भारतीय रंगभूमीचे अभ्यासक गिरीशचंद्र घोष यांना बंगाली रंगभूमीचे जनक म्हणतात. त्यांनी पाऊणशेहून अधिक नाटके लिहिली, त्यांनी मॅकबेथ या नाटकाचा बंगालीत अनुवाद केला. अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले, कित्येकांना संगीत दिले आणि हजारभर नाट्यप्रयोगांत भूमिका केल्या. मात्र त्यांचा परिचय आणखी एका वेगळ्याच महत्त्वाच्या कारणामुळे आहे. रामकृष्ण परमहंस यांचे ते आवडते शिष्य होते. नुसते आवडते नाही तर महत्त्वाचे. स्वामी चेतनानंद यांनी गिरीशचंद्र घोष यांचे एक चरित्र लिहिले आहे – Girish Chandra Ghosh – A Bohemian Devotee of Sri Ramkrishna. ते चरित्र तब्बल सव्वाचारशे पृष्ठांचे आहे. उत्पल दत्त या प्रसिद्ध अभिनेत्याने लिहिलेले गिरीशचंद्र घोष यांचे एक चरित्र त्याआधी, तीस वर्षांपूर्वी साहित्य अकादमीने प्रसिद्ध केले आहे.
चेतनानंद यांनी लिहिलेल्या चरित्रात असा उल्लेख आला आहे, की गिरीशचंद्र घोष यांनी लिहिलेल्या ‘चैतन्य लीला’ या नाटकाचे प्रयोग कोलकाता येथे 1884 मध्ये होऊ लागले आणि त्यांना विलक्षण गर्दी होत गेली. श्री रामकृष्ण परमहंस यांनी गिरीशचंद्र यांची जी पाच नाटके बघितली त्यांपैकी ते पहिले. त्या नाटकाचा पहिला प्रयोग 2 सप्टेंबर 1884 रोजी झाला. रामकृष्ण ते बघण्यास त्यानंतर साधारण महिन्याभराने गेले. चेतनानंद सांगतात – “पूर्वी सात्त्विक बंगाली लोक नाट्यगृह ही टाळण्याची जागा असे मानत; कारण स्टेजवरील अभिनेत्री वेश्याव्यवसायातील असत. परंतु ‘चैतन्य लीला’ प्रदर्शित झाले आणि लोक नाट्यगृह हे पूजनीय स्थान आहे असे मानू लागले. बंगाली लोकांची आत्मिक बाजू नाटक बघितल्यानंतर जागृत झाली आणि ते परमेश्वराचे नाव घेऊ लागले.”
त्या पुस्तकात असाही एक उल्लेख आला आहे, की त्या काळी नाटकांचे प्रयोग रईस बंगाली गृहस्थांच्या बंगल्यात, बंगल्यातील उद्यानात वगैरे अनेकदा होत असत. त्या संदर्भात मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासात शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विस्मयकारक काही माहिती मिळाली. मराठी रंगभूमीवर स्त्रियांच्या भूमिका प्रथम पुरुष करत असत हे सर्वांना ठाऊक आहे. मात्र, स्त्रियांच्या भूमिका मराठी रंगभूमीवर स्त्रियांनी करण्यास सुरुवात 1865 साली झाली होती असे माहितीजालावरून दिसते. रंगभूमीवर स्त्रियांच्या भूमिका करणाऱ्या स्त्रिया कोण होत्या? नीरा आडारकर यांनी Economic and Political Weekly या साप्ताहिकात लिहिलेल्या लेखात अशी माहिती दिली आहे, की महिलांच्या नाटकमंडळ्या 1908–1925 या काळात होत्या, त्यात महिलांच्या भूमिका तर महिला करत असतच, पण पुरुषांच्या भूमिकाही महिलाच करत असत ! ‘दंडधारी’ नावाचे एक नाटक बेळगावकर महिला नाटक मंडळी करत असे. त्या मंडळींची स्थापना एकंबा नावाच्या एका वेश्येने केलेली होती. ती मंडळी टिळक विचारसरणीच्या बाजूने झुकणारी नाटके करत असे. ‘दंडधारी’ नाटकातील स्त्रियांच्या भूमिकांची प्रशंसा झाली तरी त्या कलाकार बृहन्नडा किंवा अर्धनारी नटेश्वर यांसारख्या दिसतात अशा शब्दांत उपहासही केला गेला होता. आबाजी विष्णू कुलकर्णी यांनी 1903 साली असे मत व्यक्त केले आहे, की “स्त्रियांनी स्त्रियांची भूमिका करण्यात कौशल्य असे काहीच नाही. पुरुषांनी स्त्री भूमिका करण्यात निश्चितपणे कसब आहे.”
स्त्री–पुरुष समानतेबाबत महाराष्ट्रात हिरीरीने कार्य झाले असे आपण म्हणतो, परंतु बंगालमध्ये, गिरीशचंद्र यांच्या नाटकांतून विनोदिनी दासी ही वेश्या-कन्या सुरुवातीपासून काम करत होती. तिने गिरीशचंद्र यांच्या ‘सीतेचा वनवास’ या नाटकात 1880 साली, प्रथम काम केले. ती सीता आणि गिरीशचंद्र राम. तिने ‘चैतन्य लीला’ या नाटकात चैतन्यांचे काम 1884 साली केले होते. गिरीशचंद्र घोष यांची ती आवडती कलाकार होती आणि तिने त्यांच्या काही लोकप्रिय नाटकांत मध्यवर्ती भूमिका केल्या होत्या. नवलाची गोष्ट पुढे आहे. चेतनानंद सांगतात, “मात्र उदारमतवादी म्हणून ओळखले जाणारे ईश्वरचंद्र विद्यासागर आणि रवींद्रनाथ टागोर यांनाही स्त्रियांनी अशा नाटकांत भूमिका करू नये असे वाटत होते.”
गिरीशचंद्र यांनी ‘रंगालय’ या नियतकालिकात लेख 1901 मध्ये लिहिला. त्यात त्यांनी लिहिले, “एखादा मुलगा जसा स्त्रीच्या भूमिकेत चांगले अभिनयकौशल्य दाखवू शकत नाही त्याचप्रमाणे पुरुषाची भूमिका करणारी स्त्री नैसर्गिक अशी दिसत नाही.”
म्हणजे मराठी आणि बंगाली, दोन्ही रंगभूमींवर वारयोषिता सुरुवातीपासून वावरत होत्या आणि त्या गोष्टीला दोन्ही प्रांतांत विरोध झाला.
विष्णुदास भावे यांचे पहिले नाटक 1843 मध्ये सांगलीच्या चिंतामणराव पटवर्धन या संस्थानाधिपतींनी प्रोत्साहित केल्यामुळे रंगभूमीवर आले (सीता-स्वयंवर). त्यानंतर पुढील आठ वर्षे विष्णुदास भावे यांच्या नाटकांचे खेळ सांगलीतच राजाश्रयाने होत असत. भावे यांनी सांगली गाव 1851 मध्ये, राजांचे निधन झाल्यावर सोडले. त्यांनी स्वतः त्याबाबत लिहून ठेवले आहे- “(मी) 1851 नंतर प्रयोग करत वेगवेगळ्या गावी गेलो. तेथे आमच्या नाटकांचे खेळ रस्त्यांवर होत असत. पुण्यात बरेच खेळ झाले. केरूनाना छत्रे, कृष्णशास्त्री चिपळूणकर इत्यादींनी त्या कामी बरीच मदत केली. पुढे मुंबईत गेलो. तेथे गिरगावात आत्माराम शिंपी यांच्या घरी तिकिट लावून खेळ केला.”
अशाच आशयाची एक जाहिरात – भित्तिपत्रक – माहितीजालावर बघण्यास मिळते. ते भित्तिपत्रक 22 ऑगस्ट 1873 या दिवशी होऊ घातलेल्या एका नाट्यप्रयोगाबाबतचे आहे (रूढार्थाने त्याला नाट्यप्रयोग म्हणता येत नाही. त्यात एक नव्हे तर चार वेगवेगळी रंजनदृश्ये होती). त्या जाहिरातीतील लेखाच्या संदर्भातील भाग म्हणजे त्या चार कथानकांची प्रस्तुती ‘बाळाचार्य पंडित यांचे घर, पंच कचेरी नजीक’ होणार होती. नवल म्हणजे तेथेही तिकिट आकारले जाणार होते. त्या दरांचा संबंध जसा आसनाच्या सोयींशी होता तसाच तो स्त्री-प्रेक्षकांच्या वर्गीकरणाशी होता. तेथेही वारयोषितांचा स्पष्ट उल्लेख आहे. त्या नाटकाच्या खेळांना जात असत आणि त्या तशा येतात हे संयोजकांना माहीत होते. तितकेच नाही तर कोणती बाई कुलीन व कोणती अकुलीना हे तिकिटविक्री करणाऱ्या इसमांना माहीत असावे असे त्या जाहिरातींवरून म्हणावे लागते. त्यातील लबाडी करणाऱ्यांना आणि धूम्रपान करणाऱ्यांना दिलेला इशाराही लक्षणीय आहे.
– रामचंद्र वझे 9820946547 vazemukund@yahoo.com
——————————————————————————————————————
————————————-