महादू गेणू आढाव या संघर्षवादी नेत्याने मानवी हक्कांसाठी लढा देऊन अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवला. त्यांचा समाजाचे भले करण्याचा इरादा व जातीयवाद्यांशी लढा शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहिला. वादी असला तरी, त्याच्या आयुष्याचे नंदनवन करण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांच्यातील सद्हृदयतेचे दर्शन घडवतो…
महादू गेणू आढाव म्हटले, की फलटण परिसरात डोळ्यांसमोर येते ती सडपातळ देहयष्टी लाभलेली काळीसावळी मूर्ती. पांढरे शुभ्र धोतर, तसाच सदरा, डोक्यावर चापूनचोपून बांधलेला भलामोठा फेटा, डोळ्यांवर भिंगाचा चष्मा, त्यातून चिरणारी करारी नजर. लोक त्यांना ‘पुढारी’ म्हणूनच संबोधत. महादू गेणू हयात नाहीत, पण ते आयुष्यभर जातीयवादी, मनुवादी शक्तींशी संघर्ष करत राहिले. तो महिमा त्या काळाचा होता. त्यांचा संघर्ष विसरता येण्यासारखा नाही.
महादू गेणू हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या फलटण येथे 23 एप्रिल 1939 रोजी झालेल्या प्रजा परिषदेच्या ऐतिहासिक सभेला उपस्थित होते. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले त्या दिवशी ते ऊस तोडण्याचे काम शेतात करत होते. त्यांनी त्यांना बाबासाहेबांच्या मृत्यूची बातमी समजताच तेथून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. माघारी आल्यानंतर, त्यांनी आंबेडकरी चळवळीस सक्रिय वाहून घेतले!
‘दलित पॅन्थर’च्या पश्चिम महाराष्ट्रात स्थापन झालेल्या पहिल्या काही शाखांमध्ये त्यांच्या गुणवरे या गावाची शाखा येते. महादू गेणू हे त्या शाखेचे तहहयात अध्यक्ष होते. ते पुढे, नव्याने स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाचेही अध्यक्ष होते. त्यांच्यामधील पॅन्थर शेवटपर्यंत जिवंत राहिला. त्यांचा समाजाचे भले करण्याचा इरादा व जातीयवाद्यांशी लढा शेवटच्या क्षणापर्यंत राहिला. महादू गेणू क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सभा ऐकून समाजकार्य करण्यास सज्ज झाले होते.
महादू गेणू यांचा जन्म गुणवरे या गावी 13 जानेवारी 1933 रोजी झाला. ते इयत्ता चौथीपर्यंत तेथेच शिकले. आई मोलमजुरी करून राहायची. त्यांच्याबरोबर महादू गेणूही मजुरी करू लागले. गावातील गुजराकडून कर्ज घेतल्याने त्यांना गुजराकडे सालाने काम करावे लागले. कर्ज काढून लग्न केल्याने कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. गुजराकडे असताना, त्यांना वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने डाळ घोड्यावरून आणावी लागत असे. डाळ आणताना पोत्यातून ती थोडी-थोडी सांडत असे. त्यामुळे एकदा गुजराने त्यांच्यावरच डाळ चोरल्याचा आरोप केला आणि गुजर त्यांच्या अंगावर धावून गेला. प्रामाणिक महादू गेणूला प्रथमत: त्यांच्यावर केलेल्या चोरीच्या आरोपाचा खूप राग आला आणि त्यातच गुजर त्यांच्या अंगावर धावून आलेला; त्यांना ते सहन झाले नाही व त्यांनी एकाच झपाट्यात गुजराला आडवा पाडला. ते प्रकरण पुढे प्रांतांकडे गेले. प्रांतांनी जमिनीचा लिलाव केला. ते महादूला समजले. त्याने गुजराला दम भरला आणि तो त्याला बोलला, की, ‘तू माझ्या जमिनीवर पाय ठेवूनच दाखव!’ असा हा महादू गेणू कधीच कोणाला घाबरला नाही.
असाच एक प्रसंग गुणवरे गावात घडला. अंतू कृष्णा डंगाणे यांचे हॉटेल गावात होते. परंतु अस्पृश्य बांधवांसाठी वेगळी कपबशी त्या हॉटेलात ठेवली होती. वास्तविक, लोकहितवादी सी.के. बोले यांनी सर्व पाणवठे, सार्वजनिक स्थाने या ठिकाणी अस्पृश्य बांधवांना प्रवेश मुक्त द्यावा असा ठराव 4 ऑगस्ट 1923 रोजी मुंबई प्रांतिक विधिमंडळात केला होता. त्यानंतर अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा मात्र 20 एप्रिल 1947 पासून घोषित करण्यात आला, पण तरीही गुणवरे गावच्याच गौंड गावडे यांच्या सांगण्यावरून अंतू डंगाणे याने हॉटेलात कपबशी वेगळी ठेवली होती. महादूने त्या संबंधी अंतू डंगाणे याला विचारणा केली आणि दोन दिवसांत सर्व कपबश्या एकत्र करण्यास सांगितले. परंतु डंगाणे यांनी कपबश्या एकत्र करण्यास नकार दिला. महादूला त्याचा प्रचंड राग आला. त्याने 21 जुलै 1959 रोजी सकाळी साडेअकरा वाजता हॉटेल मालक डंगाणे यांच्या वखारीतील लाकूड घेऊन, सगळ्या कपबशा फोडून टाकल्या आणि अंतू डंगाणेविरुद्ध फलटण पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलिस गाडी 22 जुलै 1959 रोजी सकाळी साडेदहा वाजता आली. त्यांनी पहिल्यांदा कपबश्या एकत्र करण्याचा आदेश दिला. अशा प्रकारे, महादूने मानवी हक्कांसाठी लढा देऊन अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवला! फलटण तालुक्यातील कोणत्याही गावातील अस्पृश्य बांधवांवर जातीयवाद्यांनी अन्याय केला तर महादू गेणू स्वतः त्या ठिकाणी धावून जात.
दुसरा एक प्रसंग. महादू गावातील पुजाऱ्यांना बोलले, ‘दार उघड, नारळ फोडायचा आहे!’ अस्पृश्य बांधवांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. त्यामुळे ते देवळात जात नाहीत हे त्याला माहीत होते, पण महादूने मागणी केल्यामुळे पुजाऱ्याला देऊळ उघडावे लागले. महादूने नारळ फोडला. कोणीही काही बोलले नाही. पण पुजाऱ्याने त्यानंतर सातआठ किलोमीटरवरून गोखळी गावच्या नीरा नदीवरून पाणी आणून देऊळ धुऊन काढले. महादू गेणू यांनी मानवी हक्कांसाठी कायम संघर्ष केला.
महादू गेणू यांचे छपराचे घर पंधरा गावकऱ्यांनी मिळून जमीनदोस्त 20 फेब्रुवारी 1996 रोजी केले. त्यासाठी ग्रामपंचायतीचा तसा ठराव करून त्यांच्यावर अन्याय केला गेला. पण महादू गेणू मागे कधीही हटले नाहीत. त्यांनी कैकाडी समाजाच्या महिलेवर बलात्कार झाला असता, सदर प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनासुद्धा सोडले नाही. त्यांनी त्या पीडित महिलेच्या कुटुंबाला सर्व प्रकारची मदत केली. आरोपींना अटक होऊन, त्यांना कोर्टात भारतीय दंड विधान 354 कलमान्वये उभे केले, परंतु आरोपी जामिनावर सुटले. त्यावेळी महादू गेणू आढाव यांनी फलटण ‘दलित पॅन्थर’चे अध्यक्ष सुरेश अहिवळे, दादा दैठणकर, हरिभाऊ निंबाळकर यांसह सातारा येथे जाऊन अतिरिक्त पोलिस अधीक्षक शंकरराव दोडमणी यांना निवेदन 9 मे 1999 रोजी दिले. शंकरराव दोडमणी स्वत: फलटण पोलिस स्टेशनला आले आणि त्यांनी बलात्काराचा गुन्हा भादंवि 376 कलमान्वये दाखल केला. त्यामध्ये भटक्या विमुक्तांचे नेते पद्मश्री लक्ष्मण माने यांनी स्वत: लक्ष घातले. पोलिस प्रमुखांनी दोषी पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले.
महादू गेणू त्यांचे विचारही खणखणीत व्यक्त करत. ते म्हणत, “तरुणांकडे वैचारिक दृष्टी असावी. समाजावर जर कोणी धावून आला तर हातून जीव गेला तरी बेहत्तर, पण अन्यायाचा प्रतिकार सनदशीर मार्गानेच करावा. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण सतत डोळ्यांसमोर ठेवावी. चांगले काम करणाऱ्या माणसांविषयी आदरभाव बाळगावा. समाजाचे हित जपणाऱ्या माणसाकडे नेतृत्व असावे. प्रतिनिधी हा निष्ठावंत, शीलवान आणि फुले–शाहू–आंबेडकर यांच्या विचारांना आदर्श मानून काम करणारा असावा. समाजाच्या विकासासाठी एक वेळ तरी ग्रामपंचायतीत जावे आणि तेथे विधायक काम करण्याची संधी मिळवावी. वादी असला तरी चालेल, पण त्याचे नंदनवन करण्याची माझी इच्छा आहे. माझ्या समाजाचे भले कसे करता येईल याचाच विचार माझ्या मनात सतत असतो.”
त्यांनी कार्यकर्त्याचे वर्णन असे केले होते – पूर्वजांवर, समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ज्याचे रक्त खवळून उठते त्यास कार्यकर्ता म्हणावे. समाजामध्ये घडणाऱ्या वाईट घटनांबद्दल ज्याचे मन हेलावते, ज्याला दुःख होते, ज्यांचे काळीज पिळवटते त्यास कार्यकर्ता म्हणावे. समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध जो तुटून पडतो, अशा प्रकारात जो बऱ्यावाईटाची, मान-अपमानाची व मरणाची पर्वा करत नाही त्यास कार्यकर्ता म्हणावे. ज्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचे बीज रुजले आहे तो स्त्री असो वा पुरुष, त्यास कार्यकर्ता म्हणावे.
ते प्रबोधनाची परंपरा चालवत असताना गीताच्या माध्यमातूनसुद्धा प्रबोधन करत राहिले. त्यांनी त्यांच्या आवडीचे गीत कोणते असे विचारल्यावर काही ओळी गुणगुणल्या-
गोलमेज परिषद, भीम गाजला
दलितांचा पुढारी हा डंका वाजला ।
बोलण्याची नाही त्याने केली भीडभाड
वर्णभेद विटाळण्याची केली त्यांनी चिरफाड
पाहुनिया महात्मा गांधी मनी लाजला
दलितांचा पुढारी हा डंका वाजला ।।
दलितांचे भीमा बाबा झाले जगी या नाव
म्हणूनच पूजतात तुज गावोगाव
रामजीच्या पुण्याईनं आम्हाला भीम लाभला
दलितांचा पुढारी हा डंका वाजला ।।।
महादू गेणू आढाव आणि त्यांनी केलेल्या कार्याविषयी आढावा घेत असताना, त्यांच्या समवेत अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता. समाजातील काही पुरोगामी शिक्षित वर्गाने महादू गेणू यांना त्यांच्या कामामध्ये मदत केली. त्या सर्वांची आठवण या ठिकाणी काढणे उचित ठरेल! असा हा मानवी हक्कांचा आवाज १९ डिसेंबर २०१६ रोजी शांत झाला.
– सोमिनाथ घोरपडे 7387145407 sominathghorpade10@gmail.com
————————————————————————————————————————————–