Home वैभव महाराष्ट्र दिन ऑनलाईन (Maharashtra Day Goes Online)

महाराष्ट्र दिन ऑनलाईन (Maharashtra Day Goes Online)

 

महाराष्ट्र राज्य स्थापना दिन यावर्षी साजरा होऊ शकला नाही. उपचार म्हणून झेंडावंदनासारखे कार्यक्रम झाले. खरे तर, या वर्षी महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन साठ वर्षे झाली. सर्व लोक लॉकडाऊनमुळे घरातच बंदिस्त आहेत. त्यामुळे मोबाईल, इंटरनेट आणि कॉम्प्युटर यांचा उपयोग वाढला आहे. काही संस्थानी त्या तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवी वर्षात काही उपक्रम नव्याने सुरू केले. त्याची नोंद महत्त्वाची ठरेल. त्यातील मला माहीत झालेले उपक्रम तुमच्याशी शेअर करत आहे.

        

  ‘महाराष्ट्र राज्य ज्ञान महामंडळ’ (एमकेसीएल) या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने महाराष्ट्र दिनानिमित्त ‘आय.टी.त मराठी,ऐटीत मराठी’ या अॅपची निर्मिती केली आहे. इंटरनेट वापरताना मराठी भाषेचा उपयोग वाढवण्यासाठी, विविध क्षेत्रांतील ज्ञान वापरकर्त्यास उपलब्ध होईल याची सोय त्या अॅपमध्ये करण्यात आली आहे. ते अॅप विद्यार्थ्याना आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष उपयुक्त ठरणार आहे. त्यात एकाच ठिकाणी व्हॉइस टायपिंग, मराठी भाषांतर, ई-लर्निंग, वर्तमानपत्रे ऑनलाईन वाचणे, मराठी ऑडियोबुक्स, मराठी कवितासंग्रह, मराठी विश्वकोश, समग्र विनोबा, ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी बुकगंगा वेबसाईट इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. खरे तर, वापरकर्त्यांस या सर्व सेवा थोड्या खटाटोपाने वेगवेगळ्या ठिकाणी मिळू शकतात. एमकेसीएलची योजकता अशी, की त्यांनी त्या सर्व सेवा एकत्र गुंफल्यामुळे वाचकास मोठे सोयीचे झाले आहे. शिवाय औचित्य म्हणजे ते अॅप सुरू झाले, की प्रथम महाराष्ट्र दिनाचे गीत ऐकण्यास मिळते -जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा! त्यामुळे मराठी भाषासंस्कृतीबद्दलचा आत्मीय भाव जागा होतो. ‘एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन’चे अध्यक्ष उदय पंचपोर यांच्याशी बोलताना ते म्हणाले, की संगणकाच्या आरंभी लिपी त्यावर उतरवताना प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या सोयीने प्रोग्राम तयार करी. त्यातून नाना तऱ्हेच्या लिपी तयार झाल्या. त्या वापरणाऱ्यांचे गट तयार झाले. त्या लिपींचे परिवर्तन एकमेकांत करणे शक्य नव्हते. त्यामधून बऱ्याच अडचणी तयार होत. एमकेसीएलचे आधारस्तंभ विवेक सावंत हे त्यावेळी सीडॅकमध्ये होते. तेव्हा प्रत्येक भाषेसाठी युनिफॉर्म पद्धत निर्माण व्हावी यासाठी जगभर चळवळ सुरू होती, त्यात विवेक सावंत यांचाही सहभाग होता. त्यातून युनिकोड तयार झाले. एमकेसीएलच्या स्थापनेनंतर एमएससीआयटी हा अभ्यासक्रम मराठीत सुरू करण्यात आला. परंतु, तो अभ्यासक्रम करू न शकणाऱ्या लोकांनाही मराठीत लिहिता यायला हवे यासाठी कॉमन प्लॅटफॉर्म तयार करावा यावर विचार विनिमय सुरू होता. त्याबाबत विविध भाषातज्ज्ञांशी चर्चा करून आयटीत मराठी या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

बृहद्कोश वेबसाईट

प्रसाद शिरगावकर, आदू बाळ आणि ऋषीकेश खोपटीकर यांनी मिळून माहिती तंत्रज्ञानाचा आधार घेऊन बृहद्कोशाची निर्मिती केली आहे. त्यांनी तीन मराठी शब्दकोशांतील एक लाख सत्तर हजार शब्दांचे एकत्र संकलन बृहद्कोशह्या प्रकल्पाद्वारे केले आहे. बृहद्कोशा‘चे लोकार्पण महाराष्ट्र दिनी झाले. बृहद्कोशहा नवा शब्दकोश नाही. ते अनेक कोशांचे एकत्रित ऑनलाईन संकलन आहे. बृहद्कोशात एखादा शब्द शोधल्यास विविध शब्दकोशांत असलेले अर्थ एकाखाली एक मिळत जातात. त्याचप्रमाणे, त्या शब्दाशी संबंधित शब्दही मिळतात.  उदाहरणार्थ – जर समाज हा शब्द शोधला, तर मोल्सवर्थ, वझे आणि दाते शब्दकोशांतील अर्थ आणि त्याच्याशी संबंधित शब्द बृहद्कोशा‘त दिसतात -त्यातून वाचक शब्दकोशात झकास गुंतत जातो. उदाहरणार्थ समाज हा शब्द शोधताना त्यासोबत लोक, सभा, अंधपरंपरा, अस्मिता, चौघे, दहा, दीन, द्राविड, गाव, ग्यादरिंग, जुटी, जूट, लिबास, मंडळ, पंक्ती, पृष्ठ, शाळा, समुदाय, संघ, स्तोम, टोळी, टमटम, वृंद, पंच, अंग अशा प्रकारचे इत्यादी अनेक अर्थ त्या खाली दिसत जातात. मात्र त्यामुळे ज्याला फक्त समाज या शब्दाचा अर्थ हवा आहे त्याच्या समोर उगाचच अनेक फाटे फुटत जातात. त्याला समाजाचा अर्थ जाणायचा असतो परंतु, तो इतर शब्दांत फार अडकत जातो. मराठी शब्दकोशांना दोनशेहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. जेम्स थॉमस मोल्सवर्थ, थॉमस कँडी, श्रीधर गणेश वझे, यशवंत रामचंद्र दाते, चिंतामण गणेश कर्वे इत्यादींनी मराठी शब्दकोशांमध्ये मूलभूत स्वरूपाचे काम केले आहे. ते आता एकाच क्लिकवर, एकाच ठिकाणी उपलब्ध झाले. प्रकल्प व्यवस्थापक नमूद करतात, की बृहद्कोशाचा अर्थ विशाल असा कोश असा होतो. वेबसाईटवर सुरुवातीला ‘फोडिले भांडार धन्याचा हा माल | मी तंव हमाल भार वाहीया तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळी उद्धृत केल्या आहेत. बृहद्कोशप्रकल्पाची भूमिका भारवाहकाची आहे, ती आठवण कायम राहावी म्हणून ते बीजवाक्य शिरगावकर, बाळ आणि खोपटीकर आम्ही तिघांनी निवडले आहे. ते म्हणतात, की बृहद्कोशप्रकल्पाचे उद्दिष्ट सर्व कोशवाङ्मय एके ठिकाणी उपलब्ध करून देणे, नवनव्या कोशांची भर शब्दसंग्रहात घालणे हे आहे. प्रकाशित कोशसंपदेव्यतिरिक्त नवे शब्द तज्ज्ञ भाषाअभ्यासकांच्या शिफारसीने बृहद्कोशप्रकल्पात समाविष्ट केले जातील.याव्यतिरिक्त, मराठीमध्ये मर्यादित व्याप्ती असलेले आणि विविध विषयांना वाहिलेले आणखीही काही कोश आहेत. मराठीतील ते समृद्ध कोशवाङ्मय विविध छापील ग्रंथांत विखुरल्या स्वरूपात उपलब्ध आहे. त्यापैकी काहींचे संगणकीकरण झालेलेही आहे.

          बृहद्कोशा‘स मिळालेल्या प्रतिसादाबाबत मी प्रसाद शिरगावकर यांना विचारले. ते म्हणाले, की लोक भरभरून त्याबाबत बोलताहेत, पत्रकार, लेखक, साहित्यिक, अभ्यासक, संशोधक यांचा प्रतिसाद खूपच छान आहे. त्यांना त्याचा उपयोग होत आहे.      

‘ग्रंथाली’ वाचक चळवळीने ‘साहित्याच्या पारावर‘ ही एक लेखक एक कवी आणि वाचक यांची अक्षरमैफल योजली आहे. ती दर शुक्रवारी ऑनलाईन अनुभवण्यास मिळणार आहे. त्यात पुस्तकाचे अभिवाचन आणि लेखक-वाचकांची मुलाखत हे मुख्य घटक आहेत. ‘ग्रंथाली’च्या अक्षरमैफिलीचा आरंभ, शुक्रवारी 1 मे रोजी झाला. ‘घातसूत्र’चे लेखक दीपक करंजीकर आणि प्रसिद्ध गझलकार चंद्रशेखर सानेकर यांचा त्यादिवशीच्या कार्यक्रमात मुख्य सहभाग होता. मैफिलीच्या संवादक लतिका भानुशाली आणि अस्मिता पांडे या आहेत. त्या दोघींनीही सुंदर निवेदन केले. सध्याच्या परिस्थितीबाबत करंजीकर यांनी नेमके भाष्य केले. चंद्रशेखर सानेकर यांनी गझल कशी असते व गझलेतील तांत्रिक बाबी सांगितल्या. ते म्हणाले, की  गझल ही रदीफ, काफिया, वृत्त  यांच्यापलीकडे खूप दूर सुरु होते. तो कार्यक्रम उत्तरोत्तर छान रंगला त्याने बहार आली. मला असे वाटते, की लेखक-कवीच्या लेखनाबद्दल परीक्षणात्मक बोलणे हे केव्हाही लेखन सुधारण्याच्या आणि समृद्ध होण्याच्या दृष्टीने इष्टच असते. परंतु, येथे ते अस्थानी वाटते. त्यापेक्षा लेखक-कवींना लेखन करण्याची अथवा गझल सुचण्याची प्रक्रिया, त्या संदर्भातील काही आठवणी या विचारल्या गेल्या तर बरे होईल. तसेच, त्यात लेखक-कवी कमी बोलतात आणि इतर घटक अधिक बोलतात ते टाळता येऊ शकेल. परंतु, एकूणच साहित्यिक मेजवानी या उपक्रमामधून वर्षभर मिळेल असा विश्वास वाटतो. तसे आश्वासन ‘ग्रंथाली’चे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी दिले आहे.

          मुंबई उपनगरातील क.जे.सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाने या वर्षी महाराष्ट्र दिनाचा फारच वेगळा उपक्रम केला. महाविद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा करता येणारच नव्हता. त्यामुळे प्राचार्य वीणा सानेकर यांनी योजले, की विद्यार्थ्यांना व्हिडियोचे आवाहन करावे. त्याप्रमाणे त्यांनी शिक्षकांच्या मदतीने तसे आवाहन 1 मेच्या दोन दिवस आधी व्हॉटसअॅपवरून केले. त्यात सूचना अशी होती, की फक्त एक मिनिटाचे महाराष्ट्र-मराठी भाषा-मराठी संस्कृती यांविषयीचे व्हिडीयोज घरात बसून विद्यार्थ्यांनी चित्रित करावे आणि विभागातील प्राध्यापकांकडे पाठवावे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यास प्रतिसाद देताना त्रेचाळीस चित्रध्वनीफिती त्यांच्याकडे जमा झाल्या. त्या 1 मे रोजी सकाळी महाविद्यालयाच्या विविध ग्रूप्सवर झळकल्यादेखील. त्यात विद्यार्थी-शिक्षकही सामील झाले होते. विद्यार्थी कमी कालावधीत उत्कृष्ट रीत्या प्रकट झाले आणि त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचे डॉक्युमेंटेशनही झाले. त्यात विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र दिनाचे गीत, संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील पोवाडा, नाट्यगीत, भावगीत, गीतावर नृत्य, अभिनय, कविता, काही विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळ्या किंवा रांगोळी काढत असताना दाखवल्या, काहींनी चित्रे काढली, गिटार वापरून लावणी इत्यादी विषय असलेले व्हिडियो आले. शिक्षकांनी मराठी चित्रपटांचे जागतिक स्तरावरील स्थान, अभिवाचन, खाद्यपदार्थ याविषयीचे व्हिडियो केले. प्राध्यापक अभिजित देशपांडे म्हणाले, की विद्यार्थ्यांनी आहे त्या रिसोर्समध्ये व्हिडियो करायचे होते आणि वेळ पाळायची होती. म्हणजे ज्यांच्या विषयाचा आवाका मोठा आहे त्यांना एका मिनिटात व्यक्त व्हायचे होते आणि जे काहीच करत नाहीत त्यांच्यासाठी एक मिनिट बराच मोठा अवधी होता. त्यात पालकांनीही सहभाही व्हायला हरकत नाही असे म्हटले होते. त्यावर एका विद्यार्थीनीच्या पालकांनी सावरकरांनी भाषाशुद्धीसाठी कसे प्रयत्न केले? हे दाखवले आहे. तर एकाने मुद्दा मांडला आहे, की बहुजन वर्गानेच मराठी भाषा टिकवली. एकूणच वैविध्यपूर्ण आणि नेहमी करावा असा तो उपक्रम घडला. त्यात मला असे सुचवावेसे वाटते, की ते व्हिडियोज महाविद्यालयाच्या वेबसाईटवर प्रदर्शित व्हावे म्हणजे सार्वजनिक रीत्या पाहण्याची सोय होईल.

– नितेश शिंदे 9323343406 info@thinkmaharashtra.com
नितेश शिंदे हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे उपसंपादक आहेत. त्यांनी इंजिनीयरींगचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी विविध सामाजिक विषयांवर ‘स्ट्रीट प्ले’ आणि ‘लघुनाटके’ लिहिली. त्यांचा विविध स्पर्धांमध्ये सहभाग असतो. त्यांचा ‘के. जे सोमय्या मेमोरियल गोल्ड मेडलिस्ट बेस्ट स्टुंडट ऑफ द इयर’ ने सत्कार करण्यात आला.

—————————————————————————————————

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version