Home अवांतर किस्से... किस्से... मर्ढेकर आणि लागू

मर्ढेकर आणि लागू

कृ.द. दीक्षित यांनी आकाशवाणीमधील नोकरीदरम्यान अनेक कलावंतांना जवळून अनुभवले, त्यांच्या स्वभावातील कंगोरे टिपले. ते अनुभव त्यांनी व्यक्तिचित्रांच्या माध्यमातून आकर्षक पद्धतीने लिहून वाचकांसाठी मुक्त केले. त्यात चॉसरचे तज्ज्ञ प्रा. लागू व बा. सी. मर्ढेकर यांच्यातील तत्त्वनिष्ठा वेधक आहे…

कृ.द. दीक्षित यांनी उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांचा स्वत:चा व्यवसाय सोडून देऊन आकाशवाणीत जाण्याचे ठरवले आणि आकाशवाणीचे अधिकारी म्हणून कलावंतांच्या जवळिकीचे जे क्षण त्यांच्या हाती आले, त्याचे त्यांनी मुक्तहस्ताने वाचकांना वाटप केले. त्यांचा भर गाण्याच्या किंवा कलावंतांच्या कलेच्या चिकित्सेवर फारसा नव्हता; पण ते त्या कलावंतांचे मोठेपण वाचकांपर्यंत पोचवणारे छोटे छोटे प्रसंगही आकर्षक पद्धतीने सांगतात.

कृ.द. दीक्षित यांना आकाशवाणीतील अधिकारपद सांभाळत असताना ध्वनिमुद्रणाच्या निमित्ताने अनेक कलावंतांना जवळून पाहता आले, त्यांच्या स्वभावातील कंगोरे टिपता आले. त्यांनी लिहिलेली त्यांतील काही व्यक्तिचित्रे ‘सत्यकथा’ आणि ‘मौज’मध्येही आली आहेत. मी येथे उल्लेख करत आहे तो त्यांनी लिहिलेल्या एका तत्त्वनिष्ठ शिक्षकांच्या व्यक्तिचित्राचा (सत्यकथा, जानेवारी १९६६). दीक्षित पुण्याच्या डेक्कन कॉलेजात शिकत होते. प्राचार्य वुडहाऊस त्यांना इंग्रजी शिकवत. अभ्यासक्रमात चॉसर होता. त्या प्रामाणिक शिक्षकाने ‘चॉसरचा माझा अभ्यास नाही, तुम्ही स्वत:च अभ्यास करा’ असे मुलांना सांगितले. तेव्हा मुलांनी ‘पुण्यातच प्रा. लागू हे चॉसरचे तज्ज्ञ आहेत, त्यांना आपण बोलावू या का?’ असा प्रश्न भीत भीत विचारला. प्राचार्यांनी मोकळ्या मनाने संमती दिली. लागू यांना बोलावणे गेले. त्यामुळे दीक्षित यांना आणि इतर विद्यार्थ्यांना एका निष्ठावंत जीवनाचा परिचय झाला. प्रा. लागू यांना वर्ष संपल्यानंतर निरोप देण्याच्या प्रसंगी काही विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या नौकाविहाराचे जे वर्णन दीक्षित यांनी केले आहे, ते वाचण्यासारखे आहे – “निसर्गाच्या त्या शांत, प्रसन्न स्वरूपात प्रा. लागू एकदम मोकळे झाल्यासारखे वाटले. मनाभोवती करकचून बांधलेले औपचारिकपणाचे वळसे जणू त्या वेळेला सैलसर होऊ लागले.” लागू यांनी नौकेतील छोट्याशा प्रवासात मराठी कवींच्या ओळीच्या ओळी म्हणून दाखवल्या आणि कालिदासाच्या मेघदूतातील सौंदर्यस्थळेही विशद केली.

प्रा. लागू यांची आणखी एक आठवण दीक्षित यांनी ते आकाशवाणीवर कार्यक्रमाधिकारी होते त्यावेळचीच सांगितली आहे… लागू यांना भाषणासाठी बोलावण्यात आले होते. भाषण इंग्रजीत होते. ते आकाशवाणीने जी अपेक्षा पत्रात व्यक्त केली होती, त्या सर्व मुद्यांना धरून होते; पण का कोणास ठाऊक, मर्ढेकर यांनी त्यावर ‘भाषण अपेक्षेप्रमाणे नाही, तरीही ध्वनिमुद्रित करावे’ असा शेरा लिहिला होता. योगायोग असा, की लागू यांनी तो शेरा, दीक्षित क्षणभर खोलीबाहेर गेले असताना वाचला आणि त्यांनी ‘भाषण पसंत नाही, तेव्हा ते मी ध्वनिमुद्रित करणार नाही व पैसेही घेणार नाही’ असे सांगितले. मर्ढेकर यांना त्या भाषणात आणखी एक-दोन मुद्दे हवे होते, पण रेडिओने पाठवलेल्या पत्रात त्यांचा उल्लेख नव्हता. मर्ढेकरही सहज वळणारे नव्हते. त्या समर प्रसंगाचे वर्णन दीक्षित यांनी केले आहे. शेवटी, मर्ढेकर यांनी त्यांचा शेरा खोडला आणि ते त्यांच्या खोलीत भाषण संपल्यावर प्रा. लागू यांना चहाला घेऊन गेले व तेथे त्या प्रकरणाची कटुता संपली.

दीक्षित यांच्या लेखणीत रंजकता तर असेच, पण ते जो प्रसंग रंगवत त्याचे अप्रूप वाचकांच्या लक्षात आणून देत. ‘अत्तरसुगंध’, ‘षड्ज गांधार’ यांसारखी त्यांची पुस्तके संगीत न जाणणाऱ्यांनासुद्धा पुन:पुन्हा वाचावीशी वाटतात. त्यांनी अधिकारी म्हणून असलेले त्यांचे कर्तव्य तर केलेच, शिवाय कलावंतांचा लोभही स्वत:च्या वागणुकीने संपादन केला. ज्यांना काही काळ आकाशवाणीने ज्येष्ठ तज्ज्ञ निर्माते म्हणून निमंत्रित केले, त्यांना मुदत संपल्यानंतर तेच काम पुन्हा न सांगता फक्त वाद्यांची देखभाल करण्याचे काम सांगितले. तेही त्यांना करावे लागले!

– नरेंद्र चपळगावकर nanajudgenpc@gmail.com

(महा अनुभव, जानेवारी २०२१ वरून)

————————————————————————————————————————————————————————-

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version