मराठी – सर्वसमावेशक भूमिका हवी

0
260

मराठीची काळजीवाहू म्हणून बोलीभाषांना योग्य अधिष्ठान प्राप्त करून दिल्यास मराठीचा झेंडा निश्चितच उंच फडकणार आहे.

जगात बोलल्या जाणाऱ्या एकूण भाषांमध्ये मराठी ही दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. भाषेबाबत काही प्रश्न, चिंता या सतत व्यक्त केल्या जातात; त्या म्हणजे मराठीवर इंग्रजीचे आक्रमण, हिंदीचा शिरकाव, मराठी शाळा बंद पडणे, मराठी शाळांमध्ये कमी होत असलेली पटसंख्या… असे झाले तर मराठी कशी टिकेल, जगेल, मराठीचे भविष्य काय? ती कशी जगवावी? मराठीच्या संवर्धनाकरता काय करावे? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ते प्रश्न निर्माण होणे हेच मराठीजन त्यांच्या मायबोलीसाठी किती संवेदनशील आहेत याचे द्योतक होय. त्यामुळे मला वाटते, की मराठीचे भविष्य काय? अशी चिंता करण्याची गरज नसून, मराठीस सर्वसमावेशक कशी करता येईल, तिला व्यापक कशी करता येईल याचे चिंतन करण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात असणाऱ्या सर्व माध्यमांच्या प्रत्येक शाळेत पूर्वप्राथमिक पासून ते उच्चमाध्यमिक पर्यंत मराठी भाषेचा विषय सक्तीचा असावा. महाराष्ट्रात शिक्षण घेण्याचे असेल तर मराठी हा विषय शिकावाच लागेल. त्याप्रमाणे धोरण आखले गेले तर शिक्षणातून मराठी टिकेल- ती व्यापक होईल आणि मग मराठीतून विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण शिकवता येईल. त्यानुसार नियोजन आणि जनाग्रह असण्यास हवा. त्यासाठी तयारी करावी लागेल. विज्ञानातील सर्व इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधावे लागतील.

मराठी भाषा ही प्रमाणभाषेच्या नावाखाली बंदिस्त नसावी. नेमकी मराठी भाषा कोणती हा प्रश्न वारंवार कोणाच्याही मनात येण्यास नको. माझी भाषा मराठी नसून गावरान आहे असा न्यूनगंड निर्माण होण्यास नको- तो करण्यासही नको. शहरात गेलो तर माझ्या भाषेला कोणी हसतील, मला गावंढळ म्हणतील ही भीती गावाकडील मराठी जनांच्या मनातून निघण्यास हवी. तशी भीती ग्रामीणांच्या, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या मनात दिसते. शहरात गेलो तर शहरातल्यासारखे बोलता आले पाहिजे हा विचार त्यांच्या मनात येतो. महाराष्ट्रात कोठेही जा दर दहा कोसावर म्हणजेच जवळपास पंचवीस किलोमीटरवर भाषा बदलत असते. विदर्भ, मराठवाडाकोकणखानदेश यांपुरते ते मर्यादित नाही. एका जिल्ह्यात भाषा दोन ते चार प्रकारे बदलताना दिसू शकते. ते सर्व शब्द मराठीच होत. जर दुसरे भाषिक राज्य लागून असेल तर त्या भाषेचा प्रभाव असतो. मूळ प्रमाण मराठीशी साम्य सांगणारे ते शब्द असतात; फक्त जसेच्या तसे नसतात.

आणि बोलीभाषेतही तसे किती शब्द असतात? तर फार कमी. बाकी शब्द हे प्रमाणभाषेतीलच असतात. ‘मला’ हा शब्द प्रमाणभाषेत आहे. त्या शब्दाला मले हा शब्द वऱ्हाडी, काही मराठवाड्यात, तर कोकणात मना हा शब्द वापरतात. कोथिंबिरीला विदर्भात सांबार म्हणतात. रात्रौ हा प्रमाणभाषेत मूळ शब्द आहे. पण प्रमाणभाषा मानणारेसुद्धा तो शब्द ‘रात्रौ’ असा ना उच्चारता रात्री असा उच्चारतात. मात्र झाडीत तो शब्द रात्रौ असा बोलला जातो. महाराष्ट्रातील आदिवासी बोलीभाषांवर सुद्धा मराठीचा प्रभाव जाणवतो. कातकरी बोलीभाषेत कोठे ला कुसं, केव्हाला कदवा, तुझीला तुनी, केवढाला कोडा असे, मराठीशी साम्य दर्शवणारे शब्द वापरतात. ठाकर या आदिवासी जमातीची बोलीसुद्धा मराठीशी साम्य साधणारी आहे, पण त्या भाषेचा लहेजा वेगळा आहे. प्रमाण मराठीत पांढरा या रंगासाठी धवल हा शब्द आहे, मात्र विदर्भात धवळा हा शब्द सर्रास वापरला जातो आणि तो बैलाकरता जास्त वापरला जातो. लालसर पिवळा अशा बैलास लाखा हा शब्द वापरतात, मात्र इतरत्र कोठेही तो शब्द वापरात दिसत नाही. मग एका रंगाचे ते नाव म्हणून आपण त्याला का स्वीकारू नये? कातकरी आणि ठाकरी या दोन्ही भाषांत पांढऱ्या रंगासाठी धवळा हाच शब्द वापरला जातो.

त्यामुळे प्रमाणभाषेच्या जोखडातून बाहेर येऊन बोलीभाषांतील जे जे शब्द आहेl त्याला प्रमाणभाषेचा दर्जा मिळणे आवश्यक आहे. अनेक पिढ्यान् पिढ्या ते शब्द बोलले जात आहेत. त्यामुळे मराठीचे शब्दभांडार समृद्ध होणार आहे. उदाहरणार्थ १. बावळट, बह्याड, बायताड, पागल, म्याड, म्याट, २. म्हटलं, मनलं, मतलं, बोललो, ३. भाऊ, गडी, दादा, बंधू याप्रमाणे एकाच अर्थाचे शब्द आहेत, पण ते क्षेत्रानुसार बोलले जातात. त्या त्या भागात बोलीभाषेत त्याला अधिष्ठान आहे. ते अधिष्ठान सर्वांनी स्वीकारले पाहिजे. मराठीची काळजीवाहू म्हणून बोलीभाषांना योग्य अधिष्ठान प्राप्त करून दिल्यास मराठीचा झेंडा निश्चितच उंच फडकणार आहे.

मराठी साहित्यात ग्रामीण क्षेत्राचे योगदान हे महत्त्वाचे आहे. त्या ग्रामीण साहित्यिकांचा सन्मान, त्यांना योग्य स्थान देणे आवश्यक आहे. ग्रामीण महाराष्ट्रात सकस, दर्जेदार लेखन करणारे काही साहित्यिक आहेत, पण त्यांना मराठी साहित्याच्या क्षितिजावर संधी मिळत नाही. प्रतिमा इंगोले महाराष्ट्रातील बोलीभाषांची चळवळ चालवतात. हरिश्चंद्र बोरकर यांच्यासारखे साहित्यिक, कलावंत झाडीबोलीची चळवळ उभी करतात, दंडार या लोककलेस जिवंत करण्यासाठी धडपडतात, नितीन देशमुख यांच्यासारखा कवी, त्यांचा लिहिलेला प्रत्येक शब्द काहीतरी शिकवूनच जातो. गंगाधर मुटे यांच्यासारखा माणूस शेतकरी साहित्याकरता शेतकरी साहित्य चळवळ चालवतो. त्यांची संमेलने घेतो. बंडोपंत बोडेकर यांच्या ‘खंजडी’तून अस्सल झाडीबोलीचे दर्शन घडते. अविनाश पोईनकर हा युवा साहित्यिक वास्तवाची पेरणी करतो. का.रा. चव्हाण, नरेंद्र इंगळे, किशोर बळी यांच्यासारखे साहित्यिक वऱ्हाडीच्या संवर्धनासाठी कवी-लेखकांना लिहिते-बोलते करतात, तर लक्ष्मण खोब्रागडे हा युवा साहित्यिक अस्सल झाडीबोलीचा खजिना म्हणता येईल असा ‘मोरगाड’सारखा कवितासंग्रह लोकांसमोर ठेवतो तेव्हा मराठी भाषेची चिंता असावी का असे वाटते !

भाषेच्या प्रचाराकरता, बोलीभाषेच्या प्रचाराकरता गेल्या पन्नास-साठ वर्षांत जे काम झाले ते गेल्या दोन-चार वर्षांत युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या माध्यमाचा सकारात्मक वापर करून होत आहे. कराळे सर, अमरावतीची YFP फिल्म, विजय खंदारे, सोलापुरी-कोल्हापुरी युट्यूब चॅनेल, कोकणातील कोकण नाऊ, कोकणातील विनायक माली यांचे चॅनल, खानदेशी बोलीभाषेकरता असलेली चॅनेल यांसारख्या माध्यमातून. त्यामुळे मला वैयक्तिक रीत्या भाषेची चिंता वाटत नाही. मात्र तिला जगवण्याकरता, समृद्ध करण्याकरता व्यापक होणे आवश्यक आहे. बोलीभाषा ही अस्सल आहे. त्यामुळे तिच्यातून संवाद झाला तर तो निश्चितच प्रभावी होत असतो आणि त्या बोलीभाषेतून निर्माण होणारे साहित्य हेसुद्धा अस्सलच असणार आहे. काही इंग्रजी शब्द मराठीत येतील. काळानुसार ते एकरूप होतील. त्यांना पर्याय शोधण्याचा प्रयत्न करूया. तसे नाही झाले तर ते शब्द स्वीकारूया. ज्ञानेश्वरीतील मराठी आणि आजची मराठी यांत फरक आहे, तोच फरक मराठीच्या बाबतीत भविष्यातही राहणार आहे, ही जाणीव ठेवली तर मराठीला कोणतीही चिंता नाही. मराठी जगेल आणि मानाने जगेल याबाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

– श्रीकांत धोटे 9511783236/8087332593 shrikantdhote29@gmail.com

———————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here