मध्ययुगीन साहित्य हे कोणत्या ना कोणत्या तरी पंथ विचारातून निर्माण झाले. भक्ती आणि संप्रदाय यांच्यावरील निष्ठा हे त्या साहित्याचे वैशिष्ट्य होते. त्यात महानुभाव हा पंथ महत्त्वाचा आहे. त्यांच्या साहित्यातून लोकभाषेला ग्रांथिकतेचा दर्जा मिळाला व ती धर्मभाषा बनली. तोपर्यंत तेथे संस्कृत भाषेचा पगडा होता. श्रीचक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे संस्थापक. त्यांचा महाराष्ट्रातील परिभ्रमणाचा काळ 1267 ते 1274 हा मानला जातो. त्यांनी गोदावरीच्या दोन्ही तीरांवर परिभ्रमण करून तो पंथ महाराष्ट्रात रुजवण्याचे व तत्कालीन धर्मसुधारणेचे कार्य केले.
तो कालखंड यादव राजवटीचा आहे. यादवराजे हे वैदिक धर्माचे कट्टर पुरस्कर्ते होते. श्रीचक्रधर स्वामी यांनी तशा काळात त्या धर्मातील विषमता, भेदाभेद नाकारले व समतेची गुढी उभारली. त्यांच्या कार्याला धर्ममार्तंड व राजेशाही यांचा विरोध प्रचंड झाला. चक्रधर स्वामींनी त्या विरोधाचा सामना केला. त्यांनी परंपरागत धर्म नाकारला. त्यांनी जातपात व स्त्री-पुरुष भेद नाकारून लिंगाधिष्ठित श्रेष्ठ-कनिष्ठता त्याज्य ठरवली. त्यांची भूमिका माणूस वर्णातीत आहे अशी होती. त्यांनी ती बंधने ‘बाई : हे काई ब्राह्मण : की क्षेत्री : की वैश्य : की शुद्र : हे नेणिजे की बाई’ असे म्हणून झुगारून दिली. त्यांनी पहिला प्रहार धर्मातील अनिष्ट रचनेवर केला. त्यांचा दृष्टिकोन जन्मजात अभिश्रेष्ठतेपेक्षा कर्मजात अभिश्रेष्ठता महत्त्वाची असा होता आणि तोच विचार त्यांनी त्यांच्या अनुयायांच्या मनात पेरला. त्यांचा संचार सर्वत्र सारखा असे. त्यांचा सम्यक दृष्टिकोन आणि त्यांचे कृतिशील अनुसरण यांमुळे ते जेथे जात तेथे त्यांचा प्रभाव पडे.
महानुभव पंथात पंचकृष्ण अवतार मानले जातात. ती त्यांची अवतार कल्पना आहे. महानुभावांच्या पंचकृष्णांत श्रीकृष्णप्रभू, श्रीदत्तात्रेयप्रभू, श्रीचक्रपाणि, श्रीगोविंदप्रभू आणि श्रीचक्रधर स्वामी यांचा समावेश होतो. (‘जैसे दवापरी श्रीकृष्णचक्रवर्ती || जैसे सैहाद्री श्रीदत्तात्रेयप्रभू || जैसे द्वारावतीये श्रीचांगदेवो राउळ || जैसे ऋद्धीपुरी श्रीगुंडम राउळ || जैसे प्रतिष्ठानी श्रीचांगदेवो राउळ||’) पंचकृष्णांपैकी श्रीगोविंदप्रभू हे विशेष लौकिकप्राप्त. ते सर्वाशी मानवतावादी भावनेने वागत. ते शूद्रांच्या घरी जात, त्यांच्या हातचा प्रसाद भक्षण करत, त्यांच्याशी बोलत, खेळत. अभिजन त्यांच्यावर त्यांच्या त्या वागण्याने रूष्ट असत, पण त्यांनी त्याची फिकीर केली नाही. दलितांनी त्यांना त्यांचे मायबाप मानले. जनतेची त्यांच्याप्रती ‘राउळ माय : राउळ बापु’ अशी भावना होती. गोविंदप्रभू हे गुंडम राऊळ या नावाने महानुभाव पंथात सर्वश्रुत आहेत. ते श्रीचक्रधर स्वामींचे गुरू. त्यांचा जन्म काठसुरे-वऱ्हाड येथे 1197 साली झाला. त्यांचे वास्तव्य अमरावतीजवळील ऋद्धिपूर येथे होते. ते त्या पंथाचे आद्यपुरुष होते. त्यांचे जीवनचरित्र गोविंदप्रभू चरित्र ग्रंथात वर्णिले आहे.
श्रीचक्रधर स्वामी यांची जन्मभूमी गुजरात, तर त्यांची कर्मभूमी महाराष्ट्र ही आहे. त्या पंथाची महाराष्ट्राबद्दल धारणा ‘महंत राष्ट्र ते महाराष्ट्र’ अशी होती. म्हणूनच त्यांनी तेलंगण व दक्षिणेतील इतर राज्ये यांमध्ये न जाता, त्यांचे कार्य महाराष्ट्रात करण्याचे ठरवले, त्यांच्या अनुयायांना महाराष्ट्रातच राहण्याची आज्ञा दिली. त्यांनी ‘विषयबहुल’ राज्यात, राजस गुण असलेल्या प्रांतांत जाण्याचे टाळले. त्यांचा वावर महाराष्ट्रातसुद्धा गोदावरीच्या तीरावर नगर, बीड, मराठवाडा, विदर्भ या परिसरात जास्त होता. नगर जिल्ह्यातील डोमेग्राम हे स्थळ सर्वश्रुत आहे. त्यांचे पैठणमधील वास्तव्य; तसेच, त्यांच्या बाबतची अखेरची लीळा (आठवण) ही नगर जिल्या डतील बेलापूर या गावातील आहे. त्यानंतर स्वामींनी उत्तरापंथे गमन केले. (ते उत्तर दिशेला निघून गेले!)
श्रीचक्रधर स्वामी यांच्या महानुभाव पंथाने मराठी संस्कृतीची जडणघडण करण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी मराठीचा पुरस्कार केला. त्यांचा लोकभाषा वापरण्यावर कटाक्ष होता. एकदा केशिराजबास यांनी लीळाचरित्रातील एका लीळेचे भाषांतर संस्कृतमध्ये केले आणि नागदेवाचार्यांना दाखवले असता ते म्हणाले, ‘तुमचा अस्मात कस्मात मी नेणेची गा || मज श्रीचक्रधरे निरूपिलि मऱ्हाटी तियेची पुसा|’ (अर्थात तुमची संस्कृत भाषा मी जाणत नाही. मला चक्रधर स्वामींनी मराठीतच व्यवहार करण्यास सांगितले आहे. तेव्हा तिचाच आवर्जून वापर करा असे नागदेवाचार्य ठणकावून सांगतात. त्यावरून चक्रधर स्वामी मराठी भाषेविषयी किती आग्रही असणार ते दिसून येते.) श्रीचक्रधर स्वामी निघून गेल्यानंतर नागदेवाचार्य यांनी महानुभाव पंथाचे कार्य पाहिले. महानुभाव पंथाने जनभाषेच्या उपयोजनाबाबतचा पहिला अशासकीय दंडक घातला असे म्हणता येईल. त्या शतकात लोकभाषेला प्रतिष्ठा देण्याचे महनीय कार्य सुरू झाले आणि त्याची फलश्रुती म्हणजे मराठी गद्याचा पाया रचला गेला, तो महानुभाव पंथाच्या ‘लीळाचरित्र’ या ग्रंथातून. मराठीतील तो पहिला गद्य ग्रंथ. अभ्यासकांच्या मते, तो काळ इसवी सन1286 असा आहे. त्यानंतर लगेच ‘ज्ञानेश्वरी’सारखा अभिजात व दर्जेदार पद्यग्रंथ निर्माण झाला. मराठी भाषेची श्रीमंती त्या दोन ग्रंथांनी वाढली जाऊन, मराठीला संपन्न भाषा म्हणून जागतिक स्तरावर स्थान लाभले.
महानुभाव पंथातील सर्व ग्रंथ चक्रधरस्वामींच्या ‘उत्तरापंथे गमना’नंतर शब्दबध्द झाले. परंतु, ते सर्व ग्रंथ नागदेवाचार्यांच्या आग्रहामुळे आवर्जून मराठीत लिहिले गेले. त्यामुळे महानुभाव पंथ हा महाराष्ट्रातील आध्यात्मिक पंथ तर आहेच, पण तो महाराष्ट्रातील आद्य मराठीवाड्मयीन पंथदेखील आहे. त्यांनी विविध साहित्याची निर्मितीही केली. त्यात चरित्र, काव्य, प्रवासवर्णन आणि स्थलवर्णन यांचा समावेश होतो. महानुभाव पंथातील ‘गोविंदप्रभुचरित्र’, ‘दृष्टांतपाठ’, ‘स्मृतिस्थळ’, ‘सूत्रपाठ’ या ग्रंथांनी तत्कालीन मराठी भाषेचे गद्यस्वरूप सिद्ध केले. म्हणूनच ते ग्रंथ भाषिक अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले गेले आहेत. ते सामाजिक अभ्यासाच्या, लोकसाहित्याच्या अभ्यासासाठीही तितकेच महत्त्वपूर्ण आहेत. तत्कालीन रूढी, परंपरा, लोकसमजुती, लोकजीवनाच्या पद्धती त्या ग्रंथांतून व्यक्त झाल्या आहेत. ते ग्रंथ म्हणजे तत्कालीन समाजजीवनाचा आलेखच ठरतो. ‘लीळाचरित्रा’त आलेली ‘चिमणी-कावळ्याची गोष्ट’ लिखित साहित्य म्हणून अजरामर ठरली आहे. अर्थात ती गोष्ट त्याआधी मौखिक परंपरेत रूढ असणार.
महानुभाव पंथाच्या म्हाइंभट यांनी चरित्रनिर्मितीचा पाया घातला असे म्हणतात. त्यांनी श्रीचक्रधर स्वामी यांच्या वियोगाच्या अनुषंगाने लौकिक जीवनचित्रणास आरंभ केला. तोपर्यंतचे साहित्याचे विषय हे ईश्वरी अवताराच्या संबंधी व पुराणावर आधारलेले होते. म्हाईंभट हे त्या पंथातील महत्त्वाचे अनुयायी, ते अहमदनगर जिल्ह्यातील सारोळा गावचे. ते व्युत्पन्न ब्राह्मण, संस्कृत भाषेचे पंडित व उत्तम जाणकार होते. आणखीही काही उच्चवर्णीय संस्कृत पंडितांनी महानुभाव पंथाचे शिष्यत्व त्या काळात स्वीकारले. म्हाईंभट हे त्यांपैकी एक. श्रीचक्रधर स्वामी यांनी जेथे भ्रमंती केली त्या स्थळी जाऊन लीळा संकलित केल्या आणि ‘लीळाचरित्र’ हा मराठीतील पहिला गद्य ग्रंथ लिहिला. मराठी गद्यनिर्मितीला तेराव्या शतकानंतर थेट सोळाव्या शतकात पुन्हा सुरुवात झाली. मराठीतील पहिली स्त्री कवयित्री निर्माण झाली ती महदंबा ही महानुभाव पंथाचीच देणगी होय! त्या पंथाने स्त्रीविषयक उदार दृष्टिकोन स्वीकारून जे प्रबोधन केले तेही महत्त्वपूर्ण आहे. तेथे स्त्रियांना मुक्त वावर मिळाला. चक्रधर स्वामी यांनी स्त्रियांना सोसावे लागणारे दु:ख, त्यांच्यावरील विविध बंधने यांबाबत परखड विचार मांडले. स्त्रियांचा मासिक धर्म ही बाब नैसर्गिक असून त्यात विटाळ कसला? श्रीचक्रधर स्वामी यांच्या नजरेतून, त्यांचा अंगठा उमाईसेला, ती विटाळशी असताना लागतो, दुरून दर्शन घेत असताना ते घडते ही गोष्ट सुटत नाही. ते तिच्यावर रागावत नाहीत. उलट, मिश्किलपणे ‘आता त्या अंगठ्याला कोणत्या तीर्थात शुद्ध करून आणावे?’ असे विचारतात व त्या विषयावर चर्चा करून त्याबाबत त्यांचे विचार स्पष्ट मांडतात. त्यांना अंधश्रद्धा, स्पृश्यास्पृश्यता, कर्मकांड या गोष्टी मान्य नव्हत्या. चक्रधर स्वामी यांच्यानंतर त्यांच्या अनुयायांनी ती धुरा सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्या पंथातील संस्कृत पंडितांनी ‘साती ग्रंथ’ (जे सात ग्रंथ महत्त्वाचे मानले जातात त्यांना सातीग्रंथ म्हटले जाते.) निर्माण करून पुढील पंडिती काव्याचेही बीजारोपण केले. पण पुढे, त्यांनी निर्माण केलेले साहित्य ज्यावेळी मुस्लिम आक्रमणे होत होती, त्यात नष्ट होऊ नये, चोरीस जाऊ नये या भीतीने सांकेतिक लिपीत कुलुपबंद करण्यात आले. ते त्यांच्याशिवाय इतरांना कसे कळणार? पण त्यामुळे महानुभाव पंथाचे साहित्य आम लोकांपासून दूर झाले. (आधुनिक काळात ते धन पुन्हा सर्वांसाठी काही अभ्यासकांनी खुले केले.) वि. भि.कोलते हे त्यांतील प्रमुख व आद्यदेखील. ती भाषा तेराव्या शतकातील गद्याचा नमुना आहे. परंतु तिचा अर्थ लागत नाही अशी स्थिती आली. पण त्यातील कोट तसेच आहेत. तो पंथ मोठ्या प्रमाणात विस्तारला मात्र नाही. त्यांचे अनुयायी खानदेश, मराठवाडा, नगर याच टापूत आढळतात.
– अशोक लिंबेकर 93268 91567
ashlimbekar99@gmail.com
Nice
Nice
Comments are closed.