मराठी कवींचा ‘सेफ्टी झोन’

8
29

घर नावाच्या परिघाबाहेर पडल्यानंतर उमगू लागते, की जग ही काय ‘चीज’ आहे! त्याप्रमाणे मातृभाषेच्या कुशीतून उठून, इतर भाषांच्या आवारात जाऊन आल्यानंतर व्यक्तीला कळते, की तिचे ऐकण्याचे, वाचण्याचे, जाणून घेण्याचे किती राहून गेले आहे! मी ‘कविता’ हे गंभीरपणे व्यक्त होण्याचे माध्यम म्हणून निवडले तेव्हा त्या फॉर्ममध्ये पूर्वसुरींनी करून ठेवलेली नक्षत्रे माझ्या मनाच्या कोंदणात फिट्ट बसलेली होतीच. मैदानात प्रत्यक्ष उतरल्यावर, माझ्या निरखण्यात हेही आले, की काही जण त्यांची वाटचाल ज्येष्ठांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सुरू करतात, काही स्वतःची स्वतंत्र अशी वाट अस्तित्वात आणतात, तर काही हयात प्रस्थापित मद्दड कवींच्या जाळ्यात अडकून स्वतःचे वाट्टोळे करून घेतात. कविता करता करता माझे मला जाणवले, की भाषेत सहजता कालांतराने येते, त्या पाठोपाठ विचारांत चलाखी. मग सादरीकरणाला प्रेक्षकांचा बरा प्रतिसाद मिळू लागतो. तेव्हा काही नवकवी त्यामुळे मनातून गुलाबी गुलाबी होऊन जातातही.

मी माझ्या समवयस्क ‘तरुण मराठी कविताविश्वा’कडे उंचीवरून पाहतो तेव्हा आनंद आणि दुःख, अशा दोन्हींची संमिश्र भावना उदयास येते. आनंद याकरता, की इंग्रजी भाषेची कट्यार काळजात रोवून असलेल्या आजच्या मराठी भाषेचा निर्मितीचा सशक्त पान्हा अद्याप आटलेला नाही आणि दुःख याकरता, की आत्मलुब्धतेच्या शापामुळे स्वतःच्याच प्रेमात असलेली आमची बहुतांश पिढी भाषेसाठी भविष्यातील सुरुंग पेरून ठेवत आहे! ‘सोशल मिडिया’ हा जो काही ‘असामाजिक’ प्रकार काही वर्षांपासून उदयास आला, त्याने ते दान या पिढीला देऊ केले आहे का? आमच्या पिढीला कवितेचे सशक्त संपादन, जिवंत समीक्षा हा प्रकारच अनुभवता आलेला नाही. आम्हा तरुणांची स्वसंपादित कविता सोशल मीडियावरील शेकडो ‘लाईक्स’ आणि काही ‘कमेंट्स’ यांवर थांबते, गोठते! त्यांना ‘लाईक्स’चा मिळणारा आकडा पुनःपुन्हा तेच ते करण्यासाठी उद्युक्त करत राहतो आणि ते त्या ‘वेब’मध्ये अडकत जातात. तो कवी त्या शेकडो ‘लाईक्स’पलीकडे सहस्रावधी मनांचे अफाट जग आहे ते विसरून जातो.

कलेच्या पटांगणात रमल्यानंतर ज्याक्षणी कलावंताला ‘सेफ’ वाटू लागते तेव्हाच त्याला मुळात सावध होण्याची गरज आहे. कलाक्षेत्रात ‘सेटल’ हा शब्दच अस्तित्वात नाही! मनुष्य संपल्यानंतर जेव्हा त्याची कला मागे उरते आणि लोकांच्या लक्षात राहते तेव्हा कोठे त्याच्या प्रस्थापित होण्याला सुरुवात होते; ज्ञानेश्वर, कालिदास तसे ‘घडले!’, शेक्सपीयर तसा टिकून राहिला. मुळात त्या अर्थाने आम्हा तरुणांना मार्गदर्शन करणारी, काही चुकले तर सावरणारी मध्यमवयीन पिढीही आधार देण्यास नाही. आमची तरुण पिढी काव्यकलेच्या दृष्टीने अनाथ काळ अनुभवत आहे!

कॉस्मोपोलिटन जग मात्र कवितेच्या बाबत फारच सजग जाणवते. ‘कविता’ हा प्रकार भाषांचे कुंपण ओलांडून फार दूरपर्यंत पोचला आहे. ‘कॅफे रीडिंग’ हा प्रकार ठिकठिकाणी होताना दिसतो. एखाद्या कॉफी शॉपमध्ये किंवा एका ठरावीक ठिकाणी आबालवृद्ध जमून, त्यांच्या त्यांच्या कवितांचे वाचन करून, त्यावर चर्चा करतात. मुंबईमध्ये ‘द पोएट्री क्लब’, ‘पोएट्री ट्युसडे’, ‘अनइरेज पोएट्री’, ‘कम्युन’ असे केवळ कवितांसाठी वाहून घेतलेले कट्टे आहेत आणि अभिमानाची बाब म्हणजे त्यांतील बरेच तरुणांनी सुरू केलेले आहेत. ते अविरतपणे कवितेचे काम करत आहेत. त्यांची कार्यपद्धत काटेकोर आहे. त्या कट्यांमध्ये भाषेचे बंधन अजिबात नाही. भाषेच्या, विषयाच्या, आशयाच्या आणि सर्वच दृष्टींनी सर्वसमावेशक अशा त्या कट्यांमधील वातावरण निरोगी असते. हिंदी, इंग्रजी, मराठी, उर्दू, गुजराथी अशा भाषांमधील कवी त्यांच्या त्यांच्या लाडक्या कलाकृती तेथे सादर करतात. प्रादेशिक भाषा समजत नसतील कदाचित, परंतु तेथे त्यातील आशय समजावला जातो आणि त्या त्या भाषांचे लावण्य जरी कळले नाही तरी ती ती भाषा कानावरून तर जाते आणि कवीचा नखरा, त्याचा आतील विश्वास समजतो. कवी-कट्यांवरील दुनिया वेगळी असते. भिन्न भिन्न विचार करणारी चार भाषांतील चार, कधीच न भेटलेली माणसे जेव्हा एकत्र व बरोबर वावरतात, तेव्हा केवळ भाषांची अदलाबदल होत नाही, तर त्या सर्वांतून वेगळीच ऊर्जा तयार होते व ती प्रत्येक कवीत घुमत असल्याचे जाणवते. अशा सेशन्समध्ये कविता वाचताना चांगल्या मुद्यांवर मध्येच आपोआप ‘टिचक्या’ ऐकू येतात (होय ‘टिचक्या’च), नंतर कळते, की ती त्यांची दाद देण्याची पद्धत आहे. ‘दाद द्यायची तर खुलून, दणकून द्या’ असेही कधी वाटून जाते. तेथे केवळ कवितांची अदलाबदल होत नाही तर कधीतरी व्यावसायिक बोलणीदेखील उद्भवतात आणि पार पडतात. प्रुफरीडिंगचे किंवा भाषांतराचे किंवा स्वतंत्र गीत लिहून देण्याचे काम मिळू शकते, कारण विविध क्षेत्रांतील मंडळी तेथे जमलेली असतात. अनेक ठिकाणी संमेलने बहुभाषिक असतात, तेथे जर एकाद्याच्या कवितेमध्ये तेवढी ताकद असेल तर त्याला कविता सादरीकरणाकरता आमंत्रितही केले जाते. परंतु तेथे हे सगळे अनुभवता येते किंवा काहीही अनुभवता येत नाही; ते कळण्यासाठीसुद्धा तेथे जावे लागते आणि तेच विशेषत: तरुण मराठी कवींकडून फारसे होत नाही.

मराठीत सशक्त लिहिणारे त्यांचा बहुमूल्य वेळ त्यांच्या त्यांच्या चाहत्यांना रिझवण्यासाठी घालवतात; ते बहुभाषिक कट्यांकडे फिरकतच नाहीत. त्यांना त्यांचा ‘सेफ्टी झोन’ स्वतःच्या भाषेपलीकडे जाऊ देत नाही, बहुधा. तो त्यांच्या भाषेचा न्यूनगंड नसून, ती  समोरून कदाचित न मिळणाऱ्या प्रतिसादाच्या भीतीतून उमटलेली प्रतिक्रिया असावी. मराठी कवी बहुभाषी कविकट्यावर पहिल्यांदा येतो तेव्हा तो इतरांकडे आणि इतर त्याच्याकडे अनपेक्षित नजरेने बघत असतात. कट्टे बऱ्याचदा मुख्य शहरात म्हणजे दक्षिण मुंबईपासून शीव-खारपर्यंत आणि शहरातही उच्चभ्रू वस्तीत होत असल्यामुळे तेथे येणारे जनही उच्च वर्गातील भासतात. त्यांची जीवनशैली व वर्तनशैली तशी असते. तेथे मराठी नवकवी कावराबावरा होतो. त्याची स्थिती ‘साऱ्याच’ बाबतीत ‘हे पाहू की ते पाहू गं, हवेत डोळे सतरा’ अशी होते. तो त्या वातावरणाशी जुळवून घेण्यास हळूहळू सुरुवात करतो! इतरांच्या कविता ऐकताना बऱ्याचदा काही कळले नाही तरी, सुरात सूर मिसळावा तशी दादेत दाद मिसळतो आणि नकळत त्या साऱ्यात रममाण होतो. नंतर अचानक त्याचे नाव पुकारले जाते, ‘so today we have a Marathi poet …….. with us, please give him/her a round of applause’. तो कवी आवंढा गिळत माईकसमोर येतो. त्याने कविता त्या आधी स्वतःच्या मित्रांसमोर, मराठी जाणकारांसमोर वाचलेली असते. पण त्याच्या पोटात तेथे मराठीचा गंध नसणाऱ्या किंवा असला तरी फारसा न दिसणाऱ्या लोकांसमोर कविता वाचण्यास सुरुवात करण्याआधी सहज गोळा येतो. तेथे श्रोते मात्र स्वागतशील व ‘चांगल्या’साठी श्रवणोत्सुक असतात. ते भाषिक कवींची आरंभीची मुखदुर्बलता समजून घेतात. कवीला ‘चिअर अप’ करतात. त्याला त्याच्या कवितेचा अर्थ विचारतात. कवीने त्या पायर्याी धाडसाने पार केल्या तर त्याला तेथे स्वीकारले जात आहे हे आश्चर्यकारक रीत्या उमजते व त्या कवीचा आत्मविश्वास वाढतो आणि ती किंवा तो एकाऐवजी दोन कविता वाचूनच माईकसमोरून हटतो/हटते.

बहुभाषिक कट्यांवरील मंडळी खरे तर अशा विविध भाषांना ऐकण्यासाठी उत्सुक असतात. तेथे वातावरण वेगळे असते, मोकळे असते. जमलेले लोक वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतून आलेले असतात, त्यांच्या कवितांना त्यांच्या आयुष्यातून लाभलेली वेगवेगळी पार्श्वभूमी अनुभवण्यास मिळते. कवी त्याच्या तेथे असण्यामुळे कदाचित काही मिळवणार नाही; परंतु त्याच्या तेथे नसण्यामुळे तो फार काही बहुमूल्य गमावतो, एवढे मात्र निश्चित.

– आदित्य दवणे

About Post Author

Previous articleयतिन पिंपळे यांच्या नमुनेदार कागदी बस
Next articleऐतिहासिक संदर्भांचे नातेपुते
आदित्य दवणे हा तरूण कवी. तो ठाण्याला राहतो. त्याच्या कल्पनेतून 'नातवंडांच्या कविता' हा वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठी कविता वाचनाचा कार्यक्रम सुरु झाला. तो मुंबईसह राज्यात आणि राज्याबाहेर काही ठिकाणी सादर झाला. आदित्यने लिहिलेल्या 'सारे संगीतकार' या गीताला पंडित यशवंत देव, अशोक पत्की, श्रीधर फडके, सुरेश वाडकर, अजित कडकडे, वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, निलेश मोहरीर यांचा स्वरसाज लाभला. त्याने दासबोधाचे सोप्या भाषेत निरूपण करणारे 'युवा बोध' हे तरुणांसाठीचे सदर दैनिक 'महाराष्ट्र टाईम्स' (नाशिक) मध्ये 2016 साली वर्षभर लिहिले. आदित्यचे लेख-कविता विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत असतात. तो विविध कार्यक्रम-महोत्सवांत कवितांचे वाचन करतो. त्याला 'को.म.सा.प.' संस्थेचा 'सुलोचना मुरारी नार्वेकर लक्षवेधी पुरस्कार' प्राप्त झाला आहे. त्याने 'द पॉइटरी क्लब' हा नवोदितांसाठी कवितांचा कट्टा ठाण्यात सुरु केला. लेखकाचा दूरध्वनी 80972 44465

8 COMMENTS

Comments are closed.