महाराष्ट्रीय ब्राह्मणांचा मुसलमान द्वेष

0
48

शिवाजीमहाराजांचा राष्ट्रवाद हा क्षेत्रीय राष्ट्रवाद होता. त्याचे रूपांतर
भारतीय राष्ट्रवादात करण्याचा मुख्य प्रयत्‍न टिळकांनी केला,
पुढे सुभाषचंद्रांनी केला. महात्मा गांधी व पंडित नेहरू तसे प्रखर
राष्ट्रवादी नव्हते. ते लोकशाहीवादी होते. त्यांचा मुख्य विरोध
वसाहतवादाला होता. सावरकरांनी हिंदुस्तानी राष्ट्रवादाचे रूपांतर
हिंदुराष्ट्रवाद असे केले. आजचा महाराष्ट्र शिवाजी महाराजांच्या क्षेत्रीय
राष्ट्रवादाला भारतीय राष्ट्रवाद समजत आहे आणि महाराष्ट्र,

That is India
असे असल्यासारखा वागत आहे. But there is more to India than Maharashtra हे आपल्याला समजायला पाहिजे!

वादचर्चा

महाराष्ट्रीय ब्राह्मणांचा मुसलमान द्वेष

– वसंत केळकर

पाकिस्तानच्या अक्रम नामक, आपल्या आयएएस धर्तीच्या सनदी अधिकार्‍याने १९५५- मध्ये लिहिलेले पुस्तक – The Cultural History of Pakistan मी नुकतेच वाचले.

जनाब अक्रम म्हणतात, की भारतीय उपमहाद्वीपाच्या संस्कृतीत मुसलमानांनी महत्त्वाची भर टाकली हे हिंदूंनी मान्य करायला पाहिजे. जेव्हा हिंदू ते मान्य करेनासे झाले तेव्हा भारतापासून वेगळे असे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले पाहिजे या कल्पनेला जोर मिळाला आणि पाकिस्तान निर्माण झाले!

जनाब अक्रम पुढे म्हणतात, की मुसलमानांच्या संपर्कामुळे हिंदूंच्या जातींविषयी कर्मठ आचारविचारांमध्ये शिथिलता आली व माणसांची जन्मजात जात चांगली असायची गरज नसून त्यांचे वर्तन चांगले असले पाहिजे या कल्पनेला जोर मिळाला; संस्कृत भाषेचे प्रादेशिक भाषांवरचे वर्चस्व कमी झाले आणि प्रादेशिक भाषांमधून साहित्य निर्माण होऊ लागले. मुसलमान राज्यकर्त्यांनी प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन दिले. ‘अठरा पुराणे व रामायण बंगालीत वाचले तर माणूस रौरवात पडेल’ असे बंगाली ब्राह्मण आम लोकांना दटावून सांगत असत; ही परिस्थिती बदलली (History of Bengali language and literature by D K Sen, Page 5). लेखकांच्या दृष्टीमध्ये बदल झाला. इंग्रजांप्रमाणे मुसलमान लोकांना बाह्य जगामध्ये रुची असते. भौतिक परिस्थिती, सांसारिक जीवन व त्यातली आव्हाने झेलायची असतात आणि आनंद आवडीने उपभोगायचा असतो असे मुसलमान समजतात. हिंदूंमध्ये मात्र याबद्दल स्वभावसिद्ध उदासीनता आणि अंतर्विरोध असतो; मुसलमान आले तेव्हा तरी तसा तो होता. खानपान, पोशाख, तेहजीब आणि मजेत राहण्याची आवड यांत वावगे काही आहे असे इस्लाम मानत नाही.  जे आयुष्य माणसाला मिळाले आहे ते त्याने शक्य तितक्या धैर्याने व आनंदाने घालवावे हे उत्तम असे त्यांचा धर्म त्यांना शिकवतो. मुसलमान माणूस जेथे गेला तेथे त्याने अशीच वर्तणूक ठेवण्याचा प्रयत्‍न केला. मोगल राज्यकर्त्यांनी सुंदर सुंदर पोशाख शिवण्याचे कारखाने काढले. फळे, फुले यांची लागवड केली. उन्हाळ्यापासून बचावासाठी खसच्या ताटीचा उपयोग सुरू केला. हिमालयातून बर्फ आणून तो उन्हाळ्यासाठी जमिनीत पुरून ठेवायला सुरूवात केली.

यावर आपल्याला असा प्रतिवाद करता येईल, की आपल्या इतमामाप्रमाणे राहण्याची हौस कित्येकदा अती पण होत असे. सुंभ जळाला पण पीळ कायम या म्हणीप्रमाणे मोहम्मद शाह रंगीले ( १७२० ते १७४८) शेरोशायरी व गायनवादन यांतच रंगून गेले होते.  इराणातून नादिरशाह येऊन दिल्ली लुटून गेला. तरीदेखील त्याच्या दरबारातल्या सदारंग आणि अदारंग यांच्या चीजा चालूच होत्या. (अर्थात या चीजा फार सुंदर आहेत आणि आजचे गायक व गायिका त्या आवर्जून गातात ही गोष्ट वेगळी ) शेवटची जवळ जवळ शंभर वर्षे मोगल बादशहाचा हुकूम केवळ लाल किल्ल्यात चालत होता. तरीदेखील तो आपल्या इतमामाने शक्य तितका राहत असे. ‘लगता नही है दिल मेरा’, ‘बात करनी मुझे मुश्कील कभी ऐसी तो नही’, ‘न किसीकी आंख का नूर हूं’ या बहादूरशाहच्या कविता प्रसिद्ध आहेत. कवी मिर्झा गालिब कर्ज करून पण आपल्या इतमामाने राहत असे आणि पेन्शनसाठी कोलकात्याला जाये करत होता. ना.स. इनामदारांच्या ‘मंत्रावेगळा’ या पुस्तकात दुसरे पेशवे यांच्या ‘पेशवीणबाई हळदीकुंकवात सोन्याच्या नारळाने ओटी भरतात आणि मोती ओंजळींनी ओटीत टाकतात’ असे वर्णन आहे. पेशवेपद गेल्यावर दुसर्‍या बाजीरावांना जरा हायसेच वाटले आणि ते चोवीस वर्षे पेन्शन घेऊन मजेत राहिले असे मनोहर माळगावकरांचे मत आहे. छत्रपतींना सातार्‍याला छोटेसे राज्य इंग्रजांच्या मदतीने टिकवून ठेवण्यात बरे वाटले असे इतिहास सांगतो. हीच रीत शिंदे, गायकवाड, होळकर, भोसले यांची आणि भारतातील इतर राज्यांची. थोडक्यात, राजा काय आणि प्रजा काय, सर्वांनाच मायबाप इंग्रज आवडू लागले होते. राजेरजवड्यांचे हे श्रीमंतीचे आणि वरिष्ठतेचे प्रदर्शन आणि आजचा चंगळवाद यांत फरक थोडा आहे आणि घेण्यासारखे दोघांमध्येही काही नाही.

‘In its very nature Islamic culture is cosmopolitan’ असे जनाब अक्रम म्हणतात. इस्लाम संस्कृतीचा प्रवेश भारतात झाल्यामुळे भारताचा बाहेरच्या जगाशी संबंध येऊ लागला. खैबर खिंड व बोलन खिंड या मार्गाने प्रवासी, व्यापारी, अभ्यासक, कलावंत येत असत. अफगाणिस्तान आणि अर्थातच पाकिस्तान हा भाग भारताशी प्राचीन काळापासून संलग्न होता. भारताचे इराणशी मौर्य साम्राज्यापासून संबंध होते. त्या भागांकडे लक्ष देण्याचे तत्त्व मौर्य साम्राज्यापासून भारतीयांनी सोडून दिले, पण मोगल भारतीयांनी ते तत्त्व पुन्हा प्रस्थापित केले.

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध अपयशी ठरल्याचा सर्वांत जास्त धक्का मुसलमानांना बसला. इंग्लंडच्या राणीने दिल्लीची मोगल बादशाही कायद्याने बरखास्त केली. मोगलांना आपण हिंदुस्तानात एकदा राज्य केले होते; आता आपल्याला इंग्रजांच्याच काय पण हिंदूंच्या हाताखाली राहवे लागणार असे वाटू लागले. त्यांना हिंदूंच्या पेक्षा इंग्रज परवडले असेही वाटू लागले. साम्राज्ये आली आणि गेली तरी आम लोक तेच असतात. पुन्हा मोगल साम्राज्य कसे येणार? आणि का यावे? पुन्हा ब्रिटिश साम्राज्य कसे येणार? आणि का यावे? पण इतिहासाचे चांगले धडे जतन करायला पाहिजेत आणि चुकीचे धडे सोडायला पाहिजेत. मोगल साम्राज्यामुळे भारताच्या संस्कृतीची enrichment झाली हे हिंदूंनी मान्य केले असते तर भारतातील मुसलमानांना पाकिस्तानची गरज वाटली नसती. हिंदुस्तान आमचापण आहे ही मुसलमानांची भावना हिंदूंनी समजून घ्यायला पाहिजे होती. भारतातील ब्राह्मणांना, विशेषत: मराठी ब्राह्मणांना मुसलमानांशी दोस्ती हा प्रकार कमी पटतो. तमिळ, तेलुगु, मलयालम, कानडी यांना उत्तर हिंदुस्तानपण पाकिस्तानसारखाच भासतो! उलटपक्षी, उत्तर हिंदुस्तानी लोकांची पाकिस्तानी लोकांशी तमिळ, तेलुगु, मलयालम, कानडी यांच्या मानाने मैत्रीपण पटकन होते. खरे म्हणजे, राष्ट्रीयत्व ही कल्पना जात चालली आहे हे समजून घेतले पाहिजे.

पु. ग. सहस्रबुद्धे यांच्या १९७९ मध्ये लिहिलेल्या ‘महाराष्ट्र संस्कृती’ या अभ्यासपूर्ण ग्रंथात जरी उचित असे समतोलत्व राखलेले आहे तरी मुसलमानांविषयीचा राग आणि महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वाचा उपहास मात्र लपलेला नाही. ही प्रवृत्ती महाराष्ट्रीय ब्राह्मणांच्या अस्मितेचा भाग बनून गेली आहे असे दिसते. या बाबतीत महात्मा गांधी एका बाजूला आणि टिळक, सावरकर व सुभाषचंद्र बोस दुसर्‍या… असे पुष्कळजण समजतात. टिळक अहिंसेबद्दल आग्रही नसले तरी strategy म्हणून त्यांना महात्मा गांधींच्या असहकारिता आणि सविनय कायदेभंग या कल्पना आवडल्या नसत्या असे वाटत नाही. त्यांना मुसलमानांबद्दल द्वेष नव्हता. ‘इंग्रजांनी सोडून जावे, आम्ही आमचे काय ते पाहून घेऊ’ असा त्यांचा विचार होता आणि ‘आम्ही’मध्ये मुसलमानांचाही समावेश होता. सावरकरपण जन्मठेप होण्याआधी केवळ ब्रिटिश सत्तेविरुद्ध होते. त्याच्या ‘१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध’ या ग्रंथाने हिंदू व मुसलमान, दोघेही क्रांतिकारक  भारले गेले होते. त्यांना जन्मठेपेतून सुटल्यावर इंग्रजांविरुद्ध बोलण्याची बंदी होती. त्या काळात त्यांचा मुसलमानांविरुद्ध विचार कडवा होऊ लागला. तो इंग्रज सरकारच्या पथ्यावर पडला असावा!

मराठी माणसाचा सावरकरांविषयीचा आदर विविध कारणांमुळे आहे. देशासाठी जन्मठेपेची शिक्षा कोण अंगावर ओढवून घेईल? त्यांचे वीररसयुक्त काव्य, नाटक आणि लेख अद्वितीय नाहीत काय? त्यांनी हिंदू धर्मातला वेडगळपणा परखडपणे दाखवू दिला नाही काय? त्यांच्या थोर व्यक्तिमत्त्वाचे हे पैलू जर असते आणि मुसलमानविरोध नसता तर त्यांची कदर संपूर्ण भारतात जास्त झाली असती. सुभाषचंद्र बोस मुसलमानांच्या विरूद्ध कधीच नव्हते. त्यांचे ‘कदम कदम बढाये जा, खुशीके गीत गाये जा, ये जिंदगी है कौम की, तू कौम पे लुटाये जा’ हे स्फूर्तिदायक गीत उर्दूमधून होते.

अशोक सम्राटाने बौद्ध धर्मातील अहिंसा आणि वैराग्य या तत्त्वांचा पुरस्कार करून राष्ट्राची प्रतिकारशक्तीच नष्ट करून टाकली होती असे पु. ग. सहस्रबुद्धे म्हणतात. एखाद्या देशाला पादाक्रांत करून, कत्तली करून, तो देश बेचिराख करून टाकायचा याबद्दल अशोकालानंतर पश्चाताप झाला असे त्याने स्वत: लिहून ठेवले आणि हे तेवीसशे वर्षांपूर्वी घडले, ही मोठी स्तिमित करणारी घटना आहे असे नाही वाटत? सम्राटाच्या मनातील आक्रोश आणि त्याची प्रजेविषयी कळकळ आपल्या विस्तीर्ण साम्राज्यात ठिकठिकाणी, तिथल्या लोकांना समजेल अशा रीतीने कोरून ठेवण्याचा उपक्रम अशोकानंतर पुढे कधीही झालेला नाही! अशोकाच्या शिलालेखांतील आज्ञा केवळ अहिंसाविषयक नाहीत. ‘बौद्ध धर्माचा प्रसार’ अशा स्वरूपाच्या पण त्याच्या आज्ञा नाहीत. ‘सेवकांशी प्रेमाने वागावे, वडील मंडळीचा आदर करावा, प्राणिमात्रांशी दयाळुपणे वागावे. स्वत:च्या धर्माची स्तुती आणि इतरांच्या धर्माची निंदा करू नये. उलट, इतर धर्मांचा आदर केल्याने स्वत:च्या धर्माची वृद्धी होते. माझ्या प्रजेला मी पित्यासमान आहे’ अशा तर्‍हेच्या, स्तिमित करणार्‍या त्याच्या आज्ञा आहेत. अशोकाबद्दल ‘बहु होतीलही बहु…’ पण या सम हा’ असे वर्णन ब्रिटिश इतिहासकार एच.जी. वेल्स याने केले आहे. ‘अशोकाची व्यवस्था इतकी मोडकळीस आली होती की त्याच्या फाजील अहिंसा तत्त्वामुळे मौर्य साम्राज्याचा अंत झाला’ हेही म्हणणे बर्‍याच इतिहासकारांना मान्य नाही.

अल्लाउद्दिन खिलजी याने देवगिरीच्या यादवांचा पाडाव १२९६ साली केला व दिल्लीची सुलतानशाही महाराष्ट्रात आणली. त्यानंतर बल्बन हा सुलतान झाला. त्यावेळी उत्तर हिंदुस्तानात या सुलतानांनी बरी शासनव्यवस्था ठेवली होती असे इतिहासकारांचे मत आहे. आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, जनाब अक्रम यांच्या म्हणण्याप्रमाणे, भारताचे पुन्हा एकदा एक राष्ट्र बनण्यात मुस्लिम राज्यकर्त्यांचा मोठा हात आहे. त्यांच्याचमुळे फारसी ही राज्यकारभाराची भाषा पूर्ण देशाला मिळाली. पण त्यांनी प्रादेशिक भाषांना भऱपूर महत्त्वही दिले. त्यांची न्यायव्यवस्था मुसलमानांना मुसलमानांच्या नियमांप्रमाणे आणि बिगरमुस्लिमांना बिगरमुसलमानांच्या नियमांप्रमाणे अशीच होती. अक्रम म्हणतात, की अल्लाउद्दिन खिलजी आणि बल्बन कर्मठ धार्मिक असूनसुद्धा राज्यकारभार स्वत:च्या  अक्कलहुशारीने चालवत असत. ते कारभार धर्मगुरूंच्या आज्ञेनुसार चालवत नसत. पुष्कळशा इतिहासकारांचे हे मत आहे. त्यावेळच्या समाजात समता नव्हती हे मान्य आहे. मुसलमानांचा privileged वर्ग होता, पण मुसलमानांच्या अगोदरही कुठे ब्राह्मण तर कुठे राजपूत असे शक्तिमान वर्ग असत. आजही असे शक्तिमान वर्ग भारतात आहेत; पाकिस्तानातपण आहेत. मुसलमान आले तेव्हा ते परके होते, पण नंतर ते हिंदुस्तानचे झाले. इंग्रजांची गोष्ट मात्र अगदी वेगळी होती.

सहस्रबुद्धे यांचा मुख्य रोख हिंदूंनी मुसलमानांना हाकून देण्याचा आहे. मुसलमान राज्ये एकजात नादान, क्रूर, व्यसनी अशी होती, पण त्यावेळचे हिंदूपण इतके नादान झाले होते, की ते (विजयनगर हा अपवाद सोडून) अशा नालायक मुसलमान राज्यकर्त्यांनापण डुबवू शकले नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. मुसलमान आपले साम्राज्य प्रस्थापित करायला उत्तर हिंदुस्तानात आलेच होते; दक्षिणेतपण आले होते.

त्यांच्या कितीतरी आधी, मौर्यानी आपले साम्राज्य कलिंग राज्यात प्रस्थापित केले.  पुढे, कलिंग राजाने ते धुडकावून लावले, सातवाहनांनीपण मौर्यांना धुडकावले व आपले स्वतंत्र राज्य स्थापले. सातवाहन व सौराष्ट्रातले शक यांचे युद्ध कायमचे होते. पल्लव सत्तेच्या विरुद्ध चालुक्य कायम होते. देवगिरीच्या यादवांची इतर शेजारच्या राजांशी युद्धे सुरूच होती. त्यातच मुसलमानांची भर पडली. राजे आपापल्या संस्कृतीप्रमाणे राज्य करत असत आणि आपल्या साम्राज्याचा विस्तारपण करत असत. हिंदू पवित्र तीर्थस्थाने संपूर्ण भारतात होती. राज्य कोणाचेही असले तरी हिंदू आपापली धार्मिक कृत्ये करू शकत असत. पूर्ण भारतात हिंदू राजा असायलाच पाहिजे अशी लोकांची कल्पना नव्हती. राजाने आपले राज्य धर्माने चालवावे अशी कल्पना जरूर होती, पण ‘धर्माने’ याचा अर्थ ‘न्यायपूर्ण’ असा होता. हिंदुस्तान हा एक देश आहे आणि तो हिंदू राजांच्याच आधिपत्याखाली असायला पाहिजे अशी लोकांची कल्पना नव्हती आणि लोकांना विचारत होते कोण?

सातवाहन ब्राह्मण राजे वर्णसंकर होऊ नये असे म्हणत होते, पण सातवाहन राजाने सौराष्ट्रामधल्या रुद्रदामन या शक राजाला आपली मुलगी दिली होती. रुद्रदामन हे नाव संस्कृतोद्भव आहे आणि जुनागढमधला प्रस्तरलेख हा भारतातला संस्कृतमधील पहिला अभिजात प्रस्तरलेख असून त्याची भाषा समासयुक्त आणि अलंकारिक आहे. उलट, सातवाहनांचे लेख प्राकृतात आहेत. आपण शक संवत अजूनही पाळतो आणि तो भारताचा शासकीय संवत आहे. मग शकांना परकीय कसे म्हणायचे?

पल्लव चालुक्यांशी लढत होते. पुलकेशी हर्ष राजाशी लढत होता, खारवेल सातवाहनांशी लढत होता, पोरस अलेक्झांडरशी लढला, पृथ्वीराज घोरीशी लढला, बाबर इब्राहीम लोदीशी लढला, औरंगजेब दक्षिणेतल्या मुसलमान आदिलशाह राजाशी लढला. यात कोणी राष्ट्रभावनेच्या दृष्टीने परकीय नव्हते. सगळे आपापले साम्राज्य वाढवण्याच्या खटपटीत होते. ‘परकीय’ या शब्दाचा बोध इंग्रज आले तेव्हा भारतवासीयांना झाला!

धार्मिक व्यवस्थेत व्रात्य, यवन, म्लेंच्छ हे शब्द हिंदू वर्णव्यवस्थेच्या बाहेर असणार्‍या लोकांना लावतात. त्यात कुठेही आपण आज समजतो तशी राष्ट्रभावना नव्हती. जे वर्णव्यवस्थेत आहेत त्यांनी वर्ण-व्यवस्थेच्या नियमांप्रमाणे वागावे आणि ज्यांना वर्णव्यवस्थेच्या बाहेर फेकण्यात आलेले आहे, त्यांनी अशा लोकांनी जसे वागायला पाहिजे तसे वागावे असा ब्राह्मणांचा हुकूम होता. यात जेव्हा अन्याय होता, आक्रोश होता तेव्हा तो बाहेर पडत असे. पण जे बाहेरून आले होते ( ग्रीक, कुशाण, शक, हूण, अरब, तुर्क, अफगाण, इंग्रज) त्यांनी कसे वागावे याबद्दल आम्ही त्यांना काय सांगणार अशीच उच्चवर्णीय हिंदूंची वृत्ती होती. त्यांनी त्यांच्या ‘जाती’प्रमाणे वागावे अशी पूर्ण मोकळीक त्यांना होती. या बाबतीत आमचा धर्म सहिष्णू होता आणि आहे. या व्रात्य लोकांना आमच्या वर्णव्यवस्थेत सामील करवून घ्यायची आमची सुतराम इच्छा नव्हती. आमच्यांनाच आम्ही बाहेर काढत होतो तर बाहेरच्यांना आम्ही आत कुठून घेणार? आमचा (म्हणजे उच्च वर्णाच्या लोकांचा) ब्रिटिशांच्या क्लबप्रमाणे exclusive क्लब होता. व्रात्य लोकांना तेथे प्रवेश नव्हता, पण मुसलमानांच्या धर्मात आणि इंग्रजांच्या धर्मात कोणीही यावे असा त्यांचा आग्रह होता. जे लोक आमच्या exclusive क्लबमध्ये नव्हते ते आपखुशीने दुसर्‍या धर्मात गेले असणार. सहस्रबुद्धे म्हणतात, की सुफी संतांनी हिंदूंना बाटवले. सुफी संतांचे भक्त भारतात अजूनही असंख्य आहेत. अवलिया आणि सुफी संत हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये popular होते. हिंदूंनी जो इस्लाम व पुढे ख्रिस्ती धर्म घेतला तो आपखुशीने घेतला असण्याची शक्यता खूप आहे.

मुसलमानांच्या आक्रमणानंतरचा हिंदुस्तान हिंदू व मुसलमान, दोघांनी घडवला आहे असे असूनसुद्धा मुसलमान परकीय असे जर हिंदुत्ववादी म्हणू लागले तर पाकिस्तानची मागणी प्रबळ होणे साहजिक आहे. हिंदुस्तान (मराठी लोकांनी ‘हिंदुस्थान’ असा शब्द बनवला आहे) आणि पाकिस्तान व इतरत्रही सर्वांचा हिंदुस्तानवर हक्क आहे अशी कल्पना असती तर हिंदू राष्ट्र ही कल्पना आली नसती आणि फाळणी टळली असती!

महाराष्ट्र धर्म म्हणजे patriotism, nationalism, राष्ट्रधर्म असे सहस्रबुद्धे म्हणतात. यवन, म्लेच्छ यांची ‘दासबोधा’त वर्णलेली भरपूर निंदा पुढे करून या यवनांना, म्लेच्छांना, म्हणजेच मुसलमानांना कापून काढणे हेच महाराष्ट्र धर्माचे लक्षण आहे असे त्यांनी प्रतिपादन केले आहे. ‘माणसाला खायला अन्न नाही, अंथरूणपांघरूण नाही, घर करायला सामग्री नाही, हे सुलतान लोकांचे नाक-कान कापतात, त्यांना नदीत बुडवतात, पैशांसाठी त्यांची पोटे फाडतात, स्त्रियांवर अत्याचार करतात’ असे समर्थांनी सांगितलेल्या भयंकर प्रकारांचे वर्णन आहे. दक्षिण व उत्तर हिंदुस्तानातली मुस्लिम साम्राज्यातली सरकारे असा हैदोसधुल्ला घालण्यापलीकडे दुसरा काहीच राज्यकारभार करत नसावेत असे समर्थांच्या (आणि सहस्रबुद्ध्यांच्या) वर्णनावरून वाटते. समान शत्रूची जाणीव आणि त्या शत्रूशी दिलेला लढा यांतूनच राष्ट्र निर्माण होते असे सहस्रबुद्धे म्हणतात, पण साम्राज्य हे आले काय आणि ते आले काय, लोकांना पीडा व्हायची ती होतच असे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली राष्ट्रभावना, आमचाच राजा का असू नये अशा तर्‍हेची होती. लोकांचे लोकांच्या राजाने चालवलेले, लोकांच्याच कल्याणासाठी उभे राहिलेले आणि लोकांच्या आवडीचे, पसंतीचे राज्य अशी ती लोकशाही भावना होती. लुटालूट करायची झाली तर ती आमजनतेला त्रास होऊ नये अशी रॉबिन हूड धर्तीची असावी. स्त्रियांना सन्मानाने वागवले पाहिजे असे शिवाजी महाराजांचे कठोर नियम होते. राज्याबाहेरची राज्ये आपल्यावर आक्रमण करणार आणि आपणपण त्यांच्यावर आक्रमण करणार. त्यासाठी कूटनीतीपण असणार. पण मोगल साम्राज्य, आदिलशहाचे राज्य, कुतुबशाहीचे राज्य आणि एकंदरीत मुसलमान यांचा द्वेष शिवछत्रपतींना अभिप्रेत असावा असे वाटत नाही. शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली राष्ट्रभावना मुसलमानद्वेषातून आलेली नव्हती असे स्वत: सहस्रबुद्ध्यांनी म्हटले आहे. राजाराम महाराज, शाहू महाराज, संताजी-धनाजी यांनीदेखील आणि हिंदुपदपादशाहीचे प्रणेते पहिले बाजीराव काय पण सर्वच पेशवे, शिंदे, होळकर, गायकवाड हेपण असे मुसलमानद्वेष्टे दिसत नाहीत. शिंदे तर मुसलमानांशी दोस्ती करून, उलट राजपुतांना सळो की पळो करत असत. शिवाजी महाराजांचे कठोर नियम त्यांच्यानंतर संपले. सहस्रबुद्धे स्वत: मराठ्यांनी साम्राज्य स्थापन करायला सुरुवात केल्यावर दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, बंगाल, ओरिसा येथे यथेच्छ हैदोसधुल्ला घातला असे म्हणतात. मुसलमानांना कापून काढणे हेच महाराष्ट्रधर्माचे लक्षण आहे हे म्हणणे अजिबात चुकीचे आहे असे शेवटी सहस्रबुद्धे स्वत:च नकळत सिद्ध करतात, पण त्यांच्या डोक्यात कल्पना मात्र तीच शिल्लक राहते!

समर्थांचे म्हणणे exactly काय होते ते मला माहीत नाही, पण ‘मराठी तेतुका मेळवावा आणि मुसलमान तेतुका कापावा’ असे ते असेल तर, सर, आय बेग टु डिफर. पहिला भाग ठीक आहे पण दुसरा नाही! राष्ट्रभावना निर्माण होण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी पाकिस्तानसारखा एक कायम शत्रू असलाच पाहिजे असे मला तरी वाटत नाही.

पुढे, स्वराज्य आणि स्वधर्म हे महाराष्ट्रधर्माचे आणखी एक लक्षण आहे असे सहस्रबुद्धे म्हणतात. म्हणजे आपल्या माणसाचे राज्य असावे आणि ते धर्माने चालावे एवढेच काय ते. पण पुन्हा समर्थांचा उपदेश… म्लेंच्छसंहार करून महाराष्ट्र वाढवावा! रामदास स्वामी सिम्स टु बी ऑबसेस्ड बाय धिस.

शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला महाराष्ट्रधर्म म्हणजे सामर्थ्यशाली राष्ट्रवाद होता, तो द्वेषभावनेवर आधारित नव्हता. प्रखर राष्ट्रवाद निर्माण करण्यासाठी प्रखर द्वेषवाद निर्माण करावा लागतो असे त्यांचे तत्त्वज्ञान नव्हते असे माझे प्रांजळ मत आहे. पण शिवाजीमहाराजांचा राष्ट्रवाद हा क्षेत्रीय राष्ट्रवाद होता. त्याचे रूपांतर भारतीय राष्ट्रवादात करण्याचा मुख्य प्रयत्‍न टिळकांनी केला, पुढे सुभाषचंद्रांनी केला. महात्मा गांधी व पंडित नेहरू असे प्रखर राष्ट्रवादी नव्हते. ते लोकशाहीवादी होते. त्यांचा मुख्य विरोध वसाहतवादाला होता. सावरकरांनी हिंदुस्तानी राष्ट्रवादाचे रूपांतर हिंदुराष्ट्रवाद असे केले. आजचा महाराष्ट्र शिवाजी महाराजांच्या क्षेत्रीय राष्ट्रवादाला भारतीय राष्ट्रवाद समजत आहे आणि ‘महाराष्ट्र, That is India’ असे असल्यासारखे वागत आहे. But there is more to India than Maharashtra हे आपल्याला समजायला पाहिजे.

– वसंत केळकर
भ्रमणध्वनी : 9969533146
इमेल : vasantkelkar@hotmail.com

About Post Author

Previous articleसुकेशनीचा संघर्ष
Next articleडेंजर वारा
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.