ऑगस्ट २०१० मध्ये तो गावी परतला. त्याच्या गावी परतण्याने त्याचे कुटुंबीय नाराज झाले. मात्र त्याच्या कामाचे वर्तुळ वाढीस लागल्याबरोबर घरच्यानाही त्याच्या कामाचे महत्त्व पटू लागले. संतोषने ‘निर्माण’मधील त्याच्या सहकारी मुलीशी सामुहिक विवाह सोहळ्यात विवाह केला. हे जोडपे ग्रामविकासासाठी कार्य करते. जर गावाचा विकास व्हायचा असेल, तर गावक-यांनी स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, असे संतोष सांगतो. सध्या गावक-यांसाठी रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्धत करून देण्यासाठी संतोष प्रयत्नशील आहे.
शेवटी, नोकरी न करता मी माझ्या गावी परत जाण्याचा आणि ग्रामविकासा ची कामं करण्याचा निर्णय घेतला. मला अनेक प्रश्न पडले होते. गावात जाऊन कामं कोणती करायची? शिक्षण घेऊन नोकरी न करता गावात परतलो तर लोक काय म्हणतील? ज्या आई-बाबांनी रोजमजुरी करून शिक्षणाला पैसे पुरवले त्यांनी बघितलेल्या स्वप्नांचं, त्यांच्या अपेक्षांचं काय? एक ना अनेक….
पण माझ्या स्वत:च्या प्रश्नांपेक्षा मी ज्या गावात जन्मलो, लहानाचा मोठा झालो त्या गावाच्या समस्यांचं काय? असं मला वाटत होतं. गावात समस्या अनेक होत्या. त्यांचा अनेकांच्या आयुष्याशी थेट संबंध होता. ज्या समस्यांनी गावकर्यांचं जगणं असह्य व्हावं अशा समस्यांत गाव अडकलं होतं. त्या समस्या दूर कोण करणार? त्यासाठी आपण स्वत:ला गाडून घेतलं तर काय होईल? आणि तिथं उपयोगी ठरला ‘निर्माण ’चा मूलमंत्र- ‘कर के देखो’! दुसरी बाब म्हणजे आपण शिक्षण घेतो ते कशासाठी? आपलं भलं व्हावं, आई-वडिलांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरावं, आपल्या कुटुंबाला सुखसमृध्दीचं जिणं जगता यावं वगैरे वगैरे. पण मी माझ्या कक्षा अजून थोड्या रुंदावल्या…. माझ्या कुटुंबाप्रमाणे गावाला, समाजाला माझ्यासारख्या शिकलेल्यांची गरज आहे, असा विचार त्या निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचा ठरला. परतीच्या त्या प्रवासात अभय बंग यांनी सुरू केलेल्या ‘निर्माण’ या शिक्षणप्रणालीचा व ‘युनिक फिचर्स ’चा मोठा वाटा आहे. मी त्यांच्या बरोबर फेलो म्हणून पाणीप्रश्ना चा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरलो. अनेक अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, संस्था यांना भेटी दिल्या, आदर्श गावे बघितली. त्यामुळे नेमके प्रश्न कोणते व ते कसे सोडवता येतील यांविषयीची समज येण्यास मदत झाली.
आपल्या रोजच्या जगण्यात आजुबाजूच्या समस्या आपल्या अंगवळणी पडत जातात. पण आम्ही ‘निर्माण’प्रक्रियेत आजुबाजूला डोकावून पाहायला शिकतो. त्यामुळे समस्या जाणवू लागतात. त्या सोडवण्यासाठी आपण धडपडू लागतो आणि तेच माझ्याबाबत घडलं आणि मी पुण्यासारख्या शहरातील नोकरीच्या संधी सोडून माझ्या गावचा रस्ता धरला!
भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आपल्यापासून प्रयत्न व्हावेत म्हणून आम्ही गावकर्यांनी धान्याबरोबर रॉकेलचा काळा बाजार गावपातळीवर थांबवण्याचा प्रयत्न केला. गावात रॉकेलचं वाटप सुरळीत होत नव्हतं. तरी कुठलीही तक्रार न करता आम्ही रॉकेल विक्रेत्याला चार वेळा विनंती केली, की शासकीय नियमाप्रमाणे रॉकेल देण्यात यावं. ते त्यांनी मान्य केलं नाही. त्यामुळे तहसिलदारास विनंती करून दुसर्या किरकोळ विक्रेत्याद्वारे गावात रॉकेलचं वाटप केलं. त्यावेळी तहसीलदार राजेंद्र जाधव यांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्या सगळ्या प्रक्रियेत गावाला रॉकेल दोन महिने मिळालं नाही; तरीसुद्धा गावकरी या मतावर ठाम होते, की आम्हाला शासकीय दरात व शासकीय नियमानं रॉकेल मिळायला हवं. म्हणजे गावकर्यांनी आमच्या गावापुरता भ्रष्टाचार मोडून काढला. त्या दिवसापासून गावकर्यांनी भ्रष्टाचारमुक्त गाव असा जणू संकल्पच सोडला. लोकांना रॉकेल, धान्य मिळू लागलं तसं गावात सकारात्मक वारं वाहू लागलं. शिवाय, गावातल्या मीटिंगा, व्याख्यानं, चर्चा यांद्वारे लोकांना ग्रामविकासाची चाहूल लागली.
‘मग काय विहीर खोदण्यास सुरुवात करू’ असं जमलेल्या सर्व गावकर्यांना मी म्हणालो.
काही म्हणाले हे शासनाचं काम आहे. तर काहीजण हसू लागले. काहींच्या मते, हे कसं शक्य आहे?
मी म्हणालो, ‘सर्व गावानं मनावर घेतलं, कष्ट करण्याची तयारी दाखवली तर हे सहज शक्य होईल. गावातल्या प्रत्येक महिलेनं व पुरुषानं दोन दिवस विहिरीवर श्रमदान करायचं.’
महिला काम करायला तयार झाल्या! काम सुरू झालं. हळुहळू पुरुषही विहिरीवर कामाला येऊ लागले. जसजशी विहीर खोल खोदली जाऊ लागली, तसं लोकही उत्साहानं काम करू लागले. दिवसभर महिला तर रात्री तरुण मुलं काम करत. दीड महिन्यांत विहीर खोदून झाली. विहिरीला मुबलक पाणी लागलं. गावकरी खूष झाले. विहिरीसाठी प्रत्येकजण झटला होता. विहीर प्रत्येकाला आपली वाटत होती. दीड महिन्यात ‘चला श्रमदान करायला’ असा शब्दच प्रचलित झाला.
दुसरं उदाहरण म्हणजे तरुण मंडळी रात्री गावातल्या विहिरीचं खोदकाम करत. खोदकाम चालू असताना जंगलात आग लागल्याचं तरुणांच्या लक्षात आलं. वनपरिक्षेत्र अधिकारी, सामदेकर यांना माहिती देताच तेही रात्री अकरा वाजता आमच्या गावात हजर झाले. रात्रीच वीस-पंचवीस जणांचं टोळकं जंगलातील आग विझवण्यासाठी निघालं. रात्रभर जंगल विझवण्याचे प्रयत्न केले, तेव्हा सकाळी-सकाळी आग आटोक्यात आली. आगीनं जंगलाचं होणारं लाखो रुपयांचं नुकसान तरुणांच्या सहकार्यानं टाळता आलं! सामदेकर म्हणाले, ‘लोक स्वत:हून जंगल विझवण्यासाठी तयार झाले ही बाब माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आहे. लोकांना जंगल आपलं आहे आणि ते वाचवण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे ही जाणीव गावकर्यांत निर्माण झाली. अशी उदाहरणं फार कमी पाहायला मिळतात.”
विहीर पूर्ण झाल्यामुळे लोकांच्या विकासकामाबाबतच्या अपेक्षा वाढू लागल्या. पण आता एक अट घातली. ती म्हणजे प्रत्येकानं ग्रामपंचायतीचा कर भरावा. म्हणजे अजून विकासकामं करता येतील! आणि लोकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं की पाच दिवसांत साठ टक्के वसुली झाली. ही सर्वांसाठी आश्चर्याची बाब होती, कारण गेल्या अनेक वर्षापासून लोकांनी कर भरला नव्हता. लोकांचा विश्वास संपादन केला की लोक सहकार्य करतात, कारण प्रत्येकाला विकास हवा असतो.
हातभट्टीची दारू हा धंदा मोठ्या प्रमाणात गावात चालू होता. गावात दारू पिणार्यांची संख्या बरीच होती. बाजूच्या गावचे लोकसुद्धा दारू पिण्यासाठी गावात येत. जेव्हा-जेव्हा महिलांच्या मीटिंग होत तेव्हा काही महिला दारूचा मुद्दा पोटतिडकीनं मांडत. घरात खायला काहीच नाही या चिंतेनं दिवसभर रानात राब-राब राबायचं आणि रात्री दारूड्या नवर्याचा मार खायचा, हे चित्र त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होई. पण दारुबंदीचा मुद्दा तेव्हा हातात घेणं उचित नव्हतं. कारण पुरुष मंडळी विरोधात गेली असती आणि माझी शक्ती विरोध दडपण्यातच पणाला लागली असती. म्हणून तो मुद्दा उशिरा हाती घेतला. त्यात ठाणेदार ज्ञानेश्वर देवकते यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. गावात व तांड्यात महिला व पुरूष दारुबंदी समिती तयार केली गेली. समिती गावातल्या दारुड्यांवर व हातभट्टी पाडणार्यांवर लक्ष ठेवे. गावात दारू पाडली जात आहे असं कळताच समितीतील सदस्य पोलिसांना कळवत. पोलिस गावात येऊन, शहानिशा करून संबंधित दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल करत. समितीतील सदस्यांचा दारुविक्रेत्यावर एवढा वचक निर्माण झाला की गावातील दारू बंद झाली! तांड्यामध्ये होळी हा सण मोठ्या प्रमाणात दारू पिऊन साजरा करण्याची रुढी आहे. काही लोकांना असं वाटलं, की सणाच्या दिवशी हातभट्टीची दारू पाडण्यास व पिण्यास परवानगी देण्यात येईल! पण ठाणेदारानं कल्पना मांडली, की ‘त्या दिवशी दारूऐवजी दुधाचं वाटप केलं तर!’ …. आम्ही ती प्रत्यक्षात आणली व ठाणेदाराच्या हस्ते दुधाचं वाटप केलं. त्यामुळे ‘होळीच्या दिवशी दारू नाही तर कधीच नाही’ असा संदेश गावकर्यांत पोचला.
त्याच दरम्यान, एका उद्योगपतीच्या मदतीनं गावात रोपवाटिका तयार केली. त्यामध्ये आम्ही चिंच, रेनट्री, आवळा, गिरीपुष्प, गुलमोहर, हादगा, बांबू, कडुलिंब, जांभूळ आदी प्रकारची पंचवीस हजार रोपं तयार केली. रोपं तालुक्यात मोफत वाटायला सुरुवात केली. लोकांनी त्यासाठीसुद्धा श्रमदान केलं.
धान्य-रॉकेलचा थांबवलेला भ्रष्टाचार, भ्रष्टाचारमुक्त गाव हा संकल्प, श्रमदानातून गावकर्यांनी खोदलेली विहीर, श्रमदानातून तयार केलेले रस्ते, अभय बंग यांची गावाला भेट, ग्रामपंचायतीची करवसुली, रोपवाटिका, शाळेत राबवले जाणारे विविध उपक्रम यामुळे मन्याळी गाव नावारूपाला आलं. गावास अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी श्रावण हर्डिकर यांनी भेट देऊन गावकर्यांचं कौतुक केलं.
मी गावाकडे परत जाण्याचा विचार केला होता तेव्हा गावात काय काय करता येऊ शकेल याचं प्लॅनिंग मनात होतं, त्यापेक्षा जास्त काम मी गावकर्यांच्या मदतीनं करू शकलो. गावासाठी काम करताना माझं शिक्षण होत गेलं. मी स्वत: बदलत चाललो आहे ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. नम्रता, सहनशीलता, प्रामाणिकपणा, सकारात्मक दृष्टिकोन यांसारखी जगण्याची अनेक मूल्यं मी शालेय व विद्यापीठीय शिक्षणात फक्त शिकत आलो होतो. ही मूल्यं माझ्यात रुजवण्याचं काम माझं गाव करत आहे. आणि म्हणूनच मी माझ्या गावाला ‘माझं विद्यापीठ’ मानतो.
संतोष रामदास गवळे
मन्याळी, बित्तरगाव, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ, पिन – ४४५२०७
९७६७२१९०७३
sgawale05@gmail.com
(लेखातील काही भाग ‘लोकमत’च्या ‘ऑक्सीजन’ पुरवणीत प्रकाशित झाला होता.)
Good job
Good job
9545272098
9545272098
Comments are closed.