माझ्या नाणीसंग्रहाची सुरुवात कुतूहलातून झाली. मी इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असताना घरात जुनी पितळी तांब्याची भांडी, वजनमापे अशा काही वस्तू आहेत हे माझ्या लक्षात आले. त्यात वजनमापे वाटतील अशा गोलाकार आणि जाडजूड तांबे धातूच्या काही गोष्टी होत्या. मी घरी आलेल्या पाहुण्याला किंवा कोणालाही ‘हे काय आहे’ असे विचारत असे. माझी जिज्ञासा त्यांच्या वेगेवगळ्या उत्तरांनी वाढत गेली. त्यानंतर मी तांब्याचे तसेच काही गोलाकार जमवत गेलो. त्यातून माझा नाणेसंग्रह आकारास आला.
माझ्या संग्रहात आठशे नाणी आहेत. ती विविध धातूंची, विविध आकारांची, विविध किंमतीची, विविध लिपींतील आहेत. त्यात मध्ययुगीन आणि आधुनिक काळातील नाणी आहेत. त्यात शिवकालीन, शिंदे-होळकरांची, हैदराबाद निजामाची, ब्रिटिशकालीन, भारताच्या स्वातंत्र्यानंतरची गेल्या पंच्याहत्तर वर्षांतील विविध टप्प्यांतील नाणी आहेत. भारत सरकारने वेळोवेळी विशेष दिनानिमित्त काढलेली नाणीसुद्धा माझ्या संग्रही आहेत.
या संग्रहात अन्य देशदेखील आहेत- श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, युगांडा, नेपाळ, जपान, चीन, फ्रान्स, जर्मनी, इराण, अफगाणिस्तान, कझाकिस्तान, मलेशिया, भूतान अशा विविध साठ देशांचे चलन माझ्या संग्रही आहे. त्यात नाणी-नोटांचा समावेश आहे.
माझ्या संग्रहाची विशेषता अशी सांगता येईल, की मी त्यांतील कोठलेही चलन विकत घेतलेले नाही. माझे इतिहासावर असलेले प्रेम व माझ्यावरील विश्वास यांमुळे लोकांनी त्या संग्रहात भर घातली आहे. माझे औत्सुक्य व चौकसपणा हे निमित्त ठरते. कोणी बाहेर देशात जाऊन आले किंवा कोणाकडे जर काही वेगळे नाणे किंवा नोट आली तर लोक स्वतः ती नाणी/नोट मला आणून देतात. एका विद्यार्थी मित्राने त्याच्या देवघरात पिढ्यान् पिढ्या पूजा केली जात असलेली नाणी मला आणून दिली. तो म्हणाला, की “सर, या नाण्यांची जागा माझ्या देवघरापेक्षा तुमच्या संग्रहात जास्त योग्य आहे. कारण लोकांना ती नाणी बघता येतील. त्यांचे कुतूहल वाढेल. त्याने दिलेल्या त्या नाण्यांत एक नाणे शिवकालीन तांब्याची शिवराई आहे. माझा संग्रह फक्त माझा वैयक्तिक छंद असू नये, तर लोकांना तो ठेवा इतिहासाचा वाटावा-जाणवावा अशी माझी भावना आहे. तो त्यांना बघता यावा म्हणून मी शाळा-कॉलेजांमध्ये नाणी प्रदर्शने भरवत असतो. मी पंचेचाळीस शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रदर्शन भरवले आहे. अशा नाणी प्रदर्शनाच्या ठिकाणीसुद्धा शिक्षक-विद्यार्थी त्यांच्या जवळ असलेली नाणी भेट म्हणून मला देत असतात. सध्या तरी मी नाण्यांचा संग्राहक आहे; पण भविष्यात या नाण्यांचा अभ्यासही करावा असे वाटते.
महेशची वडिलोपार्जित दोन एकर शेती आहे. तो आईवडिलांसह गावीच राहतो. त्याने खेड्यात इंग्लिश मीडियम स्कूल चालवण्याचा ध्यास घेतला आहे व तसे त्याचे प्रयत्न चालू आहे. त्याला खेडोपाडी इंग्लिश मीडियम स्कूल चालू शकेल असा विश्वास आहे.
– महेश लाडणे 9970060720 maheshladane@gmail.com
——————————————————————————————
Good sir