महाराष्ट्र दगडांचा नव्हे, समृद्ध वारशाचा देश – डॉ. दाऊद दळवी

1
61

'माधवबाग कृतार्थ मुलाखमालेत' दाऊद दळवी“महाराष्ट्र हा भारतातील समृद्ध प्रदेश होता. तो ‘दगडांच्या देशा म्हणावा’ असा कधीही दरिद्री नव्हता आणि सुदैवाने आजही नाही. म्हणूनच या प्रदेशाला फार मोठा सांस्कृतिक परंपरा लाभली.” अशा शब्दांत इतिहास संशोधक डॉ. दाऊद दळवी यांनी महाराष्ट्राच्या संपन्नतेविषयीच्या सर्वसाधारण समजुतीला छेद दिला. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’, ‘सानेकेअर ट्रस्ट’ आणि ‘ग्रंथाली’ यांच्या  विद्यमाने आयोजित ‘माधवबाग कृतार्थ मुलाखतमाले’च्या दुस-या पर्वात दादर – माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात डॉ. दळवी यांची मुलाखत झाली. दाऊद दळवी यांनी राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काही महाविद्यालयांतून काम केले. ते ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. त्यांची मुलाखत कॉर्पोरेट अधिकारी व तंत्रसल्लागार चंद्रशेखर नेने यांनी घेतली. दळवी यांनी मुख्यत: महाराष्ट्रामधील लेण्यांच्या रूपातील समृद्ध इतिहास उपस्थितांसमोर उलगडून मांडला.

ते म्हणाले, की “महाराष्ट्राच्या इतिहासाला सर्वसाधारणपणे छत्रपतींच्या काळापासून सुरुवात केली जाते. त्यामुळे त्याआधीच्या महाराष्ट्रात काहीच नव्हते, तो वैराण प्रदेश होता, अशी समजूत रूढ झाली आहे. पण या भूमीचा खरा इतिहास जाणून घेण्यासाठी इसवी सनाच्याही काही दशके मागे जावे लागेल. सातवाहन हा वंश जवळजवळ साडेचारशे वर्षे अव्याहतपणे महाराष्ट्रात राज्य करत होता. सातवाहन राजांनी समृद्ध राज्यकारभार केला. त्यावेळी महाराष्ट्राचा व्यापार युरोपात रोमपर्यंत चाले. ग्रीक व रोमन संस्कृतीच तेथे प्रबळ होत्या.” दळवी म्हणाले की, “देशातील एकूण बाराशे लेण्यांपैकी आठशे महाराष्ट्रात आहेत. येथे मिळणारा बेसाल्ट हा अग्निजन्य दगड हे त्याचे एक कारण आहे. त्या दगडात कोरलेली लेणी ही शाश्वत स्वरूपाची आहेत. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आर्थिक सुबत्ता. ती असल्याशिवाय लेणी तयार केली गेली नसती.”

दाऊद दळवी आणि मुलाखतकार चंद्रशेखर नेनेदाऊद दळवी यांना शालेय जीवनापासून इतिहासाची आवड होती. त्यांनी इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयातून पदवी मिळवली. त्यावेळी पुरातत्व शास्त्रासाठी विद्यापीठामध्ये विशेष विभाग नव्हता. पण एका छोट्याशा घटनेमुळे ते गडकिल्ले, लेणी यांच्या रूपातील सांस्कृतिक वारशाच्या अभ्यासाकडे  वळले. ते घारापुरीची लेणी पाहत असताना महिला मार्गदर्शक त्या लेण्यांविषयी चुकीची माहिती देत असल्याचे दळवी यांच्या लक्षात आले. ते पाहिल्यानंतर त्यांना वाटू लागले, की हा एवढा प्रचंड वारसा आहे, त्याची कुठे तरी नोंद केली गेली पाहिजे. ती राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत, व्यक्तीपर्यंत पोचली पाहिजे. अशा प्रकारची नोंद असलेली पुस्तके मराठीत/इंग्रजीतदेखील जवळजवळ नाहीत. मग त्यांनी स्वत:च त्या विषयावर लिहिण्याचे ठरवले.

त्यानंतर दाऊद दळवी यांनी चौदा वर्षे सातत्याने महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची, लेण्यांची माहिती जमवली. त्यातून ‘लेणी महाराष्ट्राची’ हा ग्रंथ साकारला. ज्या काळात इंटरनेट, मोबाइल यांसारखी माहिती मिळवण्याची आधुनिक माध्यमे उपलब्ध नव्हती त्या काळात त्यांनी ते शिवधनुष्य कसे पेलले, याविषयी सांगताना दळवी म्हणाले, “महाविद्यालयात असताना कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास होत असे. ज्या ठिकाणी जायचे त्या परिसरातील लेण्यांची माहिती मी आधीच काढून ठेवत असे. काम संपल्यानंतर त्यांचा पाठपुरावा करत असे. पुस्तक लिहायचे असेल तर माहितीची विश्वासार्हता महत्त्वाची असते. त्यासाठी संशोधन केले. संशोधनाच्या जोडीने संदर्भ जमा केले. संदर्भांचा व्यासंगाने अभ्यास केला. हे सर्व करताना या लेण्यांविषयीचा माझा दृष्टिकोन अधिक प्रगल्भ झाला. एशियाटिक लायब्ररी आणि विद्यापीठाचे समृद्ध ग्रंथालय ही संदर्भ स्थाने माहिती मिळवण्यासाठी उपयोगी ठरले. इतर ग्रंथालयांचीही मदत झाली. पाश्चात्यांनी लिहिलेली पुस्तके अभ्यासली. त्या पुस्तकांत दिलेली माहिती आणि वस्तुस्थिती यांमध्ये तफावत असल्याचे लक्षात आले. उदाहरणार्थ, अजिंठा आणि वेरूळ येथे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत. ती लेणी एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला किंवा अखेरीस प्रकाशात येऊ लागली. पाश्चात्य अभ्यासकांनी लेण्यांच्या बाह्य रचनेवरून त्यांची माहिती लिहिली. पण त्यांना एखादी मूर्ती नेमकी कोणत्या देवतेची आहे, तिची आभुषणे काय आहेत, या प्रकारची माहिती असणे शक्य नव्हते. ती सर्व माहिती जाणून घेण्यासाठी मी आपले सर्व ग्रंथ, मूर्तिशास्त्र याविषयीची पुस्तके वाचून लेण्यांचे वर्गीकरण केले.”

अजिंठा लेणीलेण्यांच्या परिसरातील नागरिकांनाही त्या लेण्यांविषयी माहिती नसते. त्याबद्दलची जागरूकता अजिबात नाही. त्यामुळे सर्रास अनेक लेण्यांची ओळख ‘पांडवलेणी’ म्हणून करून दिली जाते. दळवी यांनी असे गैरसमज दूर करण्यासाठी ग्रंथनिर्मितीचा उपक्रम हाती घेतला. त्या अभ्यासातून लेण्यांच्या रंजक माहितीचा खजिना त्यांना सापडला. ‘कृतार्थ’ मुलाखतीच्या रूपाने उपस्थितांना ते इतिहासाची अद्भुत सफर घडवत होते. महाराष्ट्रातील लेण्यांच्या उदयाविषयी ते म्हणाले, “बौद्ध भिक्षूंमुळे महाराष्ट्रात लेण्यांची परंपरा निर्माण झाली. लेणी हा शब्द ‘लयन’ (खोदून केलेली गुहा) या संस्कृत शब्दावरून रूढ झाला आहे. महाराष्ट्रातील पहिली लेणी कोणती याबाबत अधिकृतरीत्या सांगता येत नाही. त्यांच्या शैलीवरून त्यांचा क्रम ठरवावा लागेल. त्यानुसार कार्ले-भाजे येथील लेणी पहिली मानण्यात येतात. लेण्यांची परंपरा दक्षिण बिहारमध्ये किंवा प्राचीन काळातील मगध प्रांतामध्ये जास्त दिसून येते. तेथे पहिल्या प्रथम बुद्धाच्या समकालीन आणि थोड्या नजिकच्या काळामध्ये आजीवक नावाचा पंथ होता. त्या पंथातील लोक संन्यस्त होते. ते वनामध्ये वास्तव्य करत. वर्षभर ते भ्रमंती करत. पण पावसाळ्यात मानवी वस्तीपासून दूर त्यांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून अजातशत्रू राजाने पहिली लेणी तयार करून घेतली. त्या लेण्यांना ‘वर्षावास’ असे म्हटले जात असे.  नंतर ती सांस्कृतिक केंद्रे बनली. महाराष्ट्रातील लेणी खोदण्याची जी परंपरा आहे ती बिहारमधील नागार्जुन टेकड्या किंवा लोमेश ऋषींची लेणी किंवा सोनभांडार या जांभा दगडातील लेण्यांच्या समुहाशी साधर्म्य असणारी आहे.”

बौद्ध लेण्यांविषयी अधिक माहिती देताना दाऊद दळवी यांनी सांगितले, की “सुरुवातीच्या काळात हीनयान पंथ होता. त्य पंथात बुद्धाला देव म्हणून पुजलेले नाही. त्याला समाजातील एक श्रेष्ठ मनुष्य, ज्याने केवळ ज्ञान प्राप्त केले आहे असा प्रबुद्ध मानलेले आहे. हीनयान पंथाच्या लेण्यांमध्ये त्याच्या प्रतीकांचे पूजन केलेले दिसते. भाज्याचे लेणे किंवा बेडशाचे लेणे ही अशा लेण्यांची उदाहरणं आहेत.

ग्रीक ठेवणीचा चेहरा आणि भारतीय पद्धतीचे उत्तरीय असलेला बुद्धाचा पुतळाकुशाण वंशाच्या लोकांनी भारतावर पहिल्या शतकात आक्रमण केले. त्यांचा राजा कनिष्क याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्याने बुद्धाची प्रतिमा प्रथम निर्माण केली. परंतु कनिष्क मध्य – पूर्व आशियातून आलेला असल्याने त्याने तयार केलेल्या प्रतिमेत ग्रीक ठेवणीचा चेहरा आणि भारतीय पद्धतीची उत्तरीय असे ‘फ्युजन’ पाहण्यास मिळते. त्यानंतर बुद्धप्रतिमांची प्रथा भारतात आली आणि ती लोकांना भावू लागली. लोक बुद्धाचा दैवत म्हणून स्वीकार का करू नये असा विचार करू लागले. त्यातून महायान पंथ निर्माण झाला. कार्ल्याचे मूळ लेणे हे हीनयान पंथीय आहे, पण त्याचा बाहेरील भाग हा महायानपंथीय आहे. कान्हेरीचा क्रमांक तीनचा स्तूप हा मूळचा हीनयान आहे पण नंतर महायानांनी त्यावर काम केले. बुद्धाची जवळजवळ एकवीस फुटाची प्रतिमा तेथे आहे. ती लेणी जरी दोन वेगवेगळ्या पंथाची असली तरी कोणत्याही पंथातील व्यक्ती कुठेही जात असे. पंथसहिष्णुता होती.”

दाऊद दळवी म्हणाले, “प्राचीन भारतातील राज्यकर्ते हे प्रजाभिमुख होते. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हा त्यांचा राजधर्म होता. त्यांनी कोरलेल्या लेण्यांमध्ये आलेख आहेत. राज्य कसे असावे, राजांची उद्दिष्टे काय असावीत याबाबत उल्लेख त्या आलेखांमधून आढळतो. देवी लेण्यातील आलेखावरून सातकर्णी राजाच्या गौतमी परश्री या सात्त्विक राणीची माहिती मिळते. कार्ल्याच्या लेण्यामधील आलेखांमधून ते लेणे कशासाठी कोरले, त्यासाठी कोणी दान दिले हे समजते. दुर्दैवाने ब्राम्‍हणी लेण्यांमध्ये अशा प्रकारचे आलेख सापडत नसल्याने अनेक महत्त्वाच्या गोष्टी प्रकाशात येऊ शकलेल्या नाहीत.”

भारतातील बहुतेक लेणी राजांनी किंवा त्यांच्या मंत्र्यांनी बांधलेल्या नसून लोकांनी त्यांच्याकडील पै पै दान देऊन बांधली आहेत. त्याकाळच्या सामाजिक जाणिवेचे आणि सहकार्याचे ते उत्तम उदाहरण आहे, असे दळवी यांनी सांगितले.

दळवी यांनी भारतीय लेण्यांवरील परकीय प्रभावाची माहितीही दिली. “त्या काळात पश्चिमेकडून व्यापारासाठी लोकांची ये-जा होत असे. आपल्या देशातील लोकही परदेशात जात असत. व्यापार – उदीम आणि संस्कृती यांची सुंदर देवाणघेवाण त्या काळात सुरू होती. पितळखो-यातील लेण्यांमधील दोन प्रतिहारींच्या (सुरक्षारक्षकांच्या) शिल्पांतील गणवेष आणि शिरोभूषणे परकीय धाटणीची आहेत. किंवा तेथील हत्तींच्या शिल्पांची ठेवण लक्षात घेतली तर त्यावरचा परकीय प्रभाव दिसून येतो.”

बौद्ध भिक्खु जल आणि खुष्कीचा अशा दोन मार्गांनी परदेशात गेले. काही भिक्खू खुष्कीच्या मार्गाने अफगाणिस्तान, इराणमध्ये गेले आणि तेथून सिल्क रूटने मध्य आशियात गेले. मध्य आशियातील उंटावर बसलेला बुद्ध किंवा चीनमधील तुवांग उवांगमधील भित्तिचित्रे हे त्या मार्गाने घडून आलेल्या सांस्कृतिक अभिसरणाची उदाहरणे होत. भारतीय लोक समुद्र ओलांडून जाणे महापातक मानत असत असा आपला समज आहे. पण जातककथांमध्ये आणि प्राचीन ग्रंथांमध्ये त्या काळात अनेक लोक, विशेषत: बौद्ध भिक्षू समुद्रमार्गाने परदेशात गेल्याचे संदर्भ आहेत.”

दाऊद दळवी यांना रत्‍नागिरी-सिंधूदुर्ग जिल्‍ह्यात सापडलेली कातळशिल्‍पे. यात वाघाचे ५२ फूट आकाराचे चित्र कोरलेले आहे.कातळशिल्प हा डॉ. दळवी यांच्या संशोधनातील महत्त्वाचा विषय. त्यांनीच आदिमानवांच्या या कलाकृती कोकणातून शोधून काढल्या. ते म्हणाले, “कातळशिल्प हा प्रकार फार कुणाला माहीत नाही. रत्नागिरी, सिंधुदूर्ग, गोवा आणि अगदी कर्नाटकापर्यंतच्या भागात समुद्रालगत कातळ आहे. तो कातळ मैल – मैल पसरला आहे. त्या भागात राहणा-या आदिम मानवांनी कातळावर अशा प्रकारची चित्रे, प्रतिमा कोरल्या. त्यात प्राणी, पक्षी आहेत. त्यावरून तत्कालीन मानव आपली पशुपक्ष्यांवर सत्ता असल्याचे सांगू पाहत असावा. राजापूरच्याजवळ बावन्न फूट मोठे कातळशिल्प आहे. दोन पट्टेरी वाघांच्या मध्ये माणूस असे ते शिल्प आहे. काही चित्रांचा अर्थ लागत नाही. त्यावर मी आणि माझे सहकारी संशोधन करत आहोत.”

तत्कालीन मानवी जीवनाची आणि संस्कृतीची ओळख करून देणा-या त्या कातळशिल्पांचे जतन व्हायला हवे. महाराष्ट्राचा तो जागतिक दर्ज्याचा ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

सांस्‍कृतिक वारशाविषयीचे लोकांचे अज्ञान आणि इतिहासाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन यांमुळे लेणी, ग़ड-किल्ले, कातळशिल्पे यांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाने त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. मात्र लोकांनीही केवळ शासनावर अवलंबून न राहता लोकसहभागातून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ही बाब दळवी यांनी लक्षात आणून दिली. त्याच भावनेतून त्यांनी ‘कोकण इतिहास परिषद’ निर्माण केली आहे असे ते म्हणाले.

त्यांनी इतिहासाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातील त्रूटींकडेही लक्ष वेधले. “आपल्याकडे इंग्लंडचा इतिहास, युरोपचा इतिहास, चीन-जपानचा इतिहास शिकवला जातो, पण महाराष्ट्राचा इतिहास शिकवला जात नाही. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा इतिहास येण्यास १९८६ साल उजाडावे लागले. स्थानिक इतिहासाला महत्त्व दिले गेले पाहिजे. प्रत्येक तालुक्याचा, प्रत्येक जिल्ह्याचा प्रमाणभूत इतिहास लिहिला गेला पाहिजे. तो प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचला गेला पाहिजे. त्यामुळे त्यांना स्थानिक संस्कृती कळेल आणि मग त्यांचे देशाविषयीचे प्रेम उचंबळून येईल.” अशा उद्बोधक विचारांनी दाऊद दळवी यांनी मुलाखतीचा समारोप केला.

तत्‍पूर्वी, ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केलेल्‍या माणिक कानेड लिखित ”अॅबसर्ड थिएटर’ या पुस्‍तकाचे दाऊद दळवी यांच्‍या हस्‍ते प्रकाशन करण्‍यात आले.

– सपना कदम-आचरेकर
sapanakadam34@gmail.com

(प्रसिद्ध इतिहास संशोधक तथा ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. दाऊद दळवी यांचे बुधवार, 31 ऑगस्‍ट 2016 रोजी सायंकाळी अल्पशा: आजाराने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. डॉ. दाऊद दळवी काही दिवसांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त होते. त्यांनी सार्वजनिक जीवनातून अलिप्‍त राहण्याचा निर्णय घेतला होता. अनेक दिवस ते घरातूनच कोकण इतिहास परिषदेचे काम पहात होते. त्यांच्यावर ठाण्यातील परम हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. त्‍यांना घरी आणण्‍यात आल्‍यानंतर बुधवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.)

Last Updated On – 1 st Sep 2016

About Post Author

1 COMMENT

  1. दळवी सरांनी आपले काम सांभाळून
    दळवी सरांनी आपले काम सांभाळून जे महाराष्ट्रातील लेण्यांचे संशोधन केले आहे व त्यावरुन जो इतिहास उलगडला आहे तो अतिशय वेधक आहे. ऐतिहासिक वारशांचे व संस्कृतीचे जतन आणि सवंर्धन व्हावे ही त्यांची मनापासूनची तळमळ या पाठीमागे दिसून येते. त्यांचे दुःखद निधन झाले, ते आज आपल्यात नाही त्यांची उणीव आपल्याला नेहमी भासणार आहे मात्र त्यांचे कार्य नेहमीच अभ्यासकांना, संशोधकांना मार्गदर्शन करणार आहे, प्रेरणा देणार आहे. अशा या ज्येष्ठ इतिहास संशोधकास भावपूर्ण श्रध्दांजली !

Comments are closed.