मरीन ड्राइव्ह : मुंबईची खरी ओळख

carasole

मुंबई शहराची ओळख दर्शवणाऱ्या अनेक जागा आहेत. त्यांपैकी सर्वांच्या पसंतीस उतरणारी स्वत:च्या सौंदर्याने पाहणाऱ्याचे मन मोहून घेणारी जागा म्हणून ‘मरीन ड्राइव्ह’कडे निर्देश करावा लागेल.

‘मरीन ड्राइव्ह’चा रस्ता लोकमान्य टिळकांच्या ‘स्वराज्य हक्क’ सिंहगर्जनेने पुनित झालेल्या भूमीपासून सुरू होतो. पूर्वी त्या परिसरात ब्रिटिशांची मरिन बटालियन तुकडी (लाइन्स) तैनात होती. त्या परिसरात मरिन लाइन्सच्या कवायती होत. त्यावरूनच त्या परिसाराला मरिन लाइन्स असे नाव पडले. बटालियनच्या परेडमुळे त्यास ‘मरिन ड्राइव्ह’ असे म्हणत असावेत. ब्रिटिश सरकारने गिरगाव चौपाटी ते चर्चगेट असा कोस्टल रोड तयार करण्याचे काम हाती घेतले. त्यानुसार त्या रस्त्याचे काम १८ डिसेंबर १९१५ साली पीडब्ल्यूडी इंजिनीयर केनेडी यांच्या देखरेखीखाली सुरू करण्यात आले होते. त्यास १८ डिसेंबर २०१५ रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली, ते मफतलाल तलावाच्या प्रवेशद्वारावरील दगडी दिपस्तंभावर कोरलेल्या माहितीवरून कळते. ‘मरीन ड्राइव्ह’च्या रस्त्याचे काम पूर्ण होण्यास पाच वर्षें लागली. केनेडी यांच्या निधनानंतर त्या रस्त्याला ‘केनेडी सी-फेस’ असे नाव देण्यात आले होते. ती त्या रस्त्याची पहिली ओळख! त्यानंतर त्या रस्त्याचे, ‘सुभाषचंद्र बोस मार्ग’ असे नामांतर झाले. तो रस्ता आज ‘मरीन ड्राइव्ह’ याच नावाने जगभर प्रसिद्ध आहे. त्या रस्त्याची लांबी ४.३ किलोमीटर आहे. तो रस्ता व समुद्राकाठी बांधलेला त्याचा कठडा, टाटा थियटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘एनसीपीए’पर्यंत थांबतो. भारतीय कला, संगीत, नृत्य व संस्कृती यांचे जतन करणारी ‘एनसीपीए’ची वास्तू आधुनिक वास्तूशास्राचा अजोड नमूना आहे. त्या इमारतीचे आराखडे आधुनिक वास्तूशास्त्राचे प्रणेते, जगप्रसिद्ध अमेरिकन आर्किटेक्ट फिलिप जॉन्सन यांनी तयार केलेले आहेत.

‘मरीन ड्राइव्ह’च्या रस्त्याला लागून बांधलेल्या ‘आर्ट डेको’ इमारती आणि सहा पदरी रस्ता, त्या रस्त्याला लागून असलेली मोकळी जागा व त्या जागेलगत बांधलेला कठडा ही कल्पक संकल्पना वाखाणण्याजोगी आहे. त्याच रस्त्याच्या एका टोकाला राज्यपाल, मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी, नगरसेवक व अती श्रीमंत व्यक्ती यांचे बंगले, निवासस्थाने आहेत. ते आणि समाजातील सर्व स्तरातील लोक कोठल्या ना कोठल्या कारणाने त्या रस्त्याला भेट देतात. रस्त्यावरून जात येत असताना, त्या कलासौंदर्यपूर्ण परिसराचा आनंद घेतात.

रस्त्याला लागून असलेल्या कठड्याच्या एका बाजूला अरबी समुद्र तर दुसऱ्या बाजूला मोकळेपणाने फिरता येईल अशी विस्तीर्ण जागा आहे. त्या शेजारी सहा पदरी दुहेरी रस्ता आहे.

रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला १९२० ते १९४० सालात प्रसिद्ध असलेल्या ‘आर्ट डेको’ शैलीतील इमारतींचे संकुल आहे. त्या प्रकारच्या इमारती असलेले जगातील पहिले शहर अमेरिकेतील मियामी हे होय. त्यानंतर मुंबई हे दुसरे शहर असावे. त्या काळातील सर्व श्रीमंतांना त्यांची इमारत ‘आर्ट डेको’ शैलीत असावी असे वाटत असे. त्या इमारतींपैकी जवळपास सर्व इमारती भारतीय वास्तूविशारदांनीच डिझाइन केलेल्या आहेत. त्यात वास्तूविशारद जी.बी. म्हात्रे यांचा वाटा मोठा आहे! त्या समूहातील अनेक इमारती वेगवेगळ्या वास्तूविशारदांनी डिझाइन केल्या आहेत. सर्व वास्तूविशारदांनी ‘आर्ट डेको’ शैलीचाच वापर करून त्या परिसराची शान कायम ठेवण्यात स्वत:चे कौशल्य दाखवून दिले आहे. त्यामुळेच तो परिसर सर्वांच्या पसंतीस उतरतो. त्या इमारती पाहताना, ‘शैलीविना वर्तमान इमारतींची भविष्यातील ओळख काय असणार आहे?’ असा प्रश्न मनात उभा राहतो.

‘आर्ट डेको’ या वैशिष्ट्यपूर्ण शैलीचे बाह्य स्वरूपातील सर्वात महत्त्वाचे घटक नजरेत भरतात, ते असे –

१. हलक्या व मुलायम रंगातील समान उंचीच्या इमारती.
२. प्रत्येक मजल्यावर प्रशस्त बाल्कनी व त्यांची एक गोलाकार बाजू.
३. खिडक्यांना संरक्षणासाठी लावलेले पण बटबटीतपणा जाणवू न देणारे नक्षीदार लोखंडी ग्रील.
४. मध्यवर्ती जिन्याच्या बाह्य पृष्ठभागावरील खिडक्या व गच्चीवरील भागाचे कलात्मक असे मनाला मोहित करणारे आकृतिबंध.

त्या परिसराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समुद्रकिनाऱ्यास लागून बांधलेला कठडा. समुद्राच्या हळुवार किंवा रौद्र लाटा थोपवत पहुडलेले अनगिनत टेट्रापॉड व तेथे येणारे असंख्य पाहुणे हेच या कठड्याचे मित्र! तेथे येणाऱ्यांना टेट्रापॉडवर आदळणाऱ्या लाटांच्या नादात अडकवून ठेवणारा, ऊन, ओलेपणा व थंडावा जाणवू न देणारा तो कठडाच सर्वांना त्यांचा स्वत:चा वाटतो. ‘मरीन ड्राइव्ह’ ही त्या परिसरात येणाऱ्या असंख्य पाहुण्यांना सामावून घेण्याची क्षमता असलेली एकमेव जागा असावी. मी त्या कठड्यावर बसून नजीकच्या प्रत्येक इमारतीच्या ‘आर्ट डेको’ शैलीचे बारकाव्याने निरीक्षण करणे  व सूर्यास्ताच्या रंगछटा न्याहाळणे हा छंद अनेक वर्षांपासून जपला आहे. मला त्या आनंदमय सौंदर्यपूर्ण ठेव्याचा साक्षीदार असल्याचा नेहमीच अभिमान वाटत आला आहे.

त्या परिसराची गंमत खऱ्या अर्थाने सुरुवात होते ती सूर्यास्तावेळी! आणि त्यानंतर असंख्य दिव्यांनी झळाळून निघणाऱ्या पिवळ्या रंगातील रोषणाईत! अशा ठिकाणांवर पांढरे दिवे नकोत व पिवळे दिवे पुनर्संचयित का करायला हवेत ते कला सौंदर्यानुभवाच्या निकषांवर समजून घेणे अधिक महत्त्वाचे वाटते. कारण ते निकषच माणसाच्या जीवनातील आनंद व उत्साह वाढवत असतात. मरीन ड्राइव्हवरील पिवळ्या प्रकाशामुळे समुद्रातील पाण्याच्या पृष्ठभागावर साकारलेल्या दिव्यांच्या प्रतिबिंबाकडे लक्षपूर्वक पाहिल्यास, पिवळा रंग किती सुंदर व स्वागतशील आहे ते जाणवते.

सूर्यास्ताच्या संधीप्रकाशातील फिकट पिवळा रंग जेव्हा स्वैरावस्थेत पहुडलेल्या सिमेंट काँक्रिटच्या टेट्रापॉडवर विसावतो, तेव्हा त्या रंगछटांची, धीम्या गतीत होणारी नैसर्गिक स्थित्यंतराची किमया भान हरखून टाकणारी असते. जोडीला समुद्राच्या पाण्याचा निळा रंग थंड प्रकृतीची प्रचिती देतो. संध्याकाळ उतरणीस लागते तसतसा समुद्रकिनाऱ्यास लागून ठेवलेल्या टेट्रापॉडच्या विविध आकारांवर स्थिरावणारा फिकट पिवळा रंग गूढ होत जातो. मग तो किंचितसा काळपट हलका तांबूस रंग धारण करतो. तेव्हा करड्या रंगाच्या कठड्यावर मावळत्या सूर्याला छद्मीपणाने निरोप देत रेंगाळणाऱ्या प्रकाशकिरणांचे कवडसे बघण्याचा आनंद प्रत्यक्षात अनुभवण्यास मिळतो. ती मुंबईकरांना मिळालेली एक मानवी आणि नैसर्गिक अशी दुहेरी देणगी आहे.

‘मरीन ड्राइव्ह’वर दिवेलागण झाल्यानंतर समुद्रकिनाऱ्यालगतचा भूभाग राणीच्या चंद्रहाराप्रमाणे दिसतो. म्हणूनच त्याला ‘क्विन्स नेकलेस’ अशी उपाधी मिळाली. पिवळ्या सोनेरी प्रकाशात उजळून निघणारा तो परिसर सर्व मुंबईकरांना अभिमान वाटण्याइतपत सुंदर आहे. ‘मरीन ड्राइव्ह’चा तो सौंदर्यानुभव विविध आकार, पोत व रंगांतून तयार होत असतो. तो मुंबईकरांप्रमाणे देशविदेशातून मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी अद्भुत, अनमोल व दुर्मीळ असा ठेवा आहे. अशा जागा शहराचा ‘चेहरा’ म्हणून ओळखल्या जातात. त्याकरता त्यांच्या निर्मात्यांच्या अंगी दूरदृष्टी व कला-संवेदन सौंदर्यानुभव असावा लागतो. कला-संवेदन सौंदर्याचा वारसा दिल्ली शहराच्या रूपाने सर एडविन् ल्युटेन या ब्रिटिश आर्किटेक्टने दिला आहे हे भारतीयांचे भाग्यच म्हणावे लागेल.

असे म्हणतात, ब्रिटिशांना मुंबईला लंडन शहराचे रूप द्यायचे होते. बॅलार्ड पियरच्या परिसरात त्या प्रयत्नांच्या छटा आजही दिसतात. पण वर्तमान मुंबईची खरी ओळख मरीन ड्राइव्ह व आजुबाजूच्या परिसरातच दडलेली आहे.

चंद्रशेखर बुरांडे

Last Updated On – 01 April 2016

About Post Author

2 COMMENTS

  1. Kalasakt anubhutinchi Janu
    Kalasakt anubhutinchi Janu perani Article madhun janvate. Best Article.

  2. मुंबईत येणार्या पाहुण्यांसाठी
    मुंबईत येणा-या पाहुण्यांना दाखवण्याजोगे अप्रतिम ठिकाण.

Comments are closed.