मराठी चित्रपटांचे यश-अळवावरचे पाणी

0
41

मराठी संस्कृतीमध्ये मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा अग्रस्थान मिळत आहे. प्रथम दामले-फतेलाल-शांतारामबापू यांनी 1930 – 1940 चे दशक गाजवले आणि काही अभिजात कलाकृती निर्माण केल्या. उदाहरणार्थ, ‘माणूस’,कुंकू’,रामशास्त्री’. त्यानंतर 1950 नंतरची वीस वर्षें माडगूळकर – फडके- राजा परांजपे यांनी गाजवली आणि ‘लाखाची गोष्ट’ सारख्या अजरामर कृती निर्माण केल्या. त्याच कालखंडात अनंत माने यांच्या ‘सांगत्ये ऎका’ सारख्या चित्रपटानी इतिहास निर्माण केला व तमाशापटांचा फॉर्म्युला बनून गेला.

त्याला छेद दिला तो दादा कोंडके यांनी. त्यांनी चित्रपटाचे सारे संकेतच बदलून टाकले. मंदावलेल्या त्यानंतरच्या काळात पुन्हा एकदा मराठी चित्रपटांना संजीवनी प्राप्त होत आहे, ती नव्या तरुण दिग्दर्शकांकडून. मराठी चित्रपटातील या नव्या लाटेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न येथे चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकरसतोष पाठारे यांनी केला आहे. त्यातून निर्माण होणारा वेगळा स्वरुपाचा प्रश्न मांडला आहे आशुतोष गोडबोले यांनी.

मराठी चित्रपटांचे यश-अळवावरचे पाणी

मराठी सिनेमा सध्या खूप चर्चेत आहे. ‘जोगवा’ला पाच राष्ट्रीय पारितोषिके मिळाली. ‘नटरंग’ने आठ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. ‘विहीर’ बर्लिन महोत्सवात गाजला. स्वाभिमान संघटनेने हरकत घेतली, म्हणून ‘झेंडा’चे प्रकाशन दोन आठवडे लांबणीवर पडले. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ ऑस्करला भारतातर्फे पाठवण्यात आला. तो पाहायला प्रेक्षकांनी गर्दी केली. ‘गाभ्रीचा पाऊस’ला फ्रान्समधल्या व्हिसोल महोत्सवात उत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक मिळाले. हे सगळे चित्रपट चाळिशीच्या आतल्या तरुण दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेले आहेत. त्याबद्दल मराठी माणसांना अभिमान वाटत आहे.

रवी जाधव (नटरंग),परेश मोकाशी (हरिश्चंद्राची फॅक्टरी), सचिन कुंडलकर (गंध), उमेश कुलकर्णी (विहीर), राजीव पाटील (जोगवा), सतीश मन्वर (गाभ्रीचा पाऊस) या तरुण दिग्दर्शकांनी मराठी सिनेमाला चर्चेत आणले आहे. काहींनी मराठीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले आहे. राष्ट्रीय पारितोषिकांच्या निवड समितीचे अध्यक्ष विख्यात मल्य़ाळी दिग्दर्शक शाजी करुण होते. पारितोषिके जाहीर करताना, त्यांनी मराठी सिनेमातील विविधतेचे कौतुक केले.

हे सारे ऎकून मराठी प्रेक्षकांचा उर भरून येतो!  तसे व्हायलाही पाहिजे. गेल्या पन्नास वर्षांत हिंदीच्या आक्रमणामुळे मराठी सिनेमा वळचणीला जाऊन बसला होता. एखाददुसरा चांगला चित्रपट निघाला किंवा ‘सांगत्ये ऎका’ने 130 आठवडे चालण्याचा पुण्यात विक्रम केला, तर त्याचे कौतुक होई, परंतु मराठी चित्रपटांचे दर्जा व गल्ला ह्या दोन्ही बाबतीत रडगाणे असे. स्वाभाविक मराठी वृत्तपत्रांना त्याकडे लक्ष द्यायला फुरसत नव्हती. त्या मानाने आजची परिस्थिती चांगली आहे. मराठी वृत्तपत्रे, मराठी वाहिन्या मराठी चित्रपटांच्या तरुण दिग्दर्शकांच्या प्रशंसेने भरलेले असतात. त्यात मराठी व हिंदी चित्रपटांची तुलनादेखील काही वेळा आढळते. पण मराठी सिनेमा चर्चेत येणे म्हणजे त्याची गुणवत्ता वाढली का? किंवा प्रेक्षकांनी त्याचे स्वागत केले का?

हे खरे, की नवे चित्रपट कौटुंबिक ग्रामीण-विनोदी या मराठी चित्रपटांच्या फॉर्म्युल्याहून पूर्णत: वेगळे आहेत. या तरुणांनी मराठीचा गेल्या पन्नास वर्षांतला साचा जाणीवपूर्वक नाकारला आहे, पण त्यांची ही वैयक्तिक निवड आहे. त्यामागे समग्र चळवळीचा विचार नाही.

चित्रपटांना जेव्हा ख-या अर्थाने कलात्मक व वास्तववादी वळण लाभले, त्या 1940-50 दशकात इटालीतली ‘नववास्तववाद’ ही चळवळ चार-पाच इटालियन दिग्दर्शक एकत्र येऊन सुरू झाली. स्वाभाविकच, इटालियन नववास्तववादी चित्रपटांनी (‘बायसिकल थीव्हज’ हे शिखर) जगभरच्या सिनेमावर प्रभाव टाकला. फ्रान्समधील ‘न्यू वेव्ह’ चळवळ तिथल्या धंदेवाईक सिनेमाच्या विरोधात उभी ठाकली. तिथल्या चार-पाच दिग्दर्शकांनी सिनेमाचा सखोल विचार करून ‘न्यू वेव्ह’चा जन्म झाला. एक चळवळ उभी राहिली. ‘न्यू-वेव्ह’ने युरोपीयन सिनेमावर प्रभाव टाकला. लांब कशाला, सत्तरच्या दशकात हिंदी सिनेमात ‘समांतर सिनेमा’चळवळ म्हणून उभा राहिला. मृणाल सेनच्या चित्रपटापासून त्याचा आरंभ मानतात. मग त्या परंपरेत श्याम बेनेगल, बासू चतर्जी, गोविंद निहलानी असे दिग्दर्शक वेगळे चित्रपट बनवू लागले. त्या सुमारास नव्या जाणिवांनी प्रेरित होऊन मल्याळी, कन्नड भाषांत नव चित्रपटनिर्मिती झाली. मराठीत जब्बार पटेल, अमोल पालेकर हे त्या लाटेनेच प्रभावित झाले. त्या सर्व सिनेमांत सूत्र एक होते. विषय व मांडणी यांत एक नवा दृष्टिकोन होता.

नवीन मराठी तरुण दिग्दर्शक जी झेप घेऊ पाहात आहेत त्यामागे असे समान सूत्र नाही. सिनेमासंबंधीचा खोल विचार नाही. यामुळे एकही चित्रपट ‘अभिजात’ या संज्ञेला पोचू शकत नाही.

रवी जाधव जाहिरात कंपनीतून आला, परेश मोकाशी व सतीश मन्वर नाटकातून आले. उमेश कुलकर्णी व सचिन कुंडलकर फिल्म इन्स्टिट्यूटमधून आले. या भिन्न भिन्न पार्श्वभूमीमुळे असेल कदाचित, पण या तरुण दिग्दर्शकांना एकत्र येऊन सिनेमाचा खोल विचार करावा असे वाटत नाही. की त्यांच्या प्रत्येकी स्वतंत्र व्यक्तिगत प्रेरणेच्या मागे सामाजिक कारणे आहेत? की आजच्या काळात नव्या अशा सामाजिक जाणिवा नाहीत? हा समाजशास्त्रीय अभ्यासाचा विषय ठरेल. त्याचप्रमाणे सध्या सर्वत्र जो व्यक्तिवाद बोकाळला आहे आणि त्यामुळे समाजातील आंदोलने वगैरे थंडावली आहेत. कोणत्याच क्षेत्रात सामुहिक कृती दिसत नाही. तसेच चित्रपट क्षेत्रात घडत आहे का? शिवाय आता तंत्रसाधने सहज उपलब्ध होऊ लागली आहेत त्यामुळे व्यक्तिगत प्रयत्नांना भरपूर वाव आहे. त्यामुळेच चळवळ उभी राहण्याची शक्यता दिसत नाही. स्वाभाविकच, सध्याचा चर्चेत असलेला मराठी सिनेमा केवळ अळवावरचे पाणी ठऱण्याची शक्यता आहे. अभिजात चित्रपटांकडे या तरुणांच्या सिनेमाची वाटचाल होणे अवघड दिसते.

  1. सुधीर नांदगावकर

भ्रमणध्वनी – 9323941897


मराठी चित्रपट सशक्त होताहेत?

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी मारलेली बाजी आणि ‘नटरंग’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मिळालेले यश, यांमुळे मराठी चित्रपटसृष्टीत सध्या आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. वाढत्या मराठी चॅनेल्समुळे चित्रपट प्रदर्शित होताना मिळणारी प्रसिध्दी, वर्तमानपत्रांतून छापून येणारी सकारात्मक परीक्षणं, कलावंतांच्या मुलाखती, धडाक्यात साजरे होणारे ‘प्रिमियर शोज’ यामुळे मराठी चित्रपटसृष्टी हिंदी चित्रपटसृष्टीच्या तोडीस तोड बनली आहे असं चित्र उभं राहतंय.

अमराठी प्रेक्षकांमध्ये मराठी चित्रपटांबद्दल कुतूहल निर्माण होणं, मराठी चित्रपटांनी कोटींमध्ये व्यवसाय करणं व मराठी कलावंतांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर वर्चस्व गाजवणं या सर्व गोष्टी कौतुकास्पद असल्या, तरी याच पार्श्वभूमीवर मराठी चित्रपट सकस झाले का? मराठी चित्रपटसृष्टीचं स्वत:चं स्थान राष्ट्रीय स्तरावर निर्माण झालंय का या प्रश्नांचा वेध घेणं गरजेचं आहे.

सचिन कुंडलकरच्या ‘निरोप’, ‘गंध’ या चित्रपटांना मागील दोन वर्षांत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, परंतु हे चित्रपट मुंबईत प्रदर्शितही होऊ शकले नाहीत. सर्वोत्कृष्ट अभिनय, संगीत यांसारखी पॉप्युलर अवॉर्ड्स मिळालेला ‘जोगवा’ मुंबईत कधी प्रदर्शित होऊन गेला याची माहितीही प्रेक्षकांना मिळाली नाही आणि दोन-तीन चित्रपट यशस्वी होत असताना अनेक चित्रपट केवळ एका ‘शो’पुरते प्रदर्शित होऊन लुप्त झाले, या वस्तुस्थितीचा मागोवादेखील घ्यायला हवा.

मराठी चित्रपट आशय, तंत्र, शैली व वितरण या सर्व पातळयांवर हिंदी चित्रपटांपासून भिन्न होती. गेल्या काही वर्षांत मात्र ज्या प्रकारचे मनोरंजन चित्रपटांतून मिळतं ते मराठी चित्रपटांतून दिलं तर मराठी प्रेक्षक पुन्हा मराठी चित्रपटांकडे वळेल असा अंदाज बांधून चित्रपटनिर्मिती करणाऱ्यांची संख्या वाढली. लक्ष्मीकांत बेर्डे व अलका कुबल पंथांतील विनोदी व कौटुंबिक चित्रपटांची निर्मिती मंदावली. (अशा प्रकारचे चित्रपट ग्रामीण भागात अजूनही चालतात. हे आपण चित्रपट साक्षरता रुजवू शकलो नाही याचे द्योतक आहे!) मनोरंजनपर चित्रपट मोठया प्रमाणावर निर्माण होत असताना चित्रपटमाध्यमाचा अभ्यास करणा-या व व्यावसायिक गणितांचा फारसा विचार न करता चित्रपटमाध्यमावर प्रेम करणा-या दिग्दर्शकांची एक फळी उभी राहिली आहे.

चित्रपटांच्या बरोबरीने साहित्य, चित्रकला, नाटक या कलांचा अभ्यास असणा-या सचिन कुंडलकर, संदिप सावंत, उमेश कुलकर्णी, निशिकांत कामत, राजीव पाटील, परेश मोकाशी यांसारख्या दिग्दर्शकांनी मराठी चित्रपटांना ‘फ्रेश लुक’ दिला. त्यांनी निर्माण केलेल्या कलाकृतींच्या दर्जाच्या बाबतीत मतभिन्नता असेल, मात्र त्यांनी निर्माण केलेले चित्रपट हे हिंदी चित्रपटांची नक्कल नाहीत. आशयघन मराठी चित्रपटांची परंपरा पुढे नेण्याची क्षमता या चित्रपटांत आहे व मराठी चित्रपटसृष्टीचं स्थान अबाधित राहील असा आशावादही त्यांत आहे.

पण केवळ असे मोजके वेगळे चित्रपट व दोन-चार सुपरहिट चित्रपट म्हणजे पूर्ण मराठी चित्रपटसृष्टी नव्हे, याचं भानही निर्माते, कलावंत व प्रेक्षक यांना असायला हवं. आपण ज्या चित्रपटांना प्रतिसाद देतो त्याचं किमान कलात्मक मूल्य काय आहे? याची समज प्रेक्षकांना असायला हवी व आपण प्रेक्षकांना गृहित धरून चित्रपट निर्माण करतो का? तर्क टांगणीला लावून निर्माण केलेले चित्रपट काळाच्या कसोटीवर तग धरतील का? (किमान चित्रपटगृहात एक-दोन आठवडे तरी चालतील का?) याचा विचार निर्माता-दिग्दर्शकांनी करायला हवा!

चित्रपट हे माध्यम मनोरंजन करणारं आहे व चित्रपटनिर्मिती हा व्यवसाय आहे, हे कुणीही अमान्य करणार नाही. मात्र आपण तिकिट काढून जे मनोरंजन करून घेणार आहोत ते कोणत्या प्रतीचं आहे याचं मूल्यमापन समजुतदार प्रेक्षकांनी करायला हवं. दुर्दैवानं, मराठी प्रेक्षक भाबडा आहे. डोळयांतून अश्रू वाहायला लावणारी किंवा खळखळून हसवणारी कथा असलेला बोलपट म्हणजे चित्रपट अशा समजुतीमधून प्रेक्षक बाहेर पडलेला नाही, किंबहुना तो त्यातून बाहेर पडू नये याची खबरदारी घेणारे चित्रपट बहुसंख्येनं आपल्या इथं निर्माण झाले व होत आहेत. काही तथाकथित कलात्मक दिग्दर्शक आपली वेगळी चूल मांडून चित्रपट महोत्सवांपुरते चित्रपट निर्माण करतात. पुन्हा, या चित्रपटांची रोखठोकपणे समीक्षा करणा-या मंडळींचीदेखील वानवा आहे.

तंत्राची मिरासदारी दाखवणारे चित्रपट त्यातील आशयाला गुदमरवून टाकतात, तर काही दिग्दर्शक आशयाला दुर्बोध करून टाकतात. अशा चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरवतात आणि आमच्या चित्रपटांना प्रेक्षक येत नाहीत हे दु:ख आळवायला दिग्दर्शक-निर्माते मोकळे होतात.

चित्रपट महोत्सवात गाजला किंवा चित्रपटानं मराठी अस्मितेच्या जोरावर कोटयवधीचा धंदा केला म्हणजे तो चित्रपट दर्जेदार असतोच असं समजायचं कारण नाही. त्या चित्रपटाचा आस्वाद घेताना त्यातल्या गुणदोषांचा लेखाजोखा मांडला जायला हवा. दिग्दर्शकानं देखील खुल्या मनानं तो स्वीकारायला हवा.

चित्रपट हे दिग्दर्शकाचं आविष्कार स्वातंत्र्य आहे. त्याचं योग्य मूल्यमापन करणारे समीक्षक, चित्रपट पाहून त्याबद्दल आपलं मत स्पष्टपणे व्यक्त करणारे प्रेक्षक आणि या प्रेक्षकांसाठी कला व व्यवसाय यांची सांगड घालणारा चित्रपट निर्माण करणारे दिग्दर्शक आपल्या इथं तयार झाले तरच मराठी चित्रपटसृष्टी सशक्त होईल. संपूर्ण चित्रपटसृष्टीचा व प्रेक्षकांचा विचार केला तर ही गोष्ट अशक्यप्राय वाटत असली तरीही चांगले चित्रपट मोठया प्रमाणावर निर्माण झाले. चांगला व वाईट चित्रपट कोणता हे पारखण्याची नजर प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली तर गोष्ट अशक्यप्राय निश्चित नाही.

– संतोष पाठारे

 

‘जोगवा’ने निर्माण केलेला प्रश्न..

‘जोगवा’चा अनेक अंगांनी गौरव झाला. मुख्य अभिनेता उपेंद्र लिमये आणि संगीतकार अजय-अतुल यांना राष्ट्रीय पुस्कारही लाभला. स्वतंत्रपणे लोकांना हा चित्रपट खूप भावला. परंतु या चित्रपटाने थोडा वेगळा प्रश्न प्रकर्षाने निर्माण केला. मराठी चित्रपटात सध्या जी नवी लाट आली आहे तिचा आरंभ स्मिता तळवळकरच्या ‘सातच्या आत घरात’ या चित्रपटापासून झाला असे ढोबळपणे म्हणता येईल. ‘सातच्या आत’ हा तांत्रिकदृष्टया चटपटीत सिनेमा होता. त्यात भावनेचा परिपोषही चांगला साधला गेला होता. परंतु त्यातील जी मुख्य समस्या – तरुणांचे संस्कारहीन जीवन – ती हव्या तेवढ्या ठळकपणे मांडली जात नाही. ‘जोगवा’च्या बाबतीतही असाच अनुभव येतो. हा चित्रपट सर्व दृष्टीनी आकर्षक आहे. परंतु त्याचा ठसा शेवटी एक प्रेमकहाणी अशा स्वरूपात राहतो. देवदासी व यल्लमा देवीबद्दलची अंधश्रद्धा हा जो गाभ्याचा प्रश्न तो चित्रपटामधून प्रकर्षाने पुढे येत नाही. यापूर्वी यल्लमा व देवदासी या विषयावर मराठीत एक-दोन चित्रपट निर्माण झाले ते अंधश्रद्धाविरोधी मोहिमेचा व देवदासीच्या दुर्दशेविरुद्ध मोहिमेचा भाग बनून गेले. ह्या दृष्टीने जागरुक प्रेक्षकांना आशयदृष्टया ते चित्रपट किंवा त्यासारखे सामाजिक विषयावरचे चित्रपट महत्त्वाचे वाटत. परंतु ‘जोगवा’ने नवाच प्रश्न निर्माण केला तो कला आणि सामाजिक संदर्भ या स्वरुपाचा. नव्या बदललेल्या परिस्थितीमध्ये कलेचा उपयोग निव्वळ कलाविष्कारासाठी करायचा की त्यामधून सामाजिक संदेशही द्यायचा? हा जुना वाद पुन्हा एकदा निर्माण होत आहे. चित्रपटाचे तंत्र व त्यावरील दिग्दर्शकांची हुकूमत जसजशी अधिक वाढेल तसतसे या प्रश्नाचे गांभीर्य अधिक गडद होत जाईल.

– आशुतोष गोडबोले

About Post Author

Previous articleगंमत एका अक्षराची आणि शब्दाची!
Next articleअलौकिक क्षण!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.