महाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शाळा

0
156

महाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शाळा तळेगाव दाभाडे येथील समर्थ विद्यालय होय. हे विद्यालय स्थापन करण्यात पुढील प्रमुख उद्देश होते : (1) शिक्षणात आपल्या मताप्रमाणे सुधारणा करण्याकरिता संस्था सरकारी नियंत्रणापासून स्वतंत्र ठेवणे, (2) मातृभाषेतून शिक्षण देणे, (3) बौद्धिक शिक्षणास औद्योगिक शिक्षणाची जोड देणे, (4) संस्थेतील विद्यार्थ्यांची वसतिगृहात राहण्याची सोय करून विद्यार्थ्यांस गुरुसान्निध्याचा लाभ करून देणे, (5) विद्यार्थ्यांना आपल्या धार्मिक आचारांची व संस्कृतीची माहिती करून देऊन त्यांच्यात याबद्दल अभिमान उत्पन्न होईल असे शिक्षण देणे, (6) मुलांनी शरीरप्रकृती सुदृढ व भावी आयुष्यातील जबाबदारी पार पाडण्यालायक तयार करण्याकरिता सकस आहार आणि शारीरिक शिक्षण यांची सोय करणे. आपण आखलेला शिक्षणक्रम आपल्या पद्धतीने शिकविण्याकरिता समर्थ विद्यालयाने स्वतंत्र क्रमिक पुस्तके तयार करण्याची योजना आखून मराठी, बीजगणित, संस्कृत प्रवेश, मुलांचा महाराष्ट्र, गीर्वाण लघुकोश अशी पुस्तके प्रकाशित केली.

त्या काळी देशात राजकीय असंतोष वाढत असल्यामुळे राष्ट्रीय शिक्षण हे स्वातंत्र्यप्राप्तीचे एक साधन होय, असे पालक व विद्यार्थ्यांना वाटत होते. नेमक्या यात कारणाकरिता सरकारला राष्ट्रीय शिक्षण देणा-या शाळा व त्यांचे चालक नापसंत होते. त्यामुळे 1910 साली सरकारने राष्ट्रीय शिक्षण देणा-य् शाळा बेकायदेशीर संस्था ठरवून त्या बंद पाडल्या आणि चालकांवर नोटिसा बजावून त्यांतील काहींना तुरुंगात टाकले. 1914 मध्ये लोकमान्य टिळक सहा वर्षांचा कारावास भोगून परत आल्यानंतर त्यांनी स्वराज्याच्या चळवळीस पुन्हा आरंभ केला. 1920 मध्ये लोकमान्य टिळकांचे निधन झाले. त्यावेळेस महात्मा गांधींनी लोकमान्यांच्या स्मारकासाठी टिळक स्वराज्य फंड सुरू केला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात लोकमान्यांच्या स्मरणार्थ अनेक राष्ट्रीय संस्था स्थापन करण्यात येऊन त्यांस ‘टिळक’ हे नाव जोडले गेले.

– प्रतिनिधी

(श्री.ब. गोगटे – मराठी विश्र्वकोश, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई यामधून उद्धृत)

About Post Author