चंद्रपुरातील साहित्य संमेलनात तीन कोटी रुपयांची ग्रंथविक्री झाली. ही गोष्ट मराठीच्या संदर्भात आश्वासक व प्रेरणादायक आहे. साहित्य संस्था, ग्रंथालये, भाषातज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ यांच्यांत सुसंवाद निर्माण झाल्यास तंत्रयुगातही मराठी भाषा सशक्त होईल. दिल्ली, बनारस, कोलकाता, हैदराबाद, बडोदा, भोपाळ, ग्वाल्हेर, गोवा, छत्तीसगढ, कर्नाटक, दुबई, अमेरिका इथली मराठी माणसे दूर राहूनही आपले मराठी भाषाप्रेम टिकवून आहेत. आंतरिक जाणिवांतून मराठीपण प्रकट होत राहिले तर मराठी भाषा व संस्कृती यांना मरण नाही.